रोगविभ्रम : (हायपोकाँड्रिया). प्रत्यक्ष रोगाच्या अभावी स्वतःच्या आरोग्याविषयी अस्वस्थ होऊन सतत फाजील काल्पनिक चिंता करत राहण्याच्या आणि क्षुल्लक लक्षणांमध्ये मोठ्या रोगाचे मूळ शोधत राहण्याच्या प्रवृत्तीला किंवा मानसिक अवस्थेला रोगविभ्रम असे म्हणतात. शरीरस्वास्थ्य व शरीरक्रियांच्या सुरळीतपणाविषयीचा ध्यास, शरीरक्रियांतील किरकोळ बदलांना व किरकोळ तक्ररींना अनैसर्गिक व अवास्तव प्रतिक्रिया आणि त्यातून उद्‌भवणारी गंभीर आजार असल्याची क्रिया होण्याची भीती यांचाही समावेश रोगविभ्रमात होतो. रोगविभ्रम हा विशिष्ट रोग नसून, विशिष्ट मानसिक अवस्थेमुळे, विशिष्ट प्रकारे दिसणाऱ्या निरनिराळ्या लक्षणांचा संच आहे.  

सर्वसाधारणपणे ही विकृती तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींत, विशेषतः स्त्रियांत जास्त प्रमाणात आढळते. काही वेळा, इतर अनेक मनोविकृतींनी पछाडलेल्या इतर वयोगटांतील व्यक्तींमध्ये उदा., पौगंडावस्थेतील ⇨मज्जाविकृतीपासून ते वार्धक्यातील मनोऱ्हासापर्यंत मूळ विकृतीचा एक भाग म्हणून रोगविभ्रमासारखी लक्षणे आढळू शकतात किंवा काही व्यक्तींत ही गंभीर मानसिक वा भावनिक असंतुलनाची लक्षणे असू शकतात परंतु सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष गंभीर शरीरिक रोगांमध्ये या प्रकारची मानसिक अवस्था व लक्षणे दिसून येत नाहीत. 

गंभीर रोग, अपंगत्व व मृत्यू यांच्या भीतीतून रोगविभ्रमाची अवस्था निर्माण होत असावी, असे एक मत आहे. वाचनातून किंवा इतर माध्यमांद्वारे मिळणारी गंभीर रोगांविषयीची माहिती, कुटुंबातील किंवा जवळच्या व्यक्तीची मोठी शस्त्रक्रिया, दीर्घकालीन किंवा गंभीर रोग किंवा मृत्यू यांमुळे ही भीती निर्माण होते. या भीतीविरुद्ध झगडण्याचा मार्ग म्हणून वैद्यकीय पुस्तकांचे व लेखांचे वाचन करून व इतर मार्गांनी वैद्यकीय माहिती मिळविली जाते परंतु स्वतःच्या प्रकृतीविषयी अनावश्यक चिंता व वैद्यकीय वाङ्‌मयाची विकृत आवड यामुळे नको तेवढ्या प्रमाणात वैद्यकीय साहित्य वाचल्यामुळे रोगविभ्रम उद्‌भवतो, असेही मत आहे. एखाद्या, विशेषतः हृदयविकार, कर्करोग यांसारख्या, रोगाविषयीचा लेख वाचनात आल्यावर तो रोग आपल्याला झालेला आहे किंवा होणार आहे या भीतीतून त्या रोगाशी साधर्म्य असणारी लक्षणे उद्‌भवू लागतात. काहींच्या मते आई-वडिलांनी मुलाच्या प्रकृतीची फाजील काळजी घेतल्याने त्या मुलात पुढे अशी लक्षणे उद्‌भवतात, तर सिग्मंड फ्रॉइड इ. काहींच्या मते या मनोविकृतीचा संबंध, व्यक्तीचे कामप्रेरणेपासून विभक्तीकरण होण्याशी असतो. अपयशाच्या भावनेविरुद्ध संरक्षक ढाल किंवा अटळ संघर्षातून सुटका करून घेण्याचे साधन म्हणूनही रोगविभ्रमग्रस्त व्यक्ती तथाकथित गंभीर आजाराचा उपयोग करतात. लैंगिक गोष्टीसंबंधीचे अज्ञान, गुप्ततेची व निषिद्धतेची भावना आणि मोकळेपणाने ज्ञान मिळविण्याची अशक्यता यांमुळे क्षुल्लक लैंगिक तक्रारींना अवास्तव महत्त्व दिले जाते आणि व्यक्ती आत्मकेंद्री, आरोग्याविषयी व तथाकथित लैंगिक दोषाविषयी चिंतामग्न व कुढी बनते. त्यातच मुष्टिमैथुन, वेश्यागमन इ. निषिद्ध मानलेल्या गोष्टी केल्यावर येणाऱ्या अपराधीपणाच्या भावनेने अनेकांमध्ये रोगविभ्रम निर्माण होतो.

