मार्‌तँ द्युगार, रॉझे : (२३ मार्च १८८१–२२ ऑगस्ट १९५८). फ्रेंच कादंबरीकार. जन्म नय्यी-स्युर-सॅन ह्या गावी. पॅरिसच्या एकॉल दे शार्त ह्या शिक्षणसंस्थेत पुराभिलेखशास्त्राचे अध्ययन त्याने केले. दव्हनीर (१९०९, इं. शी.) ही त्याची पहिली कादंबरी. तथापि झां बारूआ (१९१३, इं. भा. १९४९) ह्या कादंबरीमुळे, कादंबरीकार म्हणून त्याच्याकडे प्रथम लक्ष वेधले गेले. फ्रान्समध्ये गाजलेल्या ⇨ ड्रायफस प्रकरणावर ही कादंबरी असून तीत नीती आणि धर्म ह्यांसंबंधीच्या प्रश्नांचा उदापोह त्याने केला आहे. तथापि त्याला जागतिक कीर्ती मिळाली ती ले तिबो (८ खंड, १९२२–४० इं. भा. द वर्ल्ड ऑफ द तिबोज, १९३९–४१) ह्या कादंबरीमुळे. तिबो ह्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील झाक आणि आंत्वान ह्या दोन भावांच्या जीवनाचे चित्रण ह्या कादंबरीत आहे. त्या निमित्ताने पहिल्या महायुद्धाच्या पूर्वीच्या व नंतरच्या फ्रेंच समाजजीवनाचे वास्तव दर्शन ही कादंबरी घडविते. मानव जातीला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे चिंतनही ह्या कादंबरीत आढळून येते. थोर रशियन साहित्यिक लीओ टॉलस्टॉय ह्याच्या ‘वॉर अँड पीस ’ (इं. शी.) ह्या कादंबरीचा मार्‌तँ द्यु गारवर विशेष प्रभाव दिसून येतो. La Confidence africaine (१९३१, इं. शी.) आणि ला व्हियॅय फ्रांस ( १९३३, इं. भा. द पोस्टमन, १९५४) ह्या त्याच्या अन्य दोन कादंबऱ्यांत फ्रेंच ग्रामीण जीवनाचे प्रत्ययकारी दर्शन त्याने घडविले आहे.

ले सुव्हनीर द्यु कॉलॉनेल द मोमॉर ही कादंबरी त्याने लिहावयास घेतली होती तथापि ती तो पूर्ण करू शकला नाही. सामाजिक वास्तव आणि व्यक्ती ह्यांच्या परस्परसंबंधांचा शोध, कमालीची वस्तुनिष्ठता आणि भरपूर तपशील देण्याची प्रवृत्ती ही मार्‌तँ द्यु गारच्या कादंबरीलेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. फ्रेच साहित्याच्या निसर्गवादी आणि वास्तववादी परंपरेतील तो एक कादंबरीकार होय.

ल्‌ तेस्तामां द्यु पॅर लल (१९२०, इं. शी. ओल्ड लल्‌स विल) ह्या त्याच्या नाटकात फ्रेंच ग्रामीण जीवनाचे उपरोधप्रचुर चित्रण त्याने केले आहे. La Gonfle (१९२८, इं. शी. द स्वेलिंग) आणि Un Taciturne (१९३१, इं. शी. अ सायलेंट मॅन) ही त्याची अन्य दोन नाटके.

साहित्य व कला ह्यांना वाहिलेल्या नुव्हॅल रव्ह्यू फ्रांसॅझ ह्या नियतकालिकाशी त्यांचे दीर्घकाल निकटचे संबंध होते. ह्या नियतकालिकाचा एक प्रमुख संस्थापक आणि विख्यात फ्रेंच साहित्यिक आंद्रे झीद हा त्याचा स्नेही होता. Notes Sur Andre Gide (१९५१, इं. भा. रिकलेक्शन्स ऑफ आंद्रे झीद, १९५३) ह्या आपल्या ग्रंथात त्याने झीदचा, प्रांजळ परामर्श घेतला आहे.

त्याला १९३७ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. बेलेम येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.