गुरुवार : आठवड्यातील पाचवा वार. या दिवसाच्या पहिल्या होऱ्याचा अधिपती गुरू असतो म्हणून याला गुरुवार हे नाव पडले आहे. यालाच बृहस्पतिवार असेही म्हणतात. हिंदू हा वार दत्ताचा मानतात. गुरुवारी दत्तभक्त दत्ताचे दर्शन घेऊन उपवास करतात. पद्मपुराणातील व्रतांमध्ये गुरुवार-व्रताचा उल्लेख आहे. कुंडलीत गुरू अनिष्ट असेल तर गुरुवारी जप, दानादी कृत्ये करतात. शुभकार्याला व नवीन मंत्र घेण्यासाठी गुरुवार चांगला मानतात. एखाद्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असला, तर त्या योगाला गुरुपुष्ययोग म्हणतात. या दिवशी सोने खरेदी करण्याची पद्धत आहे. मुसलमानही गुरुवार शुभ मानतात व गुरुवारी जन्मलेले मूल (जुमान राती सय्यद) भाग्यवान समजतात. नॉर्वेजियन पुराणातील गुरुसदृश देवता थॉर हिच्यावरून या दिवसाला (थॉर्सडे) थर्सडे असे इंग्रजी नाव पडले. गुड फ्रायडेच्या आधीचा गुरूवार माँडी किंवा होली (पवित्र) गुरुवार असतो. त्याचा प्रभुभोजनाशी (ख्रिस्ताच्या ‘लास्ट सपर’शी ) संबंध आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये नोव्हेंबरातील चौथा गुरुवार हा सार्वत्रिक आभारप्रदर्शनाचा दिवस असतो. ६ फेब्रुवारी १८५१ या गुरुवारी ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया वसाहतीत मोठी आग लागली म्हणून तेथे हा काळा गुरुवार समजतात.

ठाकूर, अ. ना.