काँगो प्रजासत्ताक (ब्रॅझाव्हिल) : मध्य आफ्रिकेतील एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश. क्षेत्रफळ ३,४२,००० चौ. किमी. लोकसंख्या १०,८९,३०० (१९७०). शेजारच्या काँगो लोकसत्ताक गणतंत्रापासून (झाईरे) हे वेगळे कळून यावे म्हणून त्यांचा उल्लेख त्यांच्या राजधान्यांसह रिपब्लिक ऑफ काँगो (ब्रॅझाव्हिल) व डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (किन्शासा) असा करतात. हे सु. ३ ४५’ उ. ते ५ द. व सु. ११ पू. ते १८३०’ पू. यांच्या दरम्यान असून, त्याचे दक्षिणोत्तर अंतर सु. ९४५ किमी. व पूर्वपश्चिम अंतर सु. ४२५ किमी. आहे. विषुववृत्त याच्या जवळजवळ मध्यातून जाते. याच्या उत्तरेस कॅमेरून व मध्य आफ्रिका प्रजासत्ताक, पूर्वेस व दक्षिणेस काँगो लोकसत्ताक गणतंत्र (किन्शासा), नैर्ऋत्येस अंगोलाचा काबिंदा हा तुटक प्रांत व पश्चिमेस अटलांटिक महासागर आण गाबाँ हा देश अाहे. अटलांटिकवरील याचा किनारा सु. १५० किमी. लांबीचा आहे.

भूवर्णन : हा देश म्हणजे काँगो नदीच्या विशाल खोऱ्याचा एक लहानसा भाग आहे. पूर्व सरहद्दीवरील ऊबांगी व काँगो नद्यांना लागून चतुर्थक काळातील गाळाचे मैदान आहे. ते पश्चिमेकडे उंच होत जाते व दुय्यम तांबड्या आणि तृतीयककालीन पांढऱ्या वालुकाश्माच्या सु. ७९० मी. उंचीच्या पठारात त्याचे रूपांतर होते. पश्चिमेकडे या वालुकाश्माखाली वेगवेगळ्या प्रकारचे आर्कियन गाभाखडक असल्यामुळे तेथील पृष्ठभागाचे स्वरूप फार जटिल झालेले आहे. माँटूस डु शैलूच्या ग्रॅनाइटांवर फ्रान्सव्हिल द्रोणीचे व मायूंबेचे वालुकाश्म, शिस्ट, चुनखडक व पिंडाश्म आहेत. शिस्टवरील दऱ्या रुंद आहेत. नियारी खोऱ्यातून अंतर्भागात प्रवेश करता येतो. याच्या पश्चिमेस ७३५ मी. उंचीचा ग्रॅनाइट व कॉर्ट‌्झाइट यांचा बनलेला मायूंबे गिरिपिंड आहे. तेथे नियारी निदऱ्यांतून वाहते. याच्या दक्षिणेस स्टॅन्लीपूलच्या खाली कॉंगो नदीला वेढून टाकणारी प्रपातयुक्त पठारकड आहे. उत्तरेस मायूंबे गिरिपिंडाच्या पश्चिमेस चिकणमातीयुक्त फ्लायोसीन वालुकाश्माचे सु. ६० किमी. रुंदीचे किनारी मैदान असून, त्याच्या किनाऱ्यावरील खारकच्छांच्या दरम्यान काहीसा उंच असा एक पट्टा आहे. या देशात पेट्रोलियम, शिसे, पोटॅश, सोने, बॉक्साइट, कथिल, तांबे व युरेनियम ही खनिजे आहेत. परंतु अपुरा साठा व दळणवळणाच्या गैरसोयी यांमुळे त्यांचा पुरेपुर उपयोग करून घेता आलेला नाही. ऊबांगी-कॉंगोच्या काठच्या मैदानातून मोटाबा, लीक्वाला, सॅंग्गा व आलीमा या प्रमुख नद्या वाहत येऊन त्यांना मिळतात. या नद्यांचे फाटे पुष्कळदा एकत्र मिळतात व पुन्हा दूर जातात. त्यामुळे अनेक दलदली उत्पन्न झाल्या आहेत. क्वीलू ही क्रिस्टल पर्वतात उगम पावून सु. ३२५ किमी. वाहत जाऊन अटलांटिकाला मिळते. तिला सु. मध्यावर दक्षिणेकडून नियारी येऊन मिळते. नियारीवरही अनेक प्रपात आहेत.

