व्हर्जिनिया मृगव्हर्जिनिया मृग : (व्हाइट टेल्ड डिअर). या मृगाच्या शेपटीची खालची बाजू पांढरी असून पळताना किंवा धोक्याची जाणीव झाल्यानंतर ती खुणेच्या निशाणासारखी वर उचललेली असते. त्याचा समावेश स्तनी वर्गातील समखुरी (पायाच्या खुरांची संख्या सम असलेल्या प्राण्यांच्या आर्टिओडॅक्टिला) गणातील सर्व्हिडी कुलात होतो. ‘ओडोकॉयलियस व्हर्जिनियानस’ हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. दक्षिण कॅनडा ते दक्षिण अमेरिका या प्रदेशात तो आढळतो.

उत्तरेकडील भागात तो आकाराने बराच मोठा असतो. खांद्यापाशी त्याची उंची ८० –११० सेंमी. असते. त्याच्या शेपटीची लांबी सु. ३० सेंमी.असते. त्याचे वजन सु.१८० किग्रॅ. असते. प्रौढ व्हर्जिनिया मृगाच्या कातडीचा रंग उन्हाळ्यात चमकदार तांबूस तपकिरी व हिवाळ्यात मळकट करडा-तपकिरी असतो. खालची पोटाकडील बाजू पांढरी असते. नराला पुढे वळलेली शिंगे असून त्यास शाखा नसलेले पुष्कळ फाटे असतात. उत्तर अमेरिकेत जानेवारी – मार्च या काळात मृगशृंगे गळून पडतात व एप्रिल-मे या काळात नवीन येण्यास सुरुवात होते. ऑगस्ट-सप्टेंबर या काळात मृगशृंगाची मखमली त्वचा नाहीशी होते. नव्या शृंगात पूर्वीपेक्षा एक-दोन फाटे जास्त असतात. वयाच्या चौथ्या किंवा पाचव्या वर्षी शृंगाची वाढ पूर्ण होते.

वृक्षराजी असलेल्या जागा, तोडलेली वने, शहरालगतची झाडी व शेतजमिनीत त्यांची संख्या भरपूर असते. खाद्यासाठी त्यांचा वावर फळबागा व लागवडीखालील शेतजमिनीत आढळतो. गवत, तणे, झुडपे, डहाळ्या, भूछत्रे, कवचयुक्त फळे, दगडफुले इत्यादींचा समावेश त्यांच्या आहारात होतो. हिवाळ्यात अन्न मिळविण्यासाठी त्यांना खूप भटकावे लागते व त्यासाठी जास्त ऊर्जा खर्च होते. या काळात त्यांच्यात कमी अन्न खाण्याची प्रवृत्ती आढळते. इतर मृगांसारखे त्यांचे कळप आढळत नाहीत. दोन-चार मृग एकत्र आढळतात. दाट हिम पडल्यावर व चारा कमी पडल्यास चारा असलेल्या ठिकाणी ते दिसतात. बहुसंख्य माद्या दुसऱ्या वर्षी प्रजोत्पादनास सुरुवात करतात. नोव्हेंबर व डिसेंबर हा विणीचा काळ आहे. १९६-२१० दिवसांच्या गर्भावधीनंतर पहिल्या वेळेस एक पाडस व त्यानंतर दोन पाडसे (क्वचित तीन व चारही) जन्माला येतात. जन्मत: पाडसाचे वचन १.५ ते २.५ किग्रॅ. असते. त्याच्या अंगावर सुंदर ठिपके असतात व ते चालू शकते. आई पाडसाला दाट गवतात ठेवते व प्रारंभीच्या काळात दर चार तासांनी पाजते. पाडस काही दिवसांत गवत चघळू लागते. सहा आठवड्यांनंतर आई पाडसाला पाजणे बंद करते. मादी-पाडस आईबरोबर सु. दोन वर्षे राहते, तर नर-पाडस पहिल्या वर्षीच वेगळे फिरू लागते. रानावनात त्यांचे आयुष्य सु. दहा वर्षांचे असते, पण पाळलेले मृग वीस वर्षांपर्यंत जगतात.

त्याच्या रुचकर, स्वादिष्ट, रसाळ मांसासाठी व कातडीसाठी केलेल्या बेसुमार शिकारीने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत त्यांची संख्या खूपच घटली. विसाव्या शतकाच्या मध्यास संपूर्ण उत्तर अमेरिकेत शिकारीवर निर्बंध घातल्यामुळे त्यांची संख्या भरपूर वाढली आहे. व्हर्जिनिया मृगाच्या अनेक उपजातींपैकी फ्लोरिडातील ‘की मृग’ ही पांढऱ्या शेपटाच्या मृगाची लहान जात आहे. खांद्यापाशी त्याची उंची सु.७५ सेंमी. असून त्याचे वजन सु. २३ किग्रॅ. असते. हा मृग नष्ट होण्याच्या मार्गावर होता, पण संरक्षक उपाययोजनांमुळे त्यांची संख्या वाढली आहे.

पहा : मृग.

जमदाडे, ज. वि. पाटील, चंद्रकांत प.