मध्यप्रदेश राज्य : भारताच्या २२ घटक राज्यांपैकी एक राज्य. देशातील मध्यवर्ती स्थानामुळे याला मध्य प्रदेश हे नाव पडले. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील हे सर्वात मोठे (४,४२,८४१ चौ.किमी.) तर लोकसंख्येच्या दृष्टीने सहाव्या क्रमांकाचे (५,२१,३८,४६७- १९८१ ) राज्य आहे. १७०४७ उ. ते २६०३५ उ. अक्षांश आणि ७४० पू. ते ८४०३० पू. रेशांश यादरम्यान पसरलेल्या वा राज्याच्या उत्तरेला उत्तर प्रदेश ,ईशान्येला उत्तर प्रदेश व बिहार, पूर्वेला बिहार व ओरिसा, दक्षिणेला आंध्र प्रदेश, नैऋत्येला, महाराष्ट्र, पश्चिमेला गुजरात आणि वायव्येला राजस्थान ही भारतातील घटक राज्ये आहेत. भोपाळ (लोक. ८,९५,८१५ -१९८१) ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन : भारतीय पठारावर वसलेले हे राज्य, भारतीय द्विरकल्पातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या तापी, नर्मदा, वैनगंगा ,महानदी इ. नद्यांचे उगमस्थान आहे. राज्याचा बहुतेक भूभाग समुद्रसपाटीपासून सु. ४८८ मी . उंचीचा पठारी प्रदेश असून तो तीव्र उताराच्या जंगलव्याप्त पर्वतरांगांनी व टेकड्यांनी, तसेच नदीखोऱ्यानी व्यापलेला आहे. हा प्रदेश दख्खन पठाराच्या उत्तर सीमेवर असल्याने उत्तरे कडील गंगेचे मैदान व दख्खन पठार एकमेकांपासून अगल झाली आहेत. राज्यात सस. पासून ३००मी. पेक्षा कमी उंचीचा भूप्रदेश फारच थोडा आढळतो. येथील बहुतेक पर्वतरांगा नैऋत्य ईशान्य दिशेने पसरलेल्या असून भूप्रदेशाचा उतार उत्तरेकडे असल्याने बहुतेक नद्या उत्तरवाहिनी बनल्या आहेत. राज्याचे पश्चिम, वायव्य व ईशान्य भाग विंध्य पर्वत, माळव्याचे पठार व कैसूर टेकड्यांनी ,तर दक्षिण भाग सातपुडा पर्वत व महादेवाच्या डोंगररांगा यांनी व्यापलेला असून पूर्व भागात मैकल डोंगररांग पसरलेली आहे. शिवाय विंध्य पर्वताच्या उत्तरेस बुंदेलखंड पठार, राज्याच्या अगदी वायव्य टोकाला मध्य भारत पठार, ईशान्येस बाघेलखंड पठार, पूर्वेला छत्तीसगड द्रोणी, तर अगदी आग्नेय टोकाला बस्तर टेकड्या पसरलेल्या आहेत. भरचनेच्या दृष्टीने राज्याचे प्रमुख तीन विभाग केले जातात. (१) ⇨विंध्य पर्वतप्रदेश व ⇨माळवा पठार यांचा या विभागात समावेश केला जातो. प्लाइस्टोसीन काळात निर्माण झालेल्या या प्रदेशाचा सर्वसामान्य उतार उत्तरेकडे असून येथील बहुतेक नद्या गंगा, यमुना यांच्या उपनद्या आहेत. हा भाग सस. पासुन सु. ४५०ते ६०० मी. उंचीचा आहे. राज्याच्या ईशान्य भागातील कैमूर टेकड्या म्हणजे विंध्य पर्वताचा विस्तारित भाग आहे. गोविंदगड हा इतिहासप्रसिध्द किल्ली याच भागात आहे. कैमूर टेकड्यांचा थोडाच भाग या राज्यात मोडतो. (२) दुसऱ्या नैसर्गिक विभागात प्रामुख्याने नर्मदा नदीच्या लांब व रूंद खोऱ्याचा समावेश होतो. हा प्रदेश उत्तरेस विंध्य व दक्षिणेस सातपुडा या दोन पर्वतरांगानी सीमित झाला आहे. जबलपूरच्या ईशान्येस या नदीखोर्‍यांची रूंदी खूपच कमी असून (सरासरी ३०किमी). हे खोरे गाळाच्या संचयनाने बनले आहे. गहू उत्पादनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. या प्रदेशात मोह वनस्पतींची वाढही मोठ्या प्रमाणात होते. या प्रमुख नदीखोऱ्याशिवाय इतर लहान नदीखोर्‍यांचे जाळे या प्रदेशात पसरले आहे. (३) नर्मदा नदीखोऱ्याच्या दक्षिणेला पसरलेली ⇨सातपुडा पर्वतरांग हा राज्यातील तिसरा नैसर्गिक प्रदेश आहे. ही रांग नैऋत्य ईशान्य दिशेने पसरलेली असून राज्याच्या मध्यभागी असलेले ⇨महादेवाचे डोंगर हे यावेच विस्तारित भाग आहेत. या वालुकाश्माच्या डोंगररांगांची निर्मिती कारबाँनिफेरस काळातील असून त्यांचा उत्तर-उतार मंद, तर दक्षिणेकडील उतार तीव्र आहे. सातपुडा पर्वतरांगेच्या पूर्वेस नैऋत्य ईशान्य दिशेने पसरलेल्या ⇨मैकल डोंगररांगेचाही समावेश याच नैसर्गिक विभागात केला जातो. हिची निर्मिती आर्कियन काळात झाली असून या डोंगरांगेने विंध्य व सातपुडा या पर्वतरांगा जोडल्या गेल्या आहेत. नर्मदा नदीचे उगमस्थान असलेले अमरकंटक हे ठिकाण याच डोंगररांगेत आहे. या डोंगररांगांशिवाय राज्याच्या ईशान्य सीमेवर पन्ना टेकड्या, तर महादेव डोंगररांगेच्या ईशान्येस भानरेर डोंगररांग असून ती वालुकाश्मापासून बनलेली आहे. राज्याचा पूर्व भाग सपाट मैदानी असून या भागात तुरळक जंगलव्याप्त लहानलहान टेकड्याही आढळतात. पश्चिमेकडील माळवा पठाराचा काही भाग चंबळ खोऱ्याने व्यापलेला असून हे खोरे उत्खातबूमी (बॅडलँड) म्हणून कुप्रसिध्द आहे. राज्यातील माळवा पठार, नर्मदेचे खोरे व सातपुडा पर्वतरांगेचा काही भाग यांमध्ये काळी सुपीक मृदा आढळते. तर राज्याच्या पूर्व भागात मुख्यत्वे तांबडी व पिवळी मृदा असून ती काळ्या मृदेपेक्षा कमी प्रतीची व वाळूमिश्रित आहे.

मध्य प्रदेश राज्य अनेक लहानमोठ्या नदीखोर्‍यांनी व्यापलेले असून येथील बहुतेक नद्या उत्तरवाहिनी आहेत. तापी, नर्मदा, चंबळ, वैनगंगा, महानदी या येथील प्रमुख नद्या होत.⇨ तापी, ⇨नर्मदा,या दोन्ही नद्या पश्चिमवाहिनी असून त्या सातपुडा पर्वतरांगांत उगम पावतात. ⇨चंबळ, नदी राज्याच्या वायव्य भागात उगम पावून उत्तरेस वहात जाते. ⇨वैनगंगा नदी महादेव डोंगररांगेत उगम पावून दक्षिणेस वाहत जाते व पुढे गोदावरी नदीस जाऊन मिळते.⇨महानदी राज्याच्या आग्नेय भागात उगम पावून प्रथम उत्तरेस व नंतर पूर्वेस ओरिसा राज्यात वहात जाते. या नद्यांशिवाय राज्याच्या वायव्य भागातून कालीसिंध, पार्वती, उत्तर भागातून बेटचा सिंद, घसान, केन, शोण व पूर्व भागातून हसदो (हसदेव) ,रिहांड, पैरी इ. नद्या उत्तरेकडे वहात जातात. शबरी ही राज्याच्या आग्नेय सरहद्दीवरील नदी दक्षिणेस सिलेरू नदीस जाऊन मिळते. तर इंद्रावती ही आग्नेय भागातील नदी राज्यातून पूर्वेकडून पश्चिमेकडे राज्याच्या सरहद्दीपर्यंत वहात जाऊन पुढे दक्षिणेस वळते आणि आणि सरहद्दवरून काही अंतर गेल्यावर आंध्र प्रदेश राज्यात प्रवेश करते. या नद्यांशिवाय राज्यात काही नैसर्गिक व कृत्रिम सरोवरेही आहेत. आग्नेय भागातील तंदुला तलाव, ईशान्य भागातील रिहांड धरणाचा जलाशय, वायव्य भागातील चंबळ नदीवरील गांधीसागर इ. जलाशय महत्वाचे आहेत.

हवामान : राज्यातील हवामान मॉन्सून प्रकारचे असून जून ते ऑक्टोबर या काळात पाऊस पडतो. उन्हाळ्यात (मार्च ते मे) येथील तपमान २९से. पेक्षाही जास्त असते. तर हिवाळ्यात हवा कोरडी व आल्हाददायक असते. भूरचनेच्या विविधतेप्रमाणे हवामानात थोडाफार फरक झालेला आढळतो. राज्याच्या उत्तर भागात हवामान तीव्र स्वरूपाचे ,तर पठारी भागात ते समशीतोष्ण असते. पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील मैदानी प्रदेशात ते थोडे उष्ण व दमट असते. राज्याच्या पूर्व व आग्नेय भागांत पर्जन्य १५०सेंमी पेक्षा जास्त पडतो. तर उत्तर व पश्चिम भागांत त्यामानाने कमी पडतो. अगदी पश्चिमेला १००सेमी पेक्षा कमी ,तर चंबळ खोऱ्यात ७५ सेंमी पेक्षाही कमी पडतो.