हा देश विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंस फारतर ५ पसरलेला असल्यामुळे येथील हवामान उष्णकटिबंधीय आहे. हवा उष्ण व दमट असते. वार्षिक सरासरी तापमान २० से. ते ३० से. पर्यंत असते व वार्षिक सरासरी पाऊस २०० सेंमी. ते २५० सेंमी. असतो. त्यातल्या त्यात जानेवारी ते मार्च व जून ते सप्टेंबर हे महिने कमी पावसाचे असतात. पाऊस बहुधा मुसळधार, गडगडाटी, वादळी स्वरूपाचा अभिसरण पर्जन्य असतो.

विषुववृत्तीय घनदाट अरण्ये पूर्वेकडील मैदानी प्रदेशात व विषुववृत्ताच्या उत्तरेस आढळतात. नद्यांकाठाच्या अरण्यात सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकतो, तेथे उंच उंच वृक्ष आणि वेली यांबरोबरच खाली जमिनीवरही झुडपे दाटीवाटीने उगवलेली असतात. मध्य आफ्रिका प्रजासत्ताकाच्या सीमेजवळ स्पष्ट कोरडा ऋतू जाणवतो. तेथे सॅव्हाना गवत उगवलेले दिसते. बाटके या वालुकाश्मयुक्त पठारावर, मायूंबेच्या कुशीतील नियारी खोऱ्यात आणि बेंग्वेला प्रवाहामुळे सौम्य हवामान झालेल्या किनारी प्रदेशातही सॅव्हाना गवताळ प्रदेश आढळतो.

अरण्यमय भागात गोरिला, चिंपॅंझी व इतर वानर, साप, पक्षी, कीटक वगैरे प्राणी असतात. अरण्ये व गवताळ प्रदेश यांच्या सीमेवर जंगली हत्ती, म्हशी, ओकापी, तरस, चित्ता वगैरे प्राणी आहेत. नद्यांतून मगरी, सुसरी, हिप्पोपोटॅमस व इतर अनेक जलचर आहेत. या देशात सिंह मात्र क्वचितच दिसतो.

इतिहास : या देशातील पिग्मी लोक ऊबांगी नदीप्रदेशातून येथे आले असावे. पंधराव्या शतकात काँगो लोक काँगोमधून आले. टेकेनी स्टॅन्लीपूल विभाग व्यापला, ईशान्येकडे म्बोची होते. ते तटबंदीयुक्त गावांतून राहत असत. लीक्वाला व सॅंग्गा नद्यांच्या दलदलीच्या प्रदेशांत पिग्मी व इतर काही लोक राहत. या सर्व लोकांची लहान लहान राज्ये असत. तथापि पंधराव्या शतकापर्यंत बाह्य जगाला या प्रदेशाची काही माहिती नव्हती. पोर्तुगीज नाविक काउं द्योगू याने १४८२ मध्ये काँगो नदीच्या मुखाचा शोध लावला. त्यानंतर अठराव्या शतकात किनाऱ्याजवळच्या राज्यात ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला. परंतु मिशन पाठोपाठ धर्मही गेला. किनाऱ्यावरील काबिंदा, लोअँगो व मायूंबा इ. बंदरांतून गुलामांचा व्यापार चाले. किनाऱ्यावरील राज्ये यासाठी बंदुका व लुंग्या यांच्या रूपाने कर घेत असत. एकोणिसाव्या शतकात गुलामांच्या व्यापारावर बंदी आली व त्या पाठोपाठ ही किनारी राज्येही लयास गेली. १८७७ मध्ये स्टॅन्ली हा काँगो नदीमार्गे स्टॅन्लीपूलपर्यंत आला व पुढे अतिकष्टाने प्रपातयुक्त प्रवाहातून काँगोच्या मुखापर्यंत गेला. प्येअर साव्होर्न्यां द ब्राझा हा १८७८ मध्ये ओगोवे नदीमार्गाने वर आला परंतु त्याला स्थानिक लोकांनी परत जावयास लावले तथापि १८८० मध्ये तो स्टॅन्लीपूलपर्यंत आला व तेथील राजाशी करार करून त्याने तो मुलूख फ्रान्ससाठी मिळविला व ब्रॅझाव्हिल शहर वसविले. काँगोचे प्रपात टाळून तो नियारी-क्वीलू मार्गे प्यॅंतन्वारला आला व त्याने लोअँगो आणि प्वॅंतन्वार शहरे व्यापिली. पोर्तुगीजांचा प्रदेश व झाईरे यांमधील हद्दी १८८५ व ८७ च्या तहांनी ठरल्या. बेल्जियन काँगोची सरहद्दही ठरली. १८९१ मध्ये फ्रेंच काँगोची वसाहत स्थापन झाली. तिला १९०३ मध्ये मध्य काँगो हे नाव मिळाले. १८९४ मध्ये कॅमेरूनशी सरहद्दी ठरल्या. १८८६ ते १८९८ पर्यंत फ्रेंच कमिशनर असलेला ब्राझा परत गेला, तो १९०५ मध्ये स्थानिक लोकांच्या पिळवणुकीची चौकशी करण्याच्या कामावर आला. १९१९ च्या फ्रॅंको-जर्मन कराराने सॅंग्गा खोऱ्याचा भाग जर्मनांस दिला होता, परंतु पहिल्या महायुद्धामुळे तो करार रद्द झाला.

