आपॉलिनेर, गीयोम : (२६ ऑगस्ट १८८० – ९ नोव्हेंबर १९१८). फ्रेंच कवी व कलासमीक्षक. जन्म रोममध्ये. त्याची आई पोलिश व बाप इटालियन होता. त्याचे शिक्षण दक्षिण फ्रान्समध्ये झाले. पॅरिसला आल्यावर त्याचे दरँ, पिकासो, व्ह्लामँक इ. चित्रकारांशी मैत्रीचे संबंध जुळले व त्याने घनवादी व इतर आधुनिक कलासंप्रदायांच्या तत्त्वांचे विवेचन करणारे समीक्षालेख लिहिले. वेळोवेळी नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या आपॉलिनेरच्या कविता पुढे Alcools (१९१३) व Calligrammes (१९१८) या दोन काव्यसंग्रहांत संकलित करण्यात आल्या. Alcools मधील ‘La Chanson du Mal Aime’ ही कविता विलक्षण गाजली. ही व अशाच प्रकारच्या इतरही कविता प्रेमभंगाच्या निराशेतून उद्‍भवलेल्या आहेत. स्वतःच्या अनुभवांकडे अलिप्तपणे बघण्याची वृत्ती व संयत अभिव्यक्ती यांमुळे स्वच्छंदतावादी काव्यापेक्षा आपॉलिनेरचे भावकाव्य अधिक वेधक भासते. त्याच्या काव्यातील प्रतिमांचे अनेक अर्थ संभवतात. आधुनिक युगाच्या या कवीने शहरी संस्कृतीशी संलग्न असलेल्या प्रतिमा वापरलेल्या आहेत. उदा., विजेचे खांब, मोटारी, अनेकमजली इमारती इत्यादी. फ्रेंच प्रतीकवादी कवी रँबोच्या शब्दांच्या जादुचा प्रभाव आपॉलिनेरच्या शैलीवर पडला आहे. अनेकदा शब्दार्थ झिजले आहेत, याची खंत त्याने व्यक्त केली आहे. पुष्कळदा त्याचे शब्द आपले मूळ लॅटिन किंवा ग्रीक अर्थ सूचित करतात.

Calligrammes या संग्रहातील कविता बऱ्याच प्रमाणात प्रयोगशील आहेत. चित्रकाव्यासारख्या रचनेतून फुले, पाऊसधारा यांसारख्यांच्या चित्राकृती दृश्यमान होतील असा प्रयोग त्याने केला. विरामचिन्हे तो बुद्धिपुरस्सर टाळीत असे. त्याच्या मते कवितेची अंतर्गत लय अधिक महत्त्वाची आहे. साहित्यातील  ð अतिवास्तववादाचे प्रमुख वैशिष्ट्य जे स्वयंप्रेरित लिखाण (Ecriture automatique), तेही त्याच्या काव्यात आढळते. त्याच्या कवितेतल्या आगळ्या शब्दसाहचर्याने अतिवास्तववादी काव्याची पाऊलवाट तयार केली. Les Mamelles de Tiresias (१९१८) हे त्याचे विनोदी नाटक प्रयोगदृष्ट्या नावीन्यपूर्ण होते. प्रतीकवादाच्या तत्त्वाशी असलेले नाते कायम ठेवून आपॉलिनेरने नव्या प्रयोगांच्या द्वारा अतिवास्तववादी काव्याला प्रेरणा दिली. आपॉलिनेरचे भावकाव्य आपल्या माधुर्याने वाचकाच्या हृदयाला भिडते. पॅरिस येथे तो निधन पावला. 

संदर्भ : 1. Adema, Marcel Trans, Folliot, Denise, Apollinaire, New York, 1955.

             2. Davies, Margaret, Apollinaire, New York, 1964.

             3. Steegmuller, Francis, Apollinaire, Poet among the painters, New York, 1963.

टोणगावकर, विजया