वनस्पती व प्राणी : १९८२ मध्ये राज्यातील ३५% (१,५५,४११ चौ.किंमी) भूप्रदेश जंगलव्याप्त होता. येथील वनस्पती उष्ण कटिबंधीय जंगलप्रकारांतील असून त्यांत प्रामुख्याने साल, ऐन (साजा) बिबळा (बिजा, बांबू, साग, सलाई (त्याचा उपयोग राळ  व औषध निर्मितीसाठी केला जातो. ) इ. वनस्पतीचा समावेश असतो. साग व सालई हे वृक्ष राज्यांच्या जंगल उत्पन्नाचे महत्वाचे घटक आहेत. येथील सागाच्या लाकडाला देशभर मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येते. राज्यातील सु. ७% क्षेत्र कायम स्वरूपाच्या कुरणाखाली आहे. विंध्य-कैमूर तसेच सातपुडा-मैकल रांगा, बाघेलखंड पठार ,चंबळ खोरे व बस्तरचा प्रदेश हे राज्यातील प्रमुख जंगलव्याप्त प्रदेश आहेत.


येथील जंगलात वाघ, बिवळ्या, गवा, ठिपक्यांचे हरिण (चितळ) अस्वल, रानरेडे, सांबर, एण ,इ. वन्यप्राणी दिसून येतात. यांशिवाय राज्यात अनेक प्रकारचे पक्षीही आहेत. वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी राज्यांत कान्हा, बांधोगढ (रेवा) इ. अभयारण्येही निर्माण करण्यात आली आहेत. कान्हा हे दलदलीतील हरिणांसाठी, तर बांधोगढ हे पांढऱ्या वाघांसाठी प्रसिध्द आहे.

चौंडे, मा.ल.

इतिहास व राज्यव्यवस्था : मध्य प्रदेश राज्यातील काहीगावे, विभाग आणि नैसर्गिक वैशिष्ट्ये  यांचा इतिहास प्राचीन आहे. हिंदू धर्मात उज्जैनचे स्थान मोठे आहे व देव-दानव युध्दात तेथे अमृतांचा थेंब पडल्याची आख्यायिका आहे. प्राचीन हिंदू साहित्यात विंध्य अमरकंटक, चित्रकूट यांसारखे पर्वत चर्मण्वती (चंबळ) नर्मदा, वेत्रवती (बेटवा) यांसारख्या नद्यांबद्दल अनेक उल्लेख आढळतात.

दोन लाख वर्षापूवी मध्य प्लाइस्टोसीन काळात हुशंगाबाद व नरसिंगपूर यांच्या दरम्यान असलेल्या नर्मदा खोऱ्यात मानव राहत होता, हे थेल-केंब्रिज मोहिमेने सप्रमाण दाखविले आहे. सिवनी व चंबळ खोऱ्यात जी हत्यारे १९५२ नंतर सापडली त्यावरून प्राचीन मानवाचे या भागातही वास्तव्य असावे, असा तर्क आहे. भीमबेटका (रायसेन जिल्हा) येथे प्रागैतिहासिक काळातील गुहा सापडल्या आहेत .रेवा, मंदसोर, नरसिंहगढ, भोपाळ, हुशंगाबाद, सागर ,सुरगुजा आणि रायगढ या जिल्हांत सापडलेल्या गुहा सु .आठ हजार वर्षापूर्वीची मानवाची आश्रयस्थाने असावीत असा तर्क आहे. सागर जिल्ह्यात १८६६ मध्ये तर १८६७-६८ मध्ये रेवाजवळ तसेच उज्जैन ,महेश्वर, कायथा, नागदा, एकण इ. ठिकाणी अश्मयुगातील व ताम्रपाषाण युगातील संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.

ऋग्वेदातील दक्षिणापथाचा (दक्षिणापद) उल्लेख ,आर्यानी विंध्य पर्वत ओलांडल्याचा उल्लेख कात्यायनाने (इ.स.पू. चौथे शतक) या भागाची वर्मिलेली माहिती, सुत्तानिपाठ या पाली भाषेतील बौध्द ग्रंथातील या प्रदेशाचे वर्णन यांवरून याच्या प्राचीन इतिहासाची कल्पना येते. 

अंगुत्तरनिकाय या ग्रंथात आर्याच्या ज्या सोळा महाजनपदांचा उल्लेख येतो. त्यापैकी अवंती, वस्त, चेदी इ. महाजनपदे आधुनिक मध्यप्रदेश राज्यात मोडतात. परिशिष्टवर्णन ,विनयविटक, मज्जहीमाणिक्य,बृहतकथा इ. प्राचीन ग्रंथांवरून अवंती , मगध, कोसल व वत्स यांच्या सत्तास्पर्धेत मगधाचे महत्व वाढू लागले व शिशुनागाच्या कारकीर्दीत अवंती मगधाचा भाग झाला, असे दिसून येते. 

चंद्रगुप्त मौर्यच्या वेळी अवंती देश व त्याची उज्जैन ही राजधानी, सम्राट अशोकाने बौध्द धर्मप्रसारार्थ केलेल्या राजाज्ञा (सांची) ,दतिया जिल्ह्यातील व रूपनाथ येथील शिलालेख ,पुष्पमित्र शुंगाच्या काळी मगध राज्याचा अवंती एक भाग असल्याचा उल्लेख ,तसेच मिलिंद राजाच्या मगधावरील आक्रमणानंतर (इ.स.पू. दुसरे शतक) शुंग साम्राज्याची पाटलिपुत्राहून विदिशेला हलविण्यात आलेली राजधानी (इतिहासकार सरकार यांच्या मते) शुंगानी मध्य भारतात स्थापिलेले राज्य इ. ऐतिहासिक घटनांवरून या प्रदेशाची प्राचीन परंपरा लक्षात येते. इ.स.पू. पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात आंध्र-सातवाहन,त्यानंतर पुढे १०० वर्षानी कुशाण इ. घराण्याची या प्रदेशावर राज्य केले. कुशाणांच्या उतरत्या काळात शक, भूमक, नहपान इ. क्षत्रपांनीही या प्रदेशातील काही भागांवर राज्य केले. 

सातवाहनांच्या अधिपत्याखालील पूर्व व पश्चिम माळव्याखेरीज आधुनिक मध्य प्रदेश राज्याचा इतरही बराच भाग होता. त्यानतंर शक किंवा कर्दमक राजांनी सातवहनांकडून सहा देश जिंकले कर्दमक राजांच्या कारकीर्दीत उज्जैनचा विद्या व संस्कृती यांचे केंद्र म्हणून विकास झाला. सातवाहनांचा अंमल फक्त दक्षिण कोसलपुरता मर्यादित राहिला. 

तिसऱ्या शतकात सातवाहनांच्या राज्याचे दक्षिण वायव्य आणि उत्तर भाग अनुक्रमे इक्ष्वाकू, अभीर व वाकाटक राजांच्या ताब्यात राज्य गेले. इ.स.चौथ्या शतकात मालव (माळवा) प्रारजून (नरसिंहपूर) यानकणिका (पूर्व माळवा) व काक (सांची) ही प्रजासत्ताके गुप्त साम्राज्यात विलीन झाली. समुद्रगुप्ताने कोसल, महाकांतार इ. प्रदेश जिंकले .दुसऱ्या चंद्रगुप्ताने शकांकडून माळवा जिंकून घेतला. शकांच्या अस्तानंतर औलिकरांनी गुप्तांचे मांडलिक म्हणून (आधुनिक मंदसोर) येथील राज्य करण्यास सुरूवात केली (इ.स.चौथे शतक) .पाचव्या शतकाच्या शेवटी बाकाटकांनी गुप्तांना बुदेलखंडातून हुसकावले. गुप्त व औलिकर या दोन्होंची येथील राज्ये हुणांच्या आक्रमणानंतर हळूहळू विलयाला गेली. ईश्ववर्मन मौखरीने कुमारगुप्तचा पुत्र दामोदरगुप्त याचा पराभव करून माळव्याचा मौखरी राज्यात समावेश केला व त्याच्या वंशजांनी बुंदलखेड जिंकला.

देवगुप्त व मैखरी संघर्षाच्या वेळी माळव्यात कलचुरी राजघराण्याचा उदय झाला. सहाव्या शतकाच्या अखेरीस चालुक्यांनी कलचुरी राज्यावर चाल केली. दरम्यान भडोचच्या आसपास गुर्जरांनी आपले महत्व  वाढविले व प्रथम माळवा कलचुरीकडून मैत्रकाकडे गेला. दरम्यान उत्तर भारतात हर्षवर्धन गादीवर आला. त्याने कलचुरी राजांना पूर्व माळव्यातून पदच्युत केले. कलचुरी राजे पूर्व मध्यप्रदेश पुन्हा गादीवर आले. हर्षवर्धनाची आगेकूच दक्षिणेत दुसरा पुलकेशी याने व गुजरात-सौराष्ट्र येथील राजांना रोखली.


आठव्या शतकाच्या शेवटी राष्ट्रकुट राजा दंतिदुर्ग याने उज्जैन जिंकले. राष्ट्रकूट सत्तेनंतर येथे प्रतीहारांची सत्ता आली. प्रतीहारामध्ये पहिला भोजराचा, पहिला महेंद्रपाल ही काही उल्लेखनीय नावे होत. प्रतीहारांची सत्ता उतरणीला लागल्यानंतर काही काळ येथे परमारांचे राज्य होते ( दहावे व अकरावे शतक).

नवव्या शतकात बुदलेखंडात चंदेल्ल (चंद्रात्रेय) राजघराण्याचा उदय झाला. खुजराहो व महोबा या त्यांच्या दोन राजधान्या होत्या. चंदेल्ल व गुर्जर प्रतीहार यांच्यामध्ये तीव्र सत्तास्पर्धा होती. चंदेल्ल राज्याच्या दक्षिणेला चेदीचे कलचुरी राज्य (राजधानी-जबलपूरच्या दक्षिणेला त्रिपुरी अथवा सध्याचे तेवर येथे).होते चंदेल्ल कलचुरी व परमार यांच्यात आपासांत सत्तासंघर्ष होऊन अनेक राजकीय चढउतार होत गेले (अकरावे व बारावे शतक).

