मलयाळम्‌ रंगभूमी : केरळ राज्याची भाषा मलयाळम्‌ आहे. या राज्यात फार पूर्वीपासून लोकनृत्ये व लोकनाट्ये प्रचलित आहेत. केरळमध्ये संस्कृत रंगभूमी अद्यापिही तगून आहे. येथील रंगभूमीवर नृत्यमय अभिनयावर विशेष भर दिला जातो. जुन्या मलयाळम्‌ रंगभूमीवरील मनोरंजनाचे विषयदृष्ट्या मुख्यतः तीन भाग पडतात : (१) धार्मिक, (२) अर्धधार्मिक, (३) धर्मनिरपेक्ष किंवा ऐहिक. धार्मिक प्रकारात भगवती पुट्ट तियाट्ट, पण, पट्टू, कणियाड कळी आणि मुडियेट्ट हे नृत्यनाट्यप्रकार येतात. अर्धधार्मिक प्रकारात संघकळी, कुत्तू, कृष्ण नाट्टम्‌ यांचा समावेश होतो. धर्मनिरपेक्ष किंवा ऐहिक प्रकारात एलामुट्टी पुरापट्टु, तुळ्‌ळल, कोराटीयाटम्‌, मोहिनीआट्टम, कयुकोटिकळी, पथकम्‌ आणि कथकळी इ. प्रकार आहेत.

धार्मिक नृत्यप्रकार हे मुख्यतः भगवती पूजेचेच प्रकार आहेत. हे नृत्यनाट्यप्रकार भगवतीच्या मंदिराशी निगडीत असून देवीला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने कुमारम्‌ स्वतःच भगवतीचे सोंग घेऊन भगवतीमय होतो. या नृत्यनाट्यात स्थळकाळादी सूचना शब्दांनी किंवा मुद्राभिनयाने दिल्या जातत. या नाटकात काली देवी क्रूर राक्षसाचा वध करते, अशा आशयाचे कथानक असते.

अर्धधार्मिक नाट्यप्रकारांतील संघकळीची स्वस्तिकळी, शास्त्रकळी, आणि यागाकळी अशीही आणखी काही नावे आहेत. काही संघ या नाट्यप्रकारात भाग घेतात, म्हणून या प्रकाराला संघकळी असे म्हणतात. केरळ प्रांतात बौध्दधर्माचा प्रसार होऊ लागताच तेथील सनातनी लोकांनी त्या धर्मप्रसारास आळा घालण्यासाठी या नाट्यप्रकाराचा उपयोग केला, अशी एक दंतकथा सांगण्यात येते. या नाट्यप्रकाराचा आरंभ इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाला असावा, असे मानले जाते.

कृष्ण नाट्टम्‌ हे गीतगोविंद या काव्यावर आधारलेले आहे. कालिकत येथील झामोरीन राज्यकर्त्याने या नाट्यप्रकाराला चालना दिली. या नाट्यप्रकाराचे प्रयोग फक्त राजघराण्यातील मंडळींसाठीच होत असत. या प्रयोगात कृष्णविषयक कथा नऊ दिवस दाखवली जात असे. नवव्या दिवशी कृष्णजन्माचा सोहळा होई.

‘कुत्तू’ हा नाट्यप्रकार संस्कृत नाटकाचाच प्रकार आहे. कुलशेखर पेरूमलच्या काळात या नाट्यप्रकाराची परंपरा पूर्णावस्थेला पोहचली होती. या नाट्यप्रकारात विशिष्ट जातीतील स्त्री-पुरुषांनीच भूमिका कराव्यात, असा दंडक असे. या नाट्यप्रयोगाचे स्वरूप शुद्ध धार्मिक असते. रामायण-महाभारत यांसारख्या ग्रंथातून प्रयोगासाठी कथानके निवडलेली असत. याचे प्रयोग तीन ढंगांनी केले जात. केवळ वर्णनात्मक प्रयोगाला प्रबंधम्‌ कुत्तू म्हणतात. केवळ अभिनयात्मक प्रयोगाला नांग्यड म्हणतात. नाट्यकलापूर्ण प्रयोगाला कूटियाट्टम्‌ म्हटले जाते. त्याचा अर्थ संयुक्त अभिनय असा आहे. या नाट्यप्रकारातील अभिनेते परंपरागत अभिनयाचे शिक्षण घेतात आणि आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने तो अभिनय करतात. कोचीन आदी भागांमध्ये ही रंगभूमी अजूनही अस्तित्वात आहे.

धर्मनिरपेक्ष नृत्यनाट्याच्या प्रकारातही संगीत, नृत्य आणि खास वेषभूषा करून केलेला अभिनय असतो. याचा प्रयोग खुल्या रंगभूमीवर होतो. सध्या केरळमध्ये अस्तित्वात असलेले नृत्यनाट्य म्हणजे ⇨कथकळि नृत्य हे आहे. कोट्टारक्करा राजाने महाभारतातील कथा घेऊन पद्यरचना करावयाला सुरुवात केली, तेव्हा या नाट्यप्रकाराला कथकळी असे नाव पडले. या नाट्यप्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय महाकवी वळ्‌ळत्तोळ नारायण मेनन यांना दिले जाते. भरतमुनीप्रणित नाट्यशास्त्राच्या आधारे, पण जरा वेगळ्या प्रकाराने केरळीय कलाकारांनी या नाट्यकलेचा आविष्कार केला. अभिनयासाठी संगीत अशी कथकळीची तात्त्विक भूमिका असल्याने देशी पद्धतीचे शास्त्रीय संगीत मुद्दाम शिकण्याची गरज नसते. विविध रागांचा उपयोग या नृत्यनाट्यात केला जातो. पात्रे हस्त-मुद्राभिनयाने भावदर्शन करतात. हे एक मुकनाट्य असते. गेल्या काही वर्षांपासून स्त्रियांच्या भूमिका स्त्रियाच करू लागल्या आहेत. या नृत्यनाट्याचे भिष्माचार्य म्हणजे नृत्यगुरू ⇨कुंचू कुरुप हे होत. कथकळी नाट्यलेखकांमध्ये उण्णायी वारियर, कोट्टयम तंपुरान, इरयिम्मन तंपी आणि व वळ्‌ळत्तोळ हे लेखक विशेष प्रसिद्ध आहेत.

