पोवळे : (प्रवाळ). ⇨ सीलेंटेरेटा (आंतरगुही) प्राणिसंघाच्या मुख्यत्वे अँथोझोआ वर्गातील [म्हणजेच ॲक्टिनोझोआ →ॲक्टिनोझोआ] व काही ⇨ हायड्रोझोआ वर्गातील प्राण्यांनी किंवा प्राणिसमूहांनी स्वतःभोवती निर्माण केलेल्या बाह्य कंकालांचे (सांगाड्यांचे) उबदार सागरांत तयार झालेले निक्षेप (साठे) म्हणजे पोवळे होय. या प्राण्यांनाही सामान्यत: पोवळे असे संबोधण्यात येते.

सामान्यत: हे प्राणी म्हणजे बाह्य कंकाल निर्माण करून त्यात राहणारी लहानशी समुद्रपुष्पेच होत. पोवळ्यातील जीव (पॉलिप समूहातील व्यक्तिगत प्राणी) स्वतःभोवती एक चषकासारखा, अरीय (त्रिज्यीय) वरंबे (कणा किंवा कंगोरे) असलेला कंकाल निर्माण करतो. हा कंकाल मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेटयुक्त (अ‍‌ॅरॅगोनाइटाचा बनलेला) असून तो प्राण्याच्या बाह्यस्तरापासून स्रवला जातो. कंकाल नेमका कसा निर्माण होतो ह्याविषयी निश्चित अशी कल्पना नाही. तरीही बाह्यस्तराभोवती स्रवलेल्या कलिली [→ कलिल] आधारद्रव्यात कॅल्शियमी स्फटिकांचे अवक्षेपण होऊन (न विरघळणाऱ्या साक्यात रूपांतर होऊन) कंकालनिर्मिती होते, असे बहुतेकजण मानतात. कंकाल-रचना ही बरीच क्लिष्ट असून निरनिराळ्या पोवळ्यांत ती भिन्न प्रकारची असते. काही प्रकारांत कंकालाच्या शाखोपशाखाही असतात. कालांतराने प्राणी मेले, तरी पोवळ्यांचे कंकाल तसेच राहतात.

हायड्रोझोआ वर्गात पोवळ्याचे थोडेच प्रकार आढळतात. ह्यातील मिलिपोरा हा प्रकार उष्ण कटिबंधी सागरांत सर्व उथळ जागी किंवा सु. ३० मी. खोलीवर आढळतो. कंकाल पर्णाभ (पानाच्या आकाराचा) असून ३० ते ६० सेंमी. उंच असतो. तो असंख्य लहान व काही मोठ्या छिद्रांनी युक्त असतो. प्राण्यास शक्तिमान ⇨ दंशकोशिका असतात. प्रवाळभित्तींत ह्या पोवळ्याचे प्रमाण बरेच असते. स्टायलॅस्टर [आ. १ (आ)] हा प्रकार शाखायुक्त असतो, तर स्टायलँथिका [आ. १ (इ)] हा पुटासारखा किंवा लेपासारखा असतो. हे प्रकार उष्ण व उपोष्ण कटिबंधी सागरांत आढळतात.

आ. १. हायड्रोझोआ वर्गातील पोवळ्यांचे काही प्रकार : (अ) मिलिपोरा (आ) स्टायलॅस्टर (इ) स्टायलँथिका.

