रॉमँ, झ्यूल : (२६ ऑगस्ट १८८५−१४ ऑगस्ट १९७२).जागतिक कीर्तीचा फ्रेंच कवी, कादंबरीकार आणि नाटककार. मूळ नाव लुई आँरी झां फारीगूल. जन्म सँ-ज्युल्याँ-शाप्तय येथे. त्याचे शालेय आणि उच्च शिक्षण पॅरिसला झाले. ‘एकॉल नॉर्माल स्युपेरिअर’ ह्या शिक्षणसंस्थेतून तत्त्वज्ञान ह्या विषयातील पदवी त्याने १९०९ मध्ये मिळवली. काही काळ तत्त्वज्ञानाचे अध्यापन केल्यानंतर १९१९ सालापासून त्याने साहित्यनिर्मितीस वाहून घेतले. १९०७ साली झॉर्झ द्यूआमेल, शार्ल व्हील्द्राक आदी लेखकांच्या ‘आब्बे’ ह्या गटाशी रॉमँचा संबंध आला. ह्या गटानेच त्याचा पहिला काव्यसंग्रह व्ही युनानीम प्रसिद्ध केला (१९०८).

रॉमँने १९०८−११ ह्या कालखंडात ‘युनानिमिस्त’ ही कलाविषयक विचारसरणी विकसित केली. ह्या विचारसरणीत विश्वबंधुत्वाची कल्पना अंतर्भूत आहे. त्याचप्रमाणे समूहभावनेच्या आधुनिक प्रणालीचाही विचार ती विकसित करताना केलेला आहे. ‘युनानिमिस्त’-मधील मध्यवर्ती कल्पना थोडक्यात अशी सांगता येईल : मानवी आत्म्याच्या प्रसरणशीलतेवर कवीचा भर असायला हवा. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व समूहाच्या, अधिक विशाल अशा आत्म्यात कसे मिसळून जाते, हे कवीने दाखवून द्यायला हवे. हा समूह म्हणजे चर्च असेल कारखाना असेल अथवा शहर असेल. अशा समूहांचा विशालतर असा जो आत्मा असतो, त्याच्या भावना आणि तो करीत असलेल्या कृती अधिक समर्थ असतात. तसेच विशिष्ट समूहात, सूप्तावस्थेत अंतर्गत एकात्मता असते. व्ही युनानीम ह्या उपर्युक्त काव्यसंग्रहातही एकात्मतेचे हे तत्त्व आविष्कृत झालेले आहे तसेच ते त्याच्या पुढील सर्व लेखनात कमीजास्त प्रमाणात आणि विविध रूपांत व्यक्त झालेले आहे. नाट्यगृहातील प्रेक्षकवर्ग, सामाजिक गट, एखाद्या गावातील सारे रहिवासी इत्यादींच्या भावना, विचार व कृती ह्यांत त्याला एकात्मतेच्या तत्त्वाची प्रचीती येते.

रॉमँला प्रथम मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली, ती त्याच्या नाटकांमुळे−विशेषतः त्याच्या क्नॉक उल त्रिऑफ द ला मेद्सीन (१९२३, इं. भा. डॉ. क्नॉक, १९२५) ह्या नाट्यकृतीमुळे. एक चलाख डॉक्टर एका गावातल्या लोकांच्या भाबडेपणाचा फायदा घेऊन त्यांना कसा फसवतो, हे ह्या नाटकात दाखविले आहे. मोल्थेरच्या नाट्यलेखनशैलीचा प्रभाव ह्या नाटकावर असून रॉमँने त्यात समकालीन सामाजिक संदर्भाचा मार्मिक उपयोग करून घेतलेला आहे. १९३२ साली ह्या नाटकाच्या आधारे डॉ. क्नॉक हा चित्रपट निघाला. विख्यात नट लुई जुव्हे ह्याने त्यात प्रमुख भूमिका केली होती.

तथापि रॉमँला मिळालेली जागतिक कीर्ती त्याच्या लेझॉम द बॉन व्होलाँते (२७ खंड, १९३२−४६ इं. भा. मेन ऑफ गुडविल, १४ खंड, १९३३−४६) द्या प्रदीर्घ कादंबरीवर अधिष्ठित आहे. ६ ऑक्टोबर १९०८ ते ७ ऑक्टेबर १९३३ ह्या विशाल कालखंडातील फ्रान्समधले राजकीय-सामाजिक-आर्थिक जीवन त्याने रसरशीतपणे चित्रित केल आहे. ह्या कालखंडाचे सत्त्वच त्याने शब्दांच्या माध्यमातून पकडण्याचा प्रयत्ने केला आहे. ह्या कादंबरीतील व्यक्तीरेखांत तळागाळातल्या अतिसामान्य माणसांपासून अत्युच्च वर्गातल्या माणसांपर्यंत विविध प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. ही कादंबरी लिहिताना त्याने आवश्यक त्या दस्तऐवजांचाही अभ्यास केला.

ह्या प्रदीर्घ कादंबरीतून असे जाणवते, की जगातील राजकीय ताणतणाव तसेच असहिष्णुता, हिंसा, क्रौर्य इ. अनिष्ट वृत्तिप्रवृत्तींविषयी पूर्ण जाणीव असूनही रॉमँची, लहानमोठ्या स्तरांवरील माणसांच्या आंतरिक सत्प्रवृत्तीवर गाढ श्रद्धा होती. हीच माणसे समाजाला प्रगत व स्थिर सहजीवनाकडे नेतील, असा त्याला भरवसा होता. तथापि त्याच्या ह्या आशावादाला जबरदस्त तडा गेल्याचे प्रत्यंतर त्याच्या ल फीस द ज्येफोन्याँ (१९५६) ह्या कादंबरीत येते.

‘ला मॉर द कॅल्फं (१९११, इं. भा. द. डेथ ऑफ ए नोबडी) आणि ‘ले कॉपँ’ (१९१३) ह्या रॉमँच्या दोन दीर्घकथा. त्यांपैकी ‘ला मॉर …’ ही दीर्घकथा म्हणजे त्याच्या ‘युनानिमिस्त’ कलातत्त्वाचे नमुनेदार उदाहरण आहे.

रॉमँने नाना देशांत प्रवास केला होता. १९३९ मध्ये पेन क्लबच्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा तो अध्यक्ष होता. १९४६ साली त्याची फ्रेंच अकादमीवर निवड झाली. पॅरिस येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Boak, D. Jules Romains, New York, 1974.

2. Norrish, P.J. Drama of the Group: A Study of Unanimism in the Plays of Jules Romains, London, 1958.

टोणगावकर, विजया