विकृति विज्ञान, उपरूग्ण : ही विकृतिविज्ञानाची विशेष शाखा आहे [⟶ विकृतिविज्ञान]. रोगनिदान करण्याच्या दृष्टीने रोगाच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या किंवा मुद्दाम मिळविलेल्या सर्व पदार्थाच्या (उदा., रक्त, मूत्र, मल, थुंकी, पर्युदर पोकळी व परिफुप्फुस पोकळीतील द्रव, मस्तिष्कमेरूद्रव, अस्थिमज्जा, पू, वीर्य, स्त्री जननेंद्रियातील म्हणजे योनिमार्ग व गर्भाशय ग्रीवेतील म्हणजे गर्भाशयाच्या मानेसारख्या भागातील स्त्राव, तसेच जाठरास, आंत्ररस इ.) प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या तपासण्यांचा या शाखेत समावेश होतो. तपासणीचा अचूक निष्कर्ष काढणे आणि त्याचा रोगाच्या व रोग्याच्या संदर्भात योग्य अनिवार्य लावणे, हा भाग यात विशेष महत्त्वाचा असतो. त्यासाठी निरोग अवस्थेत येणारे एखाद्या तपासणीचे निष्कर्ष व त्यातील बदलांची प्राकृत (सर्वसाधारण) मर्यादा यांची माहिती असणे महत्त्वाचे असते. या शाखेविषयीची ऐतिहासिक माहिती व इतर काही माहिती ‘विकृतिविज्ञान’ या नोंदीत दिलेली आहे.

रोग्याचा वैद्यकीय इतिहास व उपरुग्ण वैद्यकीय तपासणी यांच्या इतक्याच उपरुग्ण विकृतिवैज्ञानिक तपासण्याही रोगनिदानाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. उपरुग्ण वैद्यकीय तपासणीवरून काढलेल्या निष्कर्षांना पुष्टी देण्यासाठी सहसा त्यांचा उपयोग होत असला किंवा केला जात असला, तरी काही वेळा निदाननिश्चितीसाठी फक्त त्यांच्यावरच अवलंबून रहावे लागते. तसेच विकृती सिद्ध करणाऱ्या तपासण्यांइतक्यातच विकृतीचा अभाव सिद्ध करणाऱ्या तपासण्याही महत्त्वाच्या असतात. [⟶ रोगनिदान].

रोग्याच्या प्रकृतीत होत असलेल्या बदलांवरून (सुधारणा किंवा बिघाड) उपचारांची उपयुक्तता ठरविण्यासाठी आणि जरूरीप्रमाणे उपचारांत बदल करण्यासाठी यांतील काही तपासण्या ठराविक कालावधीनंतर वारंवार करण्याची जरूरी पडते. काही ठिकाणी प्रतिबंधक वैद्यकाचा एक भाग म्हणून निरोगी व्यक्तीच्याही अशा तपासण्या ठराविक कालावधीनंतर करून घेतल्या जातात.

पूर्वी आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार रोग्याला तपासणारा वैद्य स्वतःच काही प्राथमिक तपासण्या करीत असे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विकृतिविज्ञान व उपरूग्ण विकृतिविज्ञान या विशेष वैद्यकीय शाखा म्हणून पुढे आल्या. सूक्ष्मदर्शकीय चिकित्सा, सूक्ष्मजीवविज्ञान, रसायनशास्त्र, भौतिकी, कोशिकाविज्ञान (पेशींचे शास्त्र) इ. विज्ञानशाखांतील प्रगतीबरोबर या शाखांचीही प्रगती होत गेली. त्यामुळे या तपासण्या करणारे विशेषज्ञ व तंत्रज्ञ यांची जरूर भासू लागली.

हळूहळू स्वयंचलित, इलेक्ट्रॉनीय व संगणकीय उपकरणे उपलब्ध झाल्यापासून एकाच पदार्थाच्या अनेक प्रकारच्या तपासण्या कमी वेळात व जास्त अचूक करता येऊ लागल्या आहेत. यामुळे प्रत्येक रुग्णाचे जीवरासायनिक चित्र मिळविणेही शक्य झाले आहे.

शरीरातील पदार्थांचे निरनिराळे गुणधर्म तपासण्यात निरनिराळ्या प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. त्यासाठी इतर विज्ञानशाखांतील पद्धतीही वापरल्या जातात. या तपासण्यांच्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.

भौतिक तपासण्या : पदार्थाचे भौतिक गुणधर्म (उदा., रंग, घनता वा विशिष्ट गुरुत्व, वजन, पारदर्शकपणा, प्रवाहीपणा, चिकटपणा इ.) तपासण्यासाठी या तपासण्या केल्या जातात.

रासायनिक व जीवरासायनिक तपासण्या : यांत पदार्थातील निरनिराळ्या घटकांचे अस्तित्व ओळखणे व त्यांचे प्रमाण ठरविणे पदार्थाचे रासायनिक विश्लेषण करून त्यांतील विद्राव्य व अविद्राव्य (विरघळणाऱ्या व न विरघळणाऱ्या) पदार्थाचे, निरनिराळ्या लवणांचे व वायूंचे प्रमाण ठरविणे व निरनिराळे घटक वेगळे करून प्रत्येकाचे रासायनिक गुणधर्म वर्णमापन [⟶ वर्ण व वर्णमापन], ⇨ज्योत प्रकाशमापन न इतर विशिष्ट तपासण्यांच्या साहाय्याने तपासणे या प्रकारच्या तपासण्यांचा समावेश होतो.

चयापचयक्रिया परिक्षणासाठी तपासण्या : चयापचयक्रियेमुळे (शरीरात सतत चालू असणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमुळे) निर्माण होणारे पदार्थ रक्तात मिसळतात किंवा मूत्रावाटे बाहेर टाकले जातात. या पदार्थाचे रक्त किंवा मूत्रातील अस्तित्व ओळखून व मापन करून प्राकृत किंवा अप्राकृत चयापचयक्रियेसंबंधी अनुमाने करता येतात. तसेच चयापचयक्रियांवर नियंत्रण ठेवणाऱ्या ⇨अंतःस्त्रावी ग्रंथीच्या कार्यासंबंधीही अप्रत्यक्ष अनुमाने बांधता येतात. अंतःस्त्रावी ग्रंथींच्या प्रत्यक्ष कार्याचे व निरनिराळ्या अंतःस्त्रावांच्या रक्तातील पातळ्यांचे मापन करणाऱ्या तपासण्याही उपलब्ध आहेत.

सूक्ष्मजंतुवैज्ञानिक तपासण्या : तपासणीसाठी आलेल्या पदार्थात सूक्ष्मजंतूंचा प्रादुर्भाव झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी व झाला असल्यास ते सूक्ष्मजंतू ओळखण्यासाठी पदार्थ तसाच किंवा विशिष्ट पद्धतीने अभिरंजित करून (सूक्ष्म व पारदर्शक रचना दृश्यरूप होण्यासाठी रंजक किंवा रंजकांचे मिक्षण वापरण्याची क्रिया करून) सूक्ष्मदर्शकातून तपासणे, या सूक्ष्मजंतूंचे विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट पोषक माध्यमांवर मुद्दाम संवर्धन (वाढ) करून त्यांचा अभ्यास करणे आणि त्यांच्याविरुद्ध निरनिराळी रासायनिक व प्रतिजैवी (ॲटिबायॉटिक) औषधे [⟶ प्रतिजैव पदार्थ] वापरून उपचारासाठी योग्य प्रभावी औषधे शोधून काढणे (संवर्धन व प्रभावक्षमता तपासणी) इ. तपासण्यांचा यांत समावेश होतो.

सूक्ष्मदर्शकीय चिकित्सा : पदार्थाचे पातळ लेप किंवा ऊतकांचे (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या−पेशींच्या−समूहांचे) छेद, तसेच किंवा विशिष्ट प्रकारे भौतिक किंवा रासायनिक क्रिया करून किंवा विशिष्ट प्रकारे अभिरंजित करून सूक्ष्मदर्शकाखाली तपासण्याच्या व त्यांचा सूक्ष्म अभ्यास करण्याच्या पद्धतीला सूक्ष्मदर्शकीय चिकित्सा म्हणतात. तिचा सूक्ष्मजीववैज्ञानिक, कोशिकावैज्ञानिक व प्रतिपक्षावैज्ञानिक (रोगप्रतिकारक्षमतेविषयीच्या) तपासण्यांतही उपयोग केला जातो [⟶ ऊतकविज्ञान विकृतिविज्ञान].

