‘प्रेमी’ – हरिकृष्ण : ( ? १९०८ – ). आधुनिक हिंदी नाटककार आणि कवी. जन्म मध्य प्रदेशात गुणा (जि. ग्वाल्हेर) येथे. त्यांना वडिलांकडून देशभक्तीचे बाळकडू मिळाले. प्रसिद्ध हिंदी कवी माखनलाल चतुर्वेदी यांच्या त्यागभूमि या पत्रातून त्यांनी आपले लेखन करण्यास प्रारंभ केला. लहानपणीच मातृप्रेमाला पारखे झालेले त्यांचे मन प्रेमासाठी व्याकुळ झाले होते. या संदर्भात ‘प्रेमी’ हे त्यांचे टोपणनाव लक्षणीय ठरते. हरिभाऊ उपाध्याय, रामनाथ ‘सुमन’, जगन्नाथप्रसाद ‘मिलिंद’ इ. देशभक्त साहित्यिकांच्या सहवासाचा लाभ त्यांना झाला. काही काळ जलंदर येथे ‘आकाशवाणी’वरही ते नोकरीस होते. त्यानंतर मुंबईस येऊन हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी कथा, संवाद, गीते लिहिली. निरनिराळ्या वृत्तपत्रांत संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. राजकारणात प्रत्यक्ष भाग घेतल्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगावसही घडला. स्वर्ण विहान (१९३०) हे त्यांचे पहिले पद्यनाट्य (गीतिनाट्य) सरकारने जप्त केले. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात त्यांचा छापखाना जप्त करण्यात आला. पंजाबमध्ये हिंदीचा प्रचार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. लाहोर येथून त्यांनी भारती हे हिंदी पत्रही काही काळ चालविले. राष्ट्रीयता, विश्वबंधुत्व, धर्मनिरपेक्षता इ. वैशिष्ट्ये असलेली त्यांची ऐतिहासिक नाटके रंगभूमीवरही विशेष गाजली. सामाजिक विषयांवरील नाटके व एकांकिकांमध्ये प्रचलित जीवनातील विषमतेची चीड आणि त्याविरुद्धची बंडखोरीची भावना दिसून येते. हिंदुमुस्लिमांतील सामंजस्याची वृद्धी होण्याच्या हेतूने लिहिलेले रक्षाबंधन हे त्यांचे अत्यंत गाजलेले ऐतिहासिक नाटक असून त्याचा मलयाळम् भाषेत अनुवाद झाला आहे. पाताल विजय (१९३६) हे त्यांचे एकमेव पौराणिक नाटक होय. त्यांच्या नाट्यकृतींवर गांधीजींच्या विचारांचा बराच प्रभाव दिसून येतो. त्यांनी पद्यनाट्यलेखनाचे विविध प्रयोग करून सोहनी-महीवाल, सस्सी-पुन्नू, मिर्झा-साहिबाँ, हीर-रांझा, दुल्ला-भट्टी ह्या पंजाबमध्ये लोकप्रिय असलेल्या लोककथांवर आकाशवाणीसाठी संगीत रूपकेही लिहिली.

त्यांनी काव्यलेखनही केले असून त्यांची कविता राष्ट्रीय भावनांनी युक्त, ओजस्वी व प्रवाही आहे. या दृष्टीने त्यांचे अग्निगान (१९४०), वंदनाके बोल इ. संग्रह उल्लेखनीय होत. ते उदात्त व आदर्शवादी विचारांनी भारलेले कवी आहेत. हिंदी नाटककारांत त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.

संदर्भ : विश्वप्रकाश दीक्षित ‘बटुक’, नाटककार हरिकृष्ण ‘प्रेमी’ : व्यक्तित्व और कृतित्व, दिल्ली, १९६०.

दुबे, चंदुलाल (हिं) द्रविड, व्यं. वि. (म.)