कोलोन–१ : पश्चिम जर्मनीच्या नॉर्थ ऱ्हाईनवेस्टफेलिया प्रांतातील औद्योगिक केंद्र. लोकसंख्या ८,४०,३२८ (१९७२). हे बर्लिनच्या ४७२ किमी. पश्चिम वायव्येस, ऱ्हाईन नदीच्या डाव्या तीरावर वसले असून प्राचीन काळापासून व्यापार, शिक्षण व कलाकुसरींच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. ऱ्हाईन नदीकाठचा सुपीक  परिसर व ऱ्हाईन नदीमार्गावरील महत्त्वाचे दळणवळण-केंद्र म्हणून मध्ययुगातही याला महत्त्व होते. रूर भागातील खाणी व उद्योग यांच्या वाढीबरोबर कोलोनचे महत्त्व  खूप वाढले.

कोलोन येथील प्रसिद्ध कॅथीड्रल

दोन्ही महायुद्धांत याला बरीच झळ लागली. येथे लोखंड व पोलादाचे कारखाने असून यंत्रसामग्री, मोटारी, जहाजे, रेल्वेचे डबे, रसायने, खते, रंग, औषधे, सुगंधी द्रव्ये (प्रामुख्याने ओ-द-कोलोन) कापड, खाद्यपदार्थ, साखर, तंबाखू, सौंदर्य प्रसाधने इत्यादींचे उद्योग आहेत. चौथ्या शतकातच येथे धर्मपीठ निर्माण झाल्यामुळे येथे अनेक उत्तम धार्मिक वास्तू आढळतात. तेराव्या शतकात बांधकामास सुरुवात झालेले येथील गॉथिक शैलीचे कॅथीड्रल जर्मन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना समजले जाते. एकोणिसाव्या शतकात त्यावर बांधलेले मनोरे सु. १६० मी. उंच असून महायुद्धामध्ये याला थोडीशीच हानी पोहोचली होती. याशिवाय येथील रोमानेस्क शैलीतील चर्च, प्रबोधनकाळातील इमारती व अत्याधुनिक वास्तू अप्रतिम आहेत. मार्दी ग्रा हा ख्रिश्चन लोकांच्या उपवासाच्या आधीचा मौज करण्याचा दिवस मध्ययुगापासून येथे अतिशय भव्य प्रमाणात उजवला जातो.

शाह, र. रू.