टॉमस हंट मॉर्गन

मॉर्गन, टॉमस हंट : (२५ सप्टेंबर १८६६–४ डिसेंबर १९४५). अमेरिकन जीववैज्ञानिक. आधुनिक ⇨ आनुवंशिकीचे एक प्रमुख संस्थापक. ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर या फळमाशीवर प्रायोगिक संशोधन करून त्यांनी आनुवंशिकीतील अतिशय महत्त्वाचा गुणसूत्र सिद्धांत (एका पिढीतून पुढील पिढीत आनुवंशिक लक्षणे नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांसंबंधीचा सिद्धांत) प्रस्थापित केला. यामुळे जैव क्रमविकासाची (उत्क्रांतीची) प्रक्रिया स्पष्ट होण्यास मदत झाली आणि हा सिद्धांत आधुनिक आनुवंशिकीचा पाया बनला. गुणसूत्रांच्या आनुवंशिकता संक्रामणाच्या कार्याच्या शोधाबद्दल त्यांना १९३३ सालच्या शरीरक्रियाविज्ञान या वैद्यक विषयाच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला. जीवविज्ञानाच्या अभ्यासात पूर्वी प्रचलित असलेला वर्णनात्मक आकारविज्ञानावरील (सजीवांचा आकार, स्वरूप व संरचना यांसंबंधीच्या विज्ञानावरील) जोर सध्याच्या प्रायोगिक व परिमाणात्मक स्वरूपाकडे वळविण्यात मॉर्गन यांचे भ्रूणविज्ञान व आनुवंशिकी यांतील संशोधन साहाय्यभूत ठरते.

मॉर्गन यांचा जन्म लेक्झिंग्टन (केंटकी) येथे झाला. स्टेट कॉलेज ऑफ केंटकीमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी बी.एस्. (१८८६) पदवी मिळविली. १८९० मध्ये सागरी कोळ्यांचे भ्रूणविज्ञान व जातिवृत्त या विषयावर संशोधनपर प्रबंध सादर करून त्यांनी जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी संपादन केली. १८९१–१९०४ या काळात त्यांनी फिलाडेल्फियाजवळील ब्राअन मार कॉलेजात प्राणिविज्ञानाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केले. तेथे झाक लब या जीवविज्ञानातील प्रायोगिक व यांत्रिक दृष्टीकोनाचा पुरस्कार करणाऱ्या शरीरक्रियावैज्ञानिकांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. याच काळात त्यांनी इटलीतील नेपल्स येथील प्रसिद्ध प्राणिवैज्ञानिक केंद्रालाही पुढील अभ्यासासाठी भेटी दिल्या. तेथे जीवविज्ञानातील वर्णनात्मक पद्धतीपेक्षा प्रायोगिक पद्धतीला प्राधान्य देणाऱ्या अनेक संशोधकांशी त्यांचा संपर्क आला. १९०४–२८ या काळात ते कोलंबिया विद्यापीठात प्रायोगिक प्राणिविज्ञानाचे प्राध्यापक होते. १९२८ मध्ये त्यांनी पॅसाडीना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीमध्ये (कॅल्‌टेकमध्ये) कर्कहॉफ लॅबोरेटरीज ऑफ बायॉलॉजिकल सायन्सेस ही प्रयोगशाळा स्थापन केली व ते तिचे संचालक झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रयोगशाळा आनुवंशिकीमधील संशोधनाचे एक प्रमुख केंद्र बनली. १९४१ मध्ये संचालक पदावरून ते सेवानिवृत्त झाले तथापि तेथे भ्रूणविज्ञानातील संशोधन मृत्यूपावेतो त्यांनी पुढे चालू ठेवले.

मॉर्गन यांनी १८९३–१९१० या काळात भ्रूणविज्ञानातील मूलभूत समस्यांच्या अभ्यासासाठी प्रायोगिक तंत्रांचा उपयोग केला. भ्रूणविकासातील कारणसंबंधित घटना ओळखण्यासाठी त्यांनी विलग केलेल्या कोरकखंडांपासून (प्रारंभिक भ्रूणीय कोशिकांपासून-पेशींपासून) भ्रूण तयार होणे आणि अंड्याच्या केंद्रकयुक्त (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा गोलसर पुंजयुक्त) व केंद्रकरहित तुकड्यांमधील निषेचन (फलन) यांसारख्या समस्यांचे त्यांनी विश्लेषण केले. अंड्यांच्या दिक्‌स्थितीचा त्यांच्या भावी विकासावर होणारा परिणाम आणि निषेचित व अनिषेचित अंड्यांच्या विकासावर लवण संहतीची (प्रमाणाची) होणारी क्रिया यांसारख्या भौतिक परिणामांचेही त्यांनी विश्लेषण केले. ब्राअन मार व कोलंबिया येथे असताना त्यांनी वुड्स होल (मॅसॅचूसेट्स) येथील मरिन बायॉलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये प्रत्येक उन्हाळ्यात काम केले व १८९७ पासून मृत्यूपावेतो या प्रयोगशाळेचे ते विश्वस्त होते. 

