वीर्यसेचन, कृत्रिम : जिवंत शुक्राणू (नरातील जननपेशी) असलेले नराचे वीर्य नरमादीच्या प्रत्यक्ष संयोगाशिवाय मादीच्या योनिमार्गात सुपूर्त करणे याला कृत्रिम वीर्यसेचन म्हणतात. पशुप्रजननामध्ये या पध्दतीला विशेष महत्त्व आहे. वीर्यसेचन केल्यानंतर अंडाणूचे फलन, रोपण (फलित अंडे गर्भाशयाच्या भित्तीला एकजीव होऊन जोडले जाणे) तसेच मादीची गाभण अवस्था व प्रसूती या क्रिया निसर्गनियमांनुसार नैसर्गिक पध्दतीने होतात. या पध्दतीने जन्मलेली प्रजा व नैसर्गिक संयोगाने जन्मलेली प्रजा यांच्या आनुवंशिक गुणांमध्ये फरक असत नाही. तसेच नरमादीवरही कुठला विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आलेले नाही.
इतिहास : एका अरब सरदाराने १३२२ मध्ये कृत्रिम वीर्यसेचन पध्दतीने घोडीमध्ये यशस्वी गर्भधारणा केल्याची या क्षेत्रातील पहिली नोंद आहे. वनस्पतींच्या बाबतीत ॲसिरियनांनी इ. स. पू. काळामध्ये कृत्रिम रीत्या परागण केल्याची नोंद असली तरी जे. पी. कल्रॉइटर या जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञांनी याबाबतीत शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रयोग केल्याचे दिसून येते. लाझारो स्पॅलानझानी या इटालियन शरीरक्रियावैज्ञानिकांनी (शरीराचे कार्य व क्रिया कशा चालतात याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रातील तज्ञांनी) सस्तन प्राण्यांमध्ये कृत्रिम वीर्यसेचनाचा पहिला प्रयोग १७८० मध्ये कुत्रीवर केला. तसेच नरातील वीर्याचे शुक्राणू हेच गर्भधारणेला कारणीभूत आहेत, हेही याच शास्त्रज्ञांनी निदर्शनास आणले. असे असले तरी विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत या पध्दतीचा व्यावहारिक उपयोग केल्याचे दिसत नाही. जॉन हंटर यांनी एका स्त्रीमध्ये कृत्रिम पध्दतीने १७९९ मध्ये यशस्वीपणे वीर्यसेचन केल्याची नोंद आहे. सॅंड (कोपनहेगन, १८०२) यांनी या पध्दतीचा पशुवैद्यकामध्ये उपयोग केल्यास नराच्या एका स्खलनामध्ये मिळणाऱ्या रेतापासून अनेक माद्यांमध्ये गर्भधारणा करता येणे शक्य आहे. असे प्रतिपादन केले. इल्या इव्हानॉव्ह व त्यांचे सहकारी (१८९९) यांनी घोड्यांमध्ये या पध्दतीचा रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला. इव्हानॉव्ह यांनीच १९०७ च्या सुमारास ही पध्दत गायी व मेंढ्या यांच्या बाबतीत प्रथमतः वापरात आणली आणि १९१९ मध्ये मॉस्को येथे मध्यवर्ती प्रायोगिक प्रजनन केंद्र स्थापन केले. रशियामध्ये १९३८च्या सुमारास १ लाख २० हजार घोड्या, १२ लाख गायी व १ कोटी ५० लाख मेंढ्यांचे प्रजनन कृत्रिम वीर्यसेचन पध्दतीने झाले होते. एडवर्ड सॉरनसन यांनी डेन्मार्कमध्ये १९३६ मध्ये कृत्रिम वीर्यसेचन प्रजनन सहकारी संस्था स्थापन केली. तेथे या पध्दतीचा इतका प्रसार झाला की, १९५३ च्या सुमारास दुग्धोत्पादन व्यवसायातील ६० टक्के गायींचे प्रजनन या पध्दतीने होऊ लागले. अमेरिकेमध्ये पहिले कृत्रिम वीर्यसेचन केंद्र १९३७ मध्ये मिनेसोटा राज्यात काढण्यात आले. ग्रेट ब्रिटनमधील पहिली दोन केंद्रे १९४२ मध्ये स्थापन करण्यात आली. भारतामध्ये कुमारन यांनी १९३९ मध्ये म्हैसूरच्या राजाच्या दुग्धशाळेमधील ३३ गायींचे प्रजनन या पध्दतीने केले. भारतात कृत्रिम वीर्यसेचनाद्वारे पहिले रेडकू अलाहाबाद येथील कृषी संस्थेत १९४३ साली जन्मले. मात्र कृत्रिम वीर्यसेचन पध्दतीचा भारतामधील वातावरण, परिस्थिती, भारतीय वळूंची उपयुक्तता इ. बाबींचा शास्त्रीय दृष्टिकोनातोन सांगोपांग अभ्यास १९४५ मध्ये इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट (इझतनगर, उत्तर प्रदेश) येथे सुरू झाला.
कृत्रिम वीर्यसेचन तंत्र : या तंत्राचे चार मुख्य टप्पे आहेत : (१) नराकडून रेत मिळविणे, (२) रेताचे मूल्यमापन करणे, (३) विरलकारकाच्या (परिमाण वाढविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पातळ पदार्थाच्या) साहाय्याने रेताचे परिमाण वाढवणे व (४) योग्य मात्रेमध्ये रेत मादीच्या योनिमार्गात सुपूर्त करणे.
नराकडून (वळूकडून) रेत मिळवणे : सुरूवातीच्या काळात यासाठी वळूचा मादीशी नैसर्गिक रीत्या संयोग करून मादीच्या योनिमार्गात स्खलन झालेले रेत चमच्यासारख्या साधनाने किंवा स्पंजामध्ये शोषून घेऊन गोळा केले जाई. असे रेत बहुधा मादीच्या योनिमार्गात असणाऱ्या सूक्ष्मजंतूंनी दूषित झालेले असे, त्यामुळे व्हिब्रिओसिस, ट्रिकोमोनियासिस यांसारख्या गुप्तरोगांचा प्रसार होण्याची भीती असे. व्ही. एम्. कोमॅरॉव्ह व नेग्वे या रशियनांनी नंतर (१९३२) योनिमार्गात बसविण्यासाठी रबराची प्रजनन पिशवी बनविली. स्खलित रेत या पिशवीमध्ये गोळा होऊन मिळण्याची व्यवस्था झाली. ही पध्दत तितकीशी वापरात राहिली नाही. ॲमंटी या इटालियनांनी १९१४ मध्ये कृत्रिम योनी तयार करण्याची कल्पना प्रसृत केली होती. वॉल्टन यांच्या म्हणण्याप्रमाणे रशियनांनी १९३३ च्या सुमारास वळूचे रेत गोळा करण्यासाठी अशी योनी वापरात आणली. ही योनी म्हणजे ६० सेंमी. लांबीचा व ६.५ सेंमी. व्यासाचा दोन्ही बाजू उघड्या असलेला जाड रबराचा सिलिंडर असून त्याच्या आत दोन्ही बाजू उघड्या असलेल्या सदऱ्याच्या बाहीसारखी पातळ रबराची बाही सिलिंडराच्या दोन्ही तोंडावर उलटी करून घट्ट बसवलेली असते. सिलिंडरची आतील भिंत व रबराच्या बाहीची वरची बाजू यांमध्ये हवा व गरम पाणी (४५0 से.) घालण्याची व्यवस्था सिलिंडरला असलेल्या भोकामधून असते. हे भोक मळसूत्री बुचाने बंद केल्यावर आतील पाणी सांडू शकत नाही. अशा रीतीने बाहीच्या आतील बाजूचे तापमान गायीच्या योनीमधील तापमानाइतके राहते. हवेमुळे बाहीला सुरकुत्या पडून आतील बाजू हुबेहूब गायीच्या योनीप्रमाणे तयार होते. आता या योनीच्या तत्त्वावर पण नमुन्यामध्ये फेरबदल करून अनेक देशांमध्ये सुधारित कृत्रिम योनी तयार करण्यात आल्या आहेत. स्वीडनमध्ये बनविलेल्या कृत्रिम योनी भारतामध्ये बऱ्याच प्रमाणात वापरात आहेत. ज्या वळूंचे (सांड, बोकड, मेंढा व डुक्कर) रेत गोळा करावयाचे अशा नरांना शिकवणीने माजावर न आलेल्या मादीशी संयोग करण्याची सवय केलेली असते. वळू अशा खोड्या बांधलेल्या मादीशी संयोग करण्यासाठी उत्सुक होऊन चढण्याच्या पवित्र्यात असताना रेत गोळा करणारी व्यक्ती वळूचे शिश्न (जननेंद्रिय) हाताने कृत्रिम योनीमध्ये सरकवून देते. नराचे वीर्यस्खलन बहुधा एका मिनिटाच्या आत होते व रेत योनीच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या काचेच्या परीक्षानळीमध्ये गोळा होते. रेडा, बोकड, मेंढा व डुक्कर यांच्या शिश्नांचा आकार व लांबी लक्षात घेऊन योग्य आकाराच्या व लांबीच्या कृत्रिम योनी बनविण्यात आल्या आहेत. संयोगोत्सुक नसलेल्या वळूच्या बाबतीत काही वेळा तुंबिकांचे (रेतोवाहिनी मूत्रवाहिनीला मिळतात त्या ठिकाणच्या रेतोवाहिनीच्या जाडासर भागाचे) गुदद्वारातून हात घालून मर्दन करतात म्हणजे तो उद्दिपित होऊन संयोगोत्सुक होतो. हेच कार्य मेरूरज्जूला विजेचे सौम्य धक्के देऊन करता येते, असे गन यांनी ऑस्ट्रेलियामध्ये मेंढ्याच्या बाबतीत दाखवून दिले. त्यानंतर तीबो व त्यांचे सहकारी यांनी फ्रान्समध्ये, झुइक व पीटर्सन यांनी मिनेसोटा (अमेरिका) व मार्डेन यांनी कोलोरॅडोमध्ये सांडांच्या बाबतीत वापरण्यासाठी विजेची उपकरणे तयार केली. वळूचे वीर्य आठवड्यातून किती वेळा गोळा केले जाते हे जात, वय व त्याचा जोम यांवर अवलंबून आहे. सर्वसाधारणपणे आठवड्यातून दोनदा वीर्य गोळा करतात.
