युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस : भारतातील एक मध्यवर्ती कामगार संघटना. मृणाल कांती बोस, के. टी. शाह, जतिन चक्रवर्तीप्रभृतींनी १९४९ मध्ये तिची स्थापना केली. भारत सरकारने मान्यता दिलेल्या चार मध्यवर्ती कामगार संघटनांपैकी ही सर्वांत लहान व चौथ्या क्रमांकाची संघटना समजली जाते. या संघटनेचे मुख्य कार्यालय कलकत्ता येथे असून नवी दिल्ली, मद्रास, कानपूर, त्रिवेंद्रम, पाटणा व मुंबई येथे तिची विभागीय कार्यालये आहेत.

अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसशी तिच्या साम्यवादी धोरणामुळे ज्यांचे जमले नाही व ज्यांना ‘इंटक’ व ‘हिंद मजदूर सभा’ पुरेशा जहाल नाहीत असे वाटते, अशा काही कार्यकर्त्यांनी युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना केली. या संस्थेचे कार्य मुख्यतः पश्चिम बंगाल, बिहार, व केरळ या राज्यांत चालू आहे.

युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेसशी ५४० कामगार संघटना संबद्ध असून तिचे एकूण ४,१७,४६१ कामगार सदस्य आहेत.

कर्णिक, व. भ.