प्रारंभी मॉर्गन यांनी नैसर्गिक निवडीतून जातींची उत्पत्ती या डार्विन यांच्या सिद्धांतानुसार [→ क्रमविकास] व ग्रेगोर मेंडेल यांच्या आनुवंशिकीतील संकल्पनांवर टीका केली तथापि आनुवंशिकीतील त्यांच्या स्वतःच्या प्रयोगांनंतर त्यांना आपले मत बदलणे भाग पडले. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी जीन (गुणसूत्रावरील आनुवंशिक लक्षणे निदर्शित करणारी एकके) हे आनुवंशिकतेचे कण असल्याचा सत्यतेचा पडताळा पहाण्यासाठी एक प्रयोगमाला आयोजित केली. त्यांनी आपल्या प्रयोगांकरिता अल्प आयुष्य असलेली व प्रयोगशाळेत बदलत्या परिस्थितीत सहज प्रजनन करता येणाऱ्या ड्रॉसोफिला मेलॅनोगॅस्टर या फळमाशीची निवड केली. ही माशी केवळ १० दिवसांत आपले जीवनचक्र पूर्ण करीत असल्याने वर्षभरात तिच्या ३० पिढ्या मिळू शकतात. १९१४ पर्यंत मॉर्गन यांचे प्रयोग प्रजनन व कोशिका वैज्ञानिक (कोशिकांची संरचना, वर्तन, वृद्धी व प्रजनन आणि कोशिका-घटकांचे कार्य व रसायनशास्त्र यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने केलेल्या) परीक्षणांद्वारे यशस्वी होऊन त्यांनी गुणसूत्र सिद्धांत सिद्ध केला. १९१० मध्ये त्यांना पहिली उत्परिवर्तित (आनुवंशिक लक्षणांमध्ये एकाएकी बदल झालेली) माशी आढळली आणि तिचा सामान्य माशीबरोबर संकर केला. त्यातून निर्माण झालेल्या संततीतील उत्परिवर्तित व सामान्य माश्यांची टक्केवारी मेंडेल यांच्या आनुवंशिकीच्या नियमाप्रमाणे [→आनुवंशिकी] असल्याचे मॉर्गन यांना आढळून आले. लवकरच त्यांना कित्येक उत्परिवर्तित लक्षणे आढळून आली व काही विशिष्ट लक्षणे केवळ लिंग सहलग्नच नसून विशिष्ट माश्यांत एकत्रितपणे असण्याची त्यांची प्रवृत्ती दिसून आली. यावरून त्यांनी असे गृहीतक मांडले की, सर्व लिंग सहलग्न लक्षणे एकत्रितपणे आनुवंशिकतेने पुढील पिढीत उतरतात कारण मूळ कोशिकेतील एकाच गुणसूत्रावर ही लक्षणे एक एकक म्हणून एकत्रितपणे असतात. मॉर्गन यांनी या लक्षणांना सहलग्न गट असे नाव दिले. डॅनिश वनस्पतिवैज्ञानिक व्हिल्हेल्म योहानसन यांनी १९०९ मध्ये वापरलेली जीन ही संज्ञा मॉर्गन यांनी प्रत्येक लक्षण एककाला वापरली. जीन हे गुणसूत्रांवर माळेप्रमाणे जोडलेले असतात असाही त्यांनी निष्कर्ष काढला. मॉर्गन यांना असेही आढळून आले की, अर्धसूत्रण विभाजनात [→ कोशिका] समजात गुणसूत्रांची जुळणी होऊन त्यांतील द्रव्याची देवघेव होते तेव्हा जीनांची सहलग्नता तुटणे शक्य असते. जेव्हा जीन गुणसूत्रांवर सन्निकट असतात तेव्हा त्यांची सलग्नता तुटण्याची शक्यता कमी असते आणि यामुळे तुटलेल्या खंडांची वारंवारता नोंदवून गुणसूत्रावरील जीनांच्या स्थानांचे चित्रण करता येते. मॉर्गन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिली गुणसूत्र चित्रणे १९११ मध्ये तयार केली. १९१५ मध्ये मॉर्गन व त्यांचे सहकारी ए. एच्. स्टर्टेव्हंट, सी. बी. ब्रिजेझ व एच्. जे. म्यूलर यांनी द मेकॅनिझम ऑफ मेंडेलियन हेरेडिटी हा जीनांच्या प्रणालीचे वर्णन करणारा ग्रंथ प्रसिद्ध केला. पुढे १९२६ मध्ये त्यांनी आनुवंशिकतेच्या गुणसूत्र सिद्धांताचे विस्तारपूर्वक विवरण करणारा द थिअरी ऑफ द जीन हा ग्रंथ लिहिला.

मॉर्गन यांना नोबेल पारितोषिकाखेरीज डार्विन पदक (१९२४), रॉयल सोसायटीचे कॉफ्ली पदक (१९३९) वगैरे अनेक बहुमान मिळाले. ते जेनेटिक्स सोसायटी ऑफ अमेरिका, अमेरिकन मॉर्फॉलॉजिकल सोसायटी (अध्यक्ष, १९००), अमेरिकन सोसायटी ऑफ नॅचरॅलिस्ट्स (अध्यक्ष, १९०९), सोसायटी फॉर-एक्सपिरिमेंटल बायॉलॉजी अँड मेडिसीन (१९१०–१२), सोसायटी फॉर ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स (अध्यक्ष, १९३०), नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (अध्यक्ष, १९२७–३१) वगैरे संख्यांचे सदस्य होते. इथाका (न्यूयॉर्क) येथे १९३२ मध्ये भरलेल्या सहाव्या आंतरराष्ट्रीय आनुवंशिकी परिषदेचे ते अध्यक्ष होते. ते पॅसाडीना येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.