नखे : ज्या पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणाऱ्या) प्राण्यांच्या हातापायांना बोटे असतात त्या प्राण्यांच्या बोटांची टोके केराटिनीकृत (तंतुमय प्रथिनांनी युक्त), कठीण अध्यावरणीय (त्वचेच्या) संरचनांनी मजबूत झालेली असतात. या संरचना नखर (नख्या), नखे अथवा खूर या स्वरूपाच्या असतात. उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारे) प्राणी मात्र याला अपवाद आहेत. उभयचरांमध्ये जरी खरे नखर नसले, तरी त्यांच्या हातापायांच्या बोटांच्या टोकांवर बाह्यत्वचेच्या शृंगी (शिंगाच्या द्रव्याच्या) स्तराचे स्थूलन (जाड झालेला भाग) असते. ही स्थूलने पृष्ठवंशी श्रेणीमध्ये पुढे उत्पन्न होणाऱ्या नखरांची सूचक होत, असे मानावयास हरकत नाही. आफ्रिकेतील झेनोपस भेक व जपानी सॅलॅमँडर ऑनिकॉडॅक्टिल या उभयचरांत ही बाह्यत्वचेची स्थूलने काही बोटांवर प्रत्यक्ष नखरांचे रूप धारण करतात.

आ. १. बोटाचे टोक : (१) नख, (२) चंद्रक, (३) अधिनख-नखाच्या बुडावर पुढे आलेले.

सरीसृप (सरपटणारे प्राणी) व पक्षी या दोन्ही वर्गांतील प्राण्यांच्या बोटांवर फक्त नखर असतात पण स्तनिवर्गात नखर असून त्यांच्या भरीला खूर आणि नखेदेखील असतात. नखर हे सरीसृपांकडून वारसा म्हणून सस्तन प्राण्याकडे आलेले आहेत आणि ह्या प्राण्यांनी आवश्यकतेप्रमाणे त्यांचे परिवर्तन करून खूर व नखे उत्पन्न केली आहेत. यामुळे सस्तन प्राण्यांत नखर, खूर आणि नखे असे तिन्ही प्रकार आढळतात (खूर व नखर यांची माहिती ‘खूर आणि नखर’ या स्वतंत्र नोंदीत दिलेली आहे.)

स्तनिवर्गांत माणूस व नरवानर (प्रायमेट्स) गणातील इतर प्राणी यांना नखे असतात. ती बोटांच्या संवेदी उपवर्हाला (उशी सारख्या भागाला, पॅडला) मजबुती आणून त्याचे संरक्षण करतात. नख चापट पट्टिकेसारखे असून त्याने बोटाच्या टोकाचे वरचे पृष्ठ झाकलेले असते. ते एके ठिकाणी घट्ट बांधलेल्या अतिशय शृंगित (केराटिनीभवन झालेल्या) उपकला-कोशिकांचे (त्वचेच्या वरच्या भागात असलेल्या कोशिकांचे—पेशींचे) बनलेले असते. या कोशिका मूळ मालपीगी कोशिकांपासून (एम्. मालपीगी या इटालियन शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या कोशिकांपासून) उत्पन्न झालेल्या असल्या, तरी निर्जीव झालेल्या असतात. नखपट्टिकेच्या समीपस्थ (जवळच्या टोकाशी नखाचे मूळ असून ते आधारद्रव्याच्या जाड थराचे बनलेले असते. या आधारद्रव्यापासून नखाची एकसारखी वाढ होते. नखपट्टिकेच्या बुडाशी जी अर्धचंद्राकृती पांढरी जागा दिसते त्या जागी नखाच्या खाली हे आधारद्रव्य असते. या पांढऱ्या अर्धचंद्राकृती जागेला चंद्रक म्हणतात.

चंद्रक वगळून बाकीच्या नखाचा रंग गुलाबी दिसतो, पण हा त्याचा रंग नव्हे. नख अर्धपारदर्शक असल्यामुळे नखाच्या खाली असणाऱ्या केशवाहिन्यांतील रक्ताचा रंग त्यामधून गुलाबी दिसतो. चंद्रकाचा रंग पांढरा दिसतो याचे कारण आधारद्रव्याचा थर जाड असल्यामुळे त्यातून रक्ताचा रंग दिसत नाही. नख जोराने दाबले, तर त्याच्या खाली असणाऱ्या केशवाहिन्यांतील रक्त निघून जाते आणि सबंध नख पांढरे दिसते. कधीकधी नखात काही काळ टिकणारे पांढरे ठिपके दिसून येतात. शृंगी स्तराच्या कोशिकांमध्ये आकस्मिकपणे अडकलेल्या हवेच्या त्या जागा असतात.