या नृत्यनाट्याच्या परंपरेशिवाय मलयाळम्‌ रंगभूमीवर गद्यपद्ययुक्त आधुनिक पद्धतीची नाटके होतात. सी. व्ही. रामन पिळ्‌ळा, ई. व्ही. कृष्ण पिळ्‌ळा यांची अनेक गद्य नाटके रंगभूमीवर आली. त्यांमध्ये क्षेत्रम्‌, निंगळ यन्ने कम्युनिस्ट इ. नाटकांनी विशेष लोकप्रियता मिळवली. याव्यतिरिक्त चेऊ काड, उरूब, पडशेरी, तोपील मास्त्री इ. नवे नाटककार उदयास आलेले आहेत. १९५० नंतरच्या काळात स्त्री-कलाकार मोठ्या प्रमाणात भूमिका करीत आहेत. व्यावसायिक रंगभूमीवर अनेक नाटके येत आहेत. [⟶ मलयाळम्‌ साहित्य].

गुजराती रंगभूमी : गुजराती रंगभूमीवर आरंभीच्या काळात जी नाटके आली, ती परभाषेतूनच आली. त्यांमध्ये दलपतराम डाह्याभाई कवीश्वर यांनी लिहिलेले लक्ष्मी हे पहिले गुजराती नाटक मानले जाते. गुजरात व्हर्नाक्युलर सोसायटीने ते प्रयोगित केलेले होते. हे नाटक परकीय नाटकावर आधारलेले होते. त्यानंतरची बरीचशी नाटके संस्कृतमधून प्रेरणा घेऊन गुजरातीत आली. उदा., मिथ्याभिमान, वेणीसंहार, रूढी दिग्विजय, भ्रांतिसंहार इत्यादी. संस्कृत नाट्यरचनेचे विशेष घेऊन रणछोडभाई उदयराम यांनी १८६१ साली जयकुमारी विजय हे नाटक लिहून गुजराती रंगभूमीला चैतन्य प्राप्त करून दिले. संस्कृतप्रमाणेच मराठी-हिंदी-पारशी नाटकमंडळ्यांनी केलेल्या नाट्यप्रयोगांचाही परिणाम या रंगभूमीवर झाला. काही काळ असेही घडले की, नाटकाची भाषा थोडी हिंदी, गाणी मराठी आणि बाकीचे नाटक मात्र गुजराती. पारशी रंगभूमीचा परिणाम जुन्या काळापासून आजतागायत आहे.

नवलराम पंड्या यांनी लिहिलेल्या वीरमती या ऐतिहासिक नाटकाचे महत्त्व विशेष मानले जाते. तसेच प्रताप हे गणपतराम राजाराम यांचेही नाटक लक्षवेधी ठरले. गुजराती नाटकांचे प्रयोग गुजरातप्रमाणेच मुंबईत मोठ्या प्रमाणात पूर्वीही होत असत आणि आजही होत असतात. पूर्वीच्या व्यावसायिक नाटकमंडळ्या धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक नाटकांचे प्रयोग करीत. त्याच बरोबरीने हौशी नाटकमंडळ्या नाटिकांचे तसेच नृत्यनाट्याचे प्रयोग करीत. चंद्रवदन मेहता, कनैयालाल मुनशी, रमणलाल देसाई, धनसुखलाल यांच्या नाटकांनी गुजराती रंगभूमीचे सातत्य टिकविले. त्यांच्याच बरोबरीने पुढील व्यावसायिक नाटकमंडळ्यांनी महत्त्वाचे कार्य केलेले आहे. काठियावाडी नाटक मंडळी, रिपन थिएट्रिकल कंपनी, बालीवाला पारशी व्हिक्टोरिया थिएट्रिकल कंपनी, मुंबई-गुजराती नाट्यमंडळी, देशी नाटक समाज इत्यादी. अगदी आरंभीच्या काळात स्त्रियांच्या भूमिका पुरुषच करीत. नंतर त्या भूमिका स्त्रिया करू लागल्या. बुद्धा व बुरां या दोन भगिनी गुजराती रंगभूमीवरच्या पहिल्या स्त्री-कलावंत होत.

स्वातंत्र्योत्तर काळात या रंगभूमीने वेगळे रूप धारण करण्याचा यत्‍न काही प्रमाणात केला. इब्सेनची काही नाटके, गुणवंतराय आचार्य यांचे अल्लाबेली, शिवकुमार जोशी यांचे समंगला, धनसुखलाल मेहता आणि गुलाबदास ब्रोकर यांचे धुम्रसेर ही महत्त्वाची नाटके रंगभूमीवर आली. १९५४ साली मुंबईत भारतीय विद्या भवन या संस्थेने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका-स्पर्धा घेतल्या. या निमित्ताने अनेक नवे कलाकार गुजराती रंगभूमीला मिळाले आणि त्यांनी रंगभूमीवर भिन्न भिन्न प्रकारची नाटके करून पाहिली. अशा कलाकारांमध्ये प्रवीण जोशी, कांती मडिया, उपेंद्र त्रिवेदी, विजय दत्त, कृष्ण शाह, जयंत व्यास, किशोर भट्ट, भारत दवे, शैलेश दवे, अरविंद ठक्कर, अरविंद जोशी इ. उल्लेखनीय आहेत. अर्थात यांतल्या बहुतांश कलाकारांसमोर परकीय नाटकांचे आदर्श होते. त्यामुळे भाषांतरित किंवा रूपांतरित पद्धतीने मोठ्या प्रमाणात गुजराती रंगभूमीवर नाटके आली. अस्सल गुजराती नाटक कमी प्रमाणात आले. त्यातल्या त्यात लाभशंकर ठाकर आणि सिंताशु यशश्चंद्र या आधुनिक कवी-नाटककारांनी या रंगभूमीची परंपरा व प्रतिमा बदलण्याचा यशस्वी प्रयत्‍न केला.

