पंचशील – २ :बौद्ध धर्मातील एक संकल्पना. शील म्हणजे सद्‌वर्तन. ही कल्पना केवळ धर्मकारणांपुरतीच मर्यादित न ठेवता आधुनिक राजकारणातही तिचा उपयोग केला असता, सहजीवन व शांततेचा प्रसार होईल, या विचाराने इंडोनेशियाचे अध्यक्ष सूकार्णो यांनी प्रथम तिचा उद्‌घोष केला. पुढे भारत व चीन या देशांत तिबेटसंबंधी २९ एप्रिल १९५४ रोजी  जो करार झाला, त्याच्या प्रास्ताविकात नमूद केलेली पाच तत्त्वे ‘पंचशील’ म्हणून प्रसिद्ध पावली. ती तत्त्वे अशी : (१) परस्पर देशांच्या प्रादेशिक अखंडतेला व राजकीय सार्वभौमत्वाला मान्यता देणे, (२) कोणीही कोणावर आक्रमण न करणे, (३) एकमेकांच्या अंतर्गत बाबतींत हस्तक्षेप न करणे, (४) एकमेकांविषयी समभाव बाळगणे व परस्परांच्या हिताची जपणूक करणे आणि (५) शांततामय सहअस्तित्व.

प्राचीन अशोक स्तंभांतून कोरली गेलेली सद्धर्म तत्त्वे व भारत-चीन करारातील उपर्युक्त तत्त्वे यांच्या मागची भूमिका बरीच समान असल्याने, कराराच्या वेळी  भारताचे त्या वेळचे पंतप्रधान व परराष्ट्रमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी उपर्युक्त तत्त्वांना ‘पंचशील’ म्हणून संबोधले. आंतरराष्ट्रीय राजकारणात पंचशील हे नवीनच तत्त्व होते. आंतरराष्ट्रीय शांततेसाठी तसेच स्थैर्यासाठी पंचशील हा शब्द वापरला गेला. यांतील पाचवे तत्त्वशांततामय सहजीवन हे अत्यंत महत्त्वाचे असून या तत्त्वावर इतर तत्त्वे आधारलेली आहेत. 

आंतरराष्ट्रीय राजकारणात ही तत्त्वे त्या वेळी आग्रहाने मांडण्यात विशेष औचित्य होते. दुसऱ्या महायुद्धानंतर एकीकडे सोव्हिएट रशिया व त्याचे सहविचारी कम्युनिस्ट देश आणि दुसरीकडे अमेरिका, इंग्‍लंड, फ्रान्स आणि त्यांची मित्रराष्ट्रे यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले.सोव्हिएट रशियाने मार्क्सप्रणीत आंतरराष्ट्रीय साम्यवादाच्या विचारसरणीनुसार व दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन वेगवेगळ्या देशांत साम्यवादी क्रांती घडवून आणण्याला सक्रिय साह्य करण्याचा सपाटा चालविला. साम्यवादाच्या असा प्रसाराला प्रतिबंध करणे लोकशाही-संरक्षणासाठी आवश्यक आहे, असे वाटून अमेरिका व इतर राष्ट्रांनी साम्यवादविरोध किंवा किमानपक्षी साम्यवादाला आहे त्या मर्यादेत थोपवून धरण्याचे धोरण अंगीकारले. रशिया व अमेरिका हे दोन्ही देश लष्करी दृष्ट्या सामर्थ्यशाली असल्याने आपल्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी दोघांनाही लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन, अन्य राष्ट्रांना लष्करी साहसाची लालूच व प्रसंगी प्रत्यक्षाप्रत्यक्ष दडपण आणणे, अशा मार्गांचा अवलंब केला होता. याच वेळी आशिया व आफ्रिका खंडांतील अनेक राष्ट्रे स्वतंत्र झाली होती. त्यांची या शीतयुद्धात कुतरओढ होऊ लागली. चीनमध्ये साम्यवादी क्रांती होऊन तेथे नवे सरकार प्रस्थापित झाले. चँग-कै-शेकला ते सरकार उलथून टाकून सबंध चीनवर आपले प्रभुत्व परत प्रस्थापित करण्याची इच्छा होती व अमेरिका त्याला साहाय्य करीत होती. साम्यवादी चीनचा विरोध हे अमेरिकेच्या जागतिक व विशेषतः आशियातील राजकारणाचे महत्त्वाचे सूत्र बनले होते. त्याचा त्रास आशियातील तसेच अन्यत्रच्या छोट्या छोट्या देशांना होत होता त्यांच्या आर्थिक विकासाच्या मार्गात अडथळे येते होते. तेव्हा बड्या राष्ट्रांनी सामर्थ्यावर आधारलेले राजकारण थांबवावे, वेगवेगळ्या देशांतील प्रस्थापित सरकारांचे अस्तित्व मान्य करावे आणि त्यांच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्याचे थांबवावे, हे आग्राहाने मांडण्याची गरज होती. जवाहरलाल नेहरू यांनी तशी भूमिका १९४७ पासून घेऊन ती सतत हिरिरीने मांडली होती. त्यांच्या त्या धोरणाला या पंचशीलमुळे सूत्रबद्धता प्राप्त झाली.

पंचशील तत्त्वांना आंतरराष्ट्रीय राजकारणात बरीच मान्यता मिळाली. अनेक नवजात राष्ट्रांबरोबर सोव्हिएट रशियानेही ते मान्य केले. पुढे १५ डिसेंबर १९५७ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनेही ‘शांततामय सहअस्तित्व’ या विषयावर स्वतंत्र ठराव संमत करून पंचशील तत्त्वांचा पुरस्कार केला. आंतरराष्ट्रीय राजकारणातील तणातणी कमी होण्याला त्यामुळे काही अंशी निश्चितपणे साहाय्य झाले. पण चीनने भारताबरोबर सरहद्दीच्या प्रश्नावरून वाद उपस्थित केला काही प्रदेश अनधिकाराने बळकावला व शेवटी २० ऑक्टोबर १९६२ रोजी भारतावर आक्रमण केले. त्यामुळे पंचशीलच्या निर्मात्यांपैकीच एकानं त्या तत्त्वांना मूठमाती दिली, अशी जगभर व विशेषतः भारतात टीका झाली.

सुराणा, पन्नालाल