तेराव्या शतकाच्या सुरूवातीला (इ.स. १२०२) कत्बुद्दीन एबकाने कालिंजरावर स्वारी करून चंदेल्ल राजा परमर्दीशी तह केला. परमर्दीचा मंत्री अजयदेव याने परमर्दीचा खून केला, तेव्हा कत्बुद्दीने कालिंजर लुटले व महोबा जिंकले .परमर्दीचा पुत्र त्रैलोक्यवर्धन (त्रैलोक्यमल्ल) याने बराचसा प्रदेश पुन्हा जिंकून आपली सत्ता स्थापिली. अलाउद्दीन खल्जीने १३०९ मध्य दमोह जिंकेपर्यंत चंदेल्ल राज्ये राज्य करित होते. चंदल्लांच्या पाडावानंतर अनेक छोटी छोटी राज्ये येथे आली. बाघेलखंड हे यांपैकी एक राज्य होय. बाघेल राजपूत हे याचे राज्यकर्ते होते. बांधोगढ ही त्यांची राजधानी होती. अकबराच्या वेळी बाघेलखंडाचे दोन भाग पडले. एक बाघेलखंडाच्या आधिपत्याखालील प्रदेश व दुसरा मोगल साम्राज्यात अंतर्भाव झालेला अलाहाबाद सुभ्यातील कालिंजर सरकार (एक शासकीय एकक) प्रदेश.  औरंगजेबाने रेव्याच्या आसपासच्या प्रदेश कलिंजर सरकारात टाकला. त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा बाघेल राज्य आले. अठराव्या शतकात मराठ्यांच्या स्वाऱ्यामुळे त्रस्त झालेल्या वाघेल राजांबरोबर इंग्रजांनी मित्रत्याचा करार करण्याच प्रस्ताव मांडला, पण तो अजितसिंह वाघेल याने नाकारला. तरीही शेवटी १८१२-१८३३ मध्ये वाघेल राजाने इंग्रजांशी संरक्षणाकरिता तह केला. 

बेतूलजवळील गोंड राज्य हे गोंडाचे आद्य राज्य होय. सोळाव्या शतकात गढ मंडलाच्या गोंड वंशाच्या ४७ व्या राजाने (संग्रामशाह) आपले राज्य सागर, दमोह, भोपाळ, नर्मदेचे खोरे, मंडला व सिवनी या प्रदेशाचा ५२ गढ (जिल्हे) यांवर स्थापले. अठराव्या शतकात बख्त बुलंदाने छिंदवाड्याजवळ देवगढ येथे एक गोंड राज्य स्थापन केले. यांच्याच कारकीर्दीत नागपूरची (महाराष्ट्र) स्थापना झाली. देवगड राज्याची राजधानी नागपूरला हलविण्यात आली. देवगढ राज्यात आधुनिक बेतूल, छिंदवाडा, सिवनी, बालाघाट आणि महाराष्ट्रातील नागपूर व भंडारा जिल्हा यांमधील प्रदेशाचा समावेश होता.

गोंडवन आदिवासींच्या ताब्यात असताना गढ-मंडला देवगढ व चांदा ही घराणी एक झाली. गडृमंडलाचा अकबराच्या माळवा सुभ्यास समावेश झाला. मोगल अंमल आधुनिक मध्य प्रदेश राज्याच्या पश्चिमेला एका पट्ट्यात होता .मध्यभागात गोंड राजे होते. छत्तीसगढात कलचुरी घराणे राज्य करीत होते. मोगल साम्राज्यापुढे गोंड राज्य टिकले, तरी मराठे –बुंदेले यांच्यापुढे ते निभआवले नाही आणि परिणामी गोंड सत्ता अठराव्या शतकात नष्ट झाली. 

बुंदेले गढ-कांदर येथे राज्य करीत होते. व अकराव्या ते पंधराव्या शतकापर्यंत त्यांना तेथे राज्य केले. पुढे सोळाव्या शतकात ते ओर्छा येथे गेले. चंपतराय व त्याचा मुलगा छत्रसाल या दोघांना मोगल सत्तेला टक्कर दिली. छत्रसाल विंध्येचे पठार व नर्मदा खोरे यांच्या मोठ्या प्रदेशाचा स्वामी होता. १७२८ मध्ये अलाहाबादचा सुभेदार मुहम्मदखान बंगश याच्याशी लढण्यास छत्रसालाने पेशव्यांचा मदत घेतला. त्या मोबदल्यात त्याच्या राज्याचा एकतृतींश भाग पेशव्यांचा मिळाला (१७३५) आणि पेशव्यांचे राज्य सागर सुभ्यापंर्यंत विस्तारले. रघूजी भोसला पेशव्याकरिता चौथ वसूल करण्यासाठी बेरार (विदर्भ)  व गोंडवनात आला (१७३७) .त्याने १७४३) पर्यंत देवगढ, छत्तीसगढ, चांदा(चंद्रपूर) मराठ्यांच्या अंमलाखाली आणले. रघुजाने कटक संबळपूरपर्यत धडक मारली. त्याने नागपूरला आपले मुख्य ठाणे केले. पानिपतावरील पराभवानंतर (१७६१) काही काळ मराठे शांत राहिले. पण पुन्हा सागर, नागपूर या ठिकाणी त्यांचे राज्य स्थिरावले. 

माळवा १३०५ पासून १३९८ पर्यंत दिल्ली सुलतानशाहीचा भाग होता. तैमूलरंगाच्या स्वारीनंतर खिळखिळ्या झालेल्या दिल्ली प्रशासनाचा फायदा माळव्याचा राज्यपाल दिलावरखान याने उठविला व आपले स्वातंत्र्य घोषित केले. त्याचा मुलगा होशंगशाहदेखील प्रसिध्द होता. माळव्याच्या खल्जी घऱाण्याची स्थापना १४३६ मध्ये झाली. माळव्याचे स्वातंत्र्य ,तो गुजरातचा भाग झाला. तेव्हा संपुष्ठात आले. त्यावर मोगल राज्य १५६२ च्या सुमारास आले व माळवा एक सुभा बनला. मोगलानंतर मराठ्यांनी त्यावर कबजा मिळवून माळव्याची विभागणी ग्वाल्हेरचे शिंदे व इंदूरचे होळकर याच्या राज्यांत केली. मराठे व इंग्रज यांच्यातील तिसऱ्या लढाईनंतर मराठ्यांची सत्ता आकुंचित पावली. सर जॉन मॅल्कमने एक तह करून ग्वाल्हेर व इंदूर या संस्थानांच्या नियंत्रणाखाली असलेला काही प्रदेश स्वतंत्र करून त्यातून १५ राजपूत व काही मुसलमान संस्थाने निर्माण केली. माळव्यात ही व्यवस्था भारत स्वतंत्र होईपर्यंत राहिली. 

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभा नर्मदेचे खोरे फारच अशांत होते. भोपाळचे नवाब व मराठे सरदार यांच्यात लढाया होत होत्या . शिद्यांनी हुशंगाबादवर चाल केली होती. त्याचवेळी पेंढार्यां चा उपद्रव अनेक वर्षे सुरू होता. पेशव्यांच्या पराभवानंतर सागर व नर्मदा खोरे ब्रिटिशाकेड आले. भोसल्याच्या राज्याचा काही भागही टप्प्याटप्प्याने ब्रिटिशांकडे आला.

ब्रिटिश अमदानीत सध्याच्या मध्य प्रदेश राज्याची दोन भागांत विभागणी झाली होती. ब्रिटिश अधिपत्याखाली हा प्रदेश सेंट्रंल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार (सा.पा. अँड बेरार) असा होता ,तर संस्तांनी राजवटीखालील प्रदेशाला सेंट्रल इंडिया एजन्सी म्हटले जात असे. यात प्रथम फक्त माळव्याचा समावेश होता. पुढे त्यात बुंदेल खंड व बाघेलखंड यांचा अंतर्भाव झाला. दोन्ही भाग (सी.पी.अँड बेरार व सी.आय.ए) १९४७ साली सेंट्रल इंडीया एजन्सी (भोपाळ) ,मध्य भारत व विंध्य प्रदेश या तीन लहान राज्यांत विभागले गेले. सी.पी.अँड बेरारचे मध्य प्रदेश असे नामकरण झाले. १९५६ साली राज्य पुनर्रचनेच्या वेळी जुन्या मध्य प्रदेशचे सतरा हिंदी भाषिक जिल्हे, मंदसोर जिल्ह्यातील सुनेल परावृत्त प्रदेश वगळता उरलेले मध्य भारत राज्य, भोपाळ व विंध्य प्रदेश ही राज्ये व जुन्या राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील सिरोंज उपविभाग मिळून सध्याचे मध्य प्रदेश राज्य बनले आहे.

पंडीत , अविनाश


राज्यात एकच सभामंडळ (विधानसभा) असून त्याचे एकूण ३२० सदस्य असतात (१९८२) .भारताच्या संसदेत मध्य प्रदेश राज्यातून लोकसभेवर ४० व राज्यसभेवर १६ प्रतिनिधी निवडून दिले जातात. राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाला असतात. राज्याचे मंत्रिमंडळ त्याच्या कार्यात त्याला सहकार्य व सूचना करते. मे १९८० मधील राज्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण ३१८ निर्वाचित जागांपैकी काँग्रेस (इंदिरा) पक्षाला २४५ भारतीय जनता पक्षाला ५९ आणि इतर पक्षांना १४ जागा मिळाल्या.

राज्याच्या प्रशासन सुविधेकरिता राज्याचे ११ विभाग असून प्रत्येक विभागावर आयुक्ताची नेमणूक करण्यात आली आहे. त्या विभागांची मुख्य कार्यालये, भोपाळ, बिलासपूर, ग्वाल्हेर (२) , हुशंगाबाद, इंदूर, जबलपूर, रायपूर ,रेवा, सागर व उज्जैन येथे ठेवण्यात आली आहेत. यांशिवाय राज्याची एकूण ४५ जिल्ह्यांत विभागणी करण्यात आली आहे. (१९८२) भोपाळ येथे राज्याचे प्रशासकीय कार्यालय व उच्च न्यायालय असून तेथे एक मुख्य न्यायाधीश व २१ कनिष्ठ न्यायाधीश आहेत.

चौंडे. मा.ल.

आर्थिक स्थिती : जंगलसंपत्ती, खनिजसंपत्ती, जलविद्युतशक्ती यांसारख्या नैसर्गिक साधनसामग्रीबाबत हे राज्य अतिशय समृध्द आहे. तथापि ह्या नैसर्गिक संपत्तीचे पुरेशा प्रमाणात समुपयोजन होऊ शकले नाही. त्यामुळेच अनेक वनाधारित उद्योगांच्या विकासाला या राज्यामध्ये फार मोठा वाव आहे.