रेताचे मूल्यमापन : रेताचे मूल्यमापन हे अनेक बाबींवर अवलंबून आहे पण ते करणे आवश्यक आहे. कारण त्यावर रेत सुस्थितीत टिकणे व गर्भधारणा अवलंबून आहे. रेताचे रासायनिक व एंझाइमांचे मूल्यमापन, तर्षणदाब, विशिष्ट गुरूत्व यांचा अभ्यासही केव्हा केव्हा करणे जरूर पडते. तथापि सर्वसाधारणपणे त्याचा रंग, दाटपणा, परिमाण, शुक्राणूंची संख्या व त्यांची चलनक्षमता, विकृत शुक्राणूंचे प्रमाण व मिथिलीन ब्ल्यू या हिरव्या रंगद्रव्याच्या क्षपणास [→ क्षपण ]. लागणारा वेळ यांचे मूल्यमापन रेत वापरण्यापूर्वी केले जाते [→ पुंस्त्वविद्या ]. शुक्राणूंची संख्या व चलनक्षमता सूक्ष्मदर्शकाने तपासतात. संख्या व चलनक्षमतेमुळे रेताच्या थेंबामध्ये सूक्ष्मदर्शकाखाली तरंग उठलेले दिसून येतात. हे तरंग शुक्राणूंची संख्या व हालचाल यांमुळे उठतात व त्यावर रेताची प्रतवारी करतात. उदा., ८० ते १०० टक्के शुक्राणूंची चलनक्षमता उत्तम प्रतीची आहे (+++++), ६० ते ८० टक्के (++++), ४० ते ६० टक्के (+++), २० ते ४० टक्के (++) व २० टक्क्यांहून कमी (+), एकही शुक्राणू चलनक्षम नाही (०). सांड, रेडा, बोकड, मेंढा यांच्या रेताचा रंग दुधी असतो. सांडाच्या उत्तम प्रतीच्या रेताला फिकट पिवळटसर रंगाची छटा असते. रक्तातील पेशी मोजण्याच्या हीमोसायटोमीटर किंवा फोटोइलेक्ट्रोमीटर या उपकरणाने शुक्राणूंची संख्या मोजतात. शुक्राणूंच्या हायड्रोजन निरासीकरणक्षमतेमुले मिथिलीन ब्ल्यू विद्रावाच्या रंगाचे विरंजन (रंगहीन होण्याची क्रिया) होते. या परीक्षेसाठी स्खलनातील ०.२ मिलि. रेत हे ०.८ मिलि.रेत पातळ करण्याच्या विरलकारकामध्ये घालून त्यात ०.५ टक्के मिथिलीन ब्ल्यूचा विद्राव ०.१ मिलि.इतका टाकतात. बैलाचे व रेड्याचे रेत ३.५ ते ६ मिनिटांत मिथिलीन ब्ल्यूचे विरंजन घडवून आणते. हा वेळ ८ मिनिटांपेक्षा अधिक लागल्यास रेत वापरण्यास अयोग्य समजतात. विकृत शुक्राणूंची संख्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास रेत वापरण्यायोग्य असत नाही.
रेताचे परिमाण वाढवणे व संरक्षण : रेतामध्ये विरलकारक घालून त्याचे परिमाण वाढविले जाते. यामुळे एका स्खलनात मिळालेल्या रेताचा अनेक माद्यांसाठी उपयोग करता येतो. विरलकारकाच्या अंगी शुक्राणूंची कार्यक्षमता कायम ठेवून त्याच परिस्थितीमध्ये त्यांचे संरक्षण होओ शकेल असे गुणधर्म असणे जरूर आहे. रेतामध्ये विरलकारक किती प्रमाणात मिसळावयाचे हे रेतातील शुक्राणूंच्या संख्येवर अवलंबून राहते. गायीमध्ये सेचन करण्याच्या विरल केलेल्या रेताची मात्रा १ मिलि. असून त्यामध्ये सामान्यपणे १ कोटी शुक्राणू असतात. मेंढीमध्ये ही मात्रा ०.१ मिलि. असून यामध्ये १२ कोटी शुक्राणू असतात, तर शेळीमध्ये ही मात्रा ०.१ मिलि. असून त्यात २ ते ५ कोटी शुक्राणू असतात. अंड्यातील पिवळा बलक व सोडियम सायट्रेट (३%विद्राव) यांचे समप्रमाणात मिश्रण तयार करतात, त्याला ‘एगयोक सायट्रेट’ विरलकारक म्हणतात तर अंड्यातील पिवळा बलक, सोडियम हायड्रोजन फॉस्फेट (२%) व पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट (0.२%) यांचे समप्रमाणात मिश्रण करतात, त्याला ‘एगयोक फॉस्फेट’ विरलकारक म्हणतात. रेताचे परिमाण वाढविण्यासाठी वरील दोन्ही विरलकारकांचा उपयोग बहुतेक देशांमध्ये बैल, रेडा, मेंढा व बकरा यांच्या रेतांसाठी करतात. यांशिवाय मलईरहित दूध तसेच ६ ते ७ महिने वयाच्या शहाळ्यातील पाणी यांचाही उपयोग केला जातो. सर्व विरलकारकांमध्ये पेनिसिलीन, स्ट्रेप्टोमायसीन ही प्रतिजैव (ॲंटिबायॉटिक) औषधे वापरली जातात. यामुळे शुक्राणूंचे जीवनमान वाढले असल्याचे दिसून आले. तसेच त्यामध्ये ग्लिसरीन घातल्यास शुक्राणूंची चलनक्षमता जास्त काळ टिकून राहते. विशेषतः डुकराच्या रेतासाठी सोयीस्कर असल्याचे आढळून आले आहे. विरलकारक घालून पातळ केलेले रेत ४० से. तापमानामध्ये ठेवल्यास त्याचा ३ दिवस उपयोग करता येतो. अलीकडे रेत गोठवून संरक्षित केले जाते. यासाठी विरल केलेल्या रेतामध्ये ग्लिसरॉल घालतात. असे रेत–७९० से तापमानात (शुष्क- बर्फामध्ये) ठेवल्यास ते २ वर्षे टिकू शकते व द्रवरूप नायट्रोजनात–१९६० से. तापमानात ठेवल्यास वर्षानुवर्षे टिकते. अशा रीतीने १० वर्षे संरक्षित केलेले रेत यशस्वीपणे वापरल्याची उदाहरणे आहेत. मात्र रेताचे तापमान टप्प्याटप्प्याने कमी करणे आवश्यक आहे. अन्यथा एकदम कमी झालेल्या तापमानाच्या ⇨अवसादामुळे (धक्क्यामुळे) शुक्राणू निकामी होण्याचा संभव असतो. याकरिता रेत भरलेल्या नळ्या द्रवरूप नायट्रोजनामध्ये गोठण्यासाठी ठेवण्याआधी ५० से. तापमानात ६ ते २० तास शुक्राणूंना समतोल येण्यासाठी ठेवतात. रेत संरक्षित ठेवण्यासाठी व वाहतुकीला सोयीस्कर होण्यासाठी अलीकडे कॅसौ यांनी फ्रान्समध्ये शीत पेये पिण्यासाठी वापरतात तशा गवताच्या नळ्या (स्ट्रॉ) वापरण्यास सुरूवात केली व अल्पावधीत त्या सर्वत्र वापरात येऊ लागल्या. त्यांत सुधारणा होऊन हल्ली प्लॅस्टिकच्या कमी व्यासाच्या नळ्या वापरात आल्या आहेत. जिलेटिनवेष्टित गोळीमध्ये रेत भरण्याची जपानी पध्दतही अधिक समाधानकारक असल्याचे दिसते. रेत गोठवण्याआधी अशा नळ्यांमध्ये भरून मगच गोठवले जाते. रेत नळ्यांमध्ये भरणे व त्या दोन्ही बाजूंनी बंद (सील) करणे ही कामे अलीकडे यंत्राच्या साहाय्यने केली जातात.
