वीझल, टॉर्स्टन निल्स : (३ जून १९२४-      ). स्वीडिश मस्तिष्कजीववैज्ञानिक (न्यूरोबायॉलॉजिस्ट). ⇨ डेव्हिड हंटर हुबेल, ⇨ रॉजर वॉलकॉट स्पेरी व वीझल या तिघांना मेंदूच्या कार्याविषयी अनुसंधान केल्याबद्दल १९८१ सालचे शरीरक्रियाविज्ञानाचे (किंवा वैद्यकाचे) नोबेल पारितोषिक संयुक्तपणे मिळाले होते. विशेषतः वीझल व हुबेल या दोघांनी प्रमस्तिष्काच्या पश्चकपालखंडांवर असणारया दृश्य (दृष्टी) बाह्यकाची संरचना व कार्य यांचा तपशीलवार अभ्यास केला. अशा रीतीने या दोघांनी दृष्टिप्रणालीत होणार्य़ाश माहिती संस्करणाविषयीचे शोध लावले. दृक्‌पटलापासून (डोळ्याच्या पडद्दापासून) ते मेंदूच्या संवेदी व प्रेरक केंद्रांपर्यंतच्या तंत्रिका आवेगांच्या (मज्जास्फुरणांच्या) प्रवाहाचे (प्रवासाचे) विश्लेषण त्यांनी केले. या दोघांचे हे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. (येथे आलेल्या पारिभाषिक शब्दांच्या स्पष्टीकरणासाठी मराठी विश्वकोशातील ‘तंत्रिका तंत्र’ आणि ‘मेंदू’ या नोंदी पहाव्यात).

वीझल यांनी स्टॉकहोम येथील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधून १९५४ साली एम्.डी. ही वैद्यकाची पदवी मिळविली आणि नंतर एक वर्ष (१९५४-५५) त्यांनी तेथे शरीरक्रियाविज्ञानाचे निदेशक म्हणून काम केले. नंतर बॉल्टिमोर (मेरिलंड) येथील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूलमध्ये त्यांनी नेत्रवैद्यकाचे अधिछात्र म्हणून संशोधन केले (१९५६-५८). तेथेच त्यांची हुबेल यांच्याशी गाठ पडली व दोघांच्या संयुक्त संशोधनास सुरूवात झाली. वीझल तेथे नेत्रवैद्यकीय क्रियाविज्ञानाचे सहप्राध्यापक (१९५८-५९) होते. नंतर ते बोस्टन येथील हार्व्हर्ड विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलमध्ये मस्तिष्कक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक (१९५९-६४), शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक (१९६४-६८) व मस्तिष्कजीवविज्ञानाचे प्राध्यापक (१९६८-८२) होते. नंतर ते रॉकफेलर विद्यापीठात (न्यूयॉर्क) १९८२ पासून व्हिन्सेंट अँड ब्रूक अँस्टर प्राध्यापक आणि मस्तिष्कजीवविज्ञान प्रयोगशाळेचे प्रमुख, तर १९९२ पासून रॉकफेलर विद्यापीठाचे अध्यक्ष झाले. मात्र त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले नाही.

वीझल यांनी विविध वैद्यकीय ज्ञानपत्रिकांमधून ऐंशीपेक्षा जास्त शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांना अनेक मानासन्मान व पुरस्कार मिळाले आहेत.           

ठाकूर, अ. ना.