राज्यातील दरडोई उत्पन्न (चालू किंमती विचारात घेऊन ) १९८१-८२ मध्ये १,२१७ रू. होते. हेच संबंध देशाचे १,७५० रू. होते. केंद्र शासनाने मध्य प्रदेश राज्याच्या एकूण ४५ जिल्ह्यापैंकी ३६ जिल्हे औद्योगिक दृष्ट्या मागास जिल्हे असल्याचे घोषित केले आहे. या ३६ जिल्हांमध्ये राज्याचे ८२% क्षेत्र व ७६% लोकसंख्या येते म्हणजे प्रत्येक पाचांपैकी चार माणसे औद्योगिक दृष्ट्या मागास जिल्ह्यामध्ये राहतात. त्यामुळे जिल्ह्यांतील उद्योगधंद्यांना केंद्रशासन व वित्तसंस्था या दोहोंकडून अनेक सवलती मिळू शकतात. यांखेरीज राज्य शासनाने आणखी चार जिल्हे मागास म्हणून जाहीर केले आहेत. त्यांमधील उद्योजकांना फक्त राज्यशासनाकडून सवलती मिळतात.

कृषी : राज्याच्या एकूण निव्वळ उत्पन्नापैकी शेतीचा वाटा ५५ असून राज्यातील कामकरी लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकांना या क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध होतो. यांपैकी ६६ टक्के हे शेतकरी ,तर उर्वरित शेतमजूर आहेत. सुमारे १८५ लक्ष हे .जमीन पिकविणारी ५३ लक्ष शेतकरी कुटूंबे आहेत.

भारताच्या अन्नपिकांच्या एकूण उत्पादनामध्ये मध्य प्रदेश राज्याचा वाटा पुढील प्रमाणे आहे. तांदूळ ८% ज्वारी १७% मका ९% मिलेट १०% गहू ११% सातू ७% आणि तेलबिया व डाळी ८% .

राज्यातील ११% पेरलेले क्षेत्र जलसिंचित आहे. एकूण पेरलेले क्षेत्र २०८ लक्ष हे असून १९७७-७८ मध्ये १२३.३९ लक्ष टन शेतमालाचे उत्पादन झाले. १९७९-८० सालातील शेतमालाचे पुढीलप्रमाणे उत्पादन होते (आकडे लक्ष टनांत) तांदूळ ४० मका ६.५ ज्वारी १७ गहू ३२ डाळी २६ इतर ५.५ एकूण १२७ .नगदी पिके. ऊस २२ गळिताची धान्ये ९.५ कापूस (लक्ष गासड्या) ४.५.

खरीप व रब्बी अशी दोन्ही पिके मोठ्या क्षेत्रफळात घेणारे मध्य प्रदेश हे थोड्या राज्यांपैकी एक आहे. १९८०-८१ मध्ये अन्नधान्याचे १२१ लक्ष टनांचे उद्दिष्ट होते, तथापि प्रत्यक्ष उत्पादन ११८ लक्ष टन झाले. सोयाबीनच्या उत्पादनात या राज्याचा संबंध देशात प्रथम क्रमांक लागतो. १९८० मध्ये ४ लक्ष हे .क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात आली. १९८०-८१ मधील सोयाबीन उत्पादन सु. ४.२ लक्ष टन होईल. असा अंदाज होता. सहाव्या पंचवार्षिक योजने ५ लक्ष नव्या विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट होते. जागतिक बँकेने सधन कृषिविस्तार व संशोधन प्रकल्पाच्या कार्यवाहीकरिता राज्याला १८.७७ लक्ष रूपयांचे साहाय्य केले असून  त्याकरिता १६ जिल्हे निवडण्यात आले आहेत. विविध फळांच्या उत्पादनाला अनुकुल असे हवामान व इतर घटक मध्य प्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे फलोत्पादनाला मोठा वाव आहे. १९७७ मध्ये राज्यातील पशुधन पुढीलप्रमाणे होते. म्हशी ५८,५२,५४९ इतर गुरे ३,४२,५६,७२५, मेंढ्या ९,६८,५९५, बकरी ६५,७३,४६७, कोंबड्या ७१,६०,००० घोडे व तट्टे १,२१,९०८ .राज्यात पशुवैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणावर वाढविणे आवश्यक आहे.

वनसंपत्ती : राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी सु. ३५% क्षेत्र वनव्याप्त (१,६४,९३९ चौ.किमी. १९८२ संरक्षित वने ८०,०४५ चौ. किमी. आरक्षित वने ८४,२२७ चौ.किमी. अवर्गीकृत वने ६६७ चौ. किमी.) असून साग ३१,३४६ चौ. किमी. साल ३७,८९८ चौ. किमी. मिश्र व इतर वृक्षांची वने ९५,६९५ चौ. किमी .क्षेत्रात आहेत. उत्तम प्रतीच्या सागाचे उत्पादन या राज्यात होते. देशातील सु. ६०% घरगुती इंधनगरजांकरिता या राज्यातील वनांचा उपयोग होतो. तसेच ती पाणलोट संरक्षक म्हणून अतिशय महत्वाची आहेत. १९७८-७९ मध्ये राज्यशासन व केंद्रशासन यांच्याकडून वन विकासयोजनेकरिता अनुक्रमे ३६२.३ लक्ष रू. व २२० लक्ष रूपयाची तरतूद करण्यात आली.


जलसिंचन व इंधनक्षमता : राज्यातील महत्वाच्या जलसिंचन प्रकल्पांमध्ये चंबळ खोरे योजना (अंतिम जलसिंचन क्षमता सु. ५.१५ लक्ष हे व वीजनिर्मितीक्षमता ३८६ मेवॉ.) तवा प्रकल्प (सु. ३.३२ लक्ष हे) बार्णा व हसदो योजना (बार्गी ,नर्मदासागर व बाणसागर) इत्यादींचा समावेश होतो. १९७९-८० अखेर राज्याची एकूण सिंचन क्षमता ३०.८५ लक्ष हे एवढी होती. महानदी जलाशय प्रकल्पाचे तीन टप्पे असून पहिल्या दोन टप्प्यांचे बांधकाम चालू आहे. एकूण ३.४० लक्ष हे सिंचनक्षमतेपैकी ०.४७७ लक्ष हे सिंचनक्षमता १९८२ च्या मध्यापर्यंत निर्माण होणार होती. बहूद्देशीय हसदो-बँगो प्रकल्प समूहाचा हसदो-बँगो प्रकल्प हा तिसरा टप्पा असून पहिले दोन टप्पे जवळजवळ पूर्ण होत आले आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये सध्याच्या बंधाऱ्यापासून ४५ किमी. वरच्या बाजूला हसदो नदीवर ८५ मी. उंचीचे एक चिरेबंदी धरण बांधावयाची योजना असून तीयोगे प्रतीवर्षी ३,२८ लक्ष हे जमीन ओलिताखाली आणणे ,हे प्रधान उद्दीष्ट आणि वीजनिर्मिती, औष्णिक विद्युतनिर्मितिकेंद्रांना व उद्योगाधंद्यांना पाणी पुरविणे ही इतर उद्दीष्ट्ये आहेत. बार्गी प्रकल्पामध्ये जबलपूर जिल्ह्यातील बार्गी नदीवर एक चिरंबंदी धरण बांधणे व १३५ मी. लांबीचा डावा कालवा बांधणे यांचा समावेश होत असून हा बहुउद्देशीय प्रकल्प पूर्ण झाल्यावर सु. २.४५ लक्ष हे जमिनीला जलसिंचन, जलविद्युतनिर्मिती आणि जबलपूर शहराला पाणीपुरवठा ही उद्दीष्टे साध्य होतील.

राज्याची एकूण प्रतिष्ठापित विद्युतनिर्मितिक्षमता ३१ मार्च १९८३ रोजी (जलविद्युत १९३ मेवॉ. आणि औष्णिक विद्युत १,४३७.५ मेवॉ.) १,६३०.५ मेवॉ.होती मार्च १९८३ अखेर प्रतिष्ठापित विद्युतनिर्मितीचे लक्ष्य २,२६१ मेवॉ. होते. राज्यातील औष्णिक विद्युतउत्पादन मार्च १९७७ मधील ७०२ मेवॉ. वरून मार्च १९८३ मध्ये १,४३८ मेवॉ. पर्यंत गेले. कोर्बा, सातपुडा, वैधान व बिरसिगंपूर येथील कोळशावर आधारित औष्णिक विद्युतनिर्मितिकेंद्रे पूर्ण झाल्यावर मध्य प्रदेश राज्य या प्रकारच्या वीज उत्पादनामध्ये भारतातील सर्वात मोठे राज्य ठरेल. नर्मदा जलविवाद न्यायाधिकरणाच्या निवाड्यानुसार नर्मदा नदीचे ३,४५३.७ कोटी. घ.मी. पाणी (७५%) प्रतिवर्षी वापरता येणे शक्य असून त्यापैकी मध्य प्रदेश राज्याच्या वाट्यास २,२५१ कोटी घ.मी. पाणी आले आहे. त्याचा वापर इ.स.२०२४ पर्यंत करावयाचा आहे. याखेरीज गुजरात राज्यामधील सरदार सरोवर धरणापासून निर्माण होणाऱ्या जलविद्युतपैकी ६८४ मेवॉ. वीज (५७%) मध्य प्रदेश राज्याला हक्कापोटी मिळणार आहे. नर्मदा खोरे विकासार्थ मध्य प्रदेश राज्याने एक बहत योजना तयार केले असून तीनुसार २९ मोठे बहूउद्देशीय १३५ मध्यम व सु. ३,००० लहान सिंचनयोजना बांधण्यात यावयाच्या आहेत. २९ मोठ्या प्रकल्प योजनापैकी ५ जलविद्युत ५ बहुद्देशीय व १९ जलसिंजन प्रकल्प असून ९ प्रकल्प नर्मदा नदीवर तर २० प्रकल्प नर्मदेच्या उपनद्यावरील आहेत. २९ मध्यम व ७९७ लहान प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित सर्व प्रकल्प १९८१-९५ अशा पंधरा वर्षात पूर्ण करावयाची योजना आहे. याकरिता राज्य शासनाने नर्मदा योजना अधिकरण अशी स्वतंत्र संस्था उभारली आहे. नर्मदासागर व ओंकारेश्वर हे बहुद्देशीय प्रकल्प, तर महेश्वर हा केवळ विद्युतनिर्मितिप्रकल्प आहे. नर्मदा सागर प्रकल्पासाठी नर्मदेचे पाणी उपयोगत आणल्यानंतर ते ओंकारेश्वर धरणासाठी, नंतर महेश्वर धरणासाठी आणि सरतेशेवटी सरदार सरोवर प्रकल्पाकरिता वापरण्यात येणार आहे. पहिल्या तीन प्रकल्पांची पूर्तता १९९१-९२ पर्यंत करावयाची असून त्यांयोगे १,५९० मेवॉ. जलविद्युतनिर्मिती होऊन २.५ लक्ष हे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सहकार्याने इंद्रवती नदीवर भोपाळपटनम हा प्रचंड जलविद्युतप्रकल्प उभारण्यात येत असून त्यासाठी जागतिक बँकेचे अर्थसाहाय्य घेण्यात येणार आहे. या प्रकल्पास अंदाजे ४००कोटी रू. खर्च येणार असून त्यायोगे १,००० मेवॉ. वीजनिर्मिती होईल. मध्य प्रदेश राज्यशासनाला या प्रकल्पासाठी ५५% खर्च सोसावा लागणार असून त्याला ५०० मेवॉ. विद्युतनिर्मितिक्षमतेचा कन्हार जलविद्युत सिंचन प्रकल्प संयुक्तपणे उभारण्यात एक करार केला असून त्याची कार्यवाही सातव्या योजनेपासून होणार आहे. विंद्याचल सुपर औष्णिक प्रकल्प (वैधान प्रकल्प) व कोर्बा सुपर औष्णीक प्रकल्प हे दोन्ही राष्ट्रीय औष्णिक विद्युतशक्ती निगमाद्वारा तर बांधव औष्णिक वीज प्रकल्प व मांड औष्णिक वीज प्रकल्प हे राज्य वीज मंडळामार्फत कार्यान्वित केले जाणार आहेत.