मादीच्या योनिमार्गामध्ये रेत सुपूर्त करणे (वीर्यसेचन) : मादीच्या योनिमार्गात रेत सुपूर्त करण्यासाठी गोठविलेले वीर्य पुन्हा द्रव स्थितीमध्ये आणून पिचकारीच्या साहाय्याने गर्भाशयाच्या ग्रीवेपर्यंत सोडतात. वीर्यसेचनाची कृती दोन पध्दतींनी करतात. योनिमार्ग स्पष्ट दिसेल असा विशिष्ट चिमटा योनिमार्गात घालून किंवा गुदद्वारातून लांबवर हात घालून चाचपून गर्भाशयाची ग्रीवा पकडून पिचकारीला जोडलेली नळी तीत सरकवून नळीतील वीर्य आत सोडले जाते. दुसऱ्या पध्दतीचा फायदा असा की मादी आधीच गरोदर असल्यास ते निदर्शनास येते. अर्थात ही पध्दत गाय, म्हैस, घोडी या मोठ्या जनावरांमध्येच शक्य होते. अलीकडे जिलेटिनवेष्ट रेत असलेली गोळी गर्भाशयाच्या ग्रीवेमध्ये ठेवतात. निरनिराळ्या जातींच्या पशूंच्या माद्यांमध्ये माजाच्या विशिष्ट काळातच अंडमोचन होते. अंडमोचन झाल्यानंतरच्या काळात वीर्यसेचन केल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते.[→ मादीरोगविज्ञान म्हैस ].
कृत्रिम वीर्यसेचनाचे फायदे व मर्यादा : कृत्रिम वीर्यसेचन पध्दतीने पशुप्रजनन विशेषतः दुग्धोत्पादन करणाऱ्या गायी, म्हशी यांच्या प्रजनन क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. कुठल्याही वळूची सिध्दता अजमावण्यासाठी त्याच्या आईच्या दूध उत्पादनक्षमतेवर विसंबून न राहता त्याच्यापासून जन्मलेल्या अनेक कालवडी सरासरीने जास्तीत जास्त दूध किती देतात हे अजमावणे शक्य झाले. थोड्या अवधीत अनेक कालवडी चाचणीसाठी मिळाल्याने सिध्द वळू कमीत कमी १ वर्ष लवकर प्रजननकार्यासाठी वापरण्यास मिळू लागले व कमी प्रतीचे वळू काढून टाकणेही शक्य झाले. अधिकाधिक कर्तृत्ववान सिध्द वळू उपलब्ध होत गेल्यामुळे अमेरिकेमध्ये त्यातल्या त्यात कमी प्रतीचे ६१ टक्के वळू दरवर्षी काढून टाकण्यात येतात. तात्त्विक दृष्ट्या गाय व म्हैस यांच्या बाबतीत या पध्दतीने एका वळूपासून वर्षाला १ लाख प्रजा निर्माण होणे शक्य असले तरी व्यवहारतः १०,००० च्या आसपास प्रजा झालेली आहे आणि कमीत कमी १,००० प्रजा होण्याला काहीच प्रत्यवाह नाही. अमेरिकेमध्ये एका बैलाचे रेत त्याच्या आयुष्यामध्ये ५०,००० गायींमध्ये सेचन केल्याचा उच्चांक आहे. नैसर्गिक संयोगाने जास्तीत जास्त ६० ते ९० प्रजा होते. भारतामध्ये सिध्द वळूंची कमतरता असल्यामुळे कृत्रिम वीर्यसेचन पध्दत म्हणजे दुग्धोत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टिने वरदानच ठरली आहे. सिध्द वळूचे रेत दूरवर पाठविता येत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सिध्द वळूच्या रेताचा उपयोग होऊ लागला आहे तर ते अनेक वर्षे टिकवता येऊ लागल्यामुळे वळूच्या मृत्यूनंतरही त्याचे प्रजननकार्य चालू ठेवणे शक्य झाले आहे. वापरण्यापूर्वी रेताची तपासणी होत असल्यामुळे ब्रुसिलोसिस, व्हिब्रिओसिस, ट्रिकोमोनियासिस यांसारख्या गुप्तरोगांच्या प्रसाराला आळा घालणे सुलभ झाले. आर्थिक दृष्ट्या सिध्द वळू ठेवणे न परवडणाऱ्या लहान लहान दुग्धशाळांतील गायींसाठी सिद्ध वळूचे वीर्य आणवून वापरणे शक्य झाले. विजोड आकारमानाच्या नर व मादी यांचा संयोग तसेच दोन भिन्न जातींच्या पशूंमध्ये (उदा., झीब्रा व घोडी) यांचा संकर प्रजनन करणे असल्यास तेही कृत्रिम वीर्यसेचन पध्दतीने शक्य झाले.