प्रतिपक्षावैज्ञानिक तपासण्या : प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रियेचा उपयोग करून पदार्थातील विशिष्ट प्रतिजन किंवा प्रतिपिंड ओळखणे व त्यांचे प्रमाण ठरविणे या प्रकारच्या तपासण्यांचा यात समावेश होतो [⟶ प्रतिजन प्रतिपिंड]. प्रतिजन−प्रतिपिंड प्रतिक्रिया अत्यंत विशिष्ट (अनन्यरागी) असल्याने या तपासण्याही त्या त्या प्रतिजन वा प्रतिपिंडासाठी विशिष्ट व अचूक असतात. उदा., रक्तगट ठरविण्यासाठीची तपासणी, आंत्रज्वर (टायफॉइड) निदानासाठीची ‘विडाल परीक्षा’ [⟶ आंत्रज्वर], उपदंशासाठी रक्तरसाची व्हीडीआरएल (व्हेनेरिअल डिसिझेस रिसर्च लॅब्रोरेटरी) परीक्षा ही तपासणी [⟶ उपदंश रक्तसविज्ञान रोगप्रतिकारक्षमता], गर्भधारणा निश्चिती करणारी मूत्रावरील तपासणी [⟶ गर्भारपणा] इत्यादी.

यांशिवाय सूक्ष्मशारीर विकृतिवैज्ञानिक, ऊतकवैज्ञानिक, तसेच कोशिका व ऊतक संवर्धन यांच्याविषयीच्या तपासण्या असून त्या तपासण्यांची काही माहिती ‘विकृतिविज्ञान’ या नोंदित दिली आहे. येथे शरीरातील निरनिराळ्या पदार्थावर प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या तपासण्यांसंबंधीची थोडक्यात माहिती पुढे दिली आहे.


रक्ताच्या तपासण्या : प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या तपासण्यांत रक्ताच्या तपासण्या महत्त्वाच्या आहेत. त्यांमध्ये रक्ताची सर्वसाधारण तपासणी, विशिष्ट विकारांसाठी केल्या जाणाऱ्या तपासण्या, अनेक प्रकारच्या जीवरासायनिक तपासण्या, महत्त्वाच्या विशिष्ट अवयवांची कार्यक्षमता मोजणाऱ्या तपासण्या व प्रतिजन−प्रतिपिंड प्रतिक्रियेवर आधारलेल्या तपासण्या यांचा समावेश होतो. रक्त तपासणीसाठी रक्तातील कोशिकीय भाग, रक्तद्रव (रक्तक्लथन होऊ−गोठू−न−देता कोशिकीय भाग तळाशी साचू दिल्यास वर उरणारा द्रव) व रक्तरस (रक्तक्लथनात रक्तातील कोशिकीय भाग व रक्तक्लथनासाठी आवश्यक प्रथिनांची गुठळी झाल्यावर उरणारा द्रव) उपलब्ध असतात. रक्ताचा एक थेंब तपासणीसाठी घेऊन त्याचे संपूर्ण कोशिकीय व जीवरासायनिक विश्लेषण करणारी इलेक्ट्रॉनीय व संगणकीय उपकरणे उपलब्ध आहेत.

रक्ताची सर्वसाधारण तपासणी : भौतिक तपासण्यांमध्ये रक्ताचा रंग, रक्तद्रव व रक्तरसाचा रंग आणि क्लथन होऊ न देता रक्त स्थिर ठेवल्यास त्यातील कोशिकीय भाग तळाशी साचण्याचा दर (गती) या महत्त्वाच्या तपासण्या आहेत. रक्तातील रक्तरूणाच्या (हीमोग्लेबिनाच्या) प्रमाणानुसार रक्त अधिक लाल दिसते. रक्तद्रव व रक्तरस काविळीमध्ये पिवळे दिसतात व रक्तविलयन (तांबड्या रक्तकोशिकांचा नाश होऊन हीमोग्लेबिन मुक्त होण्याची क्रिया) झाले असल्यास ते किरमिजी किंवा तपकिरी रंगाचे दिसतात. अनेक प्रकारच्या मुख्यतः चिरकारी (दीर्बकालीन,जुनाट) रोगांत रक्तकोशिका साचण्याचा दर वाढलेला आढळतो.

तांबड्या कोशिकांचा अभ्यास : तांबड्या कोशिकांची संख्या, आकार, आकारमान, त्यांच्या आकारमानाचे रक्ताच्या एकूण आकारमानाशी प्रमाण आणि त्यांतील हीमोग्लोबिनाचे प्रमाण वगरे प्रकारची मोजणी मुख्यतः पांडुरोग व त्याचे प्रकार यांच्या निदानासाठी उपयुक्त असते. पांडुरोगाच्या निदानासाठी रक्ताच्या इतर काही तपासण्या व अस्थिमज्जा, मल इ. इतर तपासण्यांचीही आवश्यकता असते. [⟶ पांडुरोग रक्त रक्तारुण].

श्वेतकोशिकांचा अभ्यास : श्वेतकोशिकांची संख्या व त्यांच्या निरनिराळ्या फ्रकारांची टक्केवारी मोजणे ही तपासणी अनेक प्रकारच्या रोगांच्या निदानासाठी उपयुक्त असते. ⇨आंत्रज्वर, काही व्हायरसांची संक्रामणे, हिवतापासारखी परोपजीवीची संक्रामणे, काही विषारी द्रव्ये व औषधांमुळे झालेली अस्थिमज्जेची अकार्यक्षमता आणि काही प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगांत ⇨श्वेतकोशिकान्यूनता आढळते. ⇨श्वेतकोशिकाधिक्य बहुधा निरनिराळ्या सूक्ष्मजंतुजन्य संक्रामणांत आढळते. तसेच तीव्र संक्रामणे, चिरकारी (उदा., क्षय), व्हायरस व आंत्रज्वराची संक्रामणे व ॲलर्जी इत्यादींमध्ये अनुक्रमे बहुरूपकेंद्रकी कणकोशिका, लसीका कोशिका व अरूणकर्षी कणकोशिका या विशिष्ट श्वेतकोशिकांची संख्यावाढ झालेली आढळते. ही संख्यावाढ एकूण श्वेतकोशिकांच्या संख्यावाढीबरोबर किंवा त्याशिवाय झालेली आढळते. रक्ताच्या कर्करोगांत विशिष्ट प्रकारच्या श्वेतकोशिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आढळते आणि या श्वेतकोशिका अप्राकृत व अविकसित असतात. रक्ताच्या कर्करोगाचा प्रकार, तीव्रता आणि फलानुमान ठरविण्यासाठी रक्ततपासणीबरोबरच अस्थिमज्जा व इतर तपासण्याही आवश्यक असतात. [⟶ रक्त].

रक्तक्लथनासाठीच्या तपासण्या : रक्तक्लथनासाठी आवश्यक सर्व १३ घटकांचे [⟶ रक्तक्लथन] प्रमाण ठरविणाऱ्या तपासण्या उपलब्ध आहेत परंतु सर्वसाधारणपणे रक्तातील बिंबाणूंची [⟶ रक्त] मोजणी, रक्तस्त्राव थांबण्याचा आणि रक्तक्लथनाचा कालावधी, रक्ताची गाठ आकसण्याचा प्रत्याकर्षण कालावधी या साध्या तपासण्या पुरेशा असतात. यांशिवाय आवश्यकतेनुसार प्रोथाँवीन कालावधी, थाँबोप्लॅस्टीन कालावधी, थ्राँबोप्लॅस्टीनजनन तपासणी, प्रोथाँबीन व्यय कालावधी, केशवाहिनी अवरोध तपासणी, रक्तातील तंत्वीजनाची पातळी इ. गुंतागुंतीच्या तपासण्याही केल्या जातात. [⟶ रक्तक्लथन].

कोष्टक क्र. १ सर्वसाधारण रक्ततपासणीच्या पद्धती व प्राकृत मूल्ये

 

पद्धती

प्राकृत मूल्ये

हीमोग्लोबिन 

 

पुरुष 

१२ ते १७ ग्रॅ./१०० मिलि. 

स्त्री

११ ते १५ ग्रॅ/१०० मिलि. 

रक्तकोशिका मोजणी  

 

पुरुष 

४५,००,००० ते ५५,००,०००/मिमी. 

स्त्री 

४०,००,००० ते ५०,००,०००/मिमी. 

हीमॅटोक्रिट  

 

पुरुष 

४६ घनफळ % 

स्त्री 

४२ घनफळ % 

अवसादन त्वरा (विनट्रॉब पद्धत)  

 

पुरुष 

१ तासात ४ ते ९ मिमी 

स्त्री 

१ तासात ४ ते २० मिमी. 

वर्णांक 

०.९ ते १.१ 

एकूण श्वेतकोशिका मोजणी

४,५०० ते ११,०००/मिमी. 