ब्रॅझाव्हिल ही १९१० मध्ये फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिकेची राजधानी झाली. फ्रान्सने या भागातील जंगम संपत्तीबाबत कंपन्यांना खूप सवलती दिल्या. दुसऱ्या महायुद्धात येथील फेलिक्स एबू या फ्रेंच गव्हर्नर जनरलने कॉंगोतील लोकांचा फ्री फ्रेंच चळवळीस पाठिंबा मिळविला. आफ्रिकेत राष्ट्रवादाचा उदय होत होता. द गॉल याने गव्हर्नर जनरलशी १९४४ मध्ये ब्रॅझाव्हिल येथे चर्चा करून फ्रान्सच्या वसाहतीविषयक नवीन धोरणाचा आराखडा तयार केला. १९४६ मध्ये काँगो हा फ्रान्सचा सागरपार प्रदेश म्हणून जाहीर झाला. त्याचे प्रतिनिधी फ्रेंच पार्लमेंटमध्ये घेतले गेले व त्याला‌ निवडलेली प्रादेशिक विधानसभा बहाल करण्यात आली. १९५८ मध्ये काँगोने फ्रेंच कम्युनिटीमध्ये स्वायत्त प्रजासत्ताक म्हणून रहावयाचे ठरविले. पुढे १५ ऑगस्ट १९६० रोजी कॉंगो हे संपूर्ण प्रजासत्ता झाले.

सप्टेंबर १९६० मध्ये काँगो संयुक्त राष्ट्रांचा सदस्य झाला. स्वातंत्र्यानंतर मात्र यादवी माजली. १९६६-६७ मध्ये ब्रॅझाव्हिल येथील बैठकीत राष्ट्रीय क्रांती दलातील (नॅशनल रेव्होल्यूशनरी मूव्हमेंट – एन्‌. आर्‌. एम्‌.) सदस्यांत मतभेद निर्माण झाले. जानेवारी १९६६ मध्ये. एन्‌. आर्‌. एम्‌. ने आपले संविधान जा‌हीर केले. या संविधानात सरकारपेक्षा पक्ष श्रेष्ठ असल्याचे तत्त्व मान्य करण्यात आले. त्याच वर्षाच्या एप्रिलमध्ये पंतप्रधान पास्काल लिसौबाने राजीनामा दिला. राजीनाम्याचे कारण अज्ञात आहे. पक्षांतर्गत कटू वादविवादानंतर पक्षाचे आम्बोइसे नोउमझाबाय यास नवीन सरकार स्थापण्यास आज्ञा केली. १९६३ पासूनचे हे चवथे सरकार होते. जून १९६६ मध्ये राष्ट्रीय सभेने कायदा पास करून मेजर डेव्हिड माउंटसाकेच्या आधिपत्याखाली जनतेचे राष्ट्रीय सैन्य निर्माण केले. या वेळी राष्ट्राध्यक्ष आल्फाँस मसांबा देबात आफ्रिकन बैठकीसाठी मॅलॅगॅसीमधील तानानारीव येथे गलेले होते. जनता सैन्याने ब्रॅझाव्हिल येथे खूप धुमाकूळ घालावयास सुरुवात केली. त्यामुळे खुद्द सरकारला भाडोत्री क्यूबन सैनिकांचा आधार घ्यावा लागला. मसांबा देबात परतल्यावर त्यांचे हार्दिक स्वागत झाले. १९६६ च्या शेवटी फ्रेंच सैनिकांना देश सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला, तेव्हा फ्रान्स व काँगो यांच्या संबंधात बिघाड झाला त्याचबरोबर साम्यवादी देशांबरोबरील संबंध घनिष्ट होत गेले. ऑगस्ट १९६६ मध्ये चीनमधून तंत्रज्ञा रस्तेदुरुस्तीसाठी ब्रॅझाव्हिलला आले. तसेच ऑगस्ट १९६६ मध्ये पोर्तुगालने हवाई हद्दीचा भंग केल्यावरून काँगोने पोर्तुगालशी संबंध तोडले. १९६५ मध्ये अमेरिकेबरोबरचे राजकीय संबंधही तोडण्यात आले होतेच.  १९६६ व १९६७ मध्ये राजकीय परिस्थिती फारच तंग झाली. मसांबा देबात याने १९६८ मध्ये मुख्य प्रधानपद स्वत:कडे घेतले. परंतु ऑगस्टमध्ये सैन्याने त्याला दूर केले. जानेवारी १९६९ पासून मारॅन न्गुआबी अध्यक्ष झाला व सध्या त्याच्याच हातात सत्ता आहे.