रंगभूमीला नवे वळण देण्याच्या संदर्भात प्रवीण जोशी यांनी केलेले प्रयत्‍न अतिशय महत्त्वाचे आहेत. रंगभूमीवर वेगळेपण आणताना त्यांनाही भारतीय-अभारतीय भाषांतील नाटकांचा आधार घ्यावा लागला. उदा., त्यांनी विजय तेंडुलकर (शांतता, कोर्ट चालू आहे), बादल सरकार (एवम्‌ इंद्रजीत), तसेच साइन पोस्ट टू मर्डर या नाटकांची गुजराती नाट्यरूपांतरे केली. १९७० साली रामजी वणिया यांचे मोली वेराणां चोकमा हे वेगळ्या आकृतिबंधातील नाटक प्रवीण जोशींनी सादर केले. आणखी एक उल्लेखनीय नाटक म्हणजे कुमारनी आगासी, संतु रंगीली, रवेलंदो, शरत, साहबो गुलाबनो छोड ही रूपांतरित नाटके आधुनिक गुजराती रंगभूमीवर अनेकार्थांनी लक्षवेधी ठरली. मधू राय, चिनू मोदी हे आणखी महत्त्वाचे आधुनिक नाटककार. त्यांनी गुजराती नाटकांतून व्यस्ततेची जाण व्यक्त करण्याचा यत्‍न केला. [⟶गुजराती साहित्य].


हिंदी रंगभूमी : हिंदी रंगभूमीची परंपरा मराठीइतकीच जुनी आहे. पण नाटक आणि रंगभूमी या दोन्ही गोष्टी बरोबरीने जायला हव्या होत्या, तशा आरंभीच्या काळात गेल्या नाहीत. १८४३ मध्ये ⇨वाजिद अली शहा याने रहस ही रचना रासलीलाच्या आधारे केली. त्यामध्ये नृत्याचा वापर होता. त्यातूनच त्याने आपल्या काव्यांना नाट्यरूप दिले. या कालखंडात उर्दू-पारशी रंगभूमीचा प्रभाव हिंदी रंगभूमीवर होता. आगा हसन अमानत यांनी १८५३ मध्ये इंदरसभा नाटक हिंदी-उर्दू भाषेत लिहिले. त्यात संगीताचा भाग मोठा होता. पारशी रंगमंचावर हिंदी नाटकांचे प्रयोग प्रथमतः राधेश्याम कथावाचक यांनी यशस्वीपणाने केले. आगा हश्‍न कश्मीरी यांनी प्रथम उर्दूत आणि नंतर हिंदीत नाट्यलेखन केले. त्यांनी सूरदास, गंगावतरण, भीष्मप्रतिज्ञा इ. नाटके लिहिली. नारायणप्रसाद बेताब यांनी उर्दू-हिंदीमध्ये महाभारत, जहरी साप, कृष्ण सुदामा, शाकुंतल ही नाटके लिहिली.

अंधा युग या हिंदी नाटकातील गांधारी भारतेंदु हरिश्चंद्र हे सर्वांत महत्त्वाचे हिंदी नाटककार मानले जातात. ते स्वतः उत्तम नट-दिग्दर्शकही होते. त्यांची नाटके तत्कालीन सामाजिक, धार्मिक, राजकीय परिस्थितीवर आधारलेली होती. त्यांचे पहिले नाटक विद्या सुंदर (१८६८). त्यांनतर त्यांनी अंधेरी नगरी, वैदिकी हिंसा हिंसा न भवति ही प्रहसने भारत जननी हे संगीत नाटक, चंद्रावली हे शोकात्म नाटक आणि नीलदेवी हे गीतिरूपक लिहिले. त्यांच्या या नाट्यरचनांमुळे हिंदी रंगभूमीला अधिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांच्याप्रमाणेच जयशंकर प्रसाद यांनी आपल्या नाट्यलेखनाने एक स्वतंत्र युग निर्माण केले. १९१० ते १९३३ या कालखंडात त्यांनी एकूण तेरा नाटके लिहिली. हरूवस्वामिनी आणि कामना ही दोन नाटके सोडल्यास, त्यांची अन्य नाटके पौराणिक-ऐतिहासिक विषयांवरची आहेत. त्यामध्ये स्कंधगुप्त, चंद्रगुप्त ही महत्त्वाची आहेत. त्यांच्या नाटकांना प्रयोगाचे यश विशेष लाभले नाही. हरिकृष्ण प्रेमी यांनी रक्षाबंधन, शिवासाधना इ. अनेक ऐतिहासिक नाटके लिहून हिंदू-मुसलमान ऐक्य निर्माण व्हावे असा त्याद्वारे प्रयत्‍न केला. पण त्यांची ही नाटके रंगभूमीवर यशस्वी होऊ शकली नाहीत. मात्र गोविंदवल्लभ पंत यांनी प्रयोगाचे भान ठेवून अंगूर की बेटी, अंतःपूर का छिद्र, अधूरी मूर्ती, अंधेरी बस्तिया ही नाटके लिहिली. उदयशंकर भट्ट हे एक प्रयोगशील नाटककार आहेत. त्यांनी मत्स्यगंधा, विश्वामित्र, राधा ही उत्तम पद्यनाटके लिहिली. लक्ष्मीनारायण मिश्र हे हिंदीतील समस्याप्रधान नाटकांचे जनक मानले जातात. त्यांनी संन्यासी, राक्षस का मंदिर, मुक्ति का रहस्य इ. नाटके लिहिली.

पृथ्वीराज कपूर हे उत्तम नट, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. त्यांनी पठाण, दीवार, पैसा, गद्दार, कलाकार, किसान इ. नाटके लिहून हिंदी नाटक सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला. त्या निमित्ताने त्यांना व हिंदी नाटकांना उदंड लोकप्रियता मिळाली. ⇨उपेंद्रनाथ अश्क यांनी सामाजिक व्यंग्यांवर बरीच नाटके लिहिली. उदा., स्वर्ग की झलक, कैद, उडान, अंजो दीदी, छठा बेटा, अलग अलग रास्ते इत्यादी.