भेददर्शी श्वेतकोशिका मोजणी  

 

कणकोशिका-उदासीनरंजी (बहुरूपकेंद्रकी)

५० ते ७०% (२,००० ते ७,०००/मिमी.

−अरुणकर्षी

१ ते ४% (५० ते ४००/मिमी.

−क्षारकरंजी

०.२५ ते ०.५% (१५ ते ५०/मिमी.

लसीका कोशिका

२५ ते ३३% (१,२०० ते ३,०००/मिमी.३) 

एककेंद्रक कोशिका

२ ते ६% (१०० ते ६००/मिमी.)

 [हीमॅटोक्रिट-तांबड्या कोशिकांच्या घनफळाचे रक्ताच्या एकूण घनफळाशी असणारे गुणोत्तर अवसादन त्वरा−क्लथन होऊ नये म्हणून सोडियम वा पोटॅशियम सायट्रेटाशी प्रक्रिया केलेल्या रक्ताच्या स्तंभामध्ये तांबड्या कोशिका खाली तळाशी बसवण्याची गती वर्णोक-ठराविक घनफळाच्या रक्तातील हीमोग्लोबिनाची राशी व तांबड्याकौशिकांची संख्या यांचे गुणोत्तर दर्शविणारा अंक (व्यक्तिगत कोशिकांतीलहीमोग्लोबिनाच्या प्रमाणाची प्राकृतता मोजण्याचे हे माप आहे) बहुरूपकेंद्रकी उदासीनरंजी कणकोशिका-बदलत्या आकाराचे खंडयुक्त केंद्रकअसलेली व जीवद्रव्यात उदासीन रंजकांनी अभिरंजित होणारे कण असणारीश्वेतकोशिका अरुणकर्षी कणकोशिका−इओसीन या अम्ल रंजकाने सहज अभिरंजित होणारे कण असलेली श्वेतकोशिका क्षारकरंजी कणकोशिका−क्षारक रंजकाने अभिरंजित होणारे कण असणारी श्वेतकोशिका एककेंद्रक कोशिकामोठी भक्षी श्वेतकोशिका (अंधुक अरुणकर्षी कणमयात असलेले क्षारकरंजी कोशिकाद्रव्य हिच्यात असते)].

तांबड्या कोशिकांची मंगुरता तपासणी : अवतानिक लवणद्रावामध्ये (०.४५%) तांबड्या कोशिकांचे काही प्रमाणात (अंदाजे ३०%) रक्तविलयन होते. रक्तविलयन पांडुरोगारासारख्या काही रोगांत याच लवणद्रावामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त तांबड्या कोशिकांचे रक्तिविलयन होते.

रक्ताच्या सर्वसाधारण तपासणीचे प्राकृत निष्कर्ष कोष्टक क्र. १ मध्ये दिले आहेत. 


रक्ताच्या रासायनिक (जीवरासायनिक) तपासण्या : रक्तातील ग्लुकोजाचे प्रमाण : रक्तात अनेक प्रकारची कार्बोहायड्रेटे असतात परंतु त्यांतील ग्लुकोजाचे प्रमाण सर्वांत महत्त्वाचे आहे.

इन्शुलीन अंतःस्त्रावाचे प्रमाण वाढणे, इन्शुलीन-आधिक्य (शरीरात जादा इन्शुलीन असणे यामुळे रक्तशर्करायुक्त उद्‌भवते), अवअवटुता (अवटू ग्रंथीची अपुरी क्रियाशीलता यामुळे चयापचयाची तीव्रता त्वरा कमी होते व एकूण जोम कमी होतो), पोष ग्रंथिन्यूनता (पोष ग्रंथीमार्फत वृद्धि-हॉर्मोनांची अपुरी निर्मिती), यकृताचे काही रोग, अधिवृक्क ग्रंथीचा नाश व जादा उपासमार यांमध्ये रक्तातील ग्लुकोजाचे प्रमाण कमी झालेले आढळते. याउलट अतिअवटुता (अवटू ग्रंथीची जादा क्रियाशीलता यामुळे चयापचय त्वरा, हृदयाची गती, रक्तदाब वाढतो व अवटू ग्रंथी मोठी होते), पोष ग्रंथि-आधिक्य (पोष ग्रंथीमार्फत जादा प्रमाणात वृद्धि-हॉर्मोन निर्माण होणे), गर्भधारणेचा कालावधी व मुख्यतः ⇨मधुमेह यांमध्ये ते वाढलेले आढळते.

मधुमेहाच्या निदानासाठी व त्याची तीव्रता समजण्यासाठी आणि रक्तातील ग्लुकोजाचे प्रमाण वाढण्याला कारणीभूत मधुमेह व इतर रोग यांच्या व्यवच्छेदक निदानासाठी ग्लुकोज सहन करण्याची क्षमता वा सह्यता तपासली जाते. ही तपासणी करण्याचे अनेक प्रकार आहेत परंतु सर्वसाधारणपणे ग्लुकोजाची ठराविक मात्रा तोंडावाटे देऊन त्यानंतर ठराविक कालावधीनंतर घेतलेल्या रक्ताच्या नमुण्यातील ग्लुकोजाचे प्रमाण ठरविणे, त्याचा आलेख काढणे व त्यावरून अनुमाने काढणे या प्रकारे ही तपासणी केली जाते. [⟶ मधुमेह].

रक्तातील प्रथिनेतर नायट्रोजनाचे प्रमाण : चयापचय प्रक्रियेतील टाकाऊ पदार्थांच्या स्वरूपात प्रथिनेतर नायट्रोजन रक्तात आढळतो. यात यूरिया व यूरिक अम्ल या पदार्थांचा समावेश होतो. हे पदार्थ नंतर वृक्कांमार्फत (मूत्रपिंडांमार्फत) शरीराबाहेर टाकले जातात. वृक्काच्या रोगांत (अकार्यक्षमतेमुळे) हे पदार्थ रक्तात जास्त प्रमाणात साचतात. त्यामुळे या पदार्थांच्या रक्तातील प्रमाणाच्या मापनावरून वृक्कांची कार्यक्षमता समजते (याविषयी माहिती पुढे आली आहे). तसेच चयापचय प्रक्रियेतील वाढ, मोठ्या प्रमाणात ऊतकनाश होणारे रोग (उदा., कर्करोग, विषबाध, उपासमार, गर्भिणी विषबाधा म्हणजे विशेषतः तीव्र आकडी व बेशुद्धी ही लक्षणे असणारी गर्भारपणातील विषरक्तता) व आहारात मांसाचे प्रमाण खूप जास्त असल्यास या प्रकारच्या पदार्थांचे रक्तातील प्रमाण खूप वाढलेले आढळते. तसेच ⇨गाऊट या रोगात रक्तातील यूरिक अम्लाचे प्रमाण वाढलेले असते व ते सांध्यात साठल्याने सांध्यांना सूज येते.

रक्तातील प्रथिने : रक्तप्रथिनांत मुख्यतः अल्ब्युमीन व ग्लोब्युलीन (प्रतिपिंडे व इतर अनेक प्रकार), एंझाइमे आणि काही अंतःस्त्रावांचा समावेश होतो. रक्तप्रथिनांच्या सर्वसाधारण तपासणीत वरीलपैकी अल्ब्युमीन व ग्लोब्युलीन आणि त्यांचे एकमेकांशी प्रमाण महत्त्वाचे आहे. रक्तप्रथिनांचा मुख्य उपयोग ऊतकवृद्धी व रक्त ऊतकातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी होतो. रक्तप्रथिनांच्या कमतरतेमुळे रक्ताची पाणी धारण करण्याची क्षमता कमी होते व परिणामी ऊतकांना सूज येते. पोषण, चयापचय व ऊत्सर्जनाशी संबंधित अवयवांच्या (उदा., पचन तंत्र, यकृत, अग्निपिंड, वृक्क) अनेक रोगांत रक्तप्रथिनांच्या प्रमाणात बदल होत असल्याने अशा रोगांत रक्तप्रथिनांचा अभ्यास महत्त्वाचा असतो. ⇨विद्युत संचारणाच्या (संधारणाच्या संपर्कातील विद्युत् अग्रांना विद्युत् चालक प्रेरणा लावली असता तिच्यामुळे द्रायुतील वा ⇨जेलमधील निलंबित कणांच्या होणाऱ्या हालचालीच्या) तंत्राने रक्तप्रथिनांची रेणुभार व आकारमानानुसार पाच गटांत (γ, β, α1, α2 -ग्लोब्युलिने व अल्ब्युमिने) विभागणी करून त्यांचा अभ्यास करता येतो. जीवशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाच्या प्रथिनांच्या अभ्यासासाठी प्रतिरक्षा विद्युत् संचारण (विद्युत् संचारणाद्वारे प्रथिने अलग होऊन मग विशिष्ट प्रतिरक्षात्मक विक्रियांनी अवक्षेप−साका−निर्माण होऊन तो ओळखणे) हे नवीन तंत्र विकसित झाले आहे.