खनिज संपत्ती : मध्य प्रदेश राज्यात सु. ३० खनिजांचे उत्पादन करण्यात येते. दगडी कोळसा (भारतातील एकूण साठ्यांच्या ३५%), लोहधातुक (३०%) बॉक्साइट (४४%) व तांब्याचे धातुक यांच्या बाबतीत राज्याचा बिहार ,पं.बंगाल व ओरिसा या राज्यांनंतर तसेच चुनखडकांबाबत आंध्र प्रदेश , गुजरात व राजस्थान या राज्यांनतंर क्रमांक लागतो. (१९७९) मँगॅनीजच्या धातुकांच्या साठ्यांबाबत (५०%) राज्याचा कर्नाटक राज्यानंतर क्रम येतो. हिरे उत्पादनाबाबत मात्र मध्य प्रदेश ची राज्याची मक्तेदारी आहे. पन्ना जिल्ह्यात हिर्यांनच्या प्रामुख्याने खाणी असल्या तरी छत्तरपूर ,दमोह, सटणा व सागर या जिल्ह्यांमध्ये हिऱ्याचे साठे आढळले आहेत. सोने बस्तर, बिलासपूर आणि राजगढ जिल्हांत सापडले आहे. कुरूविंद बस्तर, मोरेना वसिधी या जिल्ह्यांत आढळतात. झाबुआ जिल्ह्याच्या परिसरातील अरवली संघातील खडकांमध्ये डोलोमाइट-चुनखडक तसेच फॉस्फोराइट यांचे निक्षेप आढळले आहेत. अँस्बेस्टस, वैदूर्य, फेल्स्पार, फ्ल्युओरस्पार, काचवालुका, ग्रॅफाइट, जिप्सम, निकेल, रंगीत माती, पायराइटे यांची धातुकेही राज्याच्या विविध भागांत सापडतात. अलीकडेच बस्तर जिल्ह्यातील दार्बा येथे युरेनियमचे तर नयापारा येथे अभ्रकाचे साठे सापडले.

दगडी कोळसा :  राज्यातील बेतूल, बिलासपूर, छिंदवाडा शहडोल, सिधी व सुरगुजा जिल्ह्यांमध्ये द. कोळशाच्या मोठ्या खाणी आहेत. लहान खाणी नरसिंहपूर व रायगढ जिल्ह्यांत आढळतात. प्रतिवर्षी या खाणी मधून सु. २८० लक्ष टन कोळशाचे उत्पादन होते. कोळशाच्या खाणींची संख्या १९७१ मध्ये ५७ होती ती १९८१ मध्ये ८८ झाली. त्याच वर्षी ३३७ .४४ कोटी .रू. किमतीचे कोळशाचे उत्पादन झाले.

बॉक्साइट : मंडला व बिलासपूर जिल्हांत भारत अँल्युमिनियम कंपनीने सु. ८.६ लक्ष टन बॉक्साइटच्या साठ्याचा शोध लावला असून त्यामध्ये ५०% अँल्युमिना मिळते. राज्याच्या भूविज्ञान विभागाने रायगढ जिल्ह्यातील पांद्रापाट पठारी भागात ८३ लक्ष टन सर्व प्रतीच्या बॉक्साइटाने साठे असल्याच्या अंदाज केला आहे. भारतीय भूवैज्ञानिक संस्थेने सुरगुज जिल्ह्यातील जामिरापाट भागात २७ लक्ष टन बॉक्साइट साठ्यांचा अंदाज केला आहे. मंडला जिल्ह्यातून राज्याच्या एकूण बॉक्साइट उत्पादनापैकी ५०% तर बिलासपूर जिल्ह्यातून २०-२५% उत्पादन होते. बॉक्साइटच्या खाणीची संख्या १९७१ मधील १४ वरून १९८१ मध्ये २१ वर गेली व त्या वर्षीचे उत्पादन मूल्य ३.७६ कोटी रू. होते.

तांबे : बालाघाट जिल्हात तांब्याच्या खनिजांचे अंदाजे ५८० लक्ष टन साठे सापडले असून संबंध राज्यात (बस्तर, छत्तरपूर, ग्वाल्हेर, सिधी जिल्हे) अदमासे १,००० लक्ष टन साठे आहेत.

डोलोमाइट : मंडला जिल्ह्यातील ब्रम्ही बंजार भागात या धातुकाचे उच्च प्रताचे निक्षेप सापडले असून ते अंदाजे ३२० लक्ष टन आहेत. १९७१ मध्ये डोलोमाइटच्या १३ खाणी होत्या, त्यांची संख्या १९८१ मध्ये ४२ वर गेली व त्या वर्षी डोलोमाइटचे उत्पादनमूल्य ३१८ लक्ष रू. होते. 


चुनखडक : राज्यात आढळणारे चुनखडकांचे निक्षेप सिमेंट बनविण्यास उपयोगी असून त्यांचे ३३,७२० लक्ष टन साठे असल्याचा अंदाज करण्यात आला आहे. चुनखडकांचे निक्षेप राज्यात बऱ्याच ठिकाणी आढळले असून ते अंदाजे ४,९१० लक्ष टन आहेत. राज्यात १९८२ मध्ये चुनखडकांच्या ९३ खाणी व त्यांचे उत्पादनमूल्य १,८८६ लक्ष रू. झाले. 

लोहधातूक: भारतातील याच्या एकूण साठ्यापैकी ४०% साठे या राज्यात असून ६० ते ६७ टक्के उच्च दर्जाच्या लोहधातुकाचे उत्पादन होते. साठे अधिककरून बस्तर व दुर्ग आणि अल्प प्रमाणात छत्तरपूर जबलपूर, मंदसोप, नरसिंहपूर, रायगढ या जिल्ह्यांतही आढळले आहेत. १९८१ मध्ये ८ लोहधातुकाच्या खाणी असून उत्पादनमूल्य ४,१३२ लक्ष रू. होते.

मँगॅनीज धातूक : राज्यातील एकूण मँगॅनीज धातुकाच्या साठ्या पैकी सु. ९०% साठे एकट्या बालाघाट जिल्ह्यात आहेत. मँगॅनीज ओर (इंडिया) लि. ही सरकारी क्षेत्रातील कंपनी मँगॅनीज धातुकाचे उत्पादन करणारी प्रमुख कंपनी आहे. १९८१ मध्ये याच्या खाणी ११ होत्या. त्याच वर्षी उत्पादनमूल्य ७२७ लक्ष रू. होते.

कथिल : भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने बस्तर जिल्ह्यातील मुडबाल क्षेत्रामध्ये सु. १,५०० टन कथिल धातुकाच्या निक्षेपांचा शोध लावला आहे. सोने राजगढ व रायपूर या दोन जिल्ह्यांत सापडते.

महत्वाच्या खनिज उत्पादन मूल्यांच्या संदर्भात १९८१ मध्ये मध्य प्रदेश राज्याचा बिहार राज्यानंतर दुसरा क्रमांक होता. राज्याचे खनिज उत्पादनमूल्य १९८१ मध्ये ४३५ कोटी रू. झाले. अर्थातच यामध्ये दगडी कोळशाच्या उत्पादनमूल्याच्या ७५%हून अधिक मोठा वाटा होता. त्याचे उत्पादनमूल्य ३३७.४ कोटी (१९८१) रू. होते. त्याचप्रमाणे लोहधातुक ,मँगॅनीज धातुक व चुनखडक यांच्या उत्पादनमूल्यांतही वाढ झाली. संबंध भारतात पन्ना खाणीमधून हिर्यांमचे उत्पादन करणारे मध्य प्रदेश हे एकमेव राज्य आहे. १९८१ मध्ये हे राज्य डोलोमाइट व चुनखडक यांच्या उत्पादनास पहिल्या तर बॉक्साइटदगडी कोळसा ,लोहखनिज व फॉस्फोराइट यांच्या उत्पादनात दुसऱ्या आणि मँगॅनीज धातुकाच्या उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर होते. राज्यात १९८१ मध्ये कार्यक्षम खाणींची संख्या ४४६ होती. प्रत्यक्ष खाणकाम क्षेत्रातील उद्योगाशिवाय खनिजाधारित उद्योगांची संख्या १९८२ मध्ये ५७१ असून त्यांमधील कामगारसंख्या ३,७९,२४९ होती. 