राज्यव्यवस्था : १९५६ मध्ये गाय मोले याच्या फ्रेंच सरकारने ‘लोइ केडर’ द्वारा पिग्मींसह सर्व काँगो प्रजेस प्रौढ मतदानपद्धतीनुसार मतदान हक्क दिला. त्यामुळे अंतर्गत स्वायत्ततेस प्रारंभ झाला. १९६० नंतर बरीच आफ्रिकन राष्ट्रे स्वतंत्र झाली, त्यांच्यात एकता नांदावी म्हणून संघटना निर्माण करण्याच्या प्रयत्नास चालना मिळाली. सुरुवातीस निर्माण झालेल्या अनेक संघटनांपैकी ब्रॅझाव्हिल संघटना डिसेंबर १९६० मध्ये स्थापण्यात आली. दाहोमी, अपर व्होल्टा, कॉंगो (ब्रॅझा.), कॅमेरून, आयव्हरी कोस्ट, मध्य आफ्रिका प्रजासत्ताक, गाबाँ, मॅलॅगॅसी, चॅड, नायजर, सेनेगल व मॉरिटेनिया ही राष्ट्रे या संघटनेची सदस्य झाली होती. परंतु १९६३ मध्ये सर्व आफ्रिकन राष्ट्रांनुमते आफ्रिका एकता संघटना (ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी – ओ. ए. यू.) स्थापण्यात आली. तिचे मुख्य कार्यालय ‌अदिस अबाबा (इथिओपिया) येथे आहे. आज देशात कौन्सिल नॅशनल द ला रेव्होल्यूशन (सी. एन्‌. आर्‌.) नावाचा पक्ष अस्तित्त्वात आहे. सरकार या पक्षाच्या हातातील बाहुले आहे. मध्यवर्ती सत्ता पक्षात केंद्रित करण्यात येऊन साम्यवादी तत्त्वावर राज्यकारभार केला जातो. १९६३ च्या संविधानाऐवजी नवीन कायदा करून सर्व जबाबदारी सी. एन्. आर्‌. वर टाकलेली आहे. त्यानुसार पक्षसंघटनेचा अध्यक्ष न्गुआबी हाच राष्ट्राध्यक्ष आहे. तेरा आंतरराष्ट्रीय संघटनांच्या कचेऱ्या येथे आहेत. फ्रेंच ही राज्यभाषा आहे. ऑगस्ट १९६८ मध्ये सैन्य, पोलीस आणि नागरी संरक्षक दल एकत्रित करण्यात आली. ओ. ए. यू. च्या समान संरक्षण कराराचे हे प्रजासत्ताक सदस्य आहे. सैन्यदल १,४०० चे आहे वायुदल सु. २०० चे आहे.


सप्टेंबर १९६८ मध्ये सर्वोच्च न्यायालय, अपील न्यायालय, सात खालची न्यायालये, तीन कामगार न्यायालये व दंडाधिकारी न्यायालये होती. नवीन सुधारणेप्रमाणे सी. एन्‌. आर्‌. ने निवडलेल्या ५० डेप्युटींपैकी नऊ व नऊ न्यायाधीश यांचे मिळून एक, नवीन क्रांतिकारी न्यायालय निर्माण केलेले आहे.