रक्तप्रथिनांत अनेक प्रकारच्या एंझाइमांचा समावेश होतो. निरनिराळ्या अवयवांच्या रोगांत विशिष्ट एंझाइमाच्या प्रमाणात फरक पडत असल्याने विशिष्ट एंझाइमाच्या रक्तातील प्रमाणावरून त्या त्या अवयवांच्या रोगांचे निदान करता येते. [उदा., अग्निपिंडशोथ (अग्निपिंडाची दाहयुक्त सूज), गालगुंड, अति-अवटुता, पर्युदरशोथ इत्यादींच्या निदानासाठी रक्तातील अमायलेज व लायपेज यांचे प्रमाण अवरोधक यकृत रोग, अतिपरावटुता, मुडदूस, अस्थिकर्करोग इत्यादींच्या निदानासाठी अल्कधर्मी फॉस्फोटेजाचे प्रमाण अष्ठीला ग्रंथीच्या कर्करोगाच्या निदानासाठी अम्लधर्मी फॉस्फोटेजाचे प्रमाण हृदयस्नायू, यकृत इ. ऊतकांचा नाश करणाऱ्या रोगांत (उदा., हृदयकोथ, व्हायरस संक्रामणजन्य यकृतकोथ, यकृतसूत्रण इ.) SGOT व SGPT इत्यादींचे प्रमाण ठरविणे रोगनिदान व रोगाची तीव्रता समजण्यासाठी उपयुक्त असते].

रक्तातील विद्युत् विच्छेद्य पदार्थ व विद्राव्य वायूंचे विश्लेषण : (द्रवात विरघळविले असता वा वितळविले असता ज्या पदार्थांतून विद्युत् प्रवाह वाहू शकतो अशा पदार्थाना विद्युत् विच्छेद्य पदार्थ असे म्हणतात). रक्ताचे ⇨पीएच मूल्य कायम राखणे (अम्लीय−क्षारकीय संतुलन), कोशिकीय श्वसन, पाणी व विद्युत विच्छेद्य पदार्थाचे संतुलन, चयापचय क्रिया व रक्तक्लथन क्रियेतील सहभाग इत्यादींसाठी अनेक विद्युत् विच्छेद्य पदार्थ आणि विद्राव्य स्वरूपात अनेक वायू (ऑक्सिजन, कार्बन डाय-ऑक्साइड इ.) रक्तात असतात. वरील प्रक्रियांमधील संभाव्य बिघाड आणि विशिष्ट रोगजन्य परिस्थितींच्या निदानासाठी व उपचारांसाठी त्यांचे रक्तातील प्रमाण ठरविणे व वारंवार विश्लेषण करणे आवश्यक असते.

रक्तातील लिपिडे : (वसाद्रर्व्ये). अन्नपचनानंतर रक्तात शोषिली गेलेली आणि शरीरात तयार झालेली लिपिडे [अन्नातील प्रमुख घटक असलेल्या नैसर्गिक रीत्या आढळणाऱ्या कार्बनी संयुगांचा गट ⟶ लिपिडे] रक्तात आढळतात. पोषण, काही अंतःस्त्रावांची निर्मिती, कोशिकापटल व इतर कोशिकीय सूक्ष्मरचनांची निर्मिती यांच्याशी त्यांचा संबंध असतो. त्यामुळे या प्रक्रियांशी संबंधित विकारांत त्यांची रक्तातील पातळी मोजणे आवश्यक असते. तसेच विकारांत त्यांची रक्तातील पातळी मोजणे आवश्यक असते. तसेच रोहिणीकाठिण्य (रोहिणीच्या भित्ती असाधारण जाड व कठीण होऊन तिचा लवचिकपणा कमी होणे) व उच्च रक्तदाबात कोलेस्टेरॉल या लिपिडाची पातळी वाढत असल्याने ती या रोगांत मोजणे आवश्यक असते.[⟶ रक्त].


इतर जीवरासायनिक तपासण्या : यकृत कार्यक्षमतामापन तपासण्या : शरीर पोषणासाठी आवश्यक असलेल्या अनेक द्रव्यांची निर्मिती व योग्य वाटप, काही अन्नपदार्थाची साठवण व विषारी पदार्थाचे (बाह्य व चयापचय प्रक्रियेत निर्माण झालेले) निर्विषीकरण करणे ही महत्त्वाची कार्ये यकृतात होतात. त्यामुळे यकृताची कार्यक्षमता अजमावणे महत्त्वाचे ठरते. यकृताची निरनिराळी कार्ये अजमावण्यासाठी निरनिराळ्या तपासण्या उपलब्ध आहेत (उदा., रक्तप्रथिने, रक्तशर्करा, रक्तातील लिपिडे, रक्तातील एंझाइमे, मलतपासणी, प्रोथ्राँबीन इ.). तसेच यकृताचे रोग, यकृतबाह्य यकृतवाहिन्यांतील अडथळे व रक्तविलयक रोगांत कावीळ आढळत असल्याने तिच्या कारणांच्या व तीव्रतेच्या निदानासाठी रक्तरसातील ⇨पित्तारुणाचे (बिलीरुबिनाचे) प्रत्यक्ष-संयुग्मित व अप्रत्यक्ष-असंयुग्मित प्रमाण तपासले जाते. पित्तारूणाचे अप्रत्यक्ष प्रमाण वाढल्यास रक्तविलयक रोग व प्रत्यक्ष प्रमाण वाढल्यास पित्तवाहिन्यांतील अडथळ्याचे निदान होते [⟶ पित्तारुण]. रक्तरसातील काही विशिष्ट एंझाइमांची वाढ यकृतकोशिकांचा रोग व नाश सुचविते. रक्तरसातील अल्कधर्मी फॉस्फोटेज या एंझाइमाची वाढ पित्तवाहिन्यांतील अडथळे सुचविते. [⟶ यकृत].

वृक्क कार्यक्षमतामापन तपासण्या : यांची माहिती पुढे दिली आहे.

इतर तपासण्या : रक्तातील लोहाचे प्रमाण (हीमोग्लोबिनाच्या स्वरूपात), जीवनसत्त्वांचे प्रमाण व अंतःस्त्रावांचे प्रमाण तपासणे अनुक्रमे पांडुरोग, जीवनसत्त्व न्यूनताजन्य रोग व अंतःस्त्रावी ग्रंथींचे रोग यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. अंतःस्त्रावांचे प्रमाण तपासण्यासाठी किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या द्रव्याने युक्त) प्रतिरक्षा आमापन या तंत्राचा उपयोग केला जातो. किरणोत्सर्गी प्रतिरक्षा आमापन या तपासणीत रक्तातील विशिष्ट पदार्थांचे रक्तातील अस्तित्व व प्रमाण ठरविण्यासाठी त्या पदार्थाविरुद्ध (प्रतिजन) प्राण्यांच्या शरीरात तयार केलेल्या प्रतिपिंडांचा वापर केला जातो. ही प्रतिपिंडे नंतर रासायनिक विक्रियांतील किंवा जैव प्रक्रियांतील व त्यांचे अस्तित्व ओळखण्यासाठी किरणोत्सर्गी समस्थानिकांनी (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असणाऱ्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांनी) युक्त केली जातात व त्याची तपासणीसाठी घेतलेल्या रक्तरसाशी प्रतिक्रिया घडविली जाते. त्या पदार्थाची प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रिया अतिविशिष्ट असल्याने व किरणोत्सर्गी समस्थानिकांच्या अस्तित्वामुळे त्या प्रतिक्रियेची तीव्रता मोजणे शक्य होते. ह्यावरून रक्तातील मूळ पदार्थाचे (प्रतिजनाचे) प्रमाण अचूकपणे ठरविता येते. याप्रकारे रक्तातील अनेक हॉर्मोनांचे व इतरही अनेक पदार्थांचे (काही औषधे, जीवनसत्त्वे, रक्तरस, यकृतशोथाशी संबंधित प्रतिजन, कर्करोगाशी संबंधित काही प्रथिने) अस्तित्व व प्रमाण ठरविता येते.

