गिल्बर्ट, विल्यम : [२४ मे १५४४—३० नोव्हेंबर (१० डिसेंबर ?) १६०३]. इंग्लिश भौतिकीविज्ञ व वैद्य. विद्युत्‌ शास्त्र व चुंबकत्व यांसंबंधी महत्त्वाचे कार्य. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीतील प्रसिद्ध शास्त्रज्ञ. त्यांचा जन्म कोलचेस्टर येथे झाला. केंब्रिज येथील सेंट जॉन कॉलेजातून १५६० साली पदवीधर झाल्यानंतर तेथेच ते फेलो होते. १५६९ मध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळविली व त्यानंतर लंडनमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यांची १५९९ साली रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स या संस्थेच्या अध्यक्षपदावर व १६०१ मध्ये एलिझाबेथ राणीचे वैद्य म्हणून नेमणूक झाली.  De Magnete या १६०० साली लिहिलेल्या आपल्या ग्रंथात गिल्बर्ट यांनी पृथ्वी ही स्वतःच एक चुंबक आहे, असे प्रतिपादन केले. विद्युत्‌ आकर्षण व चुंबकीय आकर्षण यांतील फरक त्यांनी दाखवून दिला. घर्षणजन्य विद्युतासंबंधी त्यांनी केलेल्या प्रयोगांच्या आधारे त्यांनी घन पदार्थांचे विद्युत्‌ (उदा., अंबर, काच) व अविद्युत्‌ (उदा., धातू) असे दोन वर्गांत वर्गीकरण केले. पृथ्वी व चंद्र यांतील आकर्षणाची प्रेरणा व वस्तुमान यांसंबंधीच्या त्यांच्या विचारांचा गुरुत्वाकर्षण सिद्धांतावरच्या विकासावर बराच परिणाम झाला. कोपर्निकस यांच्या सिद्धांताचा गिल्बर्ट यांनीच इंग्लंडमध्ये प्रथमतः पुरस्कार केला. सर्वच स्थिर तारे पृथ्वीपासून सारख्या अंतरावर नाहीत, असे अनुमान त्यांनी काढले होते. विश्वस्थितिशास्त्रासंबंधीचे त्यांचे विचार पुढे १६५१ साली प्रसिद्ध करण्यात आले. ते लंडन (की कोलचेस्टर?) येथे मृत्यु पावले. भदे, व. ग.