उद्योगधंदे : गेल्या काही वर्षात राज्यातील औद्योगिक मागासलेपण कमी होत असल्याचे आढळते. खाणकाम, निर्मितीउद्योग, बांधकाम,विद्युतनिर्मिती यांपासून राज्याला मिळणारा उत्पन्नाचा वाटा १९८०-८१ मध्ये १,३८१.१ कोटी रू. (२२.८%) होता.

भिलाईचा पोलाद कारखाना (१९५९) भोपाळ येथील भारत अवजड विद्युतउद्योग (भेल १९६१) कोर्बा येथील अँल्युमिनियम प्रकल्प (१९७३) यांसारखे प्रचंड उद्योग स्थापण्यात आले आहेत. याचबरोबर नवीन रेल्वे प्रकल्प, विद्युतनिर्मिती योजना, खाणकाम हेही उद्योग चालू आहेत.

खनिजाधारित उद्योग, वनाधारित उद्योग, रसायने आणि संगल्न उद्योग, कृषिपदार्थाधारित उद्योग आणि लघुउद्योग असे राज्यातील उद्योगांचे पाच प्रकारांत वर्गीकरण करता येईल. भारताच्या एकूण क्षेत्रापैकी १४% क्षेत्र या राज्याने व्यापले असून एकूण लोकसंख्येपैकी ८% लोकसंख्या या राज्यात आहे. तथापि देशाची एकूण रोजगारी व कारखानदारी यांमधील मध्य प्रदेश राज्याचा वाटा केवळ ४ ते ५ टक्केच आहे.

सरासरी दैनिक रोजगारी व उत्पादनसंस्था यांच्या दृष्टीने १९८१ साली राज्यातील महत्वाच्या उद्योगांची क्रमवारी पुढीलप्रमाणे होती. (१) सुती कापड उद्योग (२) अन्नपदार्थ उद्योग (३) मूलधातू व मिश्रधातूउद्योग (४) अधातवीय खनिज वस्तुउद्योग (५) रसायने व रासायनिक पदार्थनिमितिउद्योग (६) लाकूड, लाकूडनिर्मिती वस्तू व फर्निचर उद्योग आणि (७) वीजयंत्रसामग्री , उपकरणे इत्यादींचे निर्मितीउद्योग.

राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासात लघुउद्योगांचा महत्वाचा वाटा आहे. १९८१ -८२ च्या अखेर या उद्योगांची संख्या १,०३,२६० ,त्यांमधील भांडवल गुंतवणूक सु. २१७ कोटी रू. आणि रोजगार संख्या ३.७६ लक्ष एवढी होती. १९८२ अखेर राज्यात ३७,००० हातमाग असून त्यांमुळे ६९,००० लोकांना रोजगार मिळाला. राज्यातील रेशीम उत्पादन उद्योग सविख्यात असून छत्तीस गढ जिल्हा हा या उद्योगाचे केंद्र आहे. सात सहकारी रेशीम उत्पादक संख्या असून सु. १५,०० मागांवर सु .९०,००० रू.किंमतीचे रेशीम कापड प्रतिवर्षी उत्पादित केले जाते. १९८२ अखेर २६,३२५ किग्रॅ. कच्च्या रेशामाचे उत्पादन करण्यात आले व २४,३४० हरिजन/जनजाती कुटुंबाना रोजगार मिळाला. १९५९ साली स्थापण्यात आलेल्या मध्य प्रदेश खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारा ६८ विभागीय उत्पादनकेंद्राचे व्यवस्थापन पाहिले जाते. सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस सध्याच्या २ कोटी रू. किंमतीच्या खादी उत्पादनावरून १० कोटी रूपयांवर हे उत्पादन नेण्याचे मंडळाचे लक्ष्य आहे.


राज्यातील इतर महत्वाच्या उद्योगांमध्ये सिमेंट, साखर, जाड पुठे, कागद, शेंगदाणा तेल, उच्चतापसह भट्ट्या, मृत्पात्रे, कापडनिर्मिति यंत्रे, ओतीव पोलाद व लाटणयंत्रे, औद्योगिक वायू, संश्लिष्ट धागे, औषधे, बिस्कीटनिर्मिती ,अभियांत्रिकी, यांत्रिक हत्यारे व अवजारे, रेयॉन व कृत्रिम रेशीम उत्पादन यांच्या उद्योगांचा समावेश होतो. राज्यात अवजड व मध्यम आकाराचे मिळून १९३ उद्योग, तर १८१ साहाय्यभूत उद्योग व ७७,३६० लघु-उद्योग आहेत. हातमाग उद्योगांसाठी चंदेरी व महेश्वर ही गावे प्रसिध्द असून खेळणी , मृत्पात्री, पट्टीकाम, लाकूडकाम, झारीकाम, कातडी वस्तू , तांब्यापितळेची भांडी यांसारख्या पारंपारिक उद्योगांचा राज्यात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे.

राज्याच्या औद्योगिक क्षितिजावर सरकारी क्षेत्रातील उद्योगांचा मोठा प्रभाव दिसून येतो. सप्टेंबर १९८१ अखेर राज्यातील सरकारी क्षेत्रीय उद्योगांमुळे सु. ११.५ लक्ष लोकांना रोजगार मिळाला . राज्यात चालू असलेले महत्वाचे अविभागीय केंद्रीय उपक्रम पुढीलप्रमाणे होत. (१) भारत अँल्युमिनियम कंपनी (बाल्को) कोर्बा, (२) भारत कोकिंग कोल लि. –कुसमुंडा (३) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. (भेल) भोपाळ. (४) सिमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. -३ कारखाने मांघार-,अकलतारा व नयागाव ,(५) कोल इंडिया लि. -८६ कोळसा खाणी (६) भारतीय अन्न निगम –उज्जैन (७) हिंदुस्थान कॉपर लि. – मालंजखंड (८) मँगॅनीज ओर (इंडिया) लि.- उकवा (९) राष्ट्रीय खनिज विकास निगम – बैलादिला, पन्ना, (१०) राष्ट्रीय वृत्तपत्री कागद व कागद कारखाना (नेपा मिल्स) –नेपानगर, (११) राष्ट्रीय कापड निगम (मध्य प्रदेश) मर्यादित –पाच-गिरण्या-भोपाळ ,बर्हाकणपूर, इंदूर, राजनांदगाव, उज्जैन, (१२) भारतीय पोलाद प्राधिकरण (सेल) भिलाई, (१३) द इंडो-बर्मा पेट्रोलियम कंपनी-कोर्बा. यांशिवाय गव्हर्नमेंट ओपियम अँड अल्कलॉइड फॅक्टरी-नीमच, सरकारी कागदी चलन व दस्तएवज छापखाना- हुशंगाबाद बँक नोटा छापखाना- देवास, सरकारी दारूगोळा कारखाने  -खमारिया , कटनी, अवजड वाहनांचा कारखाना, सेनासामग्रीचा कारखाना भारतीय डाक आणि तार कार्यालयाची यंत्रशाळा जबलपूर आग्नेय रेल्वेची यंत्रशाळा –रायपूर ,हे देखील केंद्रीय उपक्रम या राज्यात आहेत. 

मध्य प्रदेश राज्याने स्थापन केलेल्या औद्योगिक उपक्रमांची संख्या ३६ (१९८२) असून त्यांपैकी मध्य प्रदेश औद्योगिक विकास निगम, मध्य प्रदेश राज्य उद्योग निगम, मध्य प्रदेश लघुउद्योग निगम, मध्य प्रदेश राज्य कृषि-औद्योगिक विकास निगम मध्य प्रदेश राज्य वनविकास निगम, मध्य प्रदेश राज्य वित्त निगम यांसारख्या निगमांद्वारे उद्योगांचा विकास घडविला जाऊन त्यांना वित्तसाहाय्य दिले जाते.

मध्य प्रदेश राज्य १९५६ मध्ये अस्तित्वात आले .तेव्हा फक्त पाच बँका आपल्या १७१ शाखांसह बव्हंशी नागरी भागातच कार्यतच होत्या. जून १९८२ अखेर राज्यात २,५१० बँकाशाखा होत्या म्हणजेच जून १९८२ अखेर राज्यातील १ लक्ष लोकांमागे ४.८ बँकाकार्यालये (भारतातील प्रमाण १ लक्ष लोक, ५.७ बँककार्यालये) असे प्रमाण होते. १९८१ अखेर राज्यातील सरकारी क्षेत्रीय बँकांनी कृषी, लघुउद्योग, अल्प कर्जदार यांसारख्या अग्रक्रम क्षेत्राला पुरविलेल्या कर्जाचा आकडा ५०० कोटी रूपयांपर्यंत गेला. राज्यात ३० जून १९८१ अखेर एक राज्य सरकारी बँक, एक मध्यवर्ती भूविकास बँक, ४४ मध्यवर्ती सहकारी बँका, ४५ प्राथमिक भूविकास बँका, ५,५७० प्राथमिक कृषी पंतसंस्था व ७७६ बिगर-कृषी पतसंस्था होत्या राज्यात सांप्रत नऊ राष्ट्रीयकृत बँका, आपल्या शाखांसहित अग्रणी बँका म्हणून कार्य करीत आहेत. ३१ जानेवारी १९८३ अखेर १६ प्रादेशिक ग्रामीण बँका आपल्या ५२० शाखांसह २९ जिल्ह्यातून कार्य करीत होत्या .इंदूर येथे शेअरबाजार आहे. 

वाहतूक,संदेशवहन: रस्ते हाच या राज्याच्या वाहतूकयंत्रणेचा महत्वाचा कणा ठरतो. राज्यातील बराच भूप्रदेश डोंगराळ आणि कपाशीला पोषक अशा काळ्या मृदेचे वैपुल्य यांमुळे रस्तेबांधणीचे कामही अतिशय दुष्कर झाले आहे. हे राज्य आकाराने मोठे असल्याने जास्त लांबीच्या रस्त्याचे बांधकाम करणे आवश्यक ठरते.