कृत्रिम वीर्यसेचन पध्दतीने प्रजनन करणे सकृतदर्शनी दिसते तितके सोपे नाही. या कामात गुंतलेले कर्मचारी याबाबत नुसतेच तंत्रज्ञान मिळविलेले नसावेत, तर त्यांना पशूच्या जनन तंत्रातील इंद्रियांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. या पध्दतीचा सदोष वापर केल्यास जननेंद्रियाला इजा झाल्यामुळे नर अगर मादी कायमची निकामी होण्यचा धोका संभवतो. रेत गोळा करण्यापासून ते योनिमार्गात सुपूर्त होईपर्यंत वापरात येणाऱ्या सर्व वस्तू काळजीपूर्वक निर्जंतुक करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा अपायकारक जंतूंना गर्भाशयापर्यंत प्रवेश मिळून गर्भाशयशोथासारखे विकार होण्याचा धोका उत्पन्न होतो. याशिवाय आनुवंशिकीच्या दृष्टिकोनातून पाहता फार थोडे वळू वापरात असल्यास अंतःप्रजननाने होणारे घातक परिणामही लवकर दिसून येतील. नैसर्गिक संयोग पध्दतीमध्ये एका संयोगाने गाभण राहणाऱ्या माद्यांचे प्रमाण सरासरीने ४५ ते ५० टक्के इतकेच आहे. कृत्रिम वीर्यसेचन पध्दतीनेही पहिल्या सेचनाने गाभण होण्याचे प्रमाण यापेक्षा फारसे अधिक नाही. तात्विक दृष्ट्या कृत्रिम वीर्यसेचनातील हे प्रमाण यापेक्षा किती तरी अधिक असावयास हवे, पण प्रत्यक्षात ते तसे असत नाही. याची कारणे अनेक असू शकतात. तथापि बऱ्याच वेळा सदोष तंत्र पध्दतीपेक्षा मादीच्या ऋतुकालाचे व पर्यायाने अंडमोचनाचा निश्चित काल ठरविण्यात होणारी चूक हेच अनेक वेळा कारण असते. रेताचा विचार करता ते कशा स्वरूपात संरक्षित केले आहे, इतकेच नव्हे तर कशामध्ये भरले आहे यावरही गर्भधारणेचे प्रमाण अवलंबून आहे, असे दिसून आले. रेत गोळा केल्यावर ५० से. तापमानात संरक्षित ठेवून २-३ दिवसांत उपयोगात आणल्यास गर्भधारणेचे प्रमाण अधिक राहते. वळूचे गोठविलेले वीर्य आयात करून वापरल्यास भारत व व्हेनेझुएला येथील गर्भधारणेचे प्रमाण २० ते ३७ टक्के राहिले. क्यूबामध्ये असे दिसून आले की, गवताच्या नळ्यांमध्ये साठविलेल्या रेताचे सेचन केल्यावर गर्भधारणेचे प्रमाण ६४ टक्के, जपानी गोळी पध्दतीने साठविलेल्यामध्ये ७० टक्के तर काचेच्या शिशीमध्ये साठविलेल्यामध्ये ५८ टक्के आहे.
रशियामध्ये एकापेक्षा अधिक वळूंचे रेत मिसळून वीर्यसेचन केल्यावर गर्भधारणेचे प्रमाण ८६ टक्के दिसून आले तर बैलाच्या रेतामध्ये मेंढ्याचे १० टक्के रेत मिसळल्यास गर्भधारणेचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले.
कृत्रिम वीर्यसेचन व भ्रुणप्रतिरोपण : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये अंतःस्रावविज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे पशुप्रजनन शास्त्रामध्ये भ्रूणप्रतिरोपणाचे यशस्वी प्रयोग करण्यात येऊ लागले आहेत. कृत्रिम वीर्यसेचन अशा प्रयोगांना पोषक ठरले आहे. विशिष्ट हॉर्मोनांचे (गर्भरक्षक व जननग्रंथिपोषक अंतःस्रावांचे) अंतःक्षेपण करून शुध्द बीजाच्या मादीला अधिक अंडमोचन करण्याला भाग पाडून इष्ट नराच्या रेताचे सेचन करून त्यांचे फलन करतात. अशा फलित अंड्यांच्या भ्रुणांची विशिष्ट प्रमाणात वाढ झाल्यावर अंडवाहिनीमधून काढून घेऊन कनिष्ठ प्रतीच्या मादीमध्ये त्यांचे प्रतिरोपण करतात. ग्राहक मादी व दाता मादीचे ऋतुचक्र मात्र एकाच तालात आणणे आवश्यक आहे व हे हॉर्मोनांच्या अंतःक्षेपणाने साध्य करतात. शुध्द बीजाची मादी व नर यांचा गर्भ कनिष्ठ प्रतीच्या मादीमध्ये वाढत राहून शुध्द बीजाची मादी पुन्हा दुसऱ्या सत्राचे अंडमोचन करण्याला मोकळी होते. अशा रीतीने थोड्या काळामध्ये शुध्द बीजाच्या नरमादीची अधिक संतती मिळू शकते. नुसत्या कृत्रिम वीर्यसेचनाद्वारा निपजलेल्या संततीमध्ये मातेचे ५० टक्के रक्त असल्यामुळे संततीच्या आनुवंशिक गुणांमध्ये मातेचा हिस्सा असतो, तर भ्रुणप्रतिरोपणामध्ये तो अजिबात नसतो. माता ही गर्भ वाढविण्याचे यंत्र बनते.
भ्रुणप्रतिरोपण करून मेंढ्यामध्ये काही प्रमाणात तर गायी व डुकरिणी यांच्यामध्ये अल्प प्रमाणात प्रजनन करण्यात आले आहे. भारतामध्ये रेमंड वुलन मिल्स लि. यांच्या लळिंग (धुळे, -महाराष्ट्र) येथील शीप अँड बुल रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिव्हिजनमध्ये १९७९ साली ३७ कोकरे या पध्दतीने जन्मली व बहुधा भारतातील हा पहिलाच प्रयत्न आहे.
कृत्रिम वीर्यसेचन कार्याचा प्रसार : पशूंमध्ये वीर्यसेचन पध्दतीचा प्रजननासाठी उपयोग विसाव्या शतकाच्या सुरूवातीपासून सुरू झाला असला, तरी रेत–७९० से. तापमानामध्ये दीर्घकाल संरक्षित ठेवता येऊ लागल्यापासून (१९५०) या कामाला गती मिळाली. त्यानंतर १९६० मध्ये रेत द्रवरूप नायट्रोजनमध्ये -१९६० से. तापमानात गोठवून त्याचा कित्येक वर्षे उपयोग होऊ शकतो, हे समजून आल्यावर कृत्रिम वीर्यसेचन कार्याची झपाट्याने वाढ झाली. गाय, म्हैस, मेंढी, घोडी, डुकरीण तसेच कुत्रा व ससा इ. प्राण्यांमध्ये हे तंत्र वापरण्यात येत असले, तरी प्रामुख्याने याचा प्रसार दुग्धोत्पादन करणाऱ्या गाय, म्हैस आणि मेंढी या पशूमध्ये जगभर मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते. अमेरिकेमध्ये दुग्धोत्पादन करणाऱ्या ५० टक्के गायीगुरांचे प्रजनन या पध्दतीने होते तर मांसोत्पादन करणाऱ्या गायीगुरांमध्ये हे प्रमाण अवघे ३ टक्के आहे. याचे कारण मांसोत्पादन करणाऱ्या गायीगुरांची संगोपन पध्दती हे आहे. या पध्दतीमध्ये जनावरांकडे वैयक्तिक लक्ष पुरविले जात नाही, त्यामुळे कृत्रिम वीर्यसेचनाला आवश्यक असलेली पार्श्वभूमी असत नाही. डेन्मार्कमध्ये ९५ टक्के दुग्धोत्पादन करणाऱ्या गायीगुरांमध्ये हे तंत्र वापरले जाते, तर इंग्लंडमध्ये हे प्रमाण ७० टक्के आहे. डेन्मार्कमध्ये हे कार्य सहकारी संस्थांमार्फत होते. अमेरिकेमध्ये सुरूवातीला हे कार्य शासकीय विद्यापीठांमार्फत सिध्द वळू भाड्याने पुरवून तांत्रिक मदत देऊन करण्यात येत असे. अलीकडे हे कार्य सहकारी व व्यापारी संस्थांमार्फत होते. इंग्लंडमध्ये कृत्रिम वीर्यसेचनाचे कार्य व प्रसार मुख्यत्वे पशुप्रजनन संस्था, सहकारी संस्था व दुग्ध विक्री मंडळाकडून केला जातो.