आर्थिक स्थिती : हा देश शेतीच्या बाबतीत फारसा आशादायक नाही. अवघे १०,००,०००  हे. क्षेत्र लागवडीखाली आहे. बहुतेक मृदा नापीक आहे. येथील बहुतेक सर्व शेती निर्वाहशेती असून ती परंपरागत जुन्या पद्धतीने केली जाते. कसावा, केळी, रताळी, मॅनिऑक ही मुख्य पिके होतात. यांशिवाय लिंबू जातीची फळे, ताडतेल, ताडफळे, कोला, रबर, तंबाखू, कॉफी, कोको फळे, भुईमूग इत्यादींचेही उत्पादन होते. सॅंग्गा व नियारी खोऱ्यांत नगदी पिकांचे उत्पादन वाढत आहे. कापूस, साखर, तेलबिया यांच्या उत्पादनात सुधारणा करण्यात येत आहेत. आधुनिक शेतीपद्धत काही ठिकाणी वापरली जात आहे. कापूस, लिंबू जातीची फळे व त्से त्से माशीला दाद न देणारी गुरे यांबाबतचे संशोध यशस्वी होत आहे. १९६७ मध्ये देशात २८,००० गुरे ५०,०००  शेळ्यामेंढ्या व १७,०००  डुकरे होती. स्वांके येथे, मायूंबेच्या उतरणीवर, नियारी खोऱ्यात व बाटेके पठारावर कोकोची लागवड झाली आहे. सँग्गा नदीच्या उत्तरेकडे तेल्याताड व कॉफी यांची लागवड होत आहे. शेतमालाची वार्षिक निर्यात ६९,३०,००,००० सी. एफ्‌. ए. फ्रॅंक आहे. भरपूर पावसामुळे जलसिंचनाच्या योजनांची आवश्यकताही फारशी वाटत नाही. अरण्ये बरीच तोडली गेली असली, तरी अद्याप देशाचा ४८% भाग अरण्यांखाली आहे व निर्यात मालात लाकूड हा प्रमुख पदार्थ आहे. वनसंरक्षण व वनसंवर्धन यांकडे आता लक्ष दिले जात आहे.

मायूंबेच्या उतारावर सोन्याच्या व हिऱ्याच्या खाणी आहेत. म्व्हूती व मिंडौली येथे तांबे सापडते. तेथेच आता शिसेही मिळू लागले आहे. अलीकडे फॉस्फेट व तेल यांचेही उत्पादन सुरू झाले आहे. ब्रॅझाव्हिल व प्वॅंतन्वार येथे प्रक्रियात्मक कारखाने निघाले आहेत. ब्रॅझाव्हिलजवळच्या जोउए धबधब्यावरील वीज त्याला पुरविली जाते. क्वीलू नदीवर बंधारा घालून ९,६१,५००  किवॉ. वीज उत्पन्न करण्याची योजना आर्थिक अडचणींमुळे लांबली असली, तरी पठार विभागातील बाटेके व नियारी विभागातील बूएन्झा येथील जलविद्युत योजना कार्यान्वित आहेत. ब्रॅझाव्हिल व प्वॅंतन्वार हीच काय ती प्रमुख औद्योगिक शहरे आहेत. राष्ट्रीय उत्पन्नापैकी ११% उत्पन्न उद्योगधंद्यांपासून मिळते. सु. १०,०००  औद्योगिक कामगार असून त्यांच्या संघटना साम्यवादी तत्वावर अस्तित्वात आल्या आहेत. काँगो नदीवरील मोसाका येथे माशांना धुरी देण्याचा कारखाना १९६९ मध्ये निघाला आहे. तो १५,००० कुटुबांच्या मालकीचा आहे. प्रमुख उद्योगधंदे पामतेल, साखर, बिअर, साबण, तंबाखू हे आहेत.

