कूपर, विल्यम-२ : (? १६६६–? १७०९). इंग्‍लिश शस्त्रवैद्य व शरीररचनाशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म हँपशर परगण्यातील पीटर्सफील्ड येथे झाला. १६८२ मध्ये ते त्या काळी अस्तित्वात असलेल्या ‘नापित-शस्त्रवैद्य’ संस्थेत प्रविष्ट झाले. त्यांनी १६९४ मध्ये स्‍नायूंचे वर्णन करणारे पुस्तक प्रसिद्ध केले. १६९८ मध्ये मानवी शरीररचनाशास्त्रावर त्यांनी एक ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यात पूर्वी प्रसिद्ध झालेल्या बिल्डू यांच्या पुस्तकातील चित्रे त्यांनी परवानगीवाचून छापल्यामुळे त्यांच्यावर फार टीका झाली. या ग्रंथात त्यांनी अनेक अवयवांचे वर्णन मात्र चांगले केलेले आहे. १६९९ मध्ये त्यांनी पुरुषाच्या मूत्रमार्गातील विशिष्ट ग्रंथींचे वर्णन केले. या ग्रंथी जरी पूर्वी माहीत होत्या, तरी त्यांचे सूक्ष्म वर्णन कूपर यांनीच प्रथम केले म्हणून त्या ग्रंथींना ‘कूपर ग्रंथी’ असे नाव पडले. या ग्रंथी म्हणजे स्त्रियांच्या योनिमार्गाजवळील ग्रंथींच्या समधर्मीय असतात. मूलरोहिणीच्या एका विशिष्ट विकारात त्या रोहिणीच्या उगमापाशी असलेली कपाटे (झडपा) नीट मिटत नाहीत, या गोष्टीचे त्यांनी प्रथम वर्णन केले. टॉमसन यांच्या ओरँग उटान  या पुस्तकातील चित्रे व स्‍नायूवरील प्रकरण कूपर यांचे आहे (१६९९).

मायोटोमीया रेफॉर्माटा (१६९४) व ॲनॉटमी ऑफ ह्यूमन बॉडीज (१६९८) हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध होते. १६९६ मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून  निवड झाली.         

  ढमढेरे, वा. रा.