भारतातील कार्य : भारतामध्ये इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेच्या सहकार्याने इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये १९४२ मध्ये कृत्रिम वीर्यसेचनाच्या कामाला सुरूवात झाली. गीर, शाहिवाल, सिंधी वगैरे दुधाळ जातींच्या वळूंचे तसेच मुरा, निली रावी इ. जातींच्या रेड्यांचे रेत शिकवणीने कृत्रिम योनीमध्ये गोळा करण्यास अडचण पडत नाही असे दिसून आले. या कार्याची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने १९४६-४७ मध्ये कोलकाता, पाटणा, बंगलोर व मंगमरी येथे कृत्रिम वीर्यसेचन केंद्रे उघडण्यात आली. महाराष्ट्रात पहिले कृत्रिम वीर्यसेचन केंद्र पुणे येथे १९४८-४९ मध्ये कार्यान्वित झाले. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारतातील बहुतेक राज्यांमध्ये निवडक भागांमध्ये कृत्रिम वीर्यसेचन पध्दतीची सोय करण्यात आली, तसेच अनेक तंत्रज्ञ शिकवून तयार करण्यात आले. १९४८-७८ या काळात बहुतेक सर्व राज्यांमध्ये अनेक वीर्यसेचन केंद्रे व उपकेंद्रे यांचे जाळेच विणले गेले आहे. तसेच देशतील कृषी विद्यापीठे, पांजरपोळ संस्था व काही खाजगी संस्थांद्वारे जर्सी, होल्स्टीन फ्रिजियन, रेड्डेन व ब्राऊन स्विस यांसारख्या दुधाळ विदेशी जातींच्या वळूंचे रेत वापरून दुग्धोत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने सर्व देशभर कृत्रिम वीर्यसेचन पध्दतीने गायीगुरांचे प्रजनन चालू आहे. केंद्र शासनाने १९७० च्या आसपास वीर्यगोठण करण्याची पहिली प्रयोगशाळा बंगलोर येथे स्थापन केली. या संदर्भात भारतीय ॲग्रो इंडस्ट्रिज फाउंडेशन (उरळी कांचन, पुणे) या संस्थेने चालविलेले कार्य मोलाचे आहे. या संस्थेचे कार्य महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश व कर्नाटक या राज्यांमध्ये चालू असून संस्थेची ११५ कृत्रिम वीर्यसेचन केंद्रे कार्यान्वित आहेत. युरोप, अमेरिका, रशिया व कॅनडा या देशांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये या कार्याचा प्रसार मेंढ्या, डुकरे व कोंबड्या या प्राण्यांमध्ये झाला असला तरी भारतामध्ये प्रामुख्याने गायी व म्हशी व काही प्रमाणात मेंढ्या या प्राण्यांपुरताच प्रासार मर्यादित आहे. शेळ्यांच्या व डुकरांच्या बाबतीत ही पध्दती अद्याप प्रयोगावस्थेतच आहे. शेळ्यांच्या बाबतीत नॅशनल गोट रिसर्च सेंटर, मखदूम (मथुरा, उत्तर प्रदेश) येथे व महाराष्ट्रामध्ये बोकडाचे रेत गोठवणे व कृत्रिम वीर्यसेचनाचे प्रयोग यशस्वीपणे करण्यात आले आहेत.
साने, चिं.रा. दीक्षित, श्री. गं.
मानवी वैद्यक : काही विशिष्ट कारणांमुळे वंध्यत्व असलेल्या जोडप्यांच्या वंध्यत्वावर उपचार म्हणून कृत्रिम वीर्यसेचन ही पध्दत वापरली जाऊ शकते. एम्. सिम्स यांनी तिचे वर्णन, ‘गर्भधारणेसाठी जिवंत शुक्राणुयुक्त वीर्य योग्य काळी योनीमध्ये निक्षेपित करणे’, असे केले आहे. या पध्दतीत प्राकृत लैंगिक समागमाऐवजी यांत्रिक साधनांनी योनिमार्गात किंवा गर्भाशय ग्रीवेत वीर्यसेचन केले जाते. मूल दत्तक घेण्याला एक पर्याय म्हणून ती समजता येईल. मानवात कारणाप्रमाणे पतीचे वीर्यसेचन व दात्याचे वीर्यसेचन हे या पध्दतीचे दोन प्रकार ओळखले जातात.
मानवातील कृत्रिम वीर्यसेचनाच्या शक्यतेचा पहिला उल्लेख इ. स. सहाव्या शतकात ⇨टॅलमुडच्या बॅबिलोनियन प्रतीत आढळतो. एक स्त्री, अजाणता वीर्य असलेल्या कोमट पाण्यात स्नान केल्याने गर्भवती झाल्याची हकीगत एका विद्यार्थ्याने गुरूजींना सांगितल्यावर गुरूजींनी ती स्त्री निरपराधी असल्याचे सांगितले, तसेच यात समागमक्रिया झाली नसल्याचे व वीर्यसेचनी क्रियेमुळे असे घडल्याचे सांगितले. १७८० मध्ये लाझारो स्पॅलानझानी यांनी सस्तन प्राण्यांपैकी कुत्रीवर प्रथम कृत्रिम वीर्यसेचनाचे प्रयोग केले व गर्भधारणेस वीर्यातील शुक्राणू कारणीभूत असतात, असे प्रतिपादन केले तसेच मानवामध्येही ही पध्दत वापरता येईल, अशी कल्पना असूनदेखील धार्मिक निर्बंधांमुळे त्यांनी आपले प्रयोग प्राण्यांपुरतेच मर्यादित ठेवले. १७९९ मध्ये ब्रिटिश शस्त्रक्रियातज्ञ जॉन हंटर यांनी एका स्त्रीच्या पश्चयोनी भागात पिचकारीच्या मदतीने तिच्या पतीचे वीर्य दाखल केले व ती स्त्री गर्भवती झाली. दात्याच्या कृत्रिम वीर्यसेचनाची पहिली नोंद फिलाडेल्फिया येथे १८८४ मध्ये झालेली आढळते. १८८६ मध्ये एम्. सिम्स यांनी केलेली ५० कृत्रिम वीर्यसेचने अयशस्वी झाली पण तांत्रिक दोषांमुळेच असे झाले असा त्यांनी निष्कर्ष काढला. अमेरिकेत रॉबर्ट डिकिन्सन यांनी दात्याचे कृत्रिम वीर्यसेचन १८९० पासून चालू केले होते. आल्बर्ट डडरलाइन (१९१२) व हाइन्रिख एस्. फ्रेंकेल (१९१४) यांच्यामुळे ही पध्दत देशोदेशी वाढत्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. अंडमोचनाच्या वेळी कृत्रिम वीर्यसेचन करण्यासाठी अंडमोचनाची वेळ ठरविणारे फ्रेंकेल हेच पहिले होत. वंध्यत्व असलेल्या जोडप्यांतील बऱ्याच जोडप्यांत वंध्यत्वाला पुरूष (पती) कारणीभूत असतो, असे १९३० नंतर वाढत्या वैद्यकीय ज्ञानाबरोबर दिसून आले. त्यामुळे यासाठी दात्याच्या वीर्याचे कृत्रिम सेचन करण्याच्या शक्यतेचा जास्त गंभीरपणे विचार केला जाऊ लागला. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात ही पध्दत अनेक स्त्रीरोगतज्ञ वापरत होते. परंतु ब्रिटिश वैद्यकीय ज्ञानपत्रिकांत याचा सर्वसमावेशक आढावा घेतला गेल्यानंतर सर्वसामान्य जनतेला हे माहीत झाले. १९४१ मध्ये एकंदर १०,००० कृत्रिम वीर्यसेचनांचा आढावा घेण्यात आला. तेव्हा ‘पतीचे वीर्य’ २/३ वेळा व ‘दात्याचे वीर्य’ १/३ वेळा वापरले गेले, असे प्रमाण होते.
कारणे : प्राण्यांमध्ये व पशूंमध्ये कृत्रिम वीर्यसेचन करण्याची अनेक कारणे आहेत (उदा., मोठ्या प्रमाणावर पैदास करणे, सुधारित गुणधर्मांच्या जाती तयार करणे, संकरित जाती निर्माण करणे इत्यादी) परंतु त्यांतील बहुतेक कारणांसाठी मानवात कृत्रिम वीर्यसेचन केले जात नाही. मानवात विशिष्ट जोडप्याच्या संदर्भात वंध्यत्वाची तक्रार असल्यास व त्यातही वंध्यात्वाच्या काही विशिष्ट कारणांसाठीच उपचार म्हणून कृत्रिम वीर्यसेचन केले जाऊ शकते. ती कारणे पुढीलप्रमाणे आहेत :
मानवात वंध्यत्वाचे प्रमाण साधारणतः १०% आढळते. त्यांतील साधारणतः १/३ जोडप्यांत वंध्यत्वाला पुरूष कारणीभूत असतो [→ वंध्यत्व ]. अशा वेळी कृत्रिम वीर्यसेचनाने गर्भधारणा होऊ शकते. त्यामध्ये ‘पतीचे कृत्रिम वीर्यसेचन’ व ‘दात्याचे कृत्रिम वीर्यसेचन’ असे दोन प्रकार असून त्यांची कारणे वेगवेगळी आहेत.