१९६७ मध्ये सु. २,०२३⋅९  कोटी सी. एफ्‌. ए. फ्रॅंक किंमतीची आयात झाली. ती मुख्यत: फ्रान्समधून व त्या खालोखाल इतर यूरोपीय देश व बाहेरील देश यांजकडून झाली. त्यात यंत्रे व उपकरणे, मोटारी व इतर वाहने, सुती, कापड, पेट्रोलियम पदार्थ, लोखंड व पोलाद, वाळवलेले, खारवलेले व धुरी दिलेले मासे, कागद व त्याच्या वस्तू, दारू ह प्रमुख होते. त्या वर्षी एकूण निर्यात १,१७२⋅९  कोटी सी. एफ्‌. ए. फ्रॅंकची झाली. ती फ्रान्स, पश्चिम जर्मनी, बेल्जियम व लक्झेंबर्ग, नेदरलॅंडस व यू. के. या देशांकडे झाली. त्यात मुख्यत: लाकूड, अनघड हिरे, अशुद्ध पेट्रोलियम, पामतेल, पामेटो हे पदार्थ होते.

देशात सी. एफ्‌. ए. हे फ्रेंच चलन असून १, २, ५, १०, २५  फ्रॅंकची नाणी व ५, १०, ५०, १००, ५०० १,०००   व ५,०००  फ्रॅंकच्या नोटा आहेत. 1 अमेरिकन डॉलर = २४४ सी. एफ्‌. ए. फ्रॅंक व 1 पौंड स्टर्लिंग = ५९३ सी. एफ्‌. ए. फ्रॅंक असा हुंडणावळीचा दर १९६७ मध्ये होता. १९६९ चे संतुलित अंदाजपत्रक १,५९३⋅९  कोटी सी. एफ्‌. ए. फ्रॅंकचे होते. देशात एक मध्यवर्ती, चार इतर व पाच परदेशी बॅंका आहेत. तसेच दोन वाणिज्य मंडळे व एक कामगार संघटना आहे.

देशातील वाहतूक मुख्यत: जलमार्गांनीच चालते. मैदानी प्रदेशातील नद्या पुष्कळदा नौकासुलभ असतात. ब्रॅझाव्हिल ते मध्य आफ्रिका प्रजासत्ताकाची राजधानी बांगीपर्यंत काँगो व ऊबांगी नद्यांतून मुख्यत: वाहतूक होते. काँगो (ब्रॅझा.) व काँगो (किन्शासा) यांत ६९० किमी. ची समाईक काँगो नदीची सरहद्द आहे. ब्रॅझाव्हिलनंतर समुद्रापर्यंत काँगोचा प्रवाह प्रपातयुक्त व बहुतांशी कॉंगो (किन्शासा) मध्ये आहे. त्यामुळे त्याचा वाहतुकीस उपयोग होत नाही. यासाठी ब्रझाव्हिलपासून प्वॅंतन्वार बंदरापर्यंतचा काँगो-ओशन लोहमार्ग ५१५ मी. लांबीचा १९२१ ते १९३४ पर्यंत बांधून पुरा करण्यात आला. काँगो नदीतून आलेला माल ब्रॅझाव्हिल येथे आगगाडीत चढवून प्वॅंतन्वारपर्यंत नेला जातो. याचेच फाटे खाणप्रदेशात व शेजारच्या गाबाँ देशात नेलेले आहेत. देशात ११,००० किमी. लांबीचे रस्ते असून बेरबेराती (म.आ.प्र.) वेसो-सांबोमा-ब्रॅझाव्हिल-लूडीमा ते प्वॅंतन्वार लूडीमा-मोर्सेदगो डॉलिसी-कीबॉंग्गू-लीब्रव्हिल (गाबाँ) हे महामार्ग फार उपयुक्त आहेत. देशांत अंतर्गत हवाई वाहतूक असून ब्रॅझाव्हिलजवळ मायामाया येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. बॅझाव्हिल येथे रेडिओ काँगो हे राष्ट्रीय व रेडिओ ब्रझाव्हिल हे फ्री फान्सचे प्रक्षेपण केंद्र असून तेथून अनुक्रमे फ्रेंच व देशी भाषांतून आणि फ्रेंच, इंग्रजी, पोर्तुगीजमधून प्रक्षेपण होते. 1968 मध्ये देशात ६२,००० रेडिओ परवाने आणि १,००० दूरचित्रवाणी परवाने आणि ९,००० दूरध्वनियंत्रे होती.