पोवळ्यांचे अनेक प्रकार अँथोझोआ ह्या वर्गातच मोडतात. रचनेतील फरकानुसार, तसेच एकाकी आहे की निवही (वसाहत करून राहणारे), मृदू आहे की शृंगी (शिंगासारखे) किंवा अश्मासारखे (दगडासारखे) आहे यावरून पोवळ्यांचे निरनिराळे प्रकार पडतात. ह्या वर्गातील काही प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. ट्युबिपोरा म्यूझिका किंवा लाल रंगाचे ऑर्गन पाइप कोरल [आ. २ (अ)], हेलिओपोरा किंवा निळे पोवळे (ब्ल्यू कोरल), गॉर्गोनिया किंवा समुद्रव्यजन [आ. २ (आ)], कोरॅलियम किंवा लाल पोवळे [रक्त प्रवाळ, रेड कोरल आ २ (इ)], फंगिया नावाचे एकाकी पोवळे [आ. २ (ऐ)], फाबिया [आ. २ (उ)], ॲक्रोपोरा किंवा मॅड्रेपोरा [आ. २ (ऊ)]. मीअँड्रीना प्रकारातील ब्रेन कोरल [आ. २ (ए)] व रोझ कोरल [आ. २ (ई)], तसेच महासागरात १०० मी.हून अधिक खोलीवर असणारी अँटिपथीससारखी काटेरी (थॉर्नी) किंवा कृष्ण प्रवाळ [ब्लॅक कोरल आ. २ (ओ)] ही निवही पोवळी. अँटिपथीस डायकॉटोमाअँ. ग्रँडीस या काळ्या पोवळ्याच्या जाती हवाई येथे आढळतात. अँथोझोआ (ॲक्टिनोझोआ) या वर्गाचे ऑक्टोकोरॅलिया व हेक्झॅकोरॅलिया असे दोन उपवर्ग केलेले आहेत. ऑक्टोकोरॅलियात तीन गण असून त्यांपैकी पहिल्या गणात-ॲल्सिओनेरियात-लाल पोवळे, निळे पोवळे, ट्युबिपोरा इत्यादिकांचा समावेश होतो आणि दुसऱ्यात म्हणजे गॉर्गोनेरियामध्ये गॉर्गोनियासारख्या सगळ्या समुद्रव्यजनांचा समावेश होतो. हेक्झॅकोरॅलिया उपवर्गात पाच गण असून त्यांतील दुसऱ्यात अश्म प्रवाळांचा आणि चौथ्यात काळ्या पोवळ्यांचा समावेश होतो [→ऑक्टोकोरॅलिया हेक्झॅकोरॅलिया].

वरीलपैकी मॅड्रेपोरा, मीअँड्रीना इ. प्रकारांस पोवळ्याचे खरे किंवा प्रमुख प्रकार म्हटले जाते. हे निवही प्रकार उष्ण कटिबंधी सागरांत उथळ (सु. ३३ ते ५० मी.) व २२° ते २५° से. तापमान असलेल्या पाण्यात आढळतात. हवाई येथे सापडणाऱ्या सोनेरी व बांबू पोवळ्यांच्या विशिष्ट जाती समुद्राच्या प्रकाशहीन भागात काहीशा स्वयंप्रकाशी आहेत, असे संशोधनात आढळून आले आहे. लेपिडीस ओलापा हे अशा बांबू पोवळ्याचे शास्त्रीय नाव आहे. अश्मासारख्या अत्यंत कठीण अशा मॅड्रेपोरा, मीअँड्रीना व इतर प्रकारांपासून प्रचंड आणि विस्तृत अशा प्रवाळभित्ती किंवा प्रवाळ खडक फ्लॉरिडा, वेस्ट इंडीज, आफ्रिकेचा पूर्व किनारा, मॅलॅगॅसी (मादागास्कर), ऑस्ट्रेलिया वगैरे ठिकाणी तयार झालेले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यापलीकडे जगप्रसिद्ध ⇨ ग्रेट बॅरिअर रीफ ही प्रचंड प्रवाळभित्ती असून ती सु. २,००० किमी. लांब व काही ठिकाणी किनाऱ्यापासून सु. १४५ किमी.पर्यंत सागरात पसरलेली आहे. दक्षिण ध्रुवाकडून येणाऱ्या थंड प्रवाहामुळे तापमान वाढीस सोयीचे नसल्याने दक्षिण अमेरिकेच्या व आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पोवळी जवळजवळ आढळतच नाहीत.