पतीचे वीर्यसेचन : (अ) पतीच्या वीर्यात प्राकृत (स्वाभाविक) प्रमाणात शुक्राणू असून प्राकृत समागम करता न येणे याची पुढील कारणे आहेत : (१) पतीतील शारीरिक व्यंगे उदा., अधरपक्षाघात व अधश्छिद्रता (मूत्रमार्ग खालील बाजूस उघडला जाण्याची विकृती असलेले शिश्न) (२) मूत्राशयात पश्च वीर्यस्खलन (अशा वेळी मूत्रातून वीर्य घेऊन वीर्यसेचन करता येते) (३) अकाल (समागमास सुरूवात करण्याआधीच) वीर्यस्खलन (४) शिश्नोत्थान असमर्थता [पूर्ण शिश्नोत्थान असमर्थतेमध्ये पतीचे वीर्य मिळविणे अवघड असते परंतु शिश्नोत्थान असमर्थतेची बरीच कारणे मानसिक असल्याने असा पुरूष इतर वेळी -पत्नी सान्निध्यात नसताना-वीर्यस्खलन करू शकत असल्यास बऱ्याच वेळा हे वीर्य सेचनासाठी उपलब्ध होऊ शकते → लैंगिक अपमार्गण ] (५) कष्ट समागमाची अनेक कारणे आहेत [उदा., योनीचा अंगग्रह → वंध्यत्व ].
(आ) पती व पत्नीत दोष नसून व प्राकृत समागम करता येत असून पत्नीच्या गर्भाशय ग्रीवामार्गातील श्लेष्मल (बुळबुळीत पदार्थाचा) रोध विकृत असल्याने शुक्राणूंची गर्भाशयाकडील गती रूध्द होते किंवा ते मरतात. अशा वेळी वीर्याचे गर्भाशय ग्रीवेत खोलवर अंतःक्षेपण केल्यास गर्भधारणा होऊ शकते. [→ वंध्यत्व ].
दात्याचे वीर्यसेचन : (अ) पतीच्या वीर्यात शुक्राणू अत्यल्प असणे म्हणजे अल्प शुक्राणुता किंवा नसणे म्हणजे अशुक्राणुता हे वंध्यत्वाचे कारण असल्यास मूल दत्तक घेणे किंवा दात्याचे वीर्यसेचन हे दोन पर्याय उरतात.
(आ) पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची मोठी शक्यता असलेला आनुवंशिक रोग पतीला असल्यास तो अपत्यात येऊ नये यासाठी दात्याच्या कृत्रिम वीर्यसेचनाने गर्भधारणा घडवून आणण्याचा विचार करता येऊ शकतो.
(इ) Rh रक्तगट विजोड असणे किंवा अनुरूप नसणे. Rh धन पिता व Rh ऋण माता असे जोडपे असल्यास व (आधीची गर्भधारणा, गर्भपात किंवा Rh धन रक्त चुकून भरण्यामुळे) मातेच्या रक्तात आधीच Rh धन रक्ताविरूद्ध ⇨ प्रतिपिंडे निर्माण झालेली असल्यास अशा जोडप्यांच्या Rh धन गर्भात गंभीर दोष निर्माण होऊ शकतात किंवा तो जन्माआधी मृत होऊ शकतो. अशा वेळी Rh ऋण रक्तगटाच्या दात्याच्या कृत्रिम वीर्यसेचनाने होणारे अपत्य निरोगी असते. [→ रक्तगट ऱ्हीसस घटक ].
(ई) पतीच्या दुसऱ्या लग्नाच्या संदर्भात किंवा इतर कारणांमुळे पतीची नसबंदी शस्त्रक्रिया झालेली असल्यास किंवा शस्त्रक्रियेनंतर आधीची मुले मृत झाली असल्यास अपत्यप्राप्तीसाठी दात्याचे कृत्रिम वीर्यसेचन करता येऊ शकते.
दात्याची निवड : हा वैद्याच्या जबाबदारीतील भाग आहे. दाता चांगल्या बुध्दिमत्तेचा, निरोगी व शारीरिक गुणधर्मांच्या दृष्टीने पतीशी मिळताजुळता असणे आवश्यक असते. त्याचा वैद्यकीय व कौटुंबिक इतिहास माहीत असणे आनुवंशिक व शारीरिक रोग अपत्यात दात्याकडून येऊ नयेत म्हणून जरूरीचे असते. Rh किंवा इतर रक्तगट विजोड असणे या कारणाचा अपवाद वगळता दात्याचा व पित्याचा रक्तगट एकच असावा. दाता शक्यतो पित्याच्याच जातिधर्माचा असणे चांगले. त्याची जननक्षमता चांगली असल्याची खात्री केलेली असावी. या दृष्टींनी सहसा वैद्यकीय विद्यार्थ्यांची दाता म्हणून निवड केली जाते. पुढील अनेक गुंतागुंती व उपद्रव टाळण्यासाठी दाता व जोडपे एकमेकांना कायमचे अनोळखी राहतील, याची सर्व प्रकारे विशेष काळजी घेतली जाते.
पध्दती : कृत्रिम वीर्यसेचनाचा निर्णय घेण्यापूर्वी त्या विशिष्ट जोडप्याच्या वंध्यत्वासाठीच्या सर्व आवश्यक तपासण्या करून निदान निश्चिती केलेली असली पाहिजे. त्यानंतर, वर उल्लेख केलेल्या विशिष्ट कारणांसाठीच व पत्नी एरवी प्रजननदृष्ट्या निरोगी असल्यास ( कारणांप्रमाणे पतीच्या अथवा दात्याच्या ) कृत्रिम वीर्यसेचनाचा उपाय सुचविला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे पती व पत्नी परिपक्व, समतोल बुध्दीची, स्थिर वैवाहिक आयुष्य असलेली व अपत्यप्राप्तीची उत्कट इच्छा असलेली आहेत, याची खात्री करून घेणे आवश्यक ठरते. तसेच त्या जोडप्यासंदर्भात होणाऱ्या मनोवैज्ञानिक, कौटुंबिक व सामाजिक दूरगामी परिणामांचा विचार करून संभाव्य सर्व दुष्परिणामांची कल्पना देऊन हा उपाय सुचविणे ही वैद्याची जबाबदारी आहे. प्रत्यक्ष कृत्रिम वीर्यसेचनाचा निर्णय त्या जोडप्याने स्वतः घ्यावयाचा असून त्यांची तशी स्पष्ट लेखी पूर्वपरवानगी वैद्याने घेणे आवश्यक आहे.
वीर्य जमा करण्याची पध्दत : वीर्य जमा करण्याआधी कमीतकमी ४८ तास समागम केलेला नसणे किंवा वीर्यस्खलन झालेले नसणे हे वीर्याची प्रत चांगली असण्यासाठी आवश्यक असते. स्वच्छतेची सर्व काळजी घेऊन, शक्यतो हस्तमैथुनाच्या साहाय्याने (किंवा समागम करतेवेळी कंडोममध्ये ) निर्जंतुक केलेल्या काचेच्या तबकडीत वीर्य जमा केले जाते. अंदाजे १०-१५मिनिटांनी ते पातळ झाल्यावर व २ तासांच्या आत ते वापरले जाते. त्यापूर्वी वीर्याची प्राकृतता अजमावण्यासाठी त्याची सूक्ष्मदर्शकीय चिकित्सा केली जाते. सेचनासाठी अंदाजे १ मिलि. वीर्य पुरेसे होते. दात्याचे वीर्यसेचनाच्यावेळी शक्य असल्यास त्यात पतीचेही वीर्य मिसळून देण्याची पध्दत वापरली जाते. त्यामुळे पतीच्याच वीर्याने गर्भधारणा झाली असावी अशा संशयाचा फायदा मिळतो.
