प्रूस्त, मार्सेल : (१० जुलै १८७१ – १८ नोव्हेंबर १९२२). जगद्‌विख्यात फ्रेंच कादंबरीकार. ओतय्य (त्या वेळी पॅरिसचे एक उपनगर) येथे जन्मला. त्याचे वडील आद्रिया प्रूस्त हे डॉक्टर असून वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक होते. जान्न वाइल हे त्याच्या आईचे नाव. ही यहुदीवंशीय स्त्री अत्यंत सुसंस्कृत व संवेदनशील होती. मार्सेलचे तिच्यावर आत्यंतिक प्रेम होते. आरंभीच शिक्षण लिसे काँदोर्से येथे झाल्यानंतर (१८८२-८९) त्याने लष्करात नोकरी केली (१८८९-९०). त्यानंतर ‘लेकॉल दे सियांस पॉलितीक’ ह्या शिक्षणसंस्थेत कायदा व राज्यशास्त्र ह्या विषयांचा त्याने अभ्यास केला. विद्यार्थीदशेत असताना विख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ आंरी बेर्गसाँ ह्यांच्या विचारांचा प्रभाव मार्सेलवर पडला होता. १८९२ मध्ये त्याने ‘लिसांस’ ही एम्. ए. शी समकक्ष अशी पदवी मिळविली. मार्सेलने लेखनाखेरीज कोणताच व्यवसाय केला नाही. वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्याला जडलेला दम्याचा विकार हे त्याचे एक कारण होते. मार्सेलची सांपत्तिक स्थिती चांगली होती आणि पॅरिसच्या उच्चभ्रू समाजाचे दर्शन त्याला अगदी जवळून घडलेले होते. ले प्लेझिर ए ले जूर (१८९६, इं.भा. प्लेझर्स अँड रिग्रेट्‌स, १९५०) ह्या त्याच्या पहिल्या साहित्यकृतीत ह्या समाजाच्या त्याने केलेल्या सूक्ष्म निरीक्षणाचा प्रत्यय येतो. १८९९ मध्ये प्रसिद्ध इंग्रज कलासमीक्षक जॉन रस्किन ह्याच्या कलाविचाराचा त्याच्यावर परिणाम झाला. सौंदर्याचा शोध घेण्यासाठी त्याने व्हेनिसला भेट दिली (१९००) रस्किनच्या काही लेखनाचा फ्रेंच अनुवाद केला. १९०५ मध्ये त्याची आई मरण पावली त्याला एकाकी वाटू लागले तसेच सतत बळावणाऱ्या दम्याच्या विकारामुळे त्याला स्वतःला जवळजवळ कायमच घरात कोंडून घ्यावे लागले आणि त्यामुळे त्याच्या सामाजिक जीवनाला साहजिकच बंधने पडली. १९०९ मध्ये आ ला रशॅर्श द्युतां पेर्द्यू ही आपली महान, सप्तखंडात्मक कादंबरी त्याने लिहावयास घेतली. द्यु कोते द् शे स्वान (इं. भा.

मार्सेल

स्वान्स वे, १९२२) हा ह्या कादंबरीचा अनेक प्रकाशकांनी नाकारलेला पहिला खंड बॅर्नार ग्रासे ह्याने १९१३ मध्ये प्रसिद्ध केला. ह्या कादंबरीचे अन्य सहा खंड असे : आ लाँब्र दे जन फीय आं फ्लर (१९१८-१९, इं.भा. विदिन अ बडिंग ग्रोव्ह, १९२४), ल कोते द् गॅर्मात (दोन भाग १९२०-२१, इं.द भा. गॅर्मांत वे-१९२५-दुसऱ्या भागामध्ये सोदॉम ए गॉमॉर-इं.भा. सिटीज ऑफ द प्लेन, १९२९ – ह्या कादंबरीचा पहिला भाग समाविष्ट), सोदॉम ए गॉमॉर (भाग दुसरा, १९२२ ह्या दुसऱ्या भागाचे तीन खंड आहेत.) ला प्रिझॉन्येर (१९२३, इं. भा. द कॅप्टिव्ह, १९२९), ला फ्युजितिव्ह (१९२५, इ. भा. द स्वीट चीट गॉन, १९३०) व ल ताँ रत्रुव्हे १९२७), इं. भा. टाइम रीगेन्ड, १९३१). १९१९ मध्ये उपर्युक्त सात खंडांपैकी आ लाँब्र… ह्या कादंबरीस गाँकूर अकादमीचे पारितोषिक मिळाले. तसेच मार्सेलला कादंबरीकार म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली.