सबंध नख बाह्यत्वचेच्या वरच्या शृंगी स्तरातून बाहेर आलेले असल्यामुळे त्या स्तराचा काठ खरबरीत व फाटका असतो, त्याला अधिनख म्हणतात. त्याने चंद्रकावर थोडे अतिक्रमण केलेले असून नखाच्या (अंग्विस) दोन्ही कडांनाही ते चिकटलेले असते. नखाच्या मोकळ्या अग्र काठाखाली सबअंग्विसचा शिल्लक राहिलेला भाग दिसून येतो.

आ. २. पेरोडिक्टिकस या लेमूराचा डावा पाय : चार बोटांवर नखे असून एकावर नखर आहे.

माणसाच्या नखाची वाढ स्थूलमानाने सहा महिन्यांत २·५ सेंमी. होते. माणसाने आपली नखे केव्हाही कापली नाहीत किंवा ती तुटली नाहीत, तर त्याच्या वयाच्या सत्तराव्या वर्षी तत्त्वतः ती सु. ३०५ सेंमी. किंवा अधिक लांब होतील.

माणसाचा गर्भ नऊ आठवड्यांचा झाल्यावर त्याच्या बोटांवर उभयचरांच्या बोटांवर असलेल्या स्थूलनांसारखी बाह्यत्वचीय स्थूलने उत्पन्न होतात. बाराव्या आठवड्यात नखे तयार होतात पण ती त्यांच्या ठराविक जागी (बोटाच्या टोकांचे बरचे पृष्ठ) येण्यास बराच काळ लागतो.


बहुतेक सस्तन प्राण्यांचे नखर पार्श्व बाजूंनी दबलेले असतात आणि त्यांच्यापासूनच परिवर्तनाने नरवानर गणातील प्राण्यांची नखे उत्पन्न झालेली असतात. काही लेमूरांमध्ये हे स्थित्यंतर स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या काही बोटांवर नखर असतात, तर काही बोटांबर गोल नखे असतात.

कर्वे, ज. नी.

आ. ३. मानवी बोटाच्या टोकाचा अनुदर्घ्य छेद : (१) शृंगी स्तर, (२) अधिनख, (३) बोटातील शेवटचे हाड, (४) नख (अंग्विस), (५) सबअंग्विस, (६) मालपीगी स्तर.

मानवी नखे व त्यांचे विकार : मानवी नखे केसाप्रमाणे त्वचेची उपांगे आहेत. नखे दर आठवड्यास सु. ०·५ ते १·२ मिमी. वाढतात. हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात ही वाढ अधिक असते. हातांच्या नखांची वाढ पायांच्या नखांपेक्षा चौपट अधिक असते. हातांच्या नखांपैकी सर्वांत लांब बोटाचे (मधल्या बोटाचे) नख इतरांपेक्षा अधिक जलद वाढते, तर करंगळीचे नख सर्वांत हळू वाढते. मानवी बोटाच्या टोकाचा अनुदैर्घ्य छेद आ. ३ मध्ये दाखविला आहे.

नखांचे स्वतंत्र विकार आहेत. सार्वदेहिक रोगामध्ये नखावर विशिष्ट परिणाम होतात. या कारणाकरिता वैद्यकीय शरीरतपासणीच्या वेळी नखाकडे लक्ष पुरविणे महत्त्वाचे असते. नखांचा रंग व आकार यांमध्ये बदल झाल्यास त्यावरून सार्वदेहिक अंदाज करता येतो. उदा., नेहमीच्या लालीच्या जागी नखे फिक्कट दिसल्यास रक्तक्षयाचा अंदाज करता येतो. नेहमीचा फुगीर आकार बदलून चमचा किंवा पळीसारखी खोलगट नखे लोहन्यूनताजन्य रक्तक्षयाचे लक्षण समजतात, अशा नखांना ‘दर्वी नखे’ म्हणतात. नखांवर बारीक बारीक खड्डे पडणे, उभ्या चिरा पडणे ही सार्वदेहिक आजाराची–विशेषेकरून अपपोषणजन्य आजाराची–लक्षणे असतात. नखांचा अती पांढुरकेपणा चिरकारी (दीर्घकालीन) यकृत विकृती आणि अल्ब्युमीनन्यूनता (एक प्रकारच्या प्रथिनाची न्यूनता) दर्शवितो.

विकार : नखुरडे : याचे तीव्र आणि चिरकारी असे दोन प्रकार आढळतात. अधिनखाचे अखंडत्व भंगल्यास सूक्ष्मजंतूंना सहज प्रवेश मिळतो व त्यांच्या संसर्गामुळे येणाऱ्या दाहयुक्त सुजेला (शोथाला) नखुरडे म्हणतात. ही सूज बोटाच्या एकाच बाजूस किंवा दोन्ही बाजूंस येऊन प्रथम लालसर फुगवटी येते. नंतर ते भाग पिवळसर दिसू लागतात. वेदना हे प्रमुख लक्षण असते. स्ट्रेप्टोकोकाय आणि स्टॅफिलोकोकाय हे सूक्ष्मजंतू बहुधा कारणीभूत असतात. योग्य ती प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे देतात व जरूर पडल्यास शस्त्रक्रिया करून पू काढून टाकतात.