प्रवाळभित्ती आर्थिक दृष्ट्या फार महत्त्वाच्या असतात. कारण त्यांत निरनिराळ्या पोवळ्यांखेरीज स्पंज, कृमी, झिंगे, खेकडे वगैरे संधिपाद (सांधेयुक्त पाय असलेलेआर्थ्रोपॉड) प्राणी, मॉलस्का (मृदुकाय) व एकायनोडर्माटा या संघांतील प्राणी, अनेक प्रकारचे व सुंदर रंगांचे मासे, तसेच शैवल वनस्पतीही असतात. उथळ पाण्यात आढळणाऱ्या व प्रवाळभित्ती तयार करणाऱ्या बऱ्याच पोवळ्यांत झूक्लोरेला नावाच्या शैवल जातीच्या सहजीवी वनस्पती राहतात. पोवळ्याचे कार्बन डाय-ऑक्साइड व नायट्रोजनी उत्सर्गी पदार्थ झूक्लोरेला वापरतात आणि पोवळ्यास कंकाल तयार करण्यास मदत करतात. [→ प्रवाळद्वीपे व प्रवाळशैलभित्ति].


प्रवाळभित्ती असलेल्या सागरी भागात ‘प्रवाळ मत्स्योद्योग’ हा व्यवसाय विशेषतः उन्हाळ्यात फार जोरात चालतो. ह्यात किनाऱ्यापासून सु. ८ किमी. आत जाऊन, जड वजने लावलेली जाळी व ती ओढून घेण्याची साधने वापरून पोवळी तोडून मिळविली जातात. नंतर पकडलेला माल नौकेवर आणून पोवळ्यांचे निरनिराळे प्रकार प्रतीनुसार अलग केले जातात. पोवळ्यास कृमी व स्पंज यांपासून बरेच नुकसान पोहोचते. त्यामुळे रंग विटून, भोके पडून पोवळी खराब होतात. अशा कमी प्रतीच्या पोवळ्यांची किंमतही कमी येते. सामान्यतः अशी पोवळी सागरात परत टाकली जातात. पोवळ्याचा व्यवसाय मुख्यत्वे अल्जीरिया, ट्युनिशिया, स्पेन, सार्डिनिया, कॉर्सिका, सिसिली, नेपल्स उपसागर (इटली), जपान, हवाई वगैरे भागांत केला जातो. लाल पोवळे व काळे पोवळे हे प्रकार फार मौल्यवान आणि चांगली किंमत देणारे समजतात. भूमध्य समुद्र व जपानपासून काहीशा दूरवर सापडणाऱ्या लाल पोवळ्यात मध्यभागी लाल रंगाचा भरीव कॅल्शियमी कणा असतो. हा भाग जडजवाहीर तयार करण्यासाठी वापरला जात असल्याने हे पोवळे मौल्यवान ठरते. भारतात लक्षद्वीप, अंदमान बेटे तसेच श्रीलंका व मालदीव बेटे येथे मिळणारे काळे काटेरी पोवळे राजदंड मढविण्यासाठी वापरले जात असल्याने मौल्यवान समजले जाते. ह्या दोन्ही प्रकारांत थोड्याफार फरकाने कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम सल्फेट, फेरस ऑक्साइड, जैव (सेंद्रिय) पदार्थ, पाणी, फॉस्फोरिक अम्ल, सिलिका इ. पदार्थ असतात. भारतात हे दोन्ही प्रकार जास्त करून आयात केले जातात.

आ. २. अँथोझोआ वर्गातील पोवळ्यांचे काही प्रकार : (अ) ऑर्गन पाइप कोरल (ट्युबिपोरा मूझिका) (आ) समुद्रव्यजन (गॉर्गोनिया) (इ) लाल पोवळे (कोरॅलियम) : (१) कंकाल, (२) पॉलिप (ई) रोझ कोरल (उ) फाबिया (ऊ) ॲक्रोपोरा (मॅड्रेपोरा) (ए) ब्रेन कोरल (मस्तिष्क पोवळे) (ऐ) फंगिया (ओ) काटेरी पोवळे (थॉर्नी किंवा ब्लॅक कोरल आडवा छेद).