आ ला रशॅर्श… ही प्रूस्तची महाकादंबरी मार्सेल ह्या प्रमुख पात्राभोवती गुंफण्यात आलेली आहे. प्रूस्तची ही आत्मकथा नसली, तरी मार्सेल ह्या व्यक्तिरेखेस मुख्यतः प्रूस्तच्या जीवनाधारेच उभी केलेली आहे. आपला पिंड कादंबरीकाराचा आहे, ह्याची मार्सेलला जाणीव कशी होत गेली ह्याचे चित्रण ह्या कादंबरीत असून ही कादंबरी त्या जाणिवेतूनच निर्माण झाली, असे दाखविण्यात आले आहे. मार्सेलची पौंगडावस्था, उमरावी जीवनाच्या वर्तुळात त्याचा झालेला प्रवेश, त्याच्यात निर्माण झालेली समलिंगी संभोगप्रवृत्ती, त्याचे एका तरुणीवरील विफल प्रेम ही एका जीवनाची अगदी बालपणापासूनची कहाणी असली, तरी तिच्या बरोबरच एकोणिसाव्या शतकाची अखेरची तीस वर्षे व विसाव्या शतकाचे पहिले दशक अशा एकूण चाळीस वर्षांच्या कालखंडाचे जिवंत दर्शनही तीतून घडविण्यात आलेले आहे. ह्या महाकादंबरीतून प्रूस्तचे स्वतःचे असे काही जीवनविषयक तत्त्वज्ञान व्यक्त झालेले जाणवते. ते असे : जग हे केवळ आपल्याभोवती आकार घेत नसून ते आपल्यातच आहे. किंबहुना जग म्हणजे आपणच होय. आपल्या भोवतालच्या व्यक्तींना आपणच आकार देतो. औदासिन्यामुळे त्या लोप पावतात तर प्रेम वा असूया ह्या भावनांमुळे त्या अवाढव्य रूप धारण करतात. जगात काहीच – दुःखसुद्धा – शाश्वत नाही. गमावलेले स्वर्ग हेच खरे स्वर्ग होत. स्मृतीच्या आधारेच ते आपण परत मिळवू शकतो. कालाच्या एका नव्याच परिमाणाचा प्रत्यय ह्या महाकादंबरीतून येतो. काल हा कधीच हरवत नाही. घडून गेलेल्या घटना घेतलेल्या अनुभूती हे सारे आपल्या अंतर्मनात सुप्तावस्थेत वसत असते. आठवणींशी निगडित असलेली एखाद्या विशिष्ट पदार्थाची चव विशिष्ट संगीताचा सूर विशिष्ट वस्तूचा गंध अशा कोणत्याही निमित्तामुळे त्या आपोआप आणि नकळत जाग्या होतात व आपण ती घटना व तो अनुभव पहिल्याच उत्कटतेने जगतो. स्मरणशक्तीचे दोन भेद प्रूस्तने स्पष्टपणे दाखविले आहेत. प्रकट मन जाणीवपूर्वक करीत असलेली आठवण हा एक प्रकार. आपल्या अप्रकट मनातून नकळत जागी होऊन विशिष्ट वेळच्या संपूर्ण भावावस्थेची आपणास पुनश्च अनुभूती देणारी आठवण, हा दुसरा. प्रूस्तची भाषा संपन्न असून एकाच वेळी बाह्य विश्वाचे आणि अंतर्मनाचे दर्शन घडविण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. प्रूस्तच्या कादंबरीलेखनाचा प्रभाव विख्यात आयरिश कादंबरीकार जेम्स जॉइस ह्याच्यावर आढळतो.

प्रूस्तने १८९६ ते १९०४ च्या दरम्यान लिहिलेली सु. १००० पृष्ठांची एक अपुरी कादंबरी झाँ सान्तेय ह्या नावाने १९५२ मध्ये प्रसिद्ध झाली. त्याने काही कथाही लिहिल्या आहेत. सँत-बव्ह् ह्या फ्रेंच साहित्यिकावर एक समालोचनात्मक ग्रंथही त्याने लिहिला आहे. पॅरिस येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Alden, Douglas, Marcel Proust and His French Critics, Los Angeles, 1940.

2. Barker, Richard, Marcel Proust A Biography, London, 1958.

3. Beckett, Samuel, Proust, New York, 1931.

4. Bersani, Leo, Marcel Proust : The Fictions of Life and of Art, New York, 1965.

5. Coleman, E. The Golden Angel : Papers on Proust, New York, 1954.

6. Ellis, Havelock, From Rousseau to Proust, Boston, 1935.

7. Green, F. C. The Mind of Proust, Cambridge, 1949.

8. King, Adele, Proust, London, 1968.

9. Miller, Milton, Nostalgia : A Psychoanalytical Study of Marcel Proust, Boston, 1956.

10. Moss, Howard, The Magic Lantern of Marcel Proust, New York, 1962.

11. Rogers, B. G. Proust’s Narrative Technique, Geneva, 1965.

12. Strauss, Walter A. Proust and Literature : The Novelist as Critic, Cambridge (Mass,) 1957.

सरदेसाय, मनोहरराय