श्रीधरस्वामी-२ : (१९०८१९७३). रामदासी संप्रदायातील एक सिद्ध पुरूष. आईचे नाव कमळाबाई वडिलांचे नारायणराव. आडनाव देगलूरकर-पतकी. त्यांचे आईवडील गाणगापूर येथे दत्तात्रेयांच्या सेवेसाठी राहिले होते. तेथे त्यांनी कडक अनुष्ठान केले. त्यानंतर गाणगापुराजवळच असलेल्या चिंचोली ह्या गावी श्रीधरस्वामींचा जन्म झाला. आईवडिलांचे छत्र त्यांना फार काळ मिळाले नाही. ते तीन वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले आणि बारा-तेरा वर्षांचे असताना आई निवर्तली. लहानपणापासूनच ते रामभक्त होते. आरंभीचे शिक्षण हैदराबाद आणि गुलबर्गा येथे आप्तांकडे राहून पूर्ण केल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी ते पुण्याला गेले 

श्रीधरस्वामीपरंतु तिथल्या इंग्रजी शिक्षणात त्यांना स्वारस्य वाटेना. सनातन आर्य धर्माच्या प्रचारार्थ आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आयुष्य वेचावे असा विचार करून ते सज्जनगडावर गेले. तत्पूर्वी आजन्म ब्रह्मचर्य पाळणे, द्रव्याला न शिवणे, कोणी आग्रहपूर्वक काही द्रव्य दिलेच, तर ते परोपकारार्थ वेचणे, गरजा कमीत कमी करणे, लोककल्याणासाठी झटणे, स्त्री-पुरूषांत भेदभाव न करता सर्वांना सारख्याच तळमळीने बोध करणे अशी आपल्या जीवनाची उद्दिष्टे मनाशी पक्की ठरवून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आपला देह ईश्वराला अर्पण करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली. पुण्याजवळील बनेश्वर येथील शिवमंदिरात रामदासस्वामींच्या छायाचित्राची पूजा करून त्यांचा सज्जनगडावर सेवावती होऊन त्यांनी सर्व प्रकारची कष्टाची कामे केली आध्यात्मिक साधनाही केली. माधुकरीवर त्यांचा निर्वाह चाले. पुढे माधुकरीतून पुरेसे अन्न मिळेना, त्यामुळे घाणेरीच्या बिया आणि निवडुंगाची बोंडे खाऊन त्यांना भूक भागवावी लागे. त्यामुळे प्रकृती ठीक राहीनाशी झाली. एका लंगोटीवर ते राहत असल्यामुळे हिवाळ्यात सज्जनगडावरच्या थंडीवाऱ्याने सारे अंग फुटून निघे. असे कठोर तपाचरण केल्यानंतर रामदासस्वामींनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन दक्षिणेकडे जाण्याची आज्ञा केली असे म्हटले जाते. १९३० मध्ये दासनवमीच्या दिवशी श्रीधरस्वामींनी सज्जनगड सोडला आणि पाच वर्षे कर्नाटकात व्यतीत केली. त्यानंतरची पाच वर्षे पुन्हा सज्जनगडावर राहून १९४० मध्ये ते कर्नाटकात पुन्हा एकदा गेले. १९४३ च्या विजयादशमीच्या दिवशी त्यांनी यतिधर्माची दीक्षा घेतली.

श्रीधरस्वामींकडे अनेक लोक आपल्या संसारिक अडचणी घेऊन येत आपली दु:खे सांगत आणि श्रीधरस्वामी त्यांना मार्गदर्शन करीत. प्रपंचातील सुखशांती प्राप्त करावयाची असेल, तर परंपरेने चालत आलेले आपले कुलाचार सांभाळावेत असा उपदेश ते करीत. १९६० पासून त्यांनी एकांतवासात राहावयास सुरूवात केली आणि बारा वर्षांनी ते त्यातून बाहेर आले. त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले. त्यामुळे भारतात ठिकठिकाणी जाऊन धर्मप्रसार करण्याचा त्यांचा संकल्प पुरा होऊ शकला नाही.

श्रीधरस्वामींनी संस्कृत, मराठी, हिंदी, कन्नड ह्या भाषांत बरेच लेखन केलेले आहे. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके अशी :आर्य संस्कृती ( मराठी ), श्रीरामपाठ,श्रीसमर्थपाठ,श्रीमारूतिमाहात्म्य,श्रीदत्त करूणार्णवआणिश्रीशिवशान्तस्तोत्रतिलकम्( संस्कृत ). महाराष्ट्नात आणि कर्नाटकात त्यांचे अनेक भक्त आहेत. 

कुलकर्णी, अ. र.