राज्यात ३१ मार्च १९८२ अखेर एकूण ६५,८५२ किमी. लांबीचे रस्ते होते. त्यांपैकी ५०,८५२ किमी. पक्के व १५,००० किमी. कच्चे रस्ते होते. २,६७६ किमी. प्रमुख जिल्हामार्ग ११,४७१ किमी. राज्य महामार्ग १५,५५८ किमी. प्रमुख जिल्हामार्ग आणि ३६,१४७ किमी. ग्रामीण मार्ग असे रस्त्यांचे वर्गीकरण होते. आग्रा –मुंबई (क्र.-इंदूर-ग्वाल्हेर), वाराणसी –कन्याकुमारी (क्र. ७-रेवा-जबलपूर) ,धुळे-कलकत्ता (क्र.६-रायपूर) झांशी-नरसिंहपूर-लाखंदन (क्र.२६), बिआओरा – जबलपूर (क्र.१२) असे पाच राष्ट्रीय महामार्ग राज्यातून जातात.

राज्यामध्ये १९५६ ते ३ १ मार्च १९८१ पर्यंत ३७२ मोठे, १२३ मध्यम व २,०२७ लहान पूल बांधण्यात आले. राज्यात १९७९-८० मध्ये २,७४,१०९ नोंदलेल्या मोटारगाड्या होत्या . याच काळात बसगाड्या व मालमोटारी यांची संख्या अनुक्रमे १०,६७४ आणि ३३,२६३ होती. मध्य प्रदेश राज्य मार्ग परिवहन निगम १ जून १९६२ रोजी स्थापण्यात आला. १९८२ पर्यंतच्या दोन दशकात निगमाच्या बसगाड्या ७०२ वरून २,६६९ पर्यंत वाढ झाली. सांप्रत निगमाच्या २,६६९ बसगाड्या (यांतच ४७ आरामगाड्या समाविष्ट) प्रतिदिनी १,४३८ मार्गावरून सु. ४.३३ लक्ष प्रवाशांना घेऊन सु. ५.८० लक्ष किमी. धावतात. व १४.३२ लक्ष रूपयांचे उत्पन्न मिळवितात. या निगमाकडे १८,००० कर्मचारी आहेत.

गेल्या पंचवीस वर्षात राज्यातील लोहमार्गाच्या लांबीमध्ये फारच थोडी वाढ झाल्याचे आढळते. ३१ मार्च १९८१ रोजी लोहमार्गाची एकूण लांबी ५,७३२ किमी होती. भारतीय रेल्वे मंडळ मध्य प्रदेश राज्यातील काही अरूंदमापी लोहमार्गाचे रूंदमापी लोहमार्गात रूपांतर करण्याच्या तसेच काही नवीन लोहमार्ग बांधण्याच्या प्रयत्नात आहे. 

भोपाळ ,इंदूर, जबलपूर, खजुराहो व रायपूर येथे विमानतळ असून तेथून नियमितपणे मुंबई,कलकत्ता व नवी दिल्ली या शहरांकडे हवाई सेवा चालू असते.

मध्य प्रदेश राज्यात ३१ मार्च रोजी १९८१ रोजी १०,११८ डाक कार्यालये असून हे प्रमाण ५,१७७ लोकांमागे एक डाक कार्यालय असे होते. टपालपेट्यांची संख्या ३९ २६४ होती. राज्यातील १ लक्ष लोकांमागे १६८ दूरध्वनी असे प्रमाण होते. राज्यात १९८० साली ६,५८,०७७ रेडिओ परवानाधारक व २,८०६ दूरदर्शन परवानाधारक होते.

गद्रे, वि.रा.


लोक व समाजजीवन : देशातील इतर राज्यांपेक्षा मध्य प्रदेश राज्यात मागासलेल्या जाति-जमातींची संख्या जास्त आहे. आदिवासी जाति-जमातींचे लोक राज्यातील एकूण लोकसंख्येचा ३३ टक्के असून त्यांची वस्ती राज्याच्या दक्षिण भागात, विशेषतः बस्तर जिल्ह्यात ,तसेच सातपुडा पर्वतरांगांत एकवटलेली आहे. बस्तर हा जिल्हा क्षेत्रफळाने (३९,०६० चौ. किमी. लोकसंख्ये १८,४०,४४९-१९८१) केरळ राज्यापेक्षा मोठा असून दंडकारण्य प्रकल्पाची कार्यवाही मध्य प्रदेश राज्याच्या या जिल्ह्यात तसेच ओरिसा वआंध्र प्रदेश राज्यांच्या अन्य जिल्हांत करण्यात आली आहे. राज्यातील लोकांत मुख्यत्वे दोन वांशिक गट असल्याचे दिसून येते. उत्तर भागात व नर्मदेच्या खोऱ्यात राहणारे लोक आर्यवंशाचे, तर दक्षिण व पूर्व भागांत राहणारे लोक द्रविड आहेत. द्रविड लोकांत आदिवासी जाति-जमातीपैकी ⇨गोंड लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. राज्यात भिल्ल, बैगा, गोंड, कोरकू, कोल , कमार, मुडिया ,माडिया या प्रमुख आदिवासी जाती व जमाती आहेत. यापैकी गोंड, मुडिया , माडिया यांची संख्या बस्तर जिल्ह्यात जास्त असल्याचे दिसून येते. यांशिवाय सुरगुजा जिल्ह्यातील पाओ व कोरवा, जशपूर परिसरातील उराव, बेतूलमधील मुंडा आणि कोरकू, मंडलामधील गोंड व बैगा, छत्तीसगढ जिल्ह्यातील परजा, भात्रा व झाबुआ, भोपाळ व माळव्यातील भिल्ल, भिलाला आणि शिवपूरी भागांतील सहरिया इ. जमाती प्रमुख आहेत. भारतातील एकून गोंडापैकी एकट्या मध्य प्रदेश राज्यात सु. ६६% गोंड राहतात. नर्मदेच्या खोऱ्यातील आगरिया परधान, यांशिवाय राज्यात राजगोंड, राजमुडिया, नाइक गोंड, पिता-मात्रा याही गोडाच्या उपजाती आहेत. त्यांपैकी राजगोंड हे स्वतःला रावणवंशी मानतात. राज्यात ग्रामीण भागातील लोकसंख्येचे वितरण असमान असल्याचे दिसून येते. महानदीचे खोरे, वैनगंगेचे वरचे खोरे, चंबळ नदीचा खालचा प्रदेश यांशिवाय टिकमगढ, रेवा,सटणा. जबलपूर जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त असून १९७१ साली राज्यात ३,९०,३४,१६१ हिंदू, १८,१५,६८५ मुसलमान, २,८६,०७२ ख्रिश्चन, ८१,८२३ बौध्द, व ९८,९७३ शीख होते. यांशिवाय पार्शी, जैन तसेच इराणी लोकही थोड्याफार प्रमाणात दिसून येतात. येथील विशेषतः ग्रामीण भागातील पुरूष धोतर, शर्ट व डोक्याला टोपी असा पारंपारिक पोषाख वापरतात. तर स्त्रिया पाचवारी साडी नेसतात. काही समारंभप्रसंगी घट्ट पायजमा, शेरवानी घालण्याची प्रथा आहे. मध्यमवर्गीयांच्या व शहरात राहणाऱ्या लोकांच्या पोषाखांत पाश्चात्यांचे अनुकरण असल्याचे दिसून येते. राज्यात महाशिवरात्र, होळी, कृष्णजन्माष्टमी, दसरा ,दिवाळी इ. सण मोठ्या उत्सहाने साजरे केले जातात.                              

चौंडे, मा.ल.

शिक्षण : राज्यात १९८१ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या २७.८२% लोक- ३९.३८% पुरूष व १५.५३% स्त्रिया-साक्षर होते. राज्यात १४ वर्षे वयाच्या मुलांपर्यंत शिक्षण मोफत आहे. १९८०-८१ मध्ये ६ते ११ वर्षे वयोगटातील मुलांच्या ६४.४% मुले इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांत होती, तर ११ ते १४ वयोगटातील मुलांच्या ३०.४% मुले सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळांत होती. १९७८ मध्ये ४२६ पूर्व-प्राथमिक शाळांत २९,००० विद्यार्थी व ४८२ शिक्षक ,५२,३४९ प्राथमिक शाळांत २९,००० विद्यार्थी व ४८२ शिक्षक ५२,३४९ प्राथमिक शाळांत ३७,५८,००० विद्यार्थी आणि ९१,३६६ शिक्षक ,८,६८१ माध्यामिक शाळांत १३,७२,००० विद्यार्थी व ४४,५२८ शिक्षक, २,०२६ उच्च माध्यामिक शाळांत ६,७९,००० विद्यार्थी व २५,९८१ शिक्षक होते.राज्यात १९७८ मध्ये १० विद्यापीठे होती. कला,विज्ञान, वाणिज्य, यांशिवाय राज्यात ७ शेती, ३ संगीत, १५ वैद्यक आणि ११ शिक्षक-प्रशिक्षण महाविद्यालये होती. तांत्रिक शिक्षणाचीही सोय असून २३ तंत्रनिकेतन ९ अभियांत्रिकी महाविद्यालये १ कला निकेतन व ६ ललित कलामहाविद्यालये होती. 

राज्यात प्रसिध्द होणारी नवभारत ,नई दुनिया, युगधर्ण ,स्वदेश,भास्कर ही हिंदी भाषेतील व हितवाद, क्रॉनिकल, ट्रिब्यून ही इंग्रजी भाषेतील प्रमुख दैनिक आहेत. कृपक जगत हे हिंदी साप्ताहिक भोपाळहून प्रसिध्द होते. 

समाजकल्याण व आरोग्य : सामाजिक प्रगतीच्या दृष्टीने राज्य सरकारने अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. प्रौढ शिक्षण युवक व महिला मंडळांस साहाय्य तसेच युवक स्पर्धा घेतल्या जातात. शासनामार्फत निराधार स्त्रियांसाठी सहा केंद्रे, कामकरी स्त्रियांसाठी दोन वसतिगृहे ,कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी सात केंद्र आणि बहिर्य़ाा व मुक्या मुलांसाठी आठ शाळा चालविल्या जातात. राज्य शासना मार्फत ६० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या निराधार वृध्दांस आणि अपंगांस काही प्रमाणात अर्थसाहाय्य दिले जाते. तसेच आदिवासी मुलांसाठी शिष्यवृत्त्या विनावेतन पुस्तके, निवासव्यवस्था वगैरे सोयी उपलब्ध केल्या जातात.

