डेकॅपोडा–१ : मॉलस्का मृदुकाय प्राण्यांच्या संघाच्या सेफॅलोपोडा या वर्गातील डायब्रँकिएटा उपवर्गातील एक गण. या प्राण्यांच्या मुखाभोवती दहा बाहूंचे वलय असते म्हणून हे नाव पडले आहे. या दहा बाहूंपैकी दोन सडपातळ व इतर बाहूंपेक्षा बरेच लांब असून त्यांची टोके मुद्‌गलासारखी असतात. यांना संस्पर्शक-बाहू म्हणतात. बाहूंवर चूषक असून त्यांच्या कडा शृंगी असतात व त्यांना आखूड देठ असतात. संस्पर्शक-बाहूंच्या जाड टोकांवर चूषक असतात. भक्ष्य पकडण्याकरिता चूषकांचा उपयोग होतो. कवच आंतरिक (त्वचेच्या आत) असते. क्लोम (कल्ले) आणि वृक्क (मूत्रपिंडे) प्रत्येकी दोन असतात. हृदयात दोन अलिंद (अशुद्ध रक्ताचे कप्पे) असतात. वाहिनी असलेला एक मसी-कोष (ग्रद तपकिरी रंगद्रव्य असलेली ग्रंथी) असतो. माखली, लोलिगो, आर्किट्युथिस, स्पायरूला इ. या गणाची उदाहरणे होत. या गणात लुप्त बेलेम्नाइटांचा समावेश होतो.

या गणातल्या अगदी लहान प्राण्याची–इडिओसीपिअस पिग्मिअस–लांबी २५ मिमी. पेक्षाही कमी असते व सगळ्यांत मोठ्या प्राण्याची–आर्किट्युथिस  याची–१८ मी. असते. आर्किट्युथिस हा सगळ्या अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांत मोठा आहे.

या गणातील प्राण्यांचा-विशेषतः माखली आणि लोलिगो यांचा-जगातील बहुतेक देशांतले लोक अन्न म्हणून उपयोग करतात. माखलीच्या कवचाचा दातवण व सौंदर्यप्रसाधने तयार करण्याच्या कामी उपयोग होतो. या प्राण्यांच्या शरीरातील मसी-कोषात साठविलेल्या शाईपासून चित्रकारांना उपयोगी पडणारा सीपिया रंग तयार करतात.

 पहा : बेलेम्नाइट माखली लोलिगो सेफॅलोपोडा स्पायरूला.

कर्वे, ज. नी.