हिंदी रंगभूमींवर ⇨जगदीशचंद्र माथूर, ⇨मोहन राके इ. अनेक नाटककरांच्या नाट्यलेखनाने नवचैतन्य निर्माण झाले. माथूर यांनी बंदी, कोर्णाक, शारदीया, पहला राजा इ. उत्तम दर्जाची नाटके लिहिली. मोहन राकेश यांनी आषाढ का एक दिन, लहरोंका राजहंस, आधे अधुरे ही नाटके लिहून हिंदी नाटक आणि रंगभूमी अनेकार्थांनी सशक्त केली. त्यांच्या या नाटकांची भाषांतरे अन्य भारतीय भाषांमध्ये झाली. आधे अधुरे हे भारतीय स्तरावर उच्च श्रेणीचे नाटक मानले जाते. या नाटकांना प्रयोगमूल्यांचे भक्कम अधिष्ठान असल्याने ती मोठ्या प्रमाणात रंगभूमीवर प्रभावी ठरली. आधे अधुरे या नाटकाने नाटकाच्या संवादभाषेचे पारंपरिक संकेत मोडून स्वतःची अशी नवी रंगभाषा निर्माण केली. हे नाटक आधुनिक भारतीय रंगभूमीवरील एक अभिजात नाटक मानले जाते.

लक्ष्मीनारायण लाल यांनी एकूण अठरा नाटके लिहिली. त्यांपैकी काही महत्त्वाची नाटके अशी : अंधकुआ, मादा कैक्टस, सुखा सरोवर, रक्तकमल, तोता-मैना, करफ्यू, अब्दुला दिवाना रातरानी. रमेश मेहतांचे अंडर सेक्रेटरी हे विशेष लोकप्रिय नाटक आहे. विनोद रस्तोगी यांनी आजादी के बाद, नये हाथ, बर्फ की मीनार ही नाटके लिहिली. ज्ञानदेव अग्निहोत्री यांनी लिहिलेली नाटके नेफा की एक शाम, माटी जागीरे, अनुष्ठान, शतुरमुर्गं इत्यादी. यांमध्ये अनुष्ठान व शतुरमुर्गं ही महत्त्वाची आहेत. नाटककार हा स्वतः नट, दिग्दर्शक असल्याने त्याने नाट्यलेखन करताना रंगभूमीचे भान चांगले राखले आहे.

धर्मवीर भारती यांचे अंधा युग हे प्रभावी नाटक भारतीय स्तरावर मान्यता पावलेले आहे. हे नाटक मुक्तच्छंदात्मक शैलीतील आहे. महाभारतातील व्यक्तींच्या जीवनाचा सखोल अर्थ त्यामध्ये नाटककाराने व्यक्त केला आहे.

आधुनिक काळात ज्या नाटककारांनी, महत्त्वाच्या नाटकांनी हिंदी रंगभूमी संपन्न केली त्यांमध्ये पुढील उल्लेखनीय आहेत : रेवतीशरण शर्मा (अपनी धरती), मन्नू भंडारी (बीना दीवारो के घर) विष्णू प्रभाकर (डॉक्टर, युगे युगे क्रांती), शंकर शेष (फंदी, बंधन, अपने अपने, खजुराहो, रक्तबीज, पोस्टर), रामेश्वरदयाल दुबे (अगस्त्य), रमेश बक्षी (देवयानी का कहना है), सक्सेश्वरदयाल शर्मा (बखरी, सुरेंद्र वर्मा (द्रौपदी ) इत्यादी. [⟶ हिंदी साहित्य].


असमिया रंगभूमी : प्राचीन काळापासून आसामच्या खुल्या रंगभूमीवर लोकनृत्ये आणि लोकनाट्ये मोठ्या प्रमाणात होत असत. त्यांतील मुख्य विषय धार्मिक आणि आध्यात्मिक असत. आसाम आणि बिहार या भागांमध्ये पूर्वी वैष्णव पंथाचा प्रभाव बराच होता. बिहारमध्ये विद्यापतीने निर्माण केलेल्या रंगभूमीने आसाममधील श्रेष्ठ कवी शंकरदेव यांना स्फूर्ती मिळाली आणि त्यांनी आपल्या वैष्णव पंथाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी रंगभूमीचा वापर केला.

आसाममधला सर्वांत जुना नाट्यप्रकार म्हणजे ‘ओजापाली’ हा आहे. नृत्य, संगीत, संवाद, अभिनय अशा विविध गुणांनी हा नाट्यप्रकार समृद्ध होता. याचाच उपयोग कवी शंकरदेव यांनी करून घेतला. ओजापाली नाट्यप्रकाराची सुधारून वाढवलेली आवृत्ती म्हणजे भावना हा नाट्यप्रकार. यांतील कथानके पौराणिक असत. मनोरंजनाबरोबर काही उपदेशाचाही भाग त्यांत असे. भावना नाट्यप्रकाराचे साम्य महाराष्ट्रातील दशावतार, तमिळनाडूमधील तेरूकुतु किंवा आंध्रमधील वीथी यांच्याशी आहे. या नाट्यप्रकाराला राजाश्रय असे. ओजापाली आणि भावना या नाट्यप्रकारांसाठी स्वतंत्र नाट्यगृहे नसत. नामधर या नावाने संबोधिल्या जाणाऱ्‍या प्रार्थनामंदिरात त्यांचे प्रयोग होत असत. अजूनही तिथेच प्रयोग होतात. १४४९ ते १५६९ हा आसामचा धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा कालखंड होता. त्याच काळात कवी शंकरदेव तसेच त्यांचे शिष्य माधवदेव यांनी असामिया रंगभूमीचा उदय आणि विकास घडवून आणला.

इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावामुळे असमिया रंगभूमीला आधुनिक रूप प्राप्त झाले. नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, प्रयोगतंत्र यामध्ये बऱ्‍याच सुधारणा झाल्या. बंगाली रंगभूमीचे नवनवीन प्रयोग असमिया रंगभूमीवर दिसू लागले. हेमचंद्र बरुआ आणि गुणाभिराम बरुआ यांनी असमिया रंगभूमीला आधुनिक रूप देण्याचे फार मोठे प्रयत्‍न केले. त्याचबरोबर जे. पी. आगरवाल आणि आद्य असमिया एकांकिका लेखक लक्ष्मीधर शर्मा यांनी असमिया रंगभूमी समृद्ध केली. हौशी स्तरांवर नाटकांचे प्रयोग मोठ्या प्रमाणात होतात, पण व्यावसायिक रंगभूमीचा मात्र अभाव आहे. अलीकडच्या काळात नवे नाटककार, नट, नाटके निर्माण होत आहेत, त्यामुळे या रंगभूमीचा विकास हळूहळू होत आहे. [⟶ असमिया साहित्य].

उर्दू रंगभूमी : खऱ्‍या अर्थाने उर्दू रंगभूमीचा उदय झाला, तो मोगल साम्राज्याच्या ऱ्‍हासानंतर. याचा अर्थ त्या आधी उर्दू रंगभूमी नव्हती असा नव्हे. व्यावसायिक उर्दू रंगभूमीवर नाटके होण्यास सुरुवात होण्यापूर्वी राजेरजवाडे-अमीरउमराव यांच्या मनोरंजनासाठी भांड किंवा नकलीये या नावाने ओळखले जाणारे लोक उर्दू भाषेत सामान्य दर्जाची प्रहसने रचीत. ती प्रयोगरूपाने करून दाखवीत. ती उर्दू रंगभूमीची प्राथमिक अवस्था होती. लखनौचा वाजिद अली शहा याच्या कारकीर्दीत अशा नाटकांचे प्रमाण मोठे होते.

गिरीश कार्नाड यांच्या तुघलक नाटकाच्या उर्दू रूपांतरातील एक दृश्य उर्दू भाषेतील पहिले नाटक म्हणून ज्याचा उल्लेख करतात, ते शाकुंतल नाटक संस्कृतचे भाषांतर होते. एका बादशहाच्या इच्छेनुसार नवाज नावाच्या कवीने ते लिहिले होते. इंद्रसभा हे उर्दू भाषेतील पहिले स्वतंत्र नाटक. लेखक होते अमानत. हे नाटक अतिशय लोकप्रिय झाले. या रंगभूमीवर शुद्ध उर्दू आणि हिंदीमिश्रित उर्दू असे भाषेच्या दृष्टीने दोन प्रकारचे नाट्यप्रयोग होत असत.

विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात उर्दू नाटकांचा दर्जा पुष्कळच उंचावला. उर्दू नाटकांत साहित्यगुण आणि प्रयोगगुण दोन्ही मोठ्या प्रमाणात दिसू लागले. महाभारत, रामायण, बिल्वमंगल इ. धार्मिक आणि संतचरित्रपर नाटकांप्रमाणेच राजदुलारी, मुरारीदादा यांसारखी गद्य सामाजिक नाटकेसुद्धा या रंगभूमीवर आली. महाराणा, वीरवृषल, बुद्धदेव, स्वामी दयानंद यांसारख्या ऐतिहासिक नाटकांनीही ही रंगभूमी गाजली. नूर-ई-वतनत्फिक्‌ ही नाटके राजकीय विषयांवरची होती. नारायणप्रसाद बेताब यांनी तर उर्दू नाटकांमध्ये हिंदी भजनाचा वापर केला. पण उर्दू रंगभूमीला खरा हातभार लागला, तो पारशी नाटक मंडळींचाच. पूर्वी मुंबईसारख्या शहरात पारशी नाटक मंडळ्या हिंदी व गुजराती नाटके करीत. त्या मंडळ्या उत्तर भारतात दौऱ्‍यांवर जाताना उर्दू नाटके व्यावसायिक रंगभूमीवर करीत. त्यांच्या नाटकांत नाच, गाणी, भडक पोशाख आणि सतत बदलते देखावे यांचा विशेष भरणा असे. तत्कालीन उर्दू रंगभूमीवर बंकिमचंद्र चतर्जी आणि प्रसिद्ध हिंदी नाटककार हरिश्चंद्र भारतेंदु यांच्या नाटकाचा ठसा मोठ्या प्रमाणात आहे. उदा., गुलबकावली, फिरोज गुलनार, लैला मजनू, शिरीनफरहाद इ. नाटकांचा उल्लेख करता येईल. उर्दू रंगभूमीची भरभराट करणारांमध्ये मुनशी ज्वालाप्रसाद बर्क, पं. त्रिभुवनदास सप्रू, पं. रतननाथ सरशार, मौलवी महंमद हुसेन आझाद इ. नाटककारांचा वाटा मोठा आहे.

पठान या उर्दू नाटकातील एका प्रसंगात प्रेमनाथ व पृथ्वीराज कपूर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व्हिक्टोरिया नाटक मंडळी, मादन थिएटर्स यांसारख्या नाटक मंडळ्या भारतभर फिरत असत. त्या इतर नाटकांच्या बरोबरीने उर्दू नाटकांचे प्रयोग करीत. पूर्वीपेक्षा सुधारलेल्या, वेगळे स्वरूप धारण केलेल्या उर्दू रंगभूमीचे जनक म्हणून दादा (दादी) भाई साहेबराव पटेल या पारशी गृहस्थांचा उल्लेख केला जातो. त्यांनी आपल्या ओरिजिनल व्हिक्टोरिया नाटक मंडळीतर्फे चांगली उर्दू नाटके रंगभूमीवर आणली. अन्य भाषांतील नाटकांप्रमाणेच उर्दू नाटके व्यावसायिक रंगभूमीवर करणारी अखेरची नाटक मंडळी म्हणजे रुस्तुमजी मोदी यांची आर्यसुबोध नाटक मंडळी. ही प्रसिद्ध नाटक मंडळी १९३१-३२ च्या दरम्यान बंद झाल्यावर, उर्दू नाटके करणाऱ्‍या व्यावसायिक मंडळ्या फारशा उरल्या नाहीत. दिल्ली, जम्मू, लखनौ, कलकत्ता इ. भागांत उर्दू नाटकांचे प्रयोग अधूनमधून होतात. पण ते प्राधान्याने समारंभी स्वरूपाचे असतात. त्यांना सातत्य, कलात्मकता, व्यावसायिक दृष्टी नाही. [⟶ उर्दू साहित्य].


