बूरहाव्हे, हेरमान : (३१ डिसेंबर १६६८-२३ सप्टेंबर १७३८). डच वैद्य, वनस्पतिशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ. वैद्यकीय शिक्षणात विद्यार्थ्यांना रोग्याजवळ नेऊन रुग्णशय्येसन्निध प्रात्यक्षिकासहित शिक्षण देणारे त्यांच्या काळातील ते पहिले प्राध्यापक होते.

बूरहाव्हे यांचा जन्म व्होरहाऊट (नेदर्लंड्‌स) येथे झाला. शालांत परीक्षेनंतर त्यांनी लायडन विद्यापीठात धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांच्या अभ्यासात १६८४ मध्ये सुरुवात केली व १६९० मध्ये तत्त्वज्ञानाची पदवी मिळवली. धर्मशास्त्राचा अभ्यास चालू असतानाच त्यांचे लक्ष वैद्यकाकडे वळले होते.१६९३ मध्ये हार्डरव्हाइक ॲकॅडेमीची वैद्यकीय पदवी त्यांनी मिळवली.१७०१ मध्ये लायडन विद्यापीठात त्यांची वैद्यकाचे व्याख्याते म्हणून नेमणूक झाली. त्याशिवाय ते खाजगी वैद्यकीय शिक्षकाचेही काम करीत व परदेशी विद्यार्थ्यांच्या आग्रहावरून त्यांनी रसायनशास्त्र शिकवण्यास प्रारंभ केला होता. लायडन विद्यापीठातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारल्यानंतर त्यांना ग्रोनिंगेन विद्यापीठाचे प्राध्यापकपदाचे आमंत्रण आले होते पण ते त्यांनी नाकारले.

इ.स.१७०९ मध्ये लायडन विद्यापीठात वैद्यक व वनस्पतिशास्त्र विभागाच्या अध्यासनावर त्यांची नेमणूक झाली. वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक असताना विद्यापीठाच्या शास्त्रीय उद्यानातील वनस्पतींची सूची त्यांनी १७१० मध्ये व तिची सुधारलेली आवृत्ती १७२० मध्ये प्रसिद्ध केली. या सूचीत वनस्पतींच्या ५,८४६ जातींची नोंद केलेली होती.१७१४ मध्ये (व पुढे १७३० मध्ये पुन्हा) विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून त्यांची नेमणूक झाली.१७१८ मध्ये रसायनशास्त्र हा विषयही त्यांच्याकडे सोपविण्यात आला. लायडन विद्यापीठाच्या वैद्यक शाखेच्या एकूण पाचपैकी तीन विषयांचे (वैद्यक, वनस्पतिशास्त्र व रसायनशास्त्र) प्राध्यापकपद त्यांनी भूषविले होते.

बूरहाव्हे यांची वैद्यकावरील व्याख्याने एवढी उत्तम असत की, त्यांवर आधारित अशी काही पाठ्य पुस्तकेच तयार झाली. त्यांचे अनेक नावाजलेले शिष्य यूरोपभर पसरले होते.

एक महान वैद्य म्हणून त्यांची ख्याती चीनपर्यंत गेली होती. अनेक राजेरजवाडे त्यांचा वैद्यकीय सल्ला घेत व त्या काळात २० लक्ष फ्लॉरिन इतकी संपत्ती त्यांनी मिळविली होती. त्यांनी लिहिलेले Instutitiones (१७०८) आणि Aphorismi (१७०९) हे दोन ग्रंथ अतिशयप्रभावी ठरले होते व त्यांची अरबीसहित अनेक भाषांतून भाषांतरे झाली होती. १७३२ मध्ये त्यांनी Elementa Chemiae नावाचे रसायनशास्त्राचे पाठयपुस्तक प्रसिद्ध केले. त्याचीही इंग्रजी व फ्रेंच भाषांतून भाषांतरे झाली व काही दशके हा ग्रंथ या विषयाचा अधिकारयुक्त आधारग्रंथ म्हणून नावाजलेला होता.

वैद्यकीय शिक्षणात रुग्णशय्येजवळ प्रात्यक्षिकासहित शिकवण्याची जुनी हिपॉक्राटीझ (इ.स.पू.४६०-३७०) या प्रसिद्ध ग्रीक वैद्यांची पद्धत त्यांनी पुन्हा उपयोगात आणली. १७२४ मध्ये ग्रसिकेचे (घशापासून जठरापर्यंतच्या अन्ननलिकेचे) विदारण (फुटणे) झालेल्या एका रुग्णाच्या विकृतीचे उत्तम वर्णन त्यांनी केले होते. १२७८मध्ये हृद्विस्तारणाची विकृती (हृदयाचे आकारमान नेहमीपेक्षा जादा वाढणारी विकृती) त्यांनी वर्णिली होती. परिफुप्फुसशोथात (फुप्फुसावरील स्त्रावोत्पादक पातळ पटलमय आवरणाला दाहयुक्त सूज येणाऱ्या विकारात) विकृतिस्थान परिफुप्फुसच असते, हे दाखवून देणारे ते पहिले वैद्य होते. देवीचा फेलाव फक्त प्रत्यक्ष संपर्कातून होतो,हे त्यांनीच सिद्ध केले होते. आपल्या व्यवसायात ते फॅरेनहाइट तापक्रम [⟶ तापमापन] दर्शविणारा तापमापक वापरीत व ही पद्धत त्यांच्या काही शिष्यांनीही पुढे चालू ठेवली होती आणि आजही ती काही प्रमाणात प्रचलित आहे.

 

पॅरिस येथील रॉयल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे (१७२८) व लंडनच्या रॉयल सोसायटीचे (१७३०) ते सदस्य होते. ते लायडन येथे मृत्यू पावले.

भालेराव, य. त्र्यं.