राज्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या मलेरियाचे जवळजवळ निर्मूलन करण्यात आले असून हत्तीरोग ,क्षय,कुष्ठरोग हे थोड्याफार प्रमाणात आहेत. १९८२ मध्ये ७६५ रूग्णालये १९,७०८ खाटा असलेली शुश्रूषाकेद्रे तसेच ६,४८७ डॉक्टर आणि ९,००८ परिचारिका व दाया होत्या . १९८१ मध्ये ७,२३,१२० अंतररूग्णांवर व ३,०१,३६ ९७८ बाह्य रूग्णांवर औषधोपचार करण्यात आले. राज्यांत मानसोपचार केंद्रही आहेत.

भाषा व साहित्य : हिंदी ही राज्याची प्रमुख भाषा असून बहुसंख्य लोकांत ती प्रचलित आहे. पूर्व-हिंदीच्या अवधी, बाघेली व छत्तीसगढी या बोली प्रामुख्याने बाघेलखंड, सुरगुजा, छत्तीसगढ, जबलपूर आणि मंडला जिल्ह्यात बोलल्या जातात. तर पश्चिमी हिंदीची बुंदेली ही बोली प्रामुख्याने राज्याच्या मध्यवर्ती जिल्ह्यांतून बोलली जाते. मालवी ही बोली राज्याच्या पश्चिमेकडील भागात प्रचलित आहे. आदिवासीत भिल्ली,गोंडी, हलवी या भाषा बोलल्या जातात. यांशिवाय मराठी, उर्दू, ओडिया, तमिळ ,गुजराती ,इंग्रजी, तेलुगू बंगाली या भाषाही बोलल्या जातात. 

मध्य प्रदेश राज्याची साहित्यपंरपरा प्राचीन आहे. उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबाद हे जसे साहित्याचे केंद्र समजले जाते. तसेच मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर हे होय. काहींच्या मते कालिदासाने मेघदूत महाकाव्याची रचना या प्रदेशातच केली असावी. येथील भवभूती, राजशेखर ,वराहमिहिर, आचार्य सोमशंभू, भारवी ,दंडी, नागार्जुन यांच्या साहित्यकृतीमुळे भारतीय साहित्याला जगाच्या साहित्यात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. या राज्यातील त्रिपुरी व सिरपूर ही एकेकाळी संस्कृत साहित्याची केंद्रस्थाने म्हणून प्रसिध्द होती.


संस्कृत भाषेतील साहित्याबरोबरच अपभ्रंश, प्राकृत, पाली या भाषांतही उत्तम साहित्यनिर्मिती झाली आहे. पुष्पदंत यांनी अपभ्रंशमध्ये जसहरचरिउ या प्रसिध्द काव्याची निर्मिती येथेच केली. बौध्द धर्मतत्व नागार्जुन यांनीही पालीमध्ये येथेच उत्कृष्ट ग्रंथरचना केल्याचे आढळते . 

हिंदी साहित्याच्या विकासात मध्य प्रदेश राज्याचा फार मोठा हिस्सा आहे. हिंदी साहित्यातील अग्रणी अष्टछाप कवीस येथील कुंभनदास व चतुर्भुजदास यांचा समावेश होतो. कृष्णभक्तीच्या कविता हरिदास स्वामी यांनी लिहिल्या .तसेच रामभक्त कवीत येथील गोपाल, माखन, मदनभट्ट यांचा नामोल्लेख केला जातो. रीतिकालीन कवीत महत्व असलेले कुमार मणी, कृष्णभट्ट, पद्माकर हे याच राज्यातील होत. बिहारींच्या दोह्यांस ,केशवदासांच्या कवितांस व कवी भूषण यांस हिंदी साहित्यात आगळे स्थान प्राप्त झालेले आहे. भारतेंदू  काळात ठाकूर जगमोहनसिंह यांचे वाडःमय प्रसिध्द असून त्यांनी मेघदूताचा हिंदीत अनुवाद केला. द्विवेदी युगातही या राज्याने हिंदीच्या विकासात अनमोल कार्य केले असून त्यामध्ये लोचन प्रसाद पांडे, मुकुटधारी पांडे , माखनलाल चतुर्वेदी , राष्ट्रवादी कवी सुभद्राकुमारी चौहान ,पु. द्वारकाप्रसाद मिश्र, विनय मोहन शर्मा यांनी हिंदीत उत्कृष्ट साहित्य लिहिले आहे. तसेच आधुनिक काळातही रामकुमार वर्मा, भवानीप्रसाद मिश्र, भवानीप्रसाद तिवारी, रामानुजलाल श्रीवास्तव, गजानन माधव मुक्तिबोध, प्रभाकर माचवे, गिरिजाकुमार माथुर, शिवमंगलसिंह सुमन , हरिशंकर परसाई , शरद जोशी, श्रीकांत वर्मा इत्यादींनी हिंदी साहित्यात अनमोल भर घातली आहे.                                                                                           

गाडे, ना.स.

प्रेक्षणीय स्थळे : मोठा विस्तार, इतिहास, भूवैशिष्ट्ये यांमुळे हे राज्य पर्यटकांकरिता एक आकर्षण ठरले आहे. ⇨ग्वाल्हेर (लोकसंख्या ५,५९,७७६-१९८१) येथे किल्ला. मानसिंगाचा राजवाडा व राणी लक्ष्मीबाईचे स्मारक आहे. मानसिंगाने किल्यात बांधलेले मानमंदिर मुसलमान काळापूर्वीच्या हिंदू स्थापत्यशास्त्राच्या एक उत्तम नमुना आहे. येथे दरवर्षी होणारा तानसेन संगीत उत्सव प्रसिध्द आहे. शिवपुरी (सीप्री-७५,६८९) येथे राष्ट्रीय उद्यान असून आसमंतात साख्यसागर जलाशय ,कुवत बाबा हे वन्य प्राणी पाणी पिण्याला येतात ते ठिकाण. भदैया कुंड, राणोजी शिंदे यांची छत्री इ. ठिकाणे महत्वाचे आहेत. शिवपुरीत जेथे तात्या टोपे यांना फाशी दिले, तेथे स्मारक म्हणून एक चबुतरा उभारला आहे. शिवपुरीपासून झांशीच्या रस्त्यावर २० किमी. अंतरावर सुरवाया येथे अनेक भग्न इमारती आहेत. यांपैकी एका मठावरील छप्पर बघण्यासारखे आहे. चुन्याचा वापर न करता दगडाच्या मोठ्या थाप्या एकमेकांवर घालून छप्पर बनविले आहे. ⇨खुजराहोची (४,६८०) देवळे, त्यांमधील शिल्पांकरिता जगप्रसिध्द आहेत. ⇨महोबा येथील मदनसागर, जैन तीर्थकर यांच्या कोरीव मूर्ती प्रसिध्द आहेत. ⇨सांचीला तेथील बौध्द स्तूपाकरिता पर्यंटक भेद देतात. त्यावर जातककथा व सम्राट अशोकाच्या जीवनातील प्रसंग कोरले आहेत. यांव्यक्तिरिक्त सांची येथे सम्राट अशोकाचा स्तंभ व काही चैत्य आणि विहार आहेत. सांचीजवळचे विदिशा (६५,५६३) हे एक ऐतिहासिक स्थान आहे. येथे एक ब्राम्ही शिलालेख व उदयगिरीजी लेणी आहेत. ⇨भोपाळ येथे मोठे आणि लहान जलाशय,ताज-उल मशीद, मोती मशीद, जामा मशीद, अनेक बागा ही पर्यटकांची आकर्षणे आहेत. ⇨इंदूरमध्ये (८,२७,०७१) लालबाग, माणिकबाग, जुना राजवाडा , नवा राजवाडा या निवासस्थानांबरोबरच जैनांचे काच मंदिर, छत्रीबाग पहाण्यासारखी आहेत. ⇨उज्जैनला (२,८१,८७८) बारा ज्योतिलिंगापैकी महाकालेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे. येथे दर बारा वर्षानी कुंभमेळा भरतो. जंतरमंतर ही जयपूरच्यासवाई जयसिंगाने बांधलेली वेधशाळाही येथे आहे. उज्जैन शहरापासून सु. ६.५ किमी. दूर श्रीमंगळनाथ मंदिर आहे.प्राचीन हिंदू भूगोलज्ञांनी या स्थानाला आद्य रेखांश मानले होते. ⇨बाघ (५,०७९) येथील लेणी बौध्द व हिंदू कलेकरिता प्रसिध्द आहेत. ⇨मांडू येथील अश्रफी महाल, जामा मशीद, जहाजमहाल आणि मांडवगड या इमारतीबरोबरच बाझ बहादूर-रूपमती यांच्या कथा चिरंतन झाल्या आहेत. ⇨जबलपूर (७,५७,७२६) येथे मदनमहाल, भेडाघाड व नर्मदेवरील प्रसिध्द धुवांधार धबधबा आहे. ⇨ओंकारमांधाता ,महेश्वर (११,५६६) धार (४८,८७५) बांधोगढ, कान्हा (दोन्ही राष्ट्रीय उद्याने), थंड हवेचे ठिकाण पंचमढी (११,०८०) ही स्थळेही पर्यटकांना आवडतात. मंडला (३७,५३८) आणि बस्तर-छत्तीसगढ या प्रदेशांत आदिवासी कला आणि लोकजीवन पहाता येते. वॉल्टेअर (आंध्र प्रदेश राज्य) ते किरंडोल (म.प्र.राज्य) या रेल्वेमार्गावरील प्रवास म्हणजे निसर्ग प्रेमिकांना पर्वणी आहे. मध्य प्रदेश विकास महामंडळ पर्यटनाला उत्तेजन देते. 

           

पंडित, अविनाश

मध्य प्रदेश राज्य


गवा-नृत्य करणाऱ्या आदिवासीचे मोरपिसांनी नटलेले शिरोभूषण औष्णिक विद्युतनिर्मितीकेंद्र, कोर्बा
नर्मदेचे उगम स्थान अमरकंटक सचिवालय भोपाळ
कुप्रसिद्ध चंबळ घळी माधव राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्या वाघाचे छायाचित्र
युद्धावर निघालेले वीर: भीमबेटका गुहेतील एक भित्तीचित्र अहिल्याबाई होळकरांची छत्री, महेश्वर
क्षिप्रेच्या काठावरील मंदिराचे दृश्य, उज्जैन