पंजाबी रंगभूमी : पंजाबी नाट्यकलेचा जुन्यात जुना असा नमुना म्हणजे ‘किस्साखानी. पद्यरूपाने पौराणिक कथा सांगून, पंजाबी भाषेत साभिनय अर्थ सांगणे असे त्याचे स्वरूप असे. पौराणिक कथांप्रमाणे काही स्थानिक अमर प्रेमकथाही सादर केल्या जात असत. उदा., हीररांझा, सोहनी-महीवाल, झुलेखा इ. प्रेमकथा किस्सा खानीचे विषय असत. नचार कलावंतांचा तमाशा, नकलियांची नक्कल, गीतवाद्यमय असलेली रढसारंगी आणि नौटंकी इ. लोकनाट्ये, तसेच गिद्धासारखी फुगडी नृत्ये पंजाबच्या खेड्यात आजही टिकून आहेत.

आधुनिक पंजाबी रंगभूमीची खरी सुरुवात फिरोझदीन शरफ यांच्या हसिस्याल या नाटकाने झाली. हे नाटक यशस्वी झाले नाही, पण त्याच विषयावर वलीसाहेब या लेखकाने लिहिलेले जट्टीहीर नाटक लोकप्रिय ठरले. हौशी आणि व्यावसायिक मंडळ्या अनेक नाटकांचे प्रयोग करीत असतात. त्यामध्ये रेल्वे ड्रॅमॅटिक क्लब, राम नाटक क्लब, भतिंडा येथील हश्‍न नाटक समाज, सुभाष नाटक समाज, युनायटेड थिएटर्स, कल्चरल थिएटर इ. मंडळ्या महत्त्वाच्या आहेत. यांनी केलेली कृष्णसुदामा, काल, जहेज (दहेज), उलटे लोग इ. नाटके विशेष गाजली. जुन्या-नव्या नाटकाकारांमध्ये आणखी काही महत्त्वाचे नाटककार म्हणजे आय्‌. सी. नंदा, जोश्वा फजल दिन, रफी पीर इ. होत. त्यांची पिंडदेवेरी, आँखिया, सुभद्रा इ. नाटके विशेष लोकप्रिय झाली. १९३९ नंतर पंजाबी रंगभूमीवर नवयुग निर्माण झाले. नवीन लेखकांत संतसिंह, हरचरणसिंह, कर्तारसिंग दुग्गल, बलवंत गार्गी, गुरुबक्षसिंग, शीला भाटिया, गुरुदियाल सिंग, रोशनलाल, अमरीक सिंग इ. नाटककार उल्लेखनीय आहेत. अर्थात स्वतःच्या गुणांवर अन्य भाषिकांचे लक्ष वेधून यावे इतके प्रगत रूप या रंगभूमीला अद्याप प्राप्त झालेले नाही. मनोरंजनाच्या ढोबळ कल्पनांमध्येच तिचे अस्तित्व घोटाळत राहिले आहे.

ओडिया रंगभूमी : जुना ओडिया नाट्यप्रकार म्हणजे ‘रामलीला’. मुसलमानी अमदानीत रूढ झालेल्या नाट्यप्रकारास ‘मजलीस’ असे म्हणत. बंगालीतील जात्रा आणि पाला यांचाही प्रभाव या रंगभूमीवर होता. या लोकनाट्यांचा प्रयोग चालू असतानाच एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बालेश्वर येथे एक बंगाली नाटक कंपनी आली. तिने बंगाली नाटक सादर केले. ते नाटक पाहून ओडिया नाट्यकलाकारांना नवी दृष्टी आली. काही तरुण कलाकारांनी या पद्धतीचे नाटक १८७८ साली करून दाखवले. तेव्हापासून खऱ्‍या अर्थाने नव्या ओडिया रंगभूमीचा आरंभ झाला. परशुराम विजय या १५ व्या शतकातील नाटकापासून ही विकासपरंपरा सांगितली जाते. पण तिला सातत्य लाभले नाही.

रामशंकर राय यांनी लिहिलेली ओडिया नाटके हौशी कलाकारांकडून सादर केली जाऊ लागली. १८८५ साली कोठपदा नावाच्या खेड्यामध्ये नाटकासाठी खास रंगमंच तयार करण्यात आला. महंत दैत्यारि रघुनाथ यांनी तो केला होता. त्या रंगमंचावर सु. तीस-चाळीस नाटके केली गेली. त्यानंतर १८८७ साली कटक येथे मधुसूदन दास यांच्या प्रयत्ना ने एक कायम स्वरूपाचे रंगमंदिर तयार झाले. त्याच दरम्यान जगन्नाथ थिएटर क्लब, व्हिक्टोरिया ॲमॅच्युअर्स थिएटर, वासंती नाट्यशाला, कृष्णचंद्रपालित उषा थिएटर इ. नाट्यसंस्था स्थापन झाल्या. वनमालिपती आणि अश्विनीकुमार घोष यांनी आर्ट थिएटर ही ओडियातील पहिली व्यावसायिक नाटक मंडळी स्थापन केली. याशिवाय मोहन गोसाई यांच्या नाटक मंडळीने बराच लौकिक मिळविला. अन्नपूर्णा थिएटर संस्थेने अनेक पौराणिक-सामाजिक नाटके रंगभूमीवर आणली. कविभूषण घनःश्याम मिश्र, गोदावरीश मिश्र, अश्विनीकुमार इ. नाटककारांनी ओडिया रंगभूमीला वैभव प्राप्त करून दिले. आधुनिक रंगभूमीवरील वास्तव देखावे दाखवण्याचे श्रेय कालीबाबूंना देण्यात येते. त्यांच्याबरोबर मनमोहन दास, रामचंद्र दास इ. नाटककारांनी नवनवीन विषय हाताळले. त्यामुळे ओडिया रंगभूमी समृद्ध झाली आहे. [⟶ ओडिया साहित्य]. (चित्रपत्रे २५, २६, २७, २८).

