पोर्ट आर्थर – १ : चीनच्या लिआउनिंग प्रांतातील बंदर व नौदलकेंद्र. हे मँचुरियातील लिनाउडुंग द्विपकल्पाच्या दक्षिण टोकावर, डायरेनच्या नैर्ऋत्येस ३८ किमी., पीत समुद्राच्या पॉहाय आखातावर वसलेले आहे. डायरेन-पोर्ट आर्थर भागास चिनी भाषेत ‘लुता म्हणतात. डायरेनसह लोकसंख्या ४२,००,००० (१९७७). पोर्ट आर्थर हे प्राचीन काळापासून चीनचे प्रमुख बंदर असून, मिंग वंशाच्या राजवटीत यास ‘लूशून म्हणत. पोर्ट आर्थर मोक्याच्या जागी असून, ते हिवाळ्यात हिमयुक्त असल्याने लष्करी दृष्ट्या त्यास महत्त्व आहे. १८९४–९५ च्या चीन-जपान युद्धात जपान्यांनी हे जिंकले, पण पाश्चात्त्य राष्ट्रांच्या दबावामुळे जपानला ते परत करावे लागले. जर्मनांनी पोर्ट आर्थरजवळील जिआउजो बंदर काबीज केल्यावर १८९८ मध्ये रशियाने चीनबरोबर तह करून खंडणीने २५ वर्षांसाठी पोर्ट आर्थर मिळविले आणि ट्रान्स-सायबीरियन लोहमार्गास जोडून शहरास तटबंदी केली. १९०४–०५ च्या रशिया-जपान युद्धात जपान्यांनी यास वेढा घातला, तेव्हा सर्व आरमारासह रशियन सैन्याने शरणागती पतकरली. त्यानंतरच्या पोर्टस्मथच्या तहाने पोर्ट आर्थर जपानला मिळाले. १९४५ मध्ये जपानचा रशियाने येथे पराभव केला त्यामुळे जपानचा यावरील हक्क संपुष्टात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर याल्टा परिषदेतील ठरावानुसार चीन व रशिया यांचा संयुक्त आरमारी तळ येथे होता. १९५५ पासून यावर फक्त चीनचाच अंमल आहे.

आजचे पोर्ट आर्थर शहर म्हणजे पाश्चात्त्य शहरांच्या धर्तीवर आखणी केलेले सुंदर शहर आहे. लुंग नदीमुळे याचे दोन विभाग झाले असून पूर्वेकडील जुन्या भागात गोद्या व बंदरांशी निगडित अशा इतर सोयी असून पश्चिमेकडील आधुनिक भागात प्रामुख्याने लोकवस्ती आढळते. मॉन्युमेंट हिल, सैनिकी पेहराव व युद्धसाहित्य यांचे संग्रहालय, ईगल्स नेस्ट हिल, द ट्‍‌विन ड्रॅगन हिल इ. भाग इतिहासप्रसिद्ध आहेत.

ओक, द. ह.