सेत्तार, षडाक्षरी एस्. : (१ जुलै १९३५). कर्नाटक राज्यातील एक थोर इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ व कला समीक्षक. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात हम्पसागर (बेल्लारी जिल्हा, कर्नाटक) येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण घेऊन ते म्हैसूर विद्यापीठातून एम्.ए. झाले (१९५९). त्यानंतर कर्नाटक विद्यापीठातून (धारवाड) पीएच्.डी. मिळविली (१९६७). तसेच त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून (ग्रेट ब्रिटन) पीएच्.डी. प्राप्त केली (१९७०). त्यानंतर त्यांनी अध्यापन हा व्यवसाय अंगीकारला आणि कर्नाटक विद्यापीठाच्या इतिहास व पुरातत्त्वविद्या विभागात प्राध्यापक व नंतर प्रमुख-प्राध्यापक म्हणून १९७० ते १९९६ दरम्यान अध्यापन केले व तेथूनच ते निवृत्त झाले. या अध्यापकीय कारकीर्दीतच ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन आर्ट हिस्टरी ‘या संस्थेचे ते कला संचालक होते (१९७८-९६). याशिवाय त्यांनी इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च (नवी दिल्ली ) याचे सन्मान्य अध्यक्षपद भूषविले (१९९६-९९). डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् गुणश्री प्राध्यापक म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्सड स्टडिज (बंगलोर) या संस्थेत त्यांनी काम केले. त्यांनी स्फुटलेखनाबरोबरच इतिहास, पुरातत्त्विवद्या, तत्त्वज्ञान, कन्नड साहित्य आदी विषयांवर विपुल लेखन केले. त्यांची मातृभाषा कन्नड असूनसुद्धा त्यांनी बहुतेक सर्व लेखन इंग्रजी भाषेत केले आहे. त्यांच्या काही प्रमुख ग्रंथांपैकी इनव्हायटिंग डेथ (१९६६), वर्ल्ड हिस्टरी : लँड मार्क्‌स इन ह्यूमन सिव्हिलायझेशन्स (१९७३), होयसळ स्कल्प्चर इन द नॅशनल म्यूझियम (१९७५), श्रवणबेळगोळ -ॲन इलस्ट्रेटेड स्टडी (१९८१), मेमोरियल स्टोन्स : ए स्टडी ऑफ देअर ऑरिजिन, सिग्निफिकन्स अँड व्हरायटी (१९८२), पर्सूइंग डेथ (१९९०), हंपी : ए मेडिईव्हल मेट्रापलिस (१९९०), होयसळ टेम्पल्स (दोन खंड, १९९१ १९९२), जैन सोअर्सिस ऑफ द इंडियन हिस्टरी : ॲनोटेड कॉन्कर्डन्स ऑफ क्लासिकल कन्नड लिटरेचर टेन्थ टू थर्टिन्थ सेन्चूरी (१९९४), पँग्ज ऑफ पार्टिशन (२००२), इंडियन आर्किऑलॉजी इन रेट्रॉस्पेक्ट (संपा. १ ते ४ खंड, २००२), सोमनाथपूर (२००८) इ. मान्यवर व प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांनी ‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ म्हैसूर’ या पुरातत्त्वीय सर्वेक्षणाद्वारे उपलब्ध झालेल्या माहितीचे २ ते ४ खंडांचे संकलन व संपादन केले आहे. तसेच त्यांच्या फिलॉसॉफी ऑफ डेथ (७ खंड) व आर्ट हिस्टरी (६ खंड) या ग्रथांना पाश्चात्त्य जगतात प्रसिद्धी मिळाली. त्यांनी मातृभाषा कन्नडमध्ये कप्पेअरभट्टण शासन (२०११) तसेच संगम व कन्नड साहित्यातील संबंधांवर लेखन केले असून बादामी चालुक्यांच्या कन्नड शिलालेखांच्या कलासौंदर्याचे मूल्यमापन केले आहे. त्यांनी अभ्यासानिमित्त जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, नेदर्लंड्स, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, श्रीलंका आदी देशांना भेटी दिल्या. त्यांचे काही ग्रंथ परदेशातच प्रकाशित झाले. कुमारस्वामींच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या ललित कला अकादेमीच्या व्याख्यानमालेत त्यांनी व्याख्याने दिली (१९९३).

सेत्तार यांच्या बहुविध विद्याव्यासंगाचा सन्मान अनेक गौरवपूर्ण पदकांनी करण्यात आला. त्यांपैकी कर्नाटक ललित कला अकादेमी वार्षिक पुरस्कार (१९८२), राज्योत्सव पुरस्कार (१९८९), अखिल भारतीय इतिहास परिषदेचा राष्ट्रीय पुरस्कार (१९९३), प्रोफेसर एम्. चिदानंद मूर्ती सुवर्णपदक (२०००), संबा-जोशी ॲवॉर्ड (२००८), चामुण्डराय प्रशस्ती (२०१३) इ. प्रतिष्ठित पुरस्कार होत. याशिवाय तत्त्वज्ञानावरील फिलॉसॉफी ऑफ डेथ या ग्रंथासाठी त्यांना समाधिज्ञानविशारद आणि शीलशासन-तज्ज्ञ या उपाधींनी गौरविण्यात आले. तसेच श्री बाहुबली विद्यापीठ ॲवार्ड (१९९६) आणि कुंडकुंड प्रशस्ती हा एक लाखाचा पुरस्कारही त्यांना लाभला (२००१). त्यांनी कर्नाटक इतिहास परिषद (शिमोगा), दक्षिण भारतीय इतिहास परिषद (पुणे) यांचे अध्यक्षपद भूषविले. जागतिक संस्कृत परिषदेचे (मेलबर्न, ऑस्ट्रेलिया) ते कला व संस्कृत विभागाचे अध्यक्ष होते. कन्नड भाषेतील योगदानाबद्दल त्यांना साहित्य अकादेमीद्वारे भाषा सन्मान पुरस्कार देण्यात आला (२००७). त्यांनी प्रामुख्याने होयसळ व विजयानगर येथील राजवंशांचा सखोल अभ्यास करून त्यांच्या कलेवर मूलगामी लेखन केले आहे. तसेच श्रवणबेळगोळ येथील गोम्मटेशराच्या मूर्तीसंबंधी माहिती नोंदविली आहे. कर्नाटकातील पुरातत्त्वीय संशोधनातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून वीरगळांचा त्यांनी सोंन्थायमर यांच्यासोबत घेतलेला सर्वांगीण आढावा त्यांच्या मेमोरियल स्टोन्स … … सारख्या ग्रंथातून पहावयास मिळतो.

सध्या सेत्तार हे बंगलोरच्या राष्ट्रीय प्रगत अध्ययन संस्थेत गुणश्री प्राध्यापक असून इंदिरा राष्ट्रीय कला केंद्राचे (दक्षिण विभाग) सन्मान्य संचालक म्हणून कार्यरत आहेत.

देशपांडे, सु. र.