चिरकारी प्रकारचे नखुरडे तीव्र क्षार (अल्कली) द्रव्ये व तीव्र साबण यांचा सतत उपयोग, नखे कुरतडण्याची सवय, पाण्यात सतत बोटे भिजविणे, आवश्यक असणारा व्यवसाय (उदा., धोब्याचा) इ. कारणांमुळे अधिनखास इजा पोहोचून उद्‌भवते. खंडित अधिनखाखाली हे पदार्थ साचून त्या ठिकाणी सूक्ष्मजंतू वाढतात. गुदद्वाराभोवती असणाऱ्या सूक्ष्मजंतूंचा विशेषेकरून कॅन्डिडा अल्बिकान्स नावाच्या सूक्ष्मजंतूंचा संसर्ग होतो. चिरकारी प्रकारचा शोथ उत्पन्न होतो व अधिनखाखालून पिवळसर द्रव अधूनमधून वाहू लागतो. नखाचा आकार बदलून त्यावर आडवे खळगे व उंचवटे दिसतात. वेदनारहित नखुरडे असल्यास कुष्ठरोगादि तंत्रिका (मज्जा) विकृती नसल्याची खात्री करावी. प्रतिबंधक इलाज म्हणून रबरी हातमोजे वापरावेत परंतु नेमकी हीच गोष्ट कधीकधी रोग वाढविण्यास कारणीभूत होते. कोणते सूक्ष्मजंतू कारणीभूत आहेत ते शोधून त्यावर योग्य इलाज करतात.

नखपट्टिकेचे विकार : जन्मजात विकृतीमध्ये नखाभाव (नखे अजिबात नसणे), अल्पविकसित नखे, दर्वी नखे, अतिजाड नखे वगैरे विकृती आढळतात. नखांची घडण आणि ठेवण आनुवंशिक असल्यामुळे त्यांमध्ये जन्मानंतर बदल करता येत नाही.

नखपट्टिकेच्या कष्ट-पोषणजन्य (पोषणामध्ये व्यत्यय आल्यामुळे होणाऱ्या) विकृतीमुळे नखे चमकहीन व ओबडधोबड बनतात. गजकर्ण, विसर्पिका यांसारख्या त्वचारोगांत, उपदंश, क्षय, कुष्ठरोग यांसारख्या सार्वदेहिक रोगांत अशी नखे आढळतात. कधीकधी नखावर आडव्या खळग्या व उंचवटे दिसतात, त्यांना ‘बो रेषा’ (जे. एच्. एस्. बो या फ्रेंच शरीरक्रियाविज्ञांच्या नावावरून) म्हणतात.

काही वेळा नखे वारंवार गळून पडतात. त्वचारोग (उदा., विसर्पिका), रासायनिक द्रव्यांचा सतत संपर्क, आघात तसेच उपदंश, मधुमेह इ. रोगांत नखपट्टिकेच्या झाकलेल्या भागाकडून नखे गळून पडतात. याला नखपात म्हणतात.


भाजणे किंवा हिमदाह (थंडीमुळे होणारा ऊतकाचा – समान कार्य व रचना असणाऱ्या कोशिकांच्या समूहाचा – अपरिवर्तनीय मृत्यू) यामुळे आधार ऊतकाचा नाश झाल्यास नख पुन्हा येत नाही. नखावर आघात झाल्यास नखाखाली रक्त साकळून काळे निळे डाग दिसतात. रक्त फार साचल्यास वेदना असह्य होतात. अशा वेळी नखास चिरा पाडून रक्त काढून टाकल्यास आराम पडतो.

पायाच्या आंगठ्याच्या नखाची अंतर्वृद्धी : नखे स्वच्छ व नीट कापलेली ठेवल्यास पायाच्या नखांची विकृती सहसा आढळत नाही. पायांना अतिशय घाम येणाऱ्या वक्तींमध्ये अयोग्य बूट वापरण्यामुळे आंगठ्याच्या नखाची बाजूची कड खोल वाढत जाऊन खुपते. वेदनांमुळे पाय नीट न टेकून लंगडत चालावे लागते. पुष्कळ वेळा नख नीट न कापल्यामुळे तीक्ष्ण कोपरा तयार होऊन व्रण उत्पन्न होतो व त्या ठिकाणी पू साठतो.

या रोगावर योग्य ती शस्त्रक्रिया करणे हा एकमेव उपाय असतो. कधीकधी विशेषेकरून वृद्धावस्थेत पायाच्या आंगठ्याच्या नखाची अतिवृद्धी होते. नख कापले तरी पुन्हा तेवढेच वाढते. काही वेळा शस्त्रक्रियेने संपूर्ण नख काढून टाकावे लागते. या विकृतीस ‘नखातिवृद्धी ’ म्हणतात.

भालेराव, य. त्र्यं.