देशपांडे, वि. भा.

पहा : अभिनय कळसूत्री बाहुल्यांचा खेळ खुले रंगमंदिर छायानाट्य नभोनाट्य नाटक नाट्यप्रयोग नाट्यसंगीत नौटंकी प्रहसन बहुरूपी खेळ बालरंगभूमी मुखवटे मूकनाट्य मृषानाट्य लोकनाट्य शोकात्मिका संगीतिका सुखात्मिका स्वगत.

संदर्भ : 1. Allen, James T. Stage Antiqulties of the Greeks and Romans and Their Influence, New York, 1965.

2. Anand, Mulk Raj. The Indian Theatre, London, 1950.

3. Arnott, P. D. The Theatres of Japan, New York, 1969.

4. Bennett, B. Modern Drama and German Classicism : Renaissance from Lessing to Brecht, Ithaca, 1979.

5. Bharata Muni, Ed. &amp Trans. Ghosh, Manmohan, The Natyasastra, Vol. I (2 parts) &amp Vol. 2, Calcutta, 1961-1967.

6. Bhattacharya, H. Origin and Development of the Assamese Drama and the Stage. Gauhati, 1964.

7. Bowers, Faubion, Theatre in the East : A Survey of Asian Drama, London, 1956.

8. Byrski, C. Concept of Ancient Indian Theatre, New Delhi, 1974.

9. Chambers, E. K. The Medieval Stage, Vols. 2, New York, 1903.

10. Cheney, Sheldon, The Theatre, 1972.

11. Clark, Barrett, Ed. European Theories of the Drama, 1965.

12. Coomaraswamy, A Mirror of Gesture (translation of Nandikeswar’s Abhinaya-

Darpan in Sanskrit), New Delhi, 1970.

13. Casto, E. The Polish Theatre, Warsaw, 1963.

14. Dasgupta, Hemendranath, Indian Stage, 4 Vols., Calcutta. 1944.

15. Downs, Harold, Ed. Theatre and Stage, 2 Vols., London, 1957.

16. Elsom, J. Post-War British Theatre, London, 1976.

17. Gargi, B. Theatre in India, New York, 1962.

18. Gassner, John Quinn, Edward, Ed. The Reader’s Encyelopedia of World Drama, New York, 1969.

19. Gerould. D. Twentieth Century Polish Avant Garde Drama, Ithaca, 1977.

20. Gossip, C. J. An Introduction to French Classical Tragedy, New York, 1982.

21.Guha, P. Thakurta, Bengali Drama, London. 1930.

22. Guicharnaud, J. Modern French Theatre : From Giraudoux to Beekett, new Haven, 1961.

23. Hanau Deutsch, H. and S. The Provincetown : A Story of the Theatre, New York, 1931.

24. Hatch, James V. Ed. Black Theatre. U.S.A. Forty-Five Plays by Black Americans 1847-1974, New York, 1974.

25. Hein, N. Miracle Plays of Mathura, Bombay, 1973.

26. Hochman, Stanley, Ed. McGraw-Hill Encyclopedia of World Drama, 5 Vols., New York, 1984. 27. Horwitz, E. P. The Indian Theatre, New York, 1967.

28. Howard, r. Contemporary Chinese Theatre, London, 1978.

29. Innes, C. D. Modern German Drama : A Study in Form, New York, 1979.

30. Kale, K. Narayan, Theatre in Maharashtra, New Delhi, 1967.

31. Keith, A. B. Sanskrit Drama in Its Origin, Development, Theory and Practice, London, 1954. 32. Levi, S. Trans. Mukerji, N. The Theatre of India, 2 Vols., Calcutta, 1979.

33. MaCgowan, Kenneath Melnits, William, The Living Stage : A History of the World Theatre, 1955.

34. Marathi Natya Parishad, The Marathi Theatre, Bombay, 1961.

35. Mathur, J. C. Drama in Rural India New Delhi, 1964.

36. Nicoll, A. A History of English Drama, 1660-1900, Vols. 2-5, London, 1959.

37. Oliver, Clinton Stephanie, Sills, Ed. Contemporary Black Drama, New York, 1971.

38. Osborne, J. The Naturalist Drama in Germany, Manchester, 1971.

39. Perry, Clarence Arthur, The Work of the Little Theatres, New York, 1933.

40. Price, C. Theatre in the Age of Garrick, Oxford, 1973.

41. Prudhoe, J. E. The Theatre of Goethe and Schiller. Oxford, 1973.

42. Rah, K. Bengali Theatre, New Delhi, 1978.

43. Ramachandra and Gunachandra, Trans. Trivedi, K. H. Natya-Darpana, ahmedabad, 1966. 44. Rangacharya, Adya, The Indian Theatre, New Delhi, 1971.

45. Ranganath, H. K. The Karnataka Theatre, Dharwar, 1960.

46. Rimer, T. Toward a Modern Japanese Theatre, Princeton, 1974.

47. Ritchie, J. German Expressionist Drama, Boston, 1976.

48. Scott, A. C. The Theatre in Asia, London, 1972.

49. Segel, H. B. Twentieth Century Russion Drama, From Gorky to the Present, New York, 1979. 50. Senelick, L. P. Russian Dramatic Theory from Pushkin to the Symbolists, Austin, 1981.