मानवात वीर्य सहसा लगेच वापरले जाते परंतु पशूंच्या वीर्याप्रमाणेच ते द्रव नायट्रोजनमध्ये दीर्घकाळ साठविता येते. मानवी गरजेच्या दृष्टीने फक्त काही विशिष्ट परिस्थितींतच वीर्यपेढीत याप्रमाणे गोठविलेले वीर्य साठविले जाते [उदा., पती दीर्घकाळ प्रारणाच्या (तरंगरूपी ऊर्जेच्या) किंवा किरणोत्सर्गाच्या (भेदक कण वा किरणांच्या) संपर्कात वावरणार असल्यास अशा संपर्काआधी, कर्करोगासाठी प्रारणोपचार किंवा रसायनोपचार सुरू करण्याआधी, पतीचे रोजचे काम अतिधोकादायक स्वरूपाचे असल्यास किंवा विशेष परिस्थितीत नसबंदी शस्त्रक्रियेआधी इ.] एरवी साठविलेल्या वीर्याच्या वापरामुळे होऊ शकणाऱ्या दूरगामी आनुवंशिक व इतर परिणामांच्या पुरेशा अभ्यासाअभावी ते सहसा वापरले जात नाही.
वीर्यसेचन तंत्र : कंबर वर उचललेल्या विशिष्ट अवस्थेत स्त्रीला झोपवून व निरीक्षण साधानच्या साहाय्याने गर्भाशय ग्रीवेचे मुख खुले करून शुष्क पिचकारी व वक्र प्रवेशिनीच्या साहाय्याने वीर्य योनिमार्गात खोलवर, गर्भाशय ग्रीवेभोवती किंवा जरूरीप्रमाणे गर्भाशय ग्रीवामार्गात (अंदाजे०.५सेंमी. खोल) अंतःक्षेपित केले जाते. त्यानंतर २०-३० मिनिटे कंबरेचा भाग वर उचललेल्या व पाय पोटाशी घेतलेल्या विशिष्ट अवस्थेत स्त्रीला कुशीवर झोपविले जाते. या तंत्रासाठी वापरलेले सर्व साहित्य संपूर्ण कोरडे व निर्जंतुक केलेले असते परंतु त्यासाठी कोणतेही रासायनिक जंतुनाशक व स्नेहक वापरले जात नाही.
याप्रमाणे एका ऋतुचक्रात रोज किंवा दिवसाआड ते ३ वेळा, असे दर ऋतुचक्रात योग्य काळी वीर्यसेचन केले जाते. सहसा २-३ ऋतुचक्रांमध्ये गर्भधारणा होते.
वीर्यसेचनासाठी योग्य काळ : संपूर्ण ऋतुचक्रात (अंदाजे २८ दिवस) अंडाशयातून अंडे म्हणजे स्त्रीबीज मुक्त होण्याच्या कालाच्या (मासिक पाळी सुरू झाल्यापासून अंदाजे चौदाव्या दिवसाच्या) मागे व पुढे एक दिवस केलेले वीर्यसेचन फक्त उपयुक्त ठरते. कारण अंड्याचे आयुर्मान अंदाजे ४८ तास व शुक्राणूंची अंडफलन क्षमताही अंदाजे ४८ तास टिकते. यासाठी अंडाशयातून अंडे मुक्त होण्याचा काळ जास्तीतजास्त अचूक ठरविणे आवश्यक असते. त्यासाठी अनेक अप्रत्यक्ष पध्दती उपलब्ध आहेत. [उदा., नियमित ऋतुचक्रात पुढील मासिक पाळी सुरू होण्याच्या अपेक्षित दिवसाआधी १४ दिवस, रोज ठराविक वेळी घेतलेल्या शरीराच्या तापमानांतील बदल, गर्भाशय ग्रीवेतील स्रावातील अंतःस्रावांवर अवलंबून असणारे भौतिक , रासायनिक व सूक्ष्मदर्शकीय बदल इ.→वंध्यत्व]. सध्या इतर पध्दती मागे पडून श्राव्यातीत ध्वनिप्रतिमादर्शनाने दोन्ही अंडाशयांचे रोज परीक्षण (दहाव्या दिवसापासून) करून अंडविमोचनाचा अचूक काल ठरविता येतो व त्या सुमारास वीर्यसेचन केले जाते. तरीसुध्दा यशाचे प्रमाण वाढण्यासाठी सहसा ४८ तासांच्या अंतराने दोन वेळा कृत्रिम वीर्यसेचन केले जाते.
गुंतागुंती व उपद्रव : वैद्यकीय उपद्रव : किरकोळ चक्कर येणे किंवा ओटीपोटात दुखणे यांसारखे त्रास तात्काळ होऊ शकतात. कालांतराने योनिमार्ग, गर्भाशय, अंडवाहिन्या व क्वचित पर्युदर पोकळीची संक्रामणे व उपदंश, परमा यांसारखी संक्रामणे होऊ शकतात. दाता निवडताना व वीर्यसेचन करताना सर्व आवश्यक काळज्या घेतलेल्या असल्यास संक्रामणांची शक्यता, प्राकृत समागमानंतर संक्रामणे होण्याच्या शक्यतेहून जास्त नसते परंतु वीर्यसेचन करताना रासायनिक जंतुनाशके वापरता न आल्याने मुख्यतः गर्भाशय ग्रीवामार्गात केलेल्या वीर्याच्या अंतःक्षेपणामुळे गंभीर संक्रामणांची (मुख्यतः अंडवाहिन्या व पर्युदर पोकळीच्या) शक्यता असते व त्यामुळे पुढे स्त्रीला वंध्यत्व येऊ शकते.
गुंतागुंती : मानसिक, कौटुंबिक व सामाजिक प्रकारच्या गुंतागुंती पतीच्या कृत्रिम वीर्यसेचनासंदर्भात होण्याची शक्यता कमी असते. दात्याच्या कृत्रिम वीर्यसेचनासंदर्भात या प्रकारच्या गुंतागुंती होण्यामागचे मूलभूत कारण म्हणजे, सर्वसाधारण प्रचलित समाजव्यवस्थेचा प्राथमिक घटक असलेल्या कुटुंबसंस्थेला धक्का पोहोचविणारे मूलभूत व दूरगामी परिणाम त्यामुळे होतात, हे होय. पती, पत्नी व मूल हे कुटुंब तिसऱ्या अनोळखी व्यक्तीच्या (दाताच्या) साहाय्याने निर्माण होते व ते नेहमीसारखे कुटुंब आहे असे प्रदीर्घकाल भासविले जाते. हे कुटुंब सामाजिक स्तरावर प्राकृत भासावे, होणाऱ्या मुलावर दुष्परिणाम होऊ नयेत, पतीचा आत्मसन्मान व सामाजिक स्थान ढासळू नये म्हणून व या संदर्भातील कायदेशीर परिस्थिती स्पष्ट नसल्याने ही संपूर्ण गुप्तता पाळली जाते. त्याचा मानसिक ताण कुटुंबातील व्यक्तींवर पडतो. पत्नीला अपराधीपणाची व पतीला कमीपणाची व परकेपणाची भावना ग्रासू शकते. गुप्तता न राहिल्यास कुटुंबातील सर्वच व्यक्तींना सामाजिक टीकेला तोंड द्यावे लागते व त्याचा कुटुंबातील व्यक्तींवर मानसिक ताण पडतो.
सर्वसाधारणपणे या संदर्भातील गुंतागुंती वा उपद्रव किंवा दूरगामी परिणामासंबंधी, प्रत्यक्ष पुराव्याअभावी व प्रदीर्घ मागोवा घेऊन केलेल्या संशोधनाअभावी, ठोस विधाने करणे अशक्य आहे.
पतीच्या (किंवा पती व दात्याच्या एकत्र) कृत्रिम वीर्यसेचनामुळे गर्भधारणा झाल्यास त्या विशिष्ट जोडप्यांचा मागोवा अभ्यास त्या स्त्रीरोगतज्ञास (गुप्तता राखून) करता येतो परंतु दात्याच्या कृत्रिम वीर्यसेचनासंदर्भात संपूर्ण गुप्ततेच्या कारणासाठी अशा जोडप्यांचा व मुख्यतः बालकांचा (अभ्यासासाठीसुध्दा) मागोवा घेतला जाऊ नये, असे या क्षेत्रातील तज्ञांचे सर्वसाधारण माता आहे.