 

लोक व समाजजीवन  : काँगोमध्ये बहुतेक लोक बांटू महाकुलात मोडणारे आहेत. त्यांच्यात असंख्य जमाती आहेत. त्यांतील महत्त्वाच्या म्हणजे काँगो, बाटेको, म्बोची, सांधा, बान्गी, टेके व पिग्मी या होत. बान्गी व टेके मध्य कॉंगोत, काँगो ब्रॅझाव्हिल व दक्षिण काँगोत किनारपट्टीजवळ आणि पिग्मी लोक उत्तरेकडील जंगलात राहतात. इतर जाती विखुरलेल्या आहेत. या जातींपैकी पिग्मी लोक फारच बुटके व जंगलात राहणारे आहेत. अलीकडे स्थाईक होण्याची चिन्हे दिसत असली तरी अजूनही बरेच लोक भटके जीवन पसंत करतात व शिकारीवर जगतात. पिग्मी लोकांचा इतर जातींतील लोकांशी संबंध आल्याने मिश्र जाती झाल्या. त्यांना पिग्मॉइड म्हणतात. पिग्मॉइड लोक पिग्मींपेक्षा थोडे उंच असतात. तथापि ते पिग्मी म्हणून चटकन ओळखू येतात. दोन्ही काँगोंत मिळून एकूण सु. ५०,०००  ते ६०,०००  पिग्मी असावेत असा अंदाज आहे.

बांटू लोकांचा रंग, पश्चिमेकडील निग्रोंइतका काळा नसतो. ते पश्चिमेकडील निग्रोंपेक्षा उंचीने कमी असतात व त्यांचे नाक सरळ असते. ओठही तितकेसे जाड नसतात. सर्वच बांटू लोक मात्र असेच असतील असे सांगता येत नाही. बांटूंचा पुरातन धर्म म्हणजे निसर्गपूजा परंतु युरोपीय पाद्र्यांच्या आगमनानंतर व १४९१ मध्ये कॉंगोच्या राजाने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केल्यानंतर ख्रिश्चनांचे प्रमाण खूपच वाढले परंतु अजूनही पुरातन धर्मपद्धती, वयात येण्यावेळचे विधी, सुंतेचा विधी वगैरे कसोशीने पाळले जातात. लग्नाच्या वेळी मुलाच्या बापाने मुलीच्या बापास हुंडा द्यावाच लागतो. शिक्षित तरुणांसही हुंडा द्यावाच लागतो, म्हणून अनेक तरुण खेड्यांतून शहरात रोजगारीसाठी येतात व पैसा जमवून गावी जातात व लग्ने करतात. त्यांना अनेक बायका करण्यास मुभा असते, परंतु इतर बायकांस सर्व बाबतींत सारखीच वागणूक द्यावयास पाहिजे असा दंडक आहे व तशी वागणूक दिलीही जाते. त्यामुळेच समाजात स्त्रियांना योग्य स्थान प्राप्त झालेले आहे. बहुतेक जातींत वयात येताना एक विशिष्ट समारंभ विधिपूर्वक पार पाडला जातो. याचवेळी सुंतेचा विधी करण्याचीही पद्धत अनेक जातींत आढळते. अलीकडे मुले-मुली पसंतीनुसार लग्न करतात, परंतु रूढीप्रमाणे माता-पित्यांची संमती घ्यावीच लागते. प्रत्येक बांटू आपल्या जातीचा अभिमान बाळगतो. तो जातीसाठी सर्वस्व पणास लावू शकतो. अजूनही जादूटोण्यावर, करणीवर लोकांचा अतोनात विश्वास आहे. जादू, तावीज (‌तलिस्मान), गंडे-दोरे व ‘जुनु’ चा वापर दररोजच्या जीवनात होतो.

विसाव्या शतकापासून शहरी जीवनास सुरुवात झाल्याने जातिसंबंध ढिले पडत चालले आहेत. जीवनमानात फरक पडल्याने राहणीतही फरक पडलेला आहे परंतु सर्वसामान्य माणसांचा जीवनप्रवाह पूर्वीसारखाच वाहात आहे. १९६३ मध्ये नॅशनल सोशल सिक्युरिटी बोर्डाने निवृत्तिवेतन योजना सुरू केली. कौटुंबिक भत्ता व कामगारांसाठी नुकसानभरपाईची योजनाही या बोर्डाने केलेली आहे. शासनातर्फे रुग्णालये व आरोग्यकेंद्रे चालविली जातात.

