दाते, केशवराव कृष्णराव : (७ ऑगस्ट १९१२ – ). विख्यात भारतीय हृद्‌रोगतज्ञ. जागतिक आरोग्य संघटनेच्या हृद्‌–रक्तवाहिन्या विकृतिविषयक सल्लागार समितीचे १९६३ पासून सभासद.

केशवराव कृष्णराव दाते

त्यांचा जन्म जबलपूर (मध्य प्रदेश) येथे झाला. जबलपूर येथे शालेय शिक्षण झाल्यानंतर १९३२ साली त्यांनी अलाहाबाद विद्यापीठाची ‘इंग्रजी साहित्य व इतिहास’या विषयातील बी. ए. पदवी संपादन केली. वैद्यकीय शिक्षणास मुंबई येथे सुरुवात करून त्यांनी १९३६ मध्ये मुंबई विद्यापीठाची एम्‌. बी. बी. एस्‌. ही पदवी मिळविली व त्यानंतर इंग्लंड, अमेरिका व स्वीडन या देशांत जाऊन एम्‌. आर्‌. सी. पी. (लंडन), एम्‌. आर्‌. सी. पी. (एडिंबरो), डी. सी. एच्‌ (इंग्लंड) आणि डी. टी. एम्‌. अँड एच्‌. (लंडन) या पदव्या मिळविल्या. १९५० मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम्‌. डी. ही पदवीही संपादन केली. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे वैद्यकीय व्यवसायास प्रारंभ केला. परदेशातून परतल्यावर लवकरच त्यांची के. ई. एम. हॉस्पिटल व बॉम्बे हॉस्पिटल या रूग्णालयांत नेमणूक झाली. १९६४ मध्ये के. ई. एम. हॉस्पिटलच्या हृद्‌रोगविज्ञान विभागाचे संचालक व हृद्‌रोगविज्ञान आणि वैद्यक विषयाचे प्राध्यापक म्हणून तसेच १९७० मध्ये बॉम्बे हॉस्पिटलच्या वैद्यकीय संशोधन केंद्रातील हृद्‌रोगविज्ञान विभागाचे संचालक म्हणून त्यांच्या नेमणुका झाल्या.

भारतीय लष्कराचे हृद्‌रोग सल्लागार म्हणून १९६२ पासून त्यांची नेमणूक होऊन नंतर त्यांना ‘सन्माननीय ब्रिगेडियर’ हा हुद्दा मिळाला. १९७५ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींचे वैद्य म्हणून त्यांची नेमणूक झाली.

त्यांना अनेक मानसन्मान मिळालेले आहेत. पद्मभूषण (१९६९) बी. सी. रॉय राष्ट्रीय पारितोषिक (१९७१) धन्वंतरी पुरस्कार (१९७४) अध्यक्ष, पाचवी वर्ल्ड काँग्रेस ऑफ कार्डिऑलॉजी (१९६६) अध्यक्ष, अकरावी इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ इंटर्नल मेडिसिन (१९७०) एकमेव भारतीय सभासद, ब्रिटिश कार्डिॲक सोसायटी सभासद, कार्डिऑलॉजीकल सोसायटी ऑफ बेल्जियम सन्माननीय फेलो, फिलिपीन्स कॉलेज ऑफ कार्डिऑलॉजी (१९७३). जगातील विविध वैद्यकीय संस्थांनी त्यांना सन्माननीय पदे देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. त्यांना एफ्‌. आर्‌. सी. पी. (लंडन), एफ्‌. आर्‌. सी. पी. (एडिंबरो), एफ्‌. ए. सी. सी. (अमेरिका), एफ्‌. सी. सी. पी. (अमेरिका) आणि एफ्‌. ए. एम्‌. एस्‌. (भारत) आणि एफ्‌. एन्‌. ए. (भारत) ही सन्माननीय पदे प्राप्त झालेली आहेत.

त्यांनी निरनिराळ्या भारतीय, ब्रिटिश, अमेरिकन आणि जपानी वैद्यकीय नियतकालिकांतून २५० पेक्षा अधिक लेख लिहिलेले असून वैद्यकीय पाठ्यपुस्तकांतून हृद्‌रोगावर लेखन केलेले आहे.

भालेराव, य. त्र्यं.