कायदेशीर गुंतागुंती व नैर्बंधिक विचार : या विषयावर जगातील कुठल्याच शासनाने विशेष अधिनियम (कायदे) केलेले नाहीत. तसेच या संदर्भात निर्माण होणाऱ्या विशिष्ट दाव्यांच्या संदर्भात, निरनिराळ्या देशांत, निरनिराळ्या वेळी, तत्कालीन प्रचलित कायद्याला अनुसरुन, निरनिराळे निर्णय दिले गेले आहेत. प्रचलित कायदे सर्वसाधारण समाजातील सर्वसामान्य कुटुंबांसाठी केलेले असल्याने कृत्रिम वीर्यसेचनाने अपत्यसंभव झाल्यावर निर्माण होणाऱ्या विशिष्ट कुटुंबातील कायदेशीर अडचणींसाठी त्यांचा निरनिराळ्या प्रकारे अन्वयार्थ लावला जाऊ शकतो, हे याचे कारण आहे. तसेच कृत्रिम वीर्यसेचनातही पतीच्या वीर्याचा किंवा दात्याच्या वीर्याचा उपयोग झाल्यास दोन्ही प्रकारांसंदर्भात कायदेशीर गुंतागुंती निरनिराळ्या असू शकतात.
अपत्याची वैधता, वारसा हक्क अपत्याचा पोषण व पोटगी मिळण्याचा अधिकार, स्त्रीसंदर्भात दात्याच्या कृत्रिम वीर्यसेचनात परपुरूष-स्त्री उपभोग व त्यामुळे व्यभिचाराचा गुन्हा होतो किंवा नाही, दात्याचा अपत्यावर हक्क व अपत्यासंबंधी कर्तव्ये असतात किंवा नाही, घटस्फोट व त्यासाठी कारणे [पती वीर्यसेचनाने अपत्यसंभव झालेला असल्यास स्त्रीकडून पतीवर शिश्नोत्थान असमर्थतेचा आरोप व त्यामुळे विवाह परिपूर्ती (पत्न्युपभोग) न झाल्याने विवाहाभावाचा दावा किंवा दात्याच्या वीर्यसेचनाने अपत्यसंभव झालेला असल्यास पुरूषाकडून पत्नीवर व्यभिचाराचा आरोप किंवा वंध्यत्व हे घटस्फोटाचे कारण होऊ शकते किंवा नाही] इ. बाबतींत कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतात.
विवाहविषयक नैर्बंधिक, सामाजिक व नैतिक बंधने भारताहून शिथिल असणाऱ्या देशांतही याप्रमाणे अनिश्चित परिस्थिती आहे. भारतात वरील प्रश्नांशिवाय (विशेषतः दात्याच्या कृत्रिम वीर्यसेचनाच्या बाबतीत) जात, धर्म इत्यादींमुळे गुंतागुंत वाढते. म्हणून असा उपक्रम करण्यापूर्वी वैद्याने उभयता पति-पत्नींकडून स्पष्ट लेखी पूर्वपरवानगी वा संमती घेणे आवश्यक आहे.
पती व पत्नींची नावे, त्यांची वये कायदेशीर संमती देण्याइतकी आहेत, अपत्यलाभाच्या तीव्र इच्छेमुळेच या उपक्रमाचा अवलंब केला जात असून त्यामुळे त्यांचे वैवाहिक स्वास्थ्य, सौख्य व स्थैर्य वाढेल इ. गोष्टींचा उल्लेख असलेली घोषणा व दाता निवडण्याचे अधिकार वैद्याला असून दात्याचा शोध न करण्याची प्रतिज्ञा, गर्भधारणा होईपर्यंत आवश्यक तितक्या वेळा हा प्रयोग करण्यास अनुमती, पूर्ण सहकाऱ्याची घोषणा, या कार्यातील जोखीम व धोका यांची पूर्ण कल्पना दिली असल्याचा उल्लेख, या उपक्रमातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उद्भवणाऱ्या (शारीरिक किंवा नैर्बंधिक) स्वत्वाधिकार, मागणी किंवा हानी यांपासून व सर्व प्रकारच्या दाव्यांपासून वैद्य, त्याचे सहकारी व दाते यांना स्वेच्छेने पूर्ण मुक्तता (मोकळीक) व हानिवर्ज्यता वा उपद्रवहीनता दिल्याचा उल्लेख व तरीही अशी काही नैर्बंधिक कारवाई झालीच तर न्यायालय, वकील इत्यादींचे वेतन, इतर खर्च व विरूध्द निर्णय झाल्यास भराव्या लागणाऱ्या दंडाची पति-पत्नी व्यक्तिशः वा उभयता भरपाई करण्यास बांधलेली आहेत अशी प्रतिज्ञा, तसेच आपाततः गर्भधारणा व प्रसूतीतील वैगुण्यांमुळे, जन्मजात व आनुवंशिक विकृतींमुळे व इतर कारणांमुळे होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांतून वैद्य, सहकारी व दाता यांना मुक्तता देणारी व वरील सर्व गोष्टींचा उल्लेख असलेली लेखी पूर्वपरवानगी घेतलेली असणे महत्त्वाचे आहे. प्रत्यक्ष उपक्रमाचे वेळी उपस्थित असलेल्या परिचारिकेकडून त्या वेळी कोणतेही अनुचित कृत्य झाले नसल्याचा निर्वाळा देणारी साक्ष या लेखावर घेऊन ठेवणे, दात्याच्या पूर्ण शारीरिक तपासणीची माहिती व त्याच्या वीर्याचा कृत्रिम सेचनासाठी उपयोग करण्यास त्याची संमती इ. लेख वैद्याने जपून ठेवले पाहिजेत, त्यामुळे दुर्लक्ष, हानी, परस्त्रीउपभोग, व्याभिचारास साहाय्य करण्याचा कट करणे इ. आरोपांपासून त्याचे रक्षण होईल.
वरील प्रश्नांबरोबरच, विशेषतः पाश्चात्त्य देशांत व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीस्वातंत्र्य व ⇨लैंगिक अपमार्गणातील काही गोष्टींकडे पाहण्याच्या नवीन दृष्टिकोनामुळे एकटेच राहू इच्छिणाऱ्या कुमारी स्त्रीने किंवा समसंभोगी (समरती) स्त्रीने फक्त संततिप्राप्तीसाठी दात्याच्या कृत्रिम वीर्यसेचनाची मागणी करणे इत्यादी नवीनच गुंतागुंती निर्माण होत आहेत. तसेच वंध्यत्वावर उपचार म्हणून शरीरबाह्य अंडफलन करणे, मातेऐवजी दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात या गर्भाची वाढ करणे व अंडफलनासाठी जरूरीप्रमाणे पतीच्या किंवा दात्याच्या वीर्याचा उपयोग करणे वगैरे नवीन संशोधनामुळे या गुंतागुंतीत भर पडत आहे.
पशूंमध्ये सुप्रजनन, अधिक प्रजनन व संकरित सुधारित जातींचे उत्पादन यादृष्टीने कृत्रिम वीर्यसेचनांकडे पाहिले जात असले तरी मानवामध्ये या तंत्राचा उपयोग काही विशिष्ट कारणांसाठीच व सर्व बाजूंनी पूर्ण विचारांतीच करणे आवश्यक आहे.
प्रभुणे, रा. प.
पहा : पशुप्रजनन पशुसंवर्धन पुंस्त्वविद्या वंध्यत्व.
संदर्भ : 1. Campbell, J.R. Lasley, J. F. The Science of Animals That Serve Mankind, New York, 1985.
2. I. C. A. R. Handbook of Animal Husbandry, New Delhi, 1977.
3. Mazumadar, P. Eugenics, Human Eugenics and Human Failings, 1991.
4. McDowell, R. E. Improvement of Livestock Production in Warm Climate, San Francisco, 1972.
5. Warner, M. P. A Couple Who Want a Baby, New York, 1981.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..