भाषा व साहित्य : बांटू महाकुलातील अनेक भाषा येथे बोलल्या जातात. त्याप्रमाणेच नायजर-कॉंगो महाकुलातीलही बऱ्याच भाषांचा प्रचार आहे. त्यांतल्या त्यात कि-काँगो, ब-काँगो, म्बोचींची भाषा, तसेच सांधा लोकांची भाषा व पिग्मींची भाषा मुख्यत्वेकरून जास्त प्रचारात आढळतात. परंतु कॉंगोत जितक्या जाती तितक्या भाषा आहेत. त्यामुळे एकता नांदणे कठीण जाते. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक, शास्त्रीय व सांस्कृतिक संघटनेतर्फे १९६५ च्या ‘बामाको कॉंग्रेस’ मध्ये काही आफ्रिकन लिप्यांच्या एकीकरणाचा प्रस्ताव आला होता. आफ्रिकन भाषांसाठी एखाद्या संस्थेचीही गरज भासते. आज शाळेतील भाषा-माध्यमाचा सर्वांत मोठा प्रश्न कॉंगो समाजापुढे उभा आहे. लिखित साहित्यास अलीकडेच सुरुवात झाली आहे परंतु लोकसाहित्य भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे.

शिक्षण : १९६० पर्यंत देश फ्रान्सच्या आधिपत्याकाली असल्याने फ्रेंच भाषा शिकणे क्रमप्राप्तच होते. स्वातंत्र्यानंतर त्यात फरक करण्यात आला असला, तरी अजूनही फ्रेंच राष्ट्रीय भाषा आहे व त्यामुळे शिक्षित व्यक्तीस फ्रेंच अवगत असावयास हवी. अनेक कॉंगो तरुण फ्रेंच विश्वविद्यालयीन स्नातक आहेत. सध्या ब्रॅझाव्हिल येथे विश्वविद्यालय स्थापण्यात आले आहे. प्राथमिक शाळा पुरेशा नसल्यातरी साक्षरतेचे प्रमाण वेगाने वाढत आहे. १९६५ मध्ये सरकारने सर्व खाजगी शाळा ताब्यात घेतल्या. १९६६-६७  मध्ये ८५९ प्राथमिक शाळांतून १,९४,९६८ विद्यार्थी, ५२ माध्यमिक शाळांतून १५,९३९ विद्यार्थी आणि ३३ तांत्रिक शाळांतून २,९३१ विद्यार्थी शिकत होते. देशात वृत्तपत्रनियंत्रण आहे. देशात ४ दैनिके, ८ नियतकालिके, एक देशी व तीन परदेशी वृत्तसंस्था आहेत.


कला व क्रीडा : काँगो देश कला व क्रीडा या बाबतींत अनेक आफ्रिकन देशांच्या पुढे आहे. त्यांची आनुवंशिक कला म्हणजे लाकडावरील कोरीव काम होय. अनेक जमातींत मुखवटे व धार्मिक नृत्यप्रसंगी वापरल्या जाणाऱ्या व इतर आकृत्या तयार करणारे कलाकार आहेत व अशा कलाकारांना मानाने वागविण्याचा प्रघातआहे.

अलीकडे फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल हे क्रीडाप्रकार व ॲथलेटिक्स लोकप्रिय असून हा देश स्पर्धांतूनही भाग घेतो. आफ्रिकन खेळांचा पहिला मेळावा ब्रॅझाव्हिल येथे १९६५ मध्ये भरला होता.

 

महत्त्वाची स्थळे : दोनच महत्त्वाची स्थळे आहेत. ब्रॅझाव्हिल व प्वॅंतन्वॉर (लो. १,३५,०००–१९७०). ब्रॅझाव्हिल (लो. १,७५,०००–१९७०) राजधानीचे ठिकाण असून अद्ययावत सुखसोयींनी परिपूर्ण आहे. प्वॅंतन्वॉर येथे अलीकडेच तेलाच्या उत्पादनास सुरुवात झालेली आहे. हे देशाचे प्रमुख बंदर आहे. याशिवाय जांबाला, डॉलिसी डाॅगू, एपीना, काये, मोसेंगो, वेसो ही २,५०० पेक्षा अधिक वस्तीची गावे आहेत.

संदर्भ : 1. Boyd, Andrew Van Rensburg, Patrick, An Atlas of African Affairs, London, 1965.

2. Last, G. C. A Regional Survey of Africa, Addis Ababa, 1964.

3. Life World Library, Tropical Africa, 1963.

पांडे, वि. गो. कुमठेकर, ज. ब.

कॉंगो प्रजासत्ताक