मारी व्हो, प्येअर कार्ले द शांब्लँ द : (४ फेब्रुवारी १६८८–१२ फेब्रुवारी १७६३). फ्रेंच नाटककार, कादंबरीकार आणि पत्रकार. जन्म पॅरिस शहरी एका संपन्न कुटुंबात. पॅरिस येथे त्याने कायद्याचा अभ्यास केला. तथापि साहित्याकडे त्याचा विशेष ओढा होता. क्लब, सालाँ आणि काफे ही अठराव्या शतकातील फ्रेंच साहित्यकांच्या आणि विचारवंताच्या भेटीगाठींची, वादसंवादाची केंद्रे होत. मादाम द तासँ हिचा सालाँ विशेष प्रतिष्ठीत होता. ताथे जाण्यायेण्याची साधी मारीव्होला मिळाली तेथील वातावरणाचे संस्कार त्याच्यावर झाले. लेखनाची आवड म्हणून तो साहित्यनिर्मितीकडे वळला परंतु १७२० मध्ये त्याच्यावर एक आर्थिक अरिष्ट येऊन त्यात त्याचे मोठे नुकसान झाले आणि लेखनावरच त्याला उदरनिर्वाह करावा लागला.

‘द जस्ट अँड प्रूडंट फादर ऑर क्रिस्पिन द जॉली रोग’ (१७१२, इं. शी.) हो मारीव्होचे पहिले नाटक १७०९ साली रंगभूमीवर आले. त्यानंतर त्याने विपुल नाट्यलेखन केले. तिसाहून अधिक नाटके त्याने लिहीली. त्यांतील विशेष उल्लेखनीय अशी (सर्व इं.शी.) : ‘द सर्‍प्राइज ऑफ लव्ह’ (१७२२), ‘डबल इन्‌कॉन्‌स्टन्सी ’ (१७२३), ‘द गेम ऑफ लव्ह अँड चान्स’ (१७३०), ‘द लेगसी ’ (१७३६), ‘फॉल्स कन्‌फेशन्स’ (१७३७), ‘द सिन्‌सीअर वन्‍स ’ (१९३९), आणि ‘द टेस्ट’ (१७४०).

आन्निबाल (१७२०) सारखी शोकात्मिका मारीव्होने लिहीलेली असली, तरी यशस्वी सुखात्मिकाकार म्हणूनच तो ओळखला जातो. प्रेम हा त्याच्या नाटकांचा मुख्य विषय. प्रेमिकाच्या मनांचे सखोल दर्शन त्याने आपल्या नाटकांतून घडविले. तत्कालीन फ्रेंच समाजातील काही वादग्रस्त प्रश्नही-उदा., स्त्रियांचा मतदानाचा हक्क, स्त्रीपुरुष समानता, स्त्रीपुरुषांनी आपल्या स्वतःच्या सामाजिक वर्गापलीकडे जाऊन विवाह करणे, विविध प्रकारची सामाजिक विषमता-त्याने आपल्या नाटकांतून आणले. स्थळ-काळ-कृती ह्यांच्या ऐक्यासंबंधीचे अभिजातवादी नियम, ‘हार्‍लेकीन रिफाइन्ड बाय लव्ह’ (१७२०, इं. शी.) सारख्या नाट्यकृतीत झुगारून देऊन मारीव्होने आपल्या स्वतंत्र वृत्तीचा प्रत्यय दिला. तथापि त्याच्या नाट्यकृतींत नाजूक भावनांच्या अभिव्यक्तीसाठी वापरलेली लयबद्ध आणि श्लेषात्मक अशी एक खास भाषाशैली ही त्याने फ्रेंच नाटकाला दिलेली एक देणगी होय. ‘मारीव्होदाज’ ह्या नावाने ही शैली ओळखली जाते. मारीव्होचे अनुकरण करणाऱ्यांकडून ह्या भाषाशोलीचा गैरवापर झाल्यामुळे ह्या शब्दाला काहीसा अवमानकारक अर्थ प्राप्त झाला. मारीव्होचा प्रभाव म्यूसे, झीरोदू आणि आनुईय ह्यांसारख्या फ्रेंच नाटककारांच्या नाट्यकृतीतून दिसून येतो.

‘लाइफ ऑफ मारिआन’ (१७३१–४१, इं. शी.) आणि ‘द फॉर्‌च्यूनेट पीझंट (१७३५–३६, इं. शी.)’ ह्या मारीव्होच्या विशेष उल्लेखनीय अशा कादंबऱ्यांपैकी होत. समाज आणि सामाजिक मूल्ये ह्यांच्यावरील ती मार्मिक भाष्ये आहेत. ह्या कादंबऱ्यांतून व्यक्त होणारी मारीव्होची एक मनोविश्लेषक प्रवृत्तीही लक्षणीय आहे.

विख्यात इंग्रज निबधकार ॲडिसन ह्याच्या स्पेक्टेटर ह्या नियतकालिकाच्या धर्तीवर स्पेक्तातर फ्रांसॅ ह्या नावाने एक नियतकालिकही मारीव्होने काढले होते. त्यातून नैतिक आणि वाङ्‍मयीन विषयांवरील लेखन त्याने केले.

१७४२ साली फ्रेंच अकादमीवर त्याची नियुक्त झाली. पॅरिस येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Greene, E. J. H. Marivaux, Toronto, 1965.

             2. Jamieson, R. K. Marivaux : A Study in Sensibillty, New York, 1938.

             3. Mckee, K. N. The Theatre of Marivaux, New York, 1958.

कुलकर्णी, अ. र.