51. Tarlekar, G. H. Studies in the Natyashastra, Delhi, 1975.

52. Varadpande, M. L. Traditions of Indian Theatre, New Delhi, 1977.

53. Vatsyayan, Kapila, Traditional Indian Theatre, New Delhi, 1980.

54. Wellarth, G. E. The Theatre of Protest and Paradox, 1970.

55. Wilson, G. B. Three Hundred Years of American Drama and Theatre, Englewood Cliffs, 1973. 56. Wilson, H. H. Theatre of the Hindus, 2 Vols., Delhi, 1972.

57. White, K. S. Man’s New Shapes : French Avant-Grade Drama, Washington, 1979.

५८. काळे, के. ना. प्रतिभा, रूप आणि रंग, पुणे, १९७६.

५९. काळे, के. ना. नाट्यविमर्श, मुंबई, १९६१.

६०. कुलकर्णी, आप्पाजी विष्णु, मराठी रंगभूमि, पुणे, १९६१.

६१. केतकर, गोदावरी, भरतमुनींचे नाट्यशास्त्र, मुंबई, १९६३.

६२. चतुर्वेदी, पं. सीताराम, भारतीय तथा पाश्चात्त्य रंगमंच, लखनऊ, १९६४.

६३. जोशी, बाबूराव, संगीताने गाजलेली रंगभूमी, पुणे, १९७४.

६४. बरवे-कानडे, मराठी नाट्यपरिषद, पुणे, १९६१.

६५. भरतमुनी अनु. कंगले, र. पं. रस-भाव-विचार (नाट्यशास्त्र, अध्याय ७), मुंबई, १९७३.

६६. भरतमुनी अनु. कंगले, र. पं. दशरूपविधान (नाट्यशास्त्र, अध्याय १८ १९), मुंबई, १९७४.

६७. मुंबई मराठी साहित्य संघ, मराठी रंगभूमी : मराठी नाटकघटना आणि परंपरा (डॉ. अ. ना. भालेराव स्मृतिग्रंथ), मुंबई, १९७१.

६८. रेगे, मे. पुं. संपा. नवभारत (रंगभूमी विशेषांक), वाई, मे-जून १९८५.

६९. सावंत, कृ. रा. ग्रीक आणि रोमन रंगभूमी, पुणे, १९७२.


मधुसूदन कालेलकरकृत 'ही श्रींची इच्छा' नाटकात शशिकांत निकते व सुहास जोशीविश्राम बेडेकरांच्या 'टिळक आणि आगरकर' नाटकात प्रमेद पवार व श्याम पोंक्षे.जयवंत दळवींच्या 'सूर्यास्त' मध्ये लालन सारंग व निळू फुले.वसंत कानेटकरांच्या 'बेइमान' मध्ये मधुकर तोरडमल व प्रभाकर पणशीकर.विजय तेंडुलकरांच्या 'कन्यादान' मध्ये सुहास जोशी व सुषमा तेंडुलकर.वसंत कानेटकरांच्या 'रायगडाला जेव्हा जाग येते' मध्ये मास्टर दत्ताराम व काशीनाथ घाणेकर.


सतीश आळेकरांच्या 'महानिर्वाण' मधील एक समूहदृश्य'अभिज्ञानशाकुंतल' (संस्कृत) नाटकाच्या नेदर्लंड्‌समधील प्रयोगातील एक दृश्य.'दरिद्रनारायण' (गुजराती) नाटकाच्या ज्योती व्यासनिर्मित प्रयोगातील एर दृश्य.'अरे मायावी सरोवर' नाटकात नीना जोशी व मोहन भंडारी.मोहन राकेशकृत 'आधे अधुरे' (हिंदी) मधील एक दृश्य.केरळमधील 'कूटियाट्टम्' (मलयाळम्) नृत्यनाट्यातील एक देखावा.'दुःस्वप्नेर नगरी' (बंगाली) या उत्पल दत्तलिखित-दिग्दर्शित नाटकातील एक प्रसंग.


'मृच्छकटिक' (संस्कृत) नाटकात दाजी भाटवडेकर व रजनी जोशी.पीरांदेल्लोच्या 'सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ ॲन ऑथर' (इटालियन) या नाटकातील वैशिष्ट्यपूर्ण छाया-प्रकाश योजना, वेस्टमिन्स्टर, लंडन.केंब्रिज फेस्टिव्हल थिएटरनिर्मित, ॲरिस्टोफेनीसच्या 'द बर्ड्‌स' (ग्रीक) सुखात्मिकेतील अभिजात नेपथ्य.चेकॉव्हकृत 'द थ्री सिस्टर्स' (रशियन) नाटकातील एक भावपूर्ण प्रसंग, मॉस्को आर्ट थिएटर.शेक्सपिअरच्या 'मॅक्‌बेथ' (इंग्रजी) नाटकातील वैशिष्ट्यपूर्ण नेपथ्य.माय्‌कोव्हस्कीच्या 'बाथ-हाउस' (रशियन) मधील समूहदृश्य, मॉस्को सटायर थिएटर.बोलकी रंगभूषा : शेक्सपिअरच्या 'किंग लिअर' नाटकातील विदूषकाच्या भूमिकेत ब्रिटिश अभिनेता ॲलेक गिनेस (१९१४--).झां आनुईयच्या 'आंतिगॉन' (फ्रेंच) नाटकातील एक दृश्य.मृषा रंगभूमीचे आद्य रूप दर्शविणाऱ्या, आल्फ्रॅद जारीच्या 'यूबू र्‌वा' (फ्रेंच) प्रहसनातील एक दृश्य.टी. एस्. एलियटच्या 'मर्डर इन द कॅथीड्रल' (ब्रिटिश) नाटकातील एक प्रसंग.यूजीन ओनीलच्या 'मोर्निंग बिकम्स इलेक्ट्रा' (अमेरिकन) नाटकातील भव्य नेपथ्य व भावपूर्ण दृश्य.झां झनेच्या 'द ब्लक्स' (फ्रेंच) नाटकातील एक प्रसंग.ब्रेक्टच्या 'मदर करेज' (जर्मन) नाटकातील एक दृश्य.