घोरपड : सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गाच्या स्क्वॅमॅता गणातील लॅसर्टीलिया या उपगणाच्या व्हॅरॅनिडी कुलातील सरड्यासारखा दिसणारा पण त्याच्यापेक्षा पुष्कळच मोठा प्राणी. घोरपडीची लांबी सु. १–४ मी. असून काहींचे वजन ९० किग्रॅ. हूनही अधिक असते. घोरपडी उष्ण हवामान असलेल्या दक्षिण आशिया, आफ्रिका, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, भारत इ. देशांत आढळतात. त्या सामान्यतः नद्या, ओढे यांच्या काठच्या ओलाव्याच्या ठिकाणी राहतात. घोरपडीच्या सु. २७–३० जाती असून त्यांतील पुढील चार भारतात आढळतात : व्हॅरॅनस मॉनिटर  ही भारतात जवळजवळ सगळीकडे आढळणारी जाती आहे. व्हॅ. बेंगॉलेन्सिस  ही जाती बंगालमध्ये आढळते व्हॅ. सॉल्व्हेटॉर  ही जाती हिमालयात १,८०० मी. उंचीवर आणि गारो टेकड्यांतील नद्यांतही आढळते. ही पाण्यात राहणारी असून हिच्या कातड्यास फार किंमत येते. व्हॅ. फ्लॅव्हिसेन्स  ही पिवळसर घोरपड पंजाब व पश्चिम बंगालमध्ये आढळते.

भारतीय घोरपड

घोरपडीच्या वरच्या बाजूचा रंग तपकिरी किंवा तपकिरी हिरवा असून त्यात काळे ठिपके किंवा लहान लहान पट्टे असतात खालच्या बाजूचा रंग पांढरट पिवळा असतो. वरची त्वचा जाड, खरखरीत असून तिच्यावर लहान गोलसर खवले असतात खालची त्वचा काहीशी गुळगुळीत आणि जाड असून तिच्यावर वर्त्मांसारखे (ढालींसारखे) मोठे चौकोनी खवले असतात व हनुवटीची त्वचा पातळ आणि मऊ असते. शरीर जाडजूड व भक्कम असते. भारतीय सामान्य घोरपडीच्या (व्हॅ. मॉनिटर ) धडाची (डोक्यासकट) लांबी ७५ सेंमी. असून शेपटीची १०० सेंमी. असते. नर मादीपेक्षा मोठा व शक्तिमान असतो. डोके लांब मानेने धडाला जोडलेले असते मुस्कट निमुळते असून त्याच्या टोकाला तिरकस नाकपुड्या असतात डोळे थोडे बाजूला असून त्यांना पापण्या नसतात पायांवरील बोटे लांबट आणि मोठी असून त्यांच्या टोकांवर मजबूत नख्या असतात. शेपूट लांब, जाड व चपटे असते. स्वसंरक्षणाच्या वेळी घोरपड शेपटाचे जोरात तडाखे देऊ शकते. त्याचप्रमाणे पोहताना ती शेपटाचा उपयोग वल्ह्यासारखा करते.

घोरपडी जंगलात किंवा उघड्या कोरड्या मैदानातही आढळतात. जरूर पडल्यास त्या वेगाने धावू शकतात व धावताना शेपटी वर उचलतात. त्या झाडावर चढू शकतात. घोरपड उत्तम पोहणारी असून पाण्याखाली बराच वेळ राहू शकते. ती स्वभावतः काहीशी भित्री असून सहसा माणसाच्या अंगावर येत नाही. पण तिचा चावा फारच जोराचा असून पकडही सहज न सुटणारी असते. संकटात सापडल्यास ती फुप्फुसात हवा घेते, अंग फुगविते, जोराने फुस्कारते व शेपटीने तडाखे देते. अशा वेळी ती बरीच क्रूर भासते.

घोरपड मांसभक्षक असून पक्षी व त्यांची अंडी, उंदीर, सरडे, साप, मासे, कवचधारी प्राणी, लहानमोठे कीटक यांवर ती उपजीविका करते. तिची जीभ लांब व टोकाशी दुभागलेली असून तिने ती किडे टिपून खाते. कधीकधी ती कुजके मांसही खाते.

मादी जुलै ते सप्टेंबर या काळात बिळात किंवा उधईच्या (वाळवीच्या) वारूळात अंडी घालते. अंडी सु. २५–३० असतात. अंडी घालून झाल्यावर मादी पालापाचोळ्याने बीळ बंद करून निघून जाते. बिळातील उष्णतामानाने ती उबतात. व्हॅ. निलोटिकस  या ईजिप्तमध्ये नाईल नदीच्या परिसरात आढळणाऱ्या घोरपडीची अंडी उबण्यास सु. दहा महिने लागतात.

घोरपडीची अंडी व मांस रूचकर असल्यामुळे त्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. घोरपडी भक्ष्य शोधण्यासाठी जेव्हा बाहेर पडतात तेव्हा शिकवून तयार केलेल्या कुत्र्यांच्या मदतीने त्यांची शिकार करतात. घोरपडीचे कातडे ढोल वगैरे वाद्यांना लावण्यास उपयोगी पडते. त्याचप्रमाणे कातड्याचे पट्टे, बॅगा वगैरे वस्तूही करतात. या प्राण्याची चरबी औषधी आहे असे म्हणतात.

घोरपडीच्या काही जाती प्रसिद्ध आहेत. व्हॅरॅनस ग्रीसियस  ही उत्तर आफ्रिका आणि अरबस्थानच्या वाळवंटी प्रदेशात राहणारी असून फिक्कट करड्या पिवळसर रंगाची असते. ही बरीच लहान असून तिची लांबी सु. एक मी. असते. डच ईस्ट इंडीजमधील कोमोडो बेटात आढळणारी व्हॅ. कोमोडोएन्सिस  ही जाती सगळ्यांत मोठी असून तिची लांबी चार मी. व वजन ११० किग्रॅ. असते. व्हॅ. साल्व्हेटॉर  ही जाती भारताखेरीज श्रीलंका आणि मलेशियात आढळते. ही घोरपड व्हॅ. कोमोडोएन्सिसच्या खालोखाल मोठी असते. व्हॅ. निलोटिकस  ही नाईल नदीच्या किनाऱ्याने आढळणारी घोरपड सु. दोन मी. पर्यंत लांब असून काळसर रंगाची असते व तिच्या अंगावर पिवळे ठिपके असतात.

घोरपड आपल्या बळकट नख्यांनी खडकाला घट्ट धरून जागच्या जागी चिकटून राहू शकते म्हणून पूर्वी घोरपडीच्या कमरेस दोर बांधून डोंगरकडा किंवा किल्ला चढून जाण्यास तिचा उपयोग करीत असत असे म्हणतात. तानाजी मालुसरे आपल्या यशवंती नावाच्या घोरपडीच्या साहाय्याने कोंडाणा (सिंहगड) किल्ला चढून गेल्याची ऐतिहासिक कथा सुप्रसिद्ध आहे.

परांजपे, स. य. यार्दी, ह. व्यं.