बोधन : (कॉग्निशन). विषयवस्तूचे ज्ञान होताना घडणाऱ्या (जागरण, जाणीव, वेदन, अवघान, संवेदन, आकलन, पुनर्बोधन, स्मृती, संकल्पन, निश्चयन, भेदन-सामान्यीकरण, कारणन, प्रतिमा, प्रतिभा, भाषा, वेदनीय स्नायवी स्पंदन, विचार इ. अनेकविध छटा असू शकणाऱ्या) मानसिक प्रक्रियेस बोधन म्हणता येईल. बोधनात एकसमयावच्छेदेकरून या सर्व छटा एकाच वेळी सारख्याच प्रमाणात असतील असे नाही. विद्यूत्‌धक्क्यामुळे होणारे दुःखवेदन, हापूससेवनाने होणारे किंवा त्याची माहिती मिळाल्याने होणारे सुखसंवेदन, चित्रकलेच्या सौंदर्याची प्रतीती किंवा तत्त्वचिंतनाचा किंवा चर्चेचा अनुभव अशा विविध छटांची उदाहरणे बोधनासंबंधी देता येतील. फार काय, बोधनात कोणती मानसिक प्रक्रिया येत नाही, असाच उलटा प्रश्न करावा लागेल. मानवाने त्याच्या हजारो वर्षांच्या ज्ञानसाधनेत या अफाट विश्वाबद्दल जे जे काही समजून घेतले आहे, त्या प्रचंड ज्ञानभांडारासही बोधन असे व्यापक अर्थाने म्हणता येईल.

मानसशास्त्रज्ञ मात्र मानवी ज्ञानभांडारापेक्षा ज्ञानसंपादनप्रक्रियेस – बोधनास – अधिक लेखतात मग ती जाणीव किंवा वेदन या प्रक्रियेसारखे कितीही सरलतम असो. गेल्या शंभर वर्षांच्या प्रायोगिक मानसशास्त्राच्या इतिहासात बोधन या संकल्पनेने अनेक चढ-उतार पाहिले. बोधन-भावन-वर्तन (कॉग्निशन-अफेक्शन-कोनेशन) या त्रिपुटीत रचनावाद्यांनी बोधनास एकतृतीयांशच महत्त्व दिले. वॉटसनसारख्या वर्तनवाद्यांनी व फ्रॉइडसारख्या मनोविश्लेषकांनी त्याचे महत्त्व शून्यावर वा त्याच्याही खाली ऋणमूल्यावर नेऊन ठेवले. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही बुद्धिवादी मताच्या विरुद्ध स्वच्छंदतावादी, वेदनवादी (सेन्सेशनॅलिस्ट) वा बुद्धिविरोधवाद्यांची (इर्‌रॅशनॅलिस्ट्स) सरशी होत गेल्याने ‘बोधन’ संकल्पनेचे अवमुल्यन या शतकाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दशकापर्यंत होतच राहिले. जडवाद व अनुभववाद यांचाही या बोधनसंकल्पनेच्या ऱ्हासातील वाटा अनुल्लेखनीय खास नाही. मानसशास्त्रातील इतर काही मतांच्या पुरस्कर्त्यानीही – उदा., प्रेरणा वा प्रवृत्तीवाद्यानीही (मोटिव्हेशनल ऑर ॲटिट्यूड थिअरीज) ज्ञानप्रक्रियेस मानवाच्या प्रेरणांची प्रवृत्तींची वा भावभावनाविकारांची बटीक बनविले पण जणू काही चमत्कार घडावा त्याप्रमाणे विशेषतः यूरोपातील काही मानसशास्त्रज्ञांनी – रचनालक्षी, अस्तित्ववादी, सत्ताशास्त्रीय ज्ञानमीमांसा (आँटॉलॉजिकल एपिस्टिमॉलॉजी) इ. – त्यांची संशोधनाधारित मते नवीन स्वरुपात हिरिरीने मांडण्याचा उठाव केल्याने ‘बोधन’ या संकल्पनेस पुनर्जन्म प्राप्त झाला, असे म्हणता येईल. बोधनाची पुन्हा प्राणप्रतिष्ठा झाली आणि आता बोधनात्मक मानसशास्त्र (कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी) या शाखेस एक आगळेच महत्त्व आले आहे. त्याचे बरेचसे श्रेय प्याजे, सार्त्र, ब्रुनर इ. विचारवंताकडे जाते.