रक्तरसाच्या प्रतिजन−प्रतिपिंड प्रतिक्रियेवर आधारित तपासण्या : रोगजनक सूक्ष्मजीव, परकीय ऊतके, तसेच अन्नमार्ग, श्वसनमार्ग, त्वचा, रक्त इत्यादींवाटे शरीरात शिरणारे इतर पदार्थ इ. बाह्य परकीय पदार्थांचा (प्रतिजन) शरीरात प्रवेश झाल्यास त्यांचा नाश करण्यासाठी किंवा त्यांना निष्प्रभ (अक्रिय) करण्यासाठी शरीराकडून प्रतिपिंड निर्मिती केली जाते. ही प्रतिपिंडे त्या प्रतिजनासाठी अतिविशिष्ट असतात व प्रतिजनाचा प्रकार, मात्रा, प्रतिजन शरीरात पुनःपुन्हा शिरण्याची शक्यता व शरीराची प्रतिपिंडनिर्मितिक्षमता यांवर त्यांचे रक्तातील प्रमाण अवलंबून असते. त्यामुळे विशिष्ट प्रतिपिंडाचे रक्तातील अस्तित्व व प्रमाण यांवरून त्या आधी विशिष्ट प्रतिजनाच्या शरीरातील प्रवेशाचे व त्यावरून विशिष्ट रोगांचे निदान करता येते [⟶ रोग-प्रतिकारक्षमता]. याप्रमाणे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोगनिदानास उपयुक्त प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रियेवर आधारीत अनेक प्रकारच्या रक्तरसाच्या तपासण्या उपलब्ध आहेत. प्रतिपिंडाच्या प्रकाराप्रमाणे किंवा तपासणीच्या तंत्रावरून त्या ओळखल्या जातात. उदा., (१) कोशिकांचे समूहन(द्रवात निलंबित असलेल्या कोशिका एकत्रित होण्याची क्रिया) करणाऱ्या तपासण्या ब्रुसेलोसिस, आंत्रज्वर, परांत्रज्वर, रिकेट्‌सियाची संक्रामणे इ. रोगांच्या निदानासाठी केल्या जातात. (२) अवक्षेपक प्रतिपिंड (विशिष्ट प्रतिजनाबरोबर अविद्राव्य−न विरघळणारा−साका बनविणाऱ्या प्रतिपिंडावर आधारीत अशा) तपासण्या उपदंश रक्तप्रथिने, रक्ताच्या डागांचे निदान(न्यायवैद्यक) यांसाठी केल्या जातात. (३) पूरक पदार्थबंधन तपासण्या : उपदंश, कवकांची (बुरशीसारख्या हरितद्रव्यहीन सूक्ष्म वनस्पतींची) संक्रामणे इ.साठी तपासण्या केल्या जातात.(रक्तरसातील वैशिष्ट्यपूर्ण प्रथिनांचा गट म्हणजे पूरक पदार्थ होत ही प्रथिने विशिष्ट प्रतिपिंडाच्या बरोबरीने सूक्ष्मजंतू, कवके, परक्या रक्तकोशिका इ. विशिष्ट प्रतिजनांचा नाश घडवून आणतात या विशिष्ट रक्तसवैज्ञानिक प्रतिक्रियेत पूरक पदार्थ प्रतिजन-प्रतिपिंड संयोगाशी बद्ध होतो. अशा रीतीने पूरक पदार्थ बद्ध झाला आहे की नाही ते दर्शक घालून पूरक पदार्थबंधन तपासणीत पाहिले जाते). (४) अनुस्फुरीत प्रतिपिंड तपासण्या : (याविषयीची माहिती पुढे दिली आहे). उपदंश, अवटुशोथ, वृक्कशोथ, क्षयाचे सूक्ष्मजंतू, त्वचारोग इ. साठी तपासण्या केल्या जातात [⟶ रक्तरस विज्ञान]. किरणोर्त्सर्गी प्रतिरक्षा आमापन रक्तगट तपासण्यांची काही माहिती पुढे दिलेली आहे.

रक्तगट तपासण्या व प्रत्यक्ष रक्त अनुरूपता निश्चिती : A, B, AB व O हे प्रमुख रक्तगट व इतर गौण रक्तगटांपैकी मुख्यतः Rh घटक ओळखण्यासाठीही प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रियेचा उपयोग केला जातो. वरील प्रत्येक रक्तगटासाठी विशिष्ट प्रतिपिंडे तपासणीसाठी मिळवलेल्या रक्तात मिसळल्यावर ज्या गटाच्या तांबड्या कोशिका असतील त्यानुसार त्या प्रतिपिंडाशी त्यांची प्रतिक्रिया होऊन समूहन होते (A, B व Rh कोशिकांविरुद्ध प्रतिपिंडे उपलब्ध असतात). इतर प्रतिपिंड द्रव्यांशी प्रतिक्रिया होत नाही. यावरून त्या रक्ताचा गट ठरवला जातो.

एका व्यक्तीचे रक्त दुसऱ्या व्यक्तीस देताना फक्त रक्तगट जुळणे पुरेसे नसते. देणाऱ्याचे व घेणाऱ्याचे रक्त प्रत्यक्ष जुळते का (रक्त अनुरूपतानिश्चिती) हे पाहणेही आवश्यक असते. महत्त्वाच्या प्रत्यक्ष-अनुरूपतानिश्चिती तपासणीत देणाऱ्याच्या तांबड्या कोशिका व घेणाऱ्याचा रक्तरस एकमेकांत मिसळून समूहन होत नाही, हे पाहिले जाते. दुय्यम अप्रत्यक्ष-अनुरूपतानिश्चिती तपासणीत देणाऱ्याच्या रक्तरसात घेणाऱ्याच्या तांबड्या रक्तकोशिका मिसळल्या जातात. अनुरूपतानिश्चिती तपासणीत रक्त प्रत्यक्ष जुळल्यासच ते रोग्याला देणे सुरक्षित असते. [⟶ रक्तगट].

प्रतिरक्षा अनुस्फुरण : या प्रकारच्या तपासण्यात रोग्याच्या रक्ताच्या पातळ लेपाच्या किंवा ऊतकांच्या छेदाचा अनुस्फुरित (अन्य उद्‌गमाकडून आलेले प्रारण−तरंगरूपी ऊर्जा−शोषून घेताना विद्युत् चुंबकीय प्रारण उत्सर्जित करण्याचा गुणधर्म असलेल्या) द्रव्याने प्रभारित (खुणेसाठी अंतर्भूत) केलेल्या प्रतिपिंड द्रव्याशी संयोग घडवून दिला जातो व नंतर त्या छेदाचा सूक्ष्मदर्शकीय अभ्यास केला जातो. अनुस्फुरित द्रव्यामुळे प्रतिजन-प्रतिपिंड प्रतिक्रियेची तीव्रता समजण्यास मदत होते.या प्रकारच्या तपासण्यांचा मुख्यतः स्वयंप्रतिकारक्षमता जन्य (जीवाने निर्माण केलेली जी प्रतिपिंडे त्याच जीवाच्या रेणूंवर, कोशिकांवर अथवा ऊतकांवर हल्ला करतात त्या प्रतिपिंडांमुळे उद्‌भवणाऱ्या) रोगांच्या निदानासाठी उपयोग होतो. [⟶ रोगप्रतिकार-क्षमता].


मूत्र तपासणी : शरीरातील चयापचय प्रक्रियेत निर्माण होणारे टाकाऊ विद्राव्य पदार्थ आणि काही विषारी व निरुपयोगी रासायनिक पदार्थ मूत्रावाटे बाहेर टाकले जातात.तसेच मूत्रनिर्मितीच्या प्रक्रियेत वा प्रक्रियेमुळे शरीरातील पाणी-लवण संतुलन व अम्ल-क्षारक (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या पदार्थाला क्षारक म्हणतात) संतुलन राखले जाते. त्यामुळे मूत्रपरीक्षेवरून अनेक प्रकारची उपयुक्त माहिती रोगनिदान व रोगाच्या पुढील प्रगताचे अनुमान काढण्यासाठी उपलब्ध होते. मूत्र सहज, शरीरांतर्गत हस्तक्षेप न करता आणि वारंवार तपासणीसाठी उपलब्ध होऊ शकते. मूत्राच्या सर्वसाधारण, विशेष व आवश्यकतेनुसार इतर तपासण्या करता येतात.

कोष्टक क्र. २. सर्वसाधारण मूत्र तपासणीच्या पद्धती व प्राकृत मूल्ये 

पद्धती 

प्राकृत मूल्ये 

भौतिकीय वैशिष्ट्ये  

 

घनफळ  

रंग 

पारदर्शकता 

वास 

विशिष्ट गुरूत्व 

दिवसाला १,००० ते १,४०० मिलि.

