चित्रपटातील चमत्कृतिदृश्ये : (ट्रिक सीन्स). चित्रपटतंत्राचा विकास होत असतानाच चित्रपटात काहीतरी अद्‌भुत चमत्कृतिपूर्ण दृश्ये असावीत, म्हणून पूर्वीपासूनच प्रयत्न होत होते. अशा प्रयोगाचे जनकत्व झॉर्झ मिली या फ्रेंच संशोधकाकडे जाते. त्याने अतिरंजित विनोदी चित्रपट तयार करण्यासाठी चमत्कृतिदृश्ये प्रथम योजिली. असंभवनीय आणि अघटित घटनांनी भरलेले रेड रायडिंग हूड, ए ट्रिप टू द मून, अंडर द सी  न इंपॉसिबल व्हायोजेस  इ. चित्रपट तयार करून त्याने ते लोकप्रिय केले.

 

चमत्कृतिदृश्ये निर्माण करण्यासाठी अनेक तंत्रे वापरली जातात. उदा., चमत्कृतिमध्ये कॅमेऱ्याची गती कमी करून चित्रीकरण केले, तर पडद्यावर त्या त्या हालचाली जलद केल्याचा भास होतो. त्याचप्रमाणे गती वाढवून चित्रीकरण केले, तर त्या हालचाली पडद्यावर अगदी मंदपणे केल्यासारख्या दिसतात. याच तंत्राचा उपयोग करून अपघातासारखी भीषण दृश्ये चित्रित करतात. एकमेकांच्या समोरून येणाऱ्या दोन मोटारींची टक्कर झाल्याचे दाखविताना त्या दोन्ही मोटारी प्रमाणशीर मंद गतीने चालवितात आणि कॅमेऱ्याची गतीही प्रमाणशीर कमी करतात. त्यामुळे ती वाहने अतिशय वेगाने धावत येऊन धडक देतात, असे दृश्य पडद्यावर दिसते किंवा दोन मोटारी एकमेकीला चिकटून उभ्या करून दोन्हीही मागे येतात. त्याचे चित्रण उलटे केले, की त्या मोटारी एकमेकींवर आपटताना दिसतात. त्याचप्रमाणे वादळ वा तुफान इत्यादींचे देखावे पहिल्या पद्धतीने चित्रित केल्याने त्यांची भीषणता अधिक वाढते. एखादा मनुष्य अवचितपणे एखाद्या जागी प्रकट होणे किंवा गुप्त होणे वगैरे चमत्कार दाखविण्यासाठी चित्रिकरणाच्या वेळी कॅमेरा क्षणभर थांबवून हवा असलेला बदल घडवून परत चित्रीकरण करतात. निर्जीव चित्रांच्या किंवा बाहुल्यांच्या बाबतीत इच्छित हालचाली करवून घेण्यासाठी जे तंत्र वापरतात, त्याला कृतिस्थगन (स्टॉप मोशन) म्हणतात. या पद्धतीत दर सेकंदाला चार चित्रे याप्रमाणे चित्रीकरण करून प्रत्येक वेळी पुढच्या पुढच्या हालचालींनुसार बदल करतात. कित्येकदा जरूरीप्रमाणे एकेका चित्राचे दर सेकंदास एक चित्र (सिंगल फ्रेम) या प्रमाणे चित्रीकरण करण्यात येते. आकाशातील ढगांचे परिभ्रमण किंवा सूर्याचा उदयास्तही याच पद्धतीने चित्रित करतात. एखादी कळी उमलून तिचे फुलात रूपांतर होते, हे दृश्यही याच पद्धतीने टिपतात. नकाशातील देशांच्या सरहद्दी वा नदीचा प्रवाह आपोआप पुढे सरकत जाणाऱ्या रेषेने दाखवितात, तेही वरील कृतिस्थगनपद्धतीनेच. या क्रियेलाच सचेतनीकरण (ॲनिमेशन) म्हणतात.

'किंगकाँग', १९३३.

व्यंगचित्र आणि बाहुल्यांच्या हालचाली असलेले चित्रपट तयार करण्याचे काम फार किचकट आणि दगदगीचे असते. व्यंगचित्रपटासाठी हजारो चित्राकृती रेखाटाव्या लागतात. पार्श्वभूमीचे देखावेही तयार करावे लागतात. जरूरीप्रमाणे अनेकदा चित्रीकरण करून खास यांत्रिक साधनांच्या साहाय्याने व्यंगपट तयार केले जातात. पशुपक्षी आणि कलावंत यांची एकत्रित कामे असलेले व्यंगपट तयार करण्यासाठी विविध आकारांच्या खिडक्या (मॅट्स) वापरतात. प्राण्यांची व माणसांची हालचाल वेगवेगळ्या पद्धतीने चित्रित करून त्यांची तंतोतंत जुळणी साधावी लागते. कळसूत्री बाहुल्या (पपेट्स) किंवा जनावर असलेला व्यंगपट तयार करताना, त्याच्या अनेक वेगवेगळ्या अवस्थांचे चित्रीकरण करावे लागते. थ्री कॅव्हेलरॉस  या चित्रपटात ⇨वॉल्ट डिझ्नी  यांनी हा प्रयोग प्रथम यशस्वी करून दाखविला.

भुतांचे चमत्कार दाखवावयाचे असतील, तर दुहेरी छायाचित्रण (डबल एक्पोझर) करावे लागते. एकदा संबंधित देखावा पूर्णपणे चित्रित करून ती फिल्म कॅमेऱ्यातल्या कॅमेऱ्यात मागे गुंडाळून घेतात व नंतर भुताचे सोंग उभे करून परत त्या देखाव्याचे चित्रीकरण करतात. त्यामुळे भूत अपार्थिव असल्याचा भास निर्माण होतो. प्रत्यक्ष भूत दाखविण्याची आणखीही एक रीत आहे. या पद्धतीत कॅमेऱ्याच्या भिंगासमोर ठराविक अंतरावर सु. ०·५६ चौ. मी. आकाराची एक पातळ काच कॅमेऱ्याच्या भिंगाशी ४५° कोन होईल अशा रीतीने ठेवतात. भुताची भूमिका करणारे पात्र छायाचित्रकाराने ठरवून दिलेल्या ठिकाणी उभे राहते. त्याच्या चालण्याचा मार्ग छायाचित्रकार आखून देतो. मात्र या पात्राला उलटा अभिनय करावा लागतो म्हणजे डावीकडून उजवीकडे जावे लागते. अशा रीतीने चित्रीकरण केल्यानंतरचे ते भूत अशरीरी दिसते आणि त्या देखाव्यातील इतर पात्रांना भेडसावू शकते. चित्रीकरण क्षणभर थांबवून व परत सुरू करून एकदम भूत प्रकट करण्याची किंवा अदृश्य करण्याचीही चमत्कृती साधता येते. तसेच एखाद्या देखाव्याचे चित्रण करून ते काळ्या पडद्याने सर्व झाकून टाकून पुन्हा त्याच फिल्मवर भुताचे चित्रण केले, की ते अशरीरी भूत त्या देखाव्यावर वावरताना दिसते.


देवाच्या मूर्तीतून प्रत्यक्ष परमेश्वर उत्पन्न वा गुप्त झालेला दाखविण्यासाठी उदयन अथवा अपायन (फेड आऊट-फेड इन) पद्धतीचा उपयोग करतात. असे चित्रीकरण कॅमेऱ्यातील यांत्रिक रचनेने किंवा नंतर रासायनिक प्रक्रियागृहातही केले जाते. तसेच अशा चित्रीकरणासाठी काळ्या पडद्याचाही वापर करण्यात येतो.

स्वप्नाची दृश्ये दाखविण्यासाठी अध्यारोपणाचा (सुपर इंपोझिंग) उपयोग करतात. यासाठी प्रथम झोपलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे थोडेसे चित्रीकरण करतात. नंतर स्वप्नदृश्यांची फिल्म आणि त्या चेहऱ्याची फिल्म एकत्र छापतात.

एकच व्यक्ती एकाच वेळी वेगवेगळ्या दुहेरी भुमिकांत दाखविण्यासाठी मुखवट्यांचाही (मास्क) उपयोग करतात. हे मुखवटे अथवा खिडक्या अनेक प्रकारच्या असतात. एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या भूमिकांत एकमेकांशी हस्तांदोलनही याच पद्धतीने करू शकते. बंद दरवाजाच्या पोटकुलपाच्या भोकातून पलिकडचे दृश्य कसे दिसते, ते दाखविण्यासाठी कुलपाच्या भोकाच्या आकाराची खिडकी (मास्क) वापरतात, तर दुर्बिणीतून दिसणारे दृश्य दाखविताना एकमेकाला चिकटलेल्या दोन वर्तुळाकृती खिडक्यांचा वापर करतात.

इमारती वा पूल कोसळणे, आगगाड्यांची टक्कर होणे वा त्या दरीत कोसळणे इ. अपघातांची दृश्ये बहुतेक चित्रपटनिर्मितिगृहात तयार करतात. त्याकरिता लहान आकारांच्या, परंतु हुबेहूब अशा छोट्या प्रतिकृती तयार करून व त्यांचे ठराविक गतीने चित्रीकरण करून जरूर तो आभास निर्माण करता येतो. कधीकधी विशिष्ट प्रकारचा आभास अंतर्गृहात निर्माण करण्यासाठी पार्श्वप्रक्षेपण (बॅक प्रोजेक्शन) या तंत्राचा उपयोग करतात. उदा., एखाद्या पेटत्या इमारतीतून नायक नायिकेला सुखरूप बाहेर काढण्यासाठी, स्वतःचा जीव धोक्यात घालत असल्याचे दृश्य दाखविण्यासाठी, खऱ्याखुऱ्या पेटत्या इमारतीचे अगर विशिष्ट दालनाचे देखावे नायकाच्या पार्श्वभूमीवर प्रक्षेपित केले जातात व वास्तवतेचा आभास निर्माण करण्यासाठी त्याच्या आसपास एक-दोन खऱ्या जळत्या तुळ्या टाकतात.

भूतचेष्टेने एखाद्या ठिकाणचे सामान डोळ्यांदेखत आपोआप इकडून तिकडे जाऊन पडणे वगैरेंसारख्या दृश्यांच्या चित्रीकरणाच्या वेळी सूक्ष्म काळ्या परंतु टणक धाग्याचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे अनेक युक्त्याप्रयुक्त्या योजून चित्रपटातील चमत्कृतिदृश्ये तयार करण्यात येतात.

तुकोबाचे सदेह वैकुंठगमन, 'संत तुकाराम', १९३६.भारतामध्ये अशा प्रकारच्या चमत्कृतिदृश्यांची प्रथम यशस्वी सुरुवात ⇨दादासाहेब फाळके  यांनी आपल्या पौराणिक चित्रपटांसाठी केली. संत तुकाराम (१९३६) या चित्रपटात तुकाराम सदेह वैकुंठाला जातान विमान अधांतरी तरंगत असल्याचे दृश्य निर्मिले होते. प्रल्हाद दत्त व हरबान्ससिंग यांनी प्रभात फिल्म कंपनीचा संत ज्ञानेश्वर  शेजारी  या चित्रपटांतही थक्क करणारी चित्रचमत्कृती साधलेली होती.

संत ज्ञानेश्वर (१९४०) चित्रपटात अंतराळातून ज्ञानेश्वर आणि त्याची भावंडे यांच्यासह भिंत भ्रमण करीत चालली आहे व जमिनीवर स्तिमित झालेला जनसमुदाय त्या भिंतीकडे आश्चर्याने पाहत आहे, हे एकाच दृश्यात दिसते. शेजारी  (१९४१) चित्रपटातील दारूच्या स्फोटाने उडालेली धरणाची दृश्येही अशीच चित्तथरारक आहेत. फाळके यांच्यानंतर चित्रचमत्कृतीचे तंत्र अनेकांनी हाताळले व ही कला पूर्णत्वाला नेली. चित्रचमत्कृती हे एक खास तंत्र असल्यामुळे ते खास तज्ञाकडून करून घेतले जाते.

शिंदे, मा. कृ.