‘बोधन’ संकल्पनेचा उगम, विकास, ऱ्हास व पुनर्जन्म कसा झाला हे आपण पाहिले. ‘बोधनलक्षी मानसशास्त्रा’स आज महत्त्व येत आहे. ‘बोधन’ ही बहुरंगी प्रक्रिया आपल्या ज्ञानविकासात कोणते कार्य करते आणि ते कार्य करण्याची क्षमता बोधनात कोठून येते याचा विचार करावा लागेल. बोधन या प्रक्रियेविषयी बोधन मानसशास्त्रज्ञांत गेल्या तीन-चार दशकांत इतर कोणते विचारप्रवाह निर्माण झाले आणि सध्या त्या विचारप्रवाहांचे वळण कोणते हे ध्यानात येईल. जीवनास आवश्यक ते सर्व ज्ञान मानवात अगोदरच असते ते फक्त अविद्येने – अज्ञानाने – झाकाळून गेलेले असते. बोधन म्हणजे ही अविद्या, अज्ञान (माया) दूर होण्याची प्रक्रिया, ही या विषयाची आपल्या म्हणजे भारतीय तत्त्वज्ञांची ऐतिहासिक भूमिका झाली. ती भूमिका आपणास थोड्याफार फरकाने प्लेटो, हेगेल, बर्क्ली, कांट इ. चिद्वादी तत्त्वज्ञांमध्येही दिसून येते. हेगेल, लायप्निट्स इत्यादीनी त्यांत विकासकल्पनेचा अंतर्भाव केला पण त्यावरुन बोधनप्रक्रियेच्या स्वरुपाचा बोध नीट होईना. डार्विनच्या विकासवादामुळे या प्रक्रियेवर प्रकाश पडू शकला असता, पण लॉईड मॉर्गन, थॉर्नडाइक, पाव्हलॉव्ह, वॉटसन इ. वर्तनवाद्यांनी ‘बोधन’ ही संकल्पना त्यांना व्हुंट, टिचनर इ. अंतर्निरीक्षणवादी व रचनालक्षी मानसशास्त्रज्ञ यांच्या ‘जाणीव’ (कॉन्शसनेस) या तत्त्वाकडे खेचत नेईल अशी भीती वाटल्याने, त्यांनी बोधनाचे महत्त्व शक्य तितके कमी करून टाकले. या परिस्थितीत बोधनमानसशास्त्रास पुन्हा उर्जितावस्था आणण्याचे कार्य स्विस शास्त्रज्ञ झां प्याजे यांनी प्रथम केले. प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांट यांनी मानवी ज्ञानाचे विश्लेषण करताना आकलनप्रक्रियेचे गट असतात (कॅटेगरीज ऑफ अंडरस्टँडिंग किंवा ट्रॅन्सेन्डेंटल फॉर्म्स ऑफ पर्सेप्शन) आणि ते आपल्या ज्ञानप्रक्रियेत अनुस्यूत असतात तसेच स्वरुपतः प्रत्यक्ष ज्ञानाची ती परारुपे असतात असे मत मांडले. ही रुपे किंवा तत्त्वे म्हणजे अवकाश, काल ही प्रत्यक्ष ज्ञानाची दोन परारुपे व कारणभाव, संबंध इ. बारा प्रकारची आकलनाची (अंडरस्टँडिंग) बारा रुपे होत असे कांट यांनी प्रतिपादिले. परारुपे असूनसुद्धा ती आपल्या लौकिक ज्ञानात कशी कार्य करु शकतात याचे उत्तर कांटच्या तत्त्वज्ञानात मिळू शकले नाही आणि त्यानंतर काही शतके तत्त्वज्ञांतील इतर मतमतांतरामुळे हे प्रश्न अनुत्तरित राहिले. प्याजे यांचे मुख्य कार्य म्हणजे बोधन हे विकासशील आहे व व्यक्तीच्या वयोमानानुसार त्याच्या विकासाच्या अवस्था आहेत हे विकासवादी तत्त्व आणि कांटचे ज्ञानातील आकलनाचे पदार्थप्रकार हे तत्त्व अशा दोन तत्त्वांचा समन्वय साधणे. ज्ञान हे विशिष्ट अनुभवांतून मिळते ही अनुभववाद्यांची भूमिकाही प्याजे यांनी आपल्या प्रयोगांच्या आधारे गौण मानली. त्यामुळे प्याजे यांच्या मतप्रणालीस ज्ञानमीमांसात्मक सत्ताशास्त्र, अस्तित्ववाद किंवा रचनालक्षी मानसशास्त्र असेही म्हणतात. बोधनात अनुस्यूत असलेली बोधनसंरचिते (कॉग्निटिव्ह स्ट्रक्चर्स) त्या त्या वेळी व्यक्तीच्या आयुष्यात विकसित रुप धारण करतात म्हणून ज्ञानविकास होते, हाच प्याजे यांचा बोधनात्मक रचनावाद, बोधनात्मक अस्तित्ववाद किंवा ज्ञानमीमांसात्मक सत्तावाद होय. पण प्याजे यांची विशिष्ट अनुभवास ज्ञान किंवा बोधन विकासात गौण स्थान देण्याची भूमिका ब्रूनरसारख्या इतर बोधन मानसशास्त्रज्ञांस मान्य नाही. ब्रूनरच्या मताप्रमाणे ज्ञानविकासात वयापेक्षा मानवास पूर्ण आत्मकेंद्रिततेपासून (एगोसेंट्रिझम) कमी कमी आत्मकेंद्रिततेकडे नेणाऱ्या परिस्थितीस (एन्व्हायर्‌न्मेंट) प्रत्यक्षज्ञानक्षेत्रात (पर्सेप्चुअल फील्ड) अधिक महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती किंवा त्याचे प्रत्यक्ष ज्ञानक्षेत्र त्या व्यक्तीच्या संस्कृतीवर अवलंबून असते. त्या त्या संस्कृतीने निर्माण केलेली हत्यारे व साधने ही व्यक्तीमात्राकडून बोधनक्रियेत अंतःसमावेशित केली जातात (इन्टर्नलाइज्ड). प्याजे यांचे बोधनात्मक रचनावादाचे तत्त्व ब्रूनर यांना मान्य आहे. ज्ञान हेही एक वर्गीकरणच आहे. कृती, प्रतिमा व चिन्हे (सिंबल) ही प्रत्येक संस्कृतीची ज्ञानसाधने होत. व्यक्तीतील औत्सुक्य व शोधवृत्ती ही या अशा अंतःसमावेशनास मदत करतात. या प्रक्रियेत व्यक्तीच्या