अंबराप्रमाणे पिवळसर उदी

स्वच्छ

मूत्राचा वैशिष्ट्यपूर्ण वास

१.००३ ते १.०२४ 

सर्वसाधारण रासायनिक वैशिष्ट्ये  

 

पीएच मूल्य 

प्रथिन 

शर्करा 

ॲसिटोन 

पित्त (पित्तलवणे व पित्तरंजक)  

४.५ ते ७.५

दिवसाला ० ते ०.५मिग्रॅ

नसते

नसते

नसते 

सूक्ष्मदर्शकीय तपासणी  

 

कोशिका 

रक्तकोशिका 

श्वेतकोशिका 

उपकला कोशिका 

निर्मोक (साचे) 

 

स्फटिक 

सूक्ष्मदर्शकाच्या उच्चवर्धित क्षेत्रात

० ते २

० ते ५

बदलणारे प्रमाण

नसतात, क्वचित थोडे काचाभसाचे आढळतात.

 बदलणारे प्रमाण

सर्वसाधारण तपासणी : यामध्ये भौतिक, सर्वसाधारण रासायनिक व सूक्ष्मदर्शकीय तपासण्यांचा समावेश होतो.या तपासण्यांचे प्राकृत निष्कर्ष कोष्टक क्र.२. मधे दिले आहेत. रोगजन्य परिस्थितीत त्यांमध्ये बदल होतात.

भौतिक तपासण्या : यांत दिवसभरातील मूत्राचे एकूण परिमाण (आकारमान) महत्त्वाचे असते. मधुमेहाच्या दोन्ही प्रकारांत (मधुमेह व बहूमूत्रमेह यांमध्ये), काही औषधांमुळे, जास्त पाणी पिण्याने व मानसिक चिंतेमुळे अतिमूत्रता (जास्त प्रमाणात मूत्र तयार होणे) होते. जास्त घाम येणे (उष्ण वातावरण, ताप यांमुळे), उलट्या व जुलाबामुळे निर्जलीभवन झाल्यास किंवा चिरकारी वृक्कशोथ व हृदनिष्फलता किंवा हृदय अकार्यक्षमतेमुळे अल्पमूत्रता होते. वरील कारणे तीव्र असल्यास किंवा अतिरक्तस्त्राव व तीव्र वेदनेमुळे रक्तदाब कमी झाल्यास असूत्रता (मूत्र तयार न होणे) होते. अशा वेळी रोग्याच्या जिवाला धोका निर्माण झालेला असतो.

मूत्रमार्गातील रक्तस्त्राव, कावीळ, काही औषधे व काही अन्नपदार्थामुळे मूत्राचा रंग बदलतो. मूत्रात रक्त, पू, मोठ्या प्रमाणात सुक्ष्मजंतू किंवा स्फटिक असल्यास मूत्र धुरकट दिसते. काही अन्नपदार्थ (उदा., शतावरी), मूत्रामार्गातील संक्रामणे (अमोनियासारख्या किंवा घाण वास) व अनियंत्रित मधुमेहात (ॲसिटोनामुळे फळासारखा गोडसर वास) मूत्राचा वास बदलतो. मूत्राचे विशिष्ट गुरूत्व दिवसभरात प्राकृत मर्यादेत सतत बदलते असते. मधुमेह, ताप, निर्जलीभवन व तीव्र वृक्कशोथात ते मर्यादेबाहेर वाढते तर अतिमूत्रतेत ते कमी होते. वृक्काच्या तीव्र रोगांत ते एकाच पातळीत स्थिर राहते.

सर्वसाधारण रासायनिक तपासण्या : सर्वसाधारण मूत्र सौम्य अम्लधर्मी किंवा उदासीन असते. ताप किंवा मधुमेहात ते तीव्र अम्लधर्मी होते, तर बायकार्बोनेटसारख्या औषधांच्या उपयोगाने, फलहारामुळे व काही संक्रमणांत ते अल्कधर्मी बनते.

प्राकृत मूत्र प्रथिने, शर्करा, ॲसिटोन व पित्तरंजकविरहित असते. या चार पदार्थांचे मूत्रातील अस्तित्त्व व प्रमाण तपासणाऱ्या तपासण्या त्यामुळे महत्त्वाच्या आहेत : (१) स्नायूंचा अतिरिक्त उपयोग, हृद्निष्फलता, अतिथंड हवामान व गर्भधारणेमुळे उद्‌भवणाऱ्या गर्भिणी विषबाधा, प्रसूतिपूर्व गर्भिणी विषबाधा (गर्भारपणाच्या अखेरच्या काळातील आणि अचानक रक्तदाब वाढणे, वजनातील जादा वाढ, तीव्र डोकेदुखी, झटके इ. लक्षणे असणारी विषाक्त परिस्थिती) यांसारख्या विशिष्ट रोगांत मूत्रात अल्ब्युमीन हे प्रथिन सापडते. वृक्काच्या काही रोगांत मूत्रात मोठ्या प्रमाणात (दिवसाला २० ग्रॅ.) प्रथिन आढळते व त्यात अल्ब्युमिनाबरोबर ग्लोब्युलिनेही आढळतात. तसेच मूत्रमार्गात रक्तस्त्राव झाल्यासही दोन्ही प्रथिने आढळतात. (२) रक्तातील शर्करेच्या प्रमाणातील वाढ मूत्रात प्रतिबिंबित होत असल्याने अतिरिक व्यायाम, मानसिक तणाव, अति-अवटुता, शर्करेचे अतिरिक्त सेवन व मुख्यतः मधुमेहात मूत्रात शर्करा आढळता पण ती लॅक्टोज असण्याचीही शक्यता असते. (३) अनियंत्रित मधुमेह, उपासमार, ईथरयुक्त भूल, तीव्र ताप व पचन तंत्रातील काही तीव्र बिघाडांमुळे होणाऱ्या मेदांच्या अपाकृत चयापचयामुळे मूत्रात ॲसिटोन व तत्सम पदार्थ आढळतात. (४) यकृतकोशिकानाश किंवा पित्तवाहिनीरोधामुळे होणाऱ्या काविळीत मूत्रात पित्तरंजक हे रंगद्रव्य सापडते परंतु वाहिनी-अंतर्गत रक्तविलमनामुळे होणाऱ्या काविळात हे मूत्रात आढळत नाही.

सूक्ष्मदर्शकीय तपासण्या : (१) मूत्रमार्गातील शोथ (दाहयुक्त सूज), अर्बुद (कोशिकांची अत्याधिक वाढ होऊन बनलेली व शरीरास निरुपयोगी अशी गाठ), खडा किंवा वृक्कशोथामुळे मूत्रमार्गात रक्तस्त्राव झाल्यास मूत्रात तांबड्या कोशिका आढळतात. मूत्रमार्गातील संक्रमणांत श्वेतकोशिकांचे प्रमाण वाढलेले आढळते. तसेच सूक्ष्मजंतूही आढळतात. त्यासाठी सूक्ष्मजंतुवैज्ञानिक तपासण्या केल्या जातात. अनेक कारणांमुळे मूत्रातील बाह्य कला कोशिकांचे प्रमाण वाढलेले आढळते. वृक्कांच्या सूक्ष्म नलिकांत तयार होणाऱ्या दंडगोलाकृती प्रथिनयुक्त रचनांना निर्मोक अथवा साचे म्हणतात व ते मूत्रात आढळतात. नलिकांच्या तीव्र रोगांत कणमय साचे किंवा नलिका क्षेप आढळतात. तसेच रक्तमय आणि पूयुक्त साचेही आढळतात. काचाभ साचे प्राकृत मूत्रातही क्वचित आढळतात. मूत्र जास्त तीव्र झाल्यास किंवा त्यातून बाहेर टाकल्या जाणाऱ्या काही लवणांचे प्रमाण वाढल्यास मूत्रात त्या लवणांचे सूक्ष्म स्फटिक (किंवा खर) आढळतात व ते साचून त्या त्या लवणांचे (उदा., कॅल्शियम ऑक्झॅलेट व यूरिक अम्ल) खडे बनू शकतात.


विशेष तपासण्या : काही विशिष्ट रोगांच्या निदानासाठी नेहमीच्या वरील मूत्र तपासण्यांव्यतिरिक्त विशेष तपासण्या केल्या जातात.