पोवळ्यास प्रवाल (प्रवाळ), विद्रुम असेही म्हटले जाते. हे एक प्रकारचे रत्न समजले जाते. लाल, गुलाबी,निळी,काळी,पांढरी अशा अनेक रंगांची पोवळी असतात. हे रंग लोह व कॅल्शियमी जैव पदार्थांच्या संयोगाने तयार होणाऱ्या रंगद्रव्यांमुळे निर्माण होतात. रंगांच्या विविध छटाही असू शकतात. उदा.,लाल रंगात पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लालसर,सशाच्या रक्तासारखे, डाळिंबाच्या फुलासारखे शेंदरी,कमळाच्या पाकळीप्रमाणे लाल अशा छटा पाडल्या जातात. पोवळ्याची किंमत त्याचा रंग, तेज, भरीवपणा, घट्टपणा, घडणावळ कशी आहे इ. गोष्टींवर अवलंबून असते. पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल किंवा पिवळ्या रंगात लाल झाक असलेले, तकतकीत, लांबट, गोलाकार, सरळ, स्निग्ध, जाडसर, छिद्रे नसलेले, वजनदार पोवळे श्रेष्ठ प्रतीचे समजतात. पांढरट, रेखा, पटल, ठिपके,छिद्रे असलेले किंवा फूट असलेले पोवळे निकृष्ट प्रतीचे समजले जाते.

 पोवळ्यांचा उपयोग माळा,अंगठ्या, कंकण, ब्रूच (कपडा नीट बसण्याकरिता लावायची नक्षीदार टाचणी किंवा अडकवण) इ. अलंकार व जडजवाहीर तयार करण्यासाठी केला जातो. राजदंड, पावा, साज, शोभेच्या वस्तू व हत्यारे मढविण्यासाठीही पोवळी वापरली जातात. पोवळी कापून विशिष्ट आकार देणे, त्यांना तकाकी आणणे, त्यावर उत्तम कोरीव काम करून निरनिराळ्या आकृत्या व नक्षीचे उठावकाम करणे हा फार मोठा कलात्मक व्यवसाय असून हे काम इटालियन कारागीर अत्युत्कृष्ट करतात. मंगळ ग्रहाच्या पिडेचे निवारण करण्यास पोवळे हे रत्न अंगावर धारण करण्यास सांगितले जाते. रोमन लोक पोवळ्याचा उपयोग पीडानिवारणार्थ व औषधासाठीही करीत असत. आयुर्वेदात पोवळे हे कान्तिवर्धक, त्रिदोषनाशक, दृष्टिदोषनाशक, विषनाशक, शुक्रवर्धक म्हणून मानले जाते. मधुमेह, रक्ती मूळव्याध, मूत्र विकारांत विशेषतः मौल्यवान पोवळी भस्मीकरण करून वापरली जातात. औषधासाठी प्रवाळभस्माचा वापर म्हणूनच आयुर्वेदात सांगितलेला आहे [→ प्रवाळभस्म]. प्रवाळभित्तीपासून निकर्षणाने (खणून व खरवडून काढण्याच्या क्रियेने) व उत्स्फोटनाने मिळणारे द्रव्य रस्ते बांधण्यास उपयोगी पडते.

प्राचीन ग्रीक लोक लाल पोवळे अमरत्वाचे प्रतीक मानीत,तसेचते गाऊट रोग,विषे व जादूटोणा यांसारख्या सर्व प्रकारच्या पिडांपासून रक्षण करणारे व सर्व रोगांवरील औषध मानले जात असे. त्यामुळे दृष्ट लागत नाही असेही समजले जाई. लाल व गुलाबी पोवळी बाळगणाऱ्या व्यक्ती नशीबवान असल्याचे अजूनही मानले जाते.

पोवळ्यांपासून होणाऱ्या आर्थिक फायद्यासाठी त्यांची बेसुमार पकड होत आहे. यामुळे त्यांची योग्य प्रमाणात वाढ होत नसल्याने १९७७ मध्ये हवाई येथील शासनाचे विशिष्ट भागातील पोवळी पकडताना त्यांचे वजन व आकारमान विशिष्ट प्रमाणापेक्षा कमी असू नये असे निर्बंध घातलेले आहेत. (चित्रपत्र).

 संदर्भ : 1. Hyman, L. H. The Invertebrates, Vol. I, New York, 1940.

             2. Silverberg, R. World of Corals, New York, 1965.

परांजपे, स. य. चिन्मुळगुंद, वासंती रा.


पोवळे