जारी, आल्फ्रॅद : (८ सप्टेंबर १८७३–१५ नोव्हेंबर १९०७). फ्रेंच नाटककार आणि कादंबरीकार. लाव्हाल येथे जन्मला स्वैराचारी जीवन जगला. मुख्यतः यूबू र्‌वा (१८९६) ह्या त्याच्या उपरोधपूर्ण फार्ससाठी प्रसिद्ध. यूबू र्‌वा ही एका मूर्ख, कपटी, भेकड, लोभी अशा माणसाची व्यक्तिरेखा. बूर्झ्वांच्या सत्तालालसेचे प्रतीकरूपाने केलेले हे चित्रण. जारीच्या नाटकांच्या प्रयोगांत नेपथ्यादी रंगतंत्रांचा अभिनय पद्धतीने वापर केला गेला. मुखवट्यांचा वापर, देखाव्यांचे फलकांच्या साहाय्याने केलेले सूचन इत्यादी. लवकरच पुरोगामी नाटककारांमध्ये जारीची गणना होऊ लागली. मेसालीन  (१९००) आणि ल् स्यूरमाल  (१९०२) ह्या त्याच्या दोन कादंबऱ्या. बुद्धीच्या साखळ्यांतून मुक्त होऊन विविध, भ्रमसंभ्रमांच्या स्वागतासाठी मनाची दालने खुली करावीत, अशी त्याची धारणा होती त्यामुळे दादावादी आणि अतिवास्तववादी आपल्या पूर्वसूरींत त्याची गणना करतात. पॅरिसमध्ये तो मरण पावला.

टोणगावकर, विजया