स्वतःच्या आरोग्याची अनावश्यक चिंता, शरीरक्रिया सुरळीत चालण्याविषयी दुराग्रह व गैरसमज आणि क्षुल्लक लक्षणांवरून मोठे अनुमान काढण्याची प्रवृत्ती यांमुळे या व्यक्तींना स्वतःला गंभीर आजार झालेला आहे याची सतत खात्री वाटत असते. उदा., अपचन झाले असता पोटाचा कर्करोग, खोकला झाल्यास क्षयरोग व छातीत कुठेही दुखल्यास हृदयविकार झाला आहे अशी या व्यक्तींना खात्री असते किंवा अशा एखाद्या रोगाची भीती त्यांच्या मनात रुजल्यास त्या रोगाच्या लक्षणांप्रमाणे काही लक्षणे त्या व्यक्ती दाखवू लागतात. काही वेळा लक्षणे संदिग्ध असतात व रोगही अनामिक असतो. काही वेळा व्यक्ती निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या रोगांशी संबंधित असलेल्या तक्रारी करते, तर काही वेळा एकाच रोगाची भीती मुळाशी असल्याने त्याच रोगाविषयी निरनिराळ्या तक्रारी उद्‌भवतात.


 

सर्वसाधारणपणे अशा व्यक्तींच्या तक्रारी अंतस्त्य अवयवांशी (उदा., हृदय, जठर, आतडे किंवा जननांगे) निगडित व संदिग्ध असतात (बहुधा या व्यक्ती अंतस्त्य अवयवांपासून होणाऱ्या संवेदनांविषयी व या अवयवांच्या कार्यांविषयी जास्त संवेदनाक्षम असतात. त्यामुळे या अवयवांच्या कार्यात थोडाही बदल झाल्यास त्याचा या व्यक्तींवर गंभीर परिणाम होतो). या तक्रारी वेदना किंवा असुखकर भावना या स्वरूपातील असतात. त्या शरीरात कुठेही उद्‌भवू शकतात व जागाही बदलू शकतात परंतु या तक्रारीच्या तीव्रतेचे समर्थन करण्यास पुरेशी चिन्हे प्रत्यक्ष तपासणीत आढळत नाहीत पण तरीही त्या व्यक्तीला वाटणारी गंभीर रोग झाल्याची भीती किंवा आरोग्यविषयक चिंता सहजपणे कमी करता येत नाही. परिणामी व्यक्ती आत्मकेंद्री, कुढी, एकलकोंडी बनते व तिला निद्रानाश, अपचन व बद्धकोष्ठ आणि विषण्णता इ. विकार जडतात. परिणामी भूक कमी लागणे, अशक्तपणा, छातीची धडधड, घाम येणे, कापरे भरणे, कामवासना दडपली जाणे, कामात लक्ष न लागणे इ. आगंतुक लक्षणे उद्‌भवू शकतात. यामुळे इतर व्यक्ती व सभोवतालचा परिसर यांच्याबरोबरच्या स्वाभाविक संबंधात बिघाड निर्माण होऊन सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे नैसर्गिक जीवन जगणे या व्यक्तींना अवघड होते.

या विकृतीचे वा मानसिक अवस्थेचे निदान करण्यासाठी प्रथम संपूर्ण शारीरिक तपासणी मुख्यतः व्यक्तीच्या तक्रारींच्या अनुरोधाने करावी लागते. त्यामुळे तक्रारींच्या मुळाशी कोणताही गंभीर रोग नाही याची वैद्य खात्री करून घेऊ शकतो व रोग्याचा विश्वासही संपादन करू शकतो परंतु सर्वसाधारणपणे या विकृतीचे निदान तक्रारींचे स्वरूप व रोग्याची त्यामागील मानसिक बैठक यांच्या अवलोकनानेच होते.

या विकृतीवर उपचार करताना प्रथम तक्रारीमागे किरकोळ रोग असल्यास यांवर उपचार केले जातात. तसेच रोगविभ्रमाची अवस्था ही इतर गंभीर मानसिक रोगाचा भाग असल्यास त्या मानसिक रोगावर मुख्यतः उपचार केले जातात. एरवी उपचारांचा मुख्य भर रोग्याला लक्षणांचा वा तक्रारींचा योग्य अर्थ वरचेवर समजावून सांगणे, तिला कोणताही गंभीर रोग झालेला नाही हे पटवून देणे, गंभीर रोगाची भीती घालविण्याचा प्रयत्न करणे व धीर देणे यांवर असतो परंतु स्वतःच्या आरोग्य चिंतेत मग्न राहण्याच्या व त्यासाठी सतत वैद्याचा सल्ला घेण्याच्या या व्यक्तींच्या प्रवृत्तीला उत्तेजन मिळणार नाही अशा कौशल्याने हे धीर देण्याचे काम करावे लागते. याशिवाय नियमित व्यायाम, योग्य आहार, विश्रांती, मनोरंजन, एकटेपणा टाळणे व चारचौघांत मिसळून वागणे यांसाठी अशा व्यक्तीला प्रवृत्त करावे लागते.

सहसा या उपचारांचा अर्धवट व तात्पुरताच उपयोग होतो व आरोग्यविषयक चिंता व गंभीर रोगाची भीती कमी होत नाही. गंभीर शारीरिक रोग झाल्याची या व्यक्तींना खात्री वाटत असते व त्याच्या पुष्ट्यर्थ त्या निरनिराळ्या चिकित्सकांचा सातत्याने सल्ला घेत राहतात. शिवाय शारीरिक रोगाच्या खात्रीमुळे मानसोपचार करून घेण्यास त्या सहसा तयार होत नाहीत. रोगविभ्रमाच्या गंभीर अवस्थेत मनोविश्लेषण आणि अन्य पद्धतींनी मानसचिकित्सा करावी लागते पण या चिकित्सेच्या उपयुक्ततेविषयी पूर्वानुमान करणे अवघड असते. थोडक्यात रोगविभ्रमावरील चिकित्सा सातत्याने, चिकाटीने, काळजीपूर्वक व दीर्घकाल करावी लागते.

या विकृतीचे हायपोकाँड्रिया हे इंग्रजी नाव हायपो म्हणजे खाली आणि काँड्रिया म्हणजे छातीचा पिंजरा वा बरगड्या या ग्रीक शब्दांवरून पडले आहे, कारण या विकृतीशी संबंधित असलेल्या तक्रारी बहुधा पोटाच्या बरगड्यांखालील भागात असल्याने या रोगाचे मूळ तिथे आहे, असे मानले जात असे. ग्रीक शब्दांवरूनच तयार झालेले हायजियाफ्राँटिस हे इंग्रजी नाव जास्त समर्पक आहे (हायजिया म्हणजे आरोग्य व फ्राँटिस म्हणजे चिंता).

ढमढेरे, वा. रा. ठाकूर, अ. ना.