(अ) वृक्क कार्यक्षमतामापना तपासण्या : (१) अनेक प्रकारच्या वृक्कनाशात नाशाची तीव्रता समाजण्यासाठी ॲडीजची मोजणी (१२ तासांच्या मूत्र नमुण्यातील तांबड्या व श्वेत रक्तकोशिका, प्रथिन व साच्यांची मोजणी) केली जाते. (२) गाढता व विरलता तपासण्या : विशिष्ट (कृत्रिम) तणावाच्या परिस्थातीत वृक्कांची मूत्र गाढ किंवा विरल करण्याची क्षमता व मूत्राची ⇨तर्षण संहती तपासणे या वृक्क कार्यक्षमतेतील सूक्ष्म घट तपासणाऱ्या संवेदनशील तपासण्या आहेत. (एरवी वृक्कनाश मोठ्या प्रमाणात झाल्याखेरीज लक्षात येत नाही, कारण वृक्कांची रखीव कार्यक्षमता जरूरीपेक्षा चौपट असते). (३) फिनोसल्फोनॅप्थॅलीन तपासणी : फिनोसल्फोनॅप्थॅलीन (फिनॉल रेड) हे रंगद्रव्य नीलबाटे रक्तात टोचल्यावर ते मूत्रावाटे बाहेर टाकण्याचे प्रमाण वृक्क कार्यक्षमता कमी झाल्यास प्राकृत मर्यादेपलीकडे घटते. (४) निष्कासन तपासण्या : रक्तात प्राकृतावस्थेत वा नेहमी आढळणारे काही घटक वा टाकाऊ पदार्थ (उदा, युरिया व क्रिॲटिनीन) मूत्रावाटे बाहेर टाकण्याचा प्रमाणावरूनही वृक्कांची उत्सर्जन कार्यक्षमता आजमावता येते. या पदार्थांचे रक्तातील प्रमाण व मूत्रातील प्रमाण यांचे गुणोत्तर म्हणजे रक्तातून तो पदार्थ काढून रक्त शुद्ध (त्या पदार्थापुरते) करण्याची वृक्कांची क्षमता होय.

(आ) इतर रासायनिक द्रव्यांचे प्रमाण : अनेक विशिष्ट रोगांच्या निदानासाठी मूत्रातील कृष्णरंजक, प्रच्छन्न रक्त (केवळ उपरुग्ण पद्धतींमुळे उघड न होऊ शकणारे म्हणजे सूक्ष्म प्रमाणात असलेले व बदललेल्या स्वरूपातील गुन्हा वा छुपे रक्त), बेन्स-जोन्झ प्रथिने (बहु-अस्थिमज्जार्बुद व इतर अस्थिरोगांच्या स्थितीत रक्तरसात व मूत्रात आढळणारे ग्लोब्युलीन किंवा ग्लोब्युलिनांचा गट), कॅल्शियम, ॲमिलेज व इतर एंझाइमे, निरनिराळी विषे व औषधे इत्यादींचे प्रमाण तपासले जाते. तसेच मूतखड्यातील द्रव्यांचे रासायनिक विश्लेषण करणेही काही वेळा आवश्यक असते.

इतर तपासण्या : (१) गर्भधारणा निदान : यासाठी मूत्रातील जरायु-जनन ग्रंथिपोषक अंतःस्त्रावाचे अस्तित्त्व तपासण्यासाठी अनेक प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. त्या सोप्या, जास्त अचूक, कमी वेळात करता येणाऱ्या व गर्भधारणा निदान लवकर (पातळीपासून पाच आठवड्यानंतर) करणाऱ्या असतात. तसेच मूत्रातील जरायु-जनन ग्रंथिपोषक या हॉर्मोनाचे प्रमाण तपासल्यास हा अंतःस्त्राव जास्त प्रमाणात निर्माण करणाऱ्या जरायूच्या रोगांचे निदान करता येते. [⟶ जरायु वार−२].

(२) हॉर्मोनचे मापन : अंतःस्त्रावी ग्रंथीच्या काही रोगांच्या निदानासाठी मूत्रावाटे उत्सर्जित होणारी पोषजन्य जनन ग्रंथिपोषकासारखी काही हार्मोने, काही अधिवृक्कबाह्यकजन्य अंतःस्त्राव (स्टेरॉइडे), स्त्रीमदजन व गर्भरक्षक संबंधित अंतःस्त्राव व काही कॅटेचल अमाइने (एपिनेफ्रीन, नॉरएपिनेफ्रीन व डोपामीन यांसारखी हॉर्मोनाचे वा मज्जाप्रेषकाचे कार्य करणारी द्रव्ये) यांचे मूत्रातील प्रमाण ठरविणाऱ्या तपासण्या उपलब्ध आहेत.

(३) सूक्ष्मजंतुवैज्ञानिक तपासण्या : मूत्रमार्गातील संक्रामणे व त्यांना कारणीभूत सूक्ष्मजंतूंच्या अभ्यासासाठी या तपासण्या केल्या जातात. त्यासाठी मूत्राचे केंद्रोत्सारण (केंद्रपासून दूर लोटण्याची क्रिया) करून खाली राहिलेल्या गाळाच्या सूक्ष्मदर्शकीय व सूक्ष्मजंतू संवर्धन व संवेदनक्षमता व इतर तपासण्या केल्या जातात. [⟶ मूत्र].

मल तपासणी : मलामध्ये सर्वसाधारणपणे न पचलेले किंवा अर्धवट पचलेले अन्न, सूक्ष्मजंतू, पचन तंत्रातील स्त्रावांचे अंश व काही श्वेतकोशिका असतात. मल तपासणीचा उपयोग पचन तंत्र व त्याच्याशी संबंधित यकृत व अगिनपिंडाच्या (स्वादुपिंडाच्या) काही रोगांच्या निदानासाठी होतो. मलाच्या भौतिक, रासायनिक आणि सूक्ष्मदर्शकीय तपासण्या करण्यात येतात.

भौतिक तपासण्या : सर्वसाधारण मल घट्ट पण असतो. मलातील पाण्याच्या प्रमाणानुसार मलाची घनता बदलते. ⇨मलावरोधात तो जास्त घट्ट व खड्यांप्रमाणे बनतो, तर जुलाबांच्या तीव्रतेनुसार तो जास्त पातळ बनतो. मलातील वायूच्या प्रमाणनुसार तो बुडबुड्यांनी युक्त किंवा फेसाळ असू शकतो. मलाच्या नेहमीच्या रंगाव्यतिरिक्त रोगाच्या प्रकारानुसार मल हिरवट, काळसर, गडद तपकिरी लालसर व पांढरट रंगाचा असू शकतो. मलाचा वास काही प्रमाणात बदलता असतो परंतु काही रोगांत तो दुर्गंधीयुक्त असतो. मल सहसा अम्लधर्मी असतो. रासायनिक तपासणीत प्रामुख्याने गुह्य रक्ताचे अस्तित्व शोधणारी तपासणी महत्त्वाची असते. सूक्ष्मदर्शकीय तपासणीत रक्तकोशिका (तांबड्या व श्वेत), पूय कोशिका, अर्बुद कोशिका, सूक्ष्मजंतू, कवके, जंत व त्यांची अंडी, सूक्ष्म आदिजीव व त्यांच्या पुटी, श्लेष्म (बुळबुळीत द्रव्य) व न पचलेले अन्नकण आढळतात. या तपासणीत आढळणाऱ्या विशिष्ट गोष्टींवरून त्या त्या रोगाचे निदान करता येते.

पचनमार्गात व्रणयुक्त रोग (शोथ, व्रण, मारक अर्बुदे इ.) असल्यास मल तपासणीत रक्त आढळते. बदललेल्या स्वरूपातील काळपट रक्त (काळपट तपकिरी मल) पचनमार्गाच्या सुरुवातीच्या भागातील (जठर व लहान आतडे) रक्तस्त्राव सूचित करते व खालच्या भागात (मोठे आतडे) रक्तस्त्राव झाल्यास मलात लाल रक्त व रक्तकोशिका आढळतात. लहान आतडे, अग्निपिंड व यकृताच्या रोगांत न पचलेले अन्न (मुख्यतः मेद) जास्त प्रमाणात (२५ टक्क्यांपेक्षा जास्त) आढळते न मल पांढरट, जास्त घनफळाचा, तेलकट व दुर्गधीयुक्त असतो.

प्राकृत मलात नेहमीच मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजंतू आढळतात परंतु आंत्रज्वर, जठर-आंत्रदाह, पटकी, जंतुजन्य जुलाब इ. रोगांत ते ते विशिष्ट सूक्ष्मजंतू आढळतात. या सूक्ष्मजंतूंसाठी इतरही सूक्ष्मजंतुशास्त्रीय तपासण्या करता येतात. तसेच अशा वेळी मल जास्त द्रवरूप, फेसाळ, हिरवट किंवा पांढरट (पटकी) व दुर्गंधीयुक्त असू शकतो. [⟶ मलोत्सर्ग].

थुंकीची तपासणी : थुंकीची भौतिक (आकारमान, वास, रंग इ.) व सूक्ष्मदर्शकीय तपासणी केली जाते.

फुप्फुसांच्या सूक्ष्मजंतुजन्य संक्रामणांत थुंकी अपारदर्शक, पूयकोशिकांच्या अस्तित्वामुळे व सूक्ष्मजंतूंच्या प्रकारांप्रमाणे पिवळसर किंवा हिरवट आणि तंत्वी व श्लेष्मामुळे घट्ट व चिकट असते. काही वेळा तीत रक्ताचा अंशही आढळतो. मृत कोशिकांमुळे व सूक्ष्मजंतूंच्या प्रकारप्रमाणे तिला घाण वास येतो. श्वासनलिकाविस्फारासारख्या (श्वासनलिकेची चिरकारी दाहयुक्त वा ऱ्हसित स्थिती यामुळे ती विस्फारलेली असते व तिच्या भित्तीचा लवचिकपणा कमी/नाहीसा झालेला असतो) रोगात थुंकीचे प्रमाण खूप जास्त असते.

चिरकारी हृद्‌निष्कलतेत थुंकी गंजाच्या काळपट लाल रंगाची असते, कारण तीत हीमोसिडेरीन (हीमोग्लोबिनाचे स्वरूप बदलून बनलेले रंगद्रव्य) भक्षण केलेल्या असंख्य महाभक्षी कोशिका आढळतात.

हृद्निष्फलता, फुप्फुस कर्करोग, फुप्फुसाची रक्तस्त्रावी संक्रामणे व मुख्यतः  क्षयामध्ये रक्त असलेली थुंकी आढळते.

थुंकीच्या सूक्ष्मदर्शकीय तपासणीसाठी थुंकीचा पातळ थर काचपट्टीवर पसरवून, वाळवून, निरनिराळ्या प्रकारच्या कोशिका व सूक्ष्मजंतूंसाठी निरनिराळ्या प्रकारे अभिरंजित करून सूक्ष्मदर्शकाखाली तपासतात. सर्वसाधारणपणे कोशिकांसाठी ‘लिशमन’ (रक्तकोशिकांचे अभिरंजन करण्यासाठी मिथिलीन ब्ल्यू व इओसीन यांचे मिश्रण वापरणारी सर विल्यम बोग लिशमन यांच्या नावावरून पडलेले नाव) व सूक्ष्मजंतूंसाठी ‘ग्रॅम’ अभिरंजनक्रिया वापरतात. (सूक्ष्मजंतूंचे भेददर्शी अभिरंजन करण्याची पद्धती या पद्धतीने ग्रॅम विद्रावाची म्हणजे आयोडीन व पोटॅशियम आयोडाइड यांच्या पाण्यातील विद्रावाची प्रक्रिया जेनशियन व्हायोलेटच्या अभिरंजनानंतर करतात व त्यामुळे सूक्ष्मजंतूंच्या काही जाती रंगीत व काही रंगहीन होतात हान्स ख्रिश्चन ग्रॅम यांच्या नावावरून पडलेले नाव). क्षय जंतूंसाठी विशेष ‘त्सीलनेल्सन’ अभिरंजनक्रिया (विशेषतः क्षयाचे जंतू ओळखण्यासाठी ही वापरतात फ्रांट्‌स त्सील व फ्रीड्रिख नेल्सन यांच्यावरून पडलेले नाव) वापरतात [⟶ सूक्ष्मजीव अभिरंजन]. या तपासणीत तांबड्या कोशिका, निरनिराळ्या श्वेतकोशिका (मुख्यतः पूय कोशिका, मृत कणकोशिका व अरुणकर्षी कणकोशिका), उपकलाकोशिका [⟶ कोशिका], कर्ककोशिका, लवचिक तंतू, तंत्वी, श्लेष्म, निरनिराळे सूक्ष्मजंतू व कवके आढळू शकतात. कर्ककोशिकांचे अस्तित्व शोधण्यासाठी विशेष ‘पापानिकोलाऊ’ अभिरंजन तंत्र वापरतात. विशेषकरून गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग प्रारंभीच्या स्थितीत ओळखण्यासाठी हे तंत्र वापरतात. अपपर्णित (गळून पडलेल्या) कोशिकांचे अभिरंजन करण्यासाठी हे खास प्रकारचे तंत्र वापरतात. यामुळे रोगग्रस्त कोशिकावेगळ्या दाखविल्या जातात. (जॉर्ज पापनिकोलाऊ यांच्या नावावरून या तंत्राचे नाव आले आहे).

सूक्ष्मजंतूंच्या अधिक अभ्यासासाठी ते पोषक माध्यमांवर वाढवून (संवर्धन करून) त्यांचा अभ्यास व त्यांविरूद्ध प्रभावी औषधे शोधणे म्हणजे जंतुसंवर्धन व संवेदनक्षमता या तपासण्या करता येतात.


अपपर्णित कोशिकाविज्ञान : निरनिराळ्या अवयवांच्या पृष्ठभागांवरून काही कोशिका शेजारील शरीरांतर्गत पोकळ्यांत नेहमी आपोआप वा सहज गळून पडत असतात म्हणजे अपपर्णित होत असतात. पोकळ्यांतून मिळालेल्या द्रायूंची वा द्रवाची सूक्ष्मदर्शकीय तपासणी केल्यास या अपपर्णित कोशिकांचा अभ्यास करता येतो. त्यावरून त्या त्या अवयवासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते. शरीरातील जवळजवळ सर्व पोकळ्यांतील (उदा., पर्युदर पोकळी, परिफुप्फुस पोकळी, परिहृदय पोकळी, संधिसंपुट, मस्तिष्कमेरूद्रव, योनिमार्ग गर्भाशय पोकळी) द्रायू व इतर द्रव (उदा., थुंकी, वीर्य इ.) याप्रमाणे तपासता येतात. शरीरांतर्गत ढवळाढवळ कमीत कमी करून हे द्रायू वारंवार मिळवणे जीवोतक परीक्षेपेक्षा तुलनेने सोपे असल्याने या तपासण्या चाळणी तपासण्या म्हणून समूहांसाठी करणे (मुख्यतः कर्करोगाच्या आधीच्या अवस्थेत पूर्व निदानासाठी) शक्य असते. (उदा., ४० वर्षावरील सर्व स्त्रियांच्या गर्भाशयग्रीवा स्त्रावाची गर्भाशयग्रीवा कर्करोगाच्या लवकर निदानासाठी दर वर्षी तपासणी करणे).

या तपासण्यांची निदानीय अचूकता जीवोतक परीक्षेपेक्षा कमी असली, तरी समूहातील संशयास्पद व्यक्ती बाजूला काढून त्यांच्या जास्त कसून सूक्ष्म तपासण्या करणे या तपासण्यांमुळे शक्य होते.

शरीरातील द्रायूंची तपासणी : शरीरातील निरनिराळ्या ठिकाणच्या द्रायूंची तपासणी त्या त्या ठिकाणी असलेल्या अवयवांच्या किंवा तंत्राच्या रोगांच्या निदानासाठी केली जाते. याप्रमाणे मस्तिष्कमेरूद्रव, पर्युदर द्रव, परिफुप्फुस द्रव, परिहृदय द्रव, संधिद्रव इ. निरनिराळ्या पोकळ्यांतील द्रव व जाठररस, आंत्ररस, पित्तरस इ. पाचक रसांची तपासणी केली जाते. या द्रायूंच्या जरूरीप्रमाणे भौतिक, रासायनिक वा जीवरासायनिक, सूक्ष्मदर्शकीय, सुक्ष्मजंतुशास्त्रीय व कोशिकीय तपासण्या केल्या जातात.

वीर्य तपासणी : वंधत्वाच्या तपासण्यांमध्ये पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे शोधण्यासाठी केल्या जाणाऱ्या  तपासण्यांत ही महत्त्वाची तपासणी आहे. वीर्याच्या भौतिक, रासयनिक आणि सूक्ष्मदर्शकीय तपासण्या केल्या जातात. [⟶ वंध्यत्व].

पहा : जीवोतक परीक्षा मूत्र रक्त रक्तरसविज्ञान रोग रोगनिदान विकृतिविज्ञान वैद्यकीय प्रतिमादर्शन.

संदर्भ : 1. Bhende, Y. M. Deodhar, S. G. General Pathology, 2 Parts, Bombay. 1966.

            2. Dey, M. C. Dey, T. F. A Textbook of Pathology, Calcutta, 1931.

           3. DeGowin, E. L. DeGowin, R. L. Beside Diagnostic Examination, New York, 1969.

           4. Feinstein, A. R. Clinical Judgement, Baltimore, 1967.

           5. Macleod, M., Ed. Clinical Examination, Edinburgh, 1983.

           6. Robbins, S. L. and others, Pathologic Basis of Disease, Philadelphia, 1984.

           7.  Swash, M. Mason, S. Hutchinson’s Clinical Methods, Eastbourne, 1984.

           8. Todd, J. C. Sanford, A. H. (Ed. by Davidsonn, I. Henry, J. B.) Clinical Diagnosis by Laboratory Methods, Pltiladelphia, 1969.

प्रभुणे, रा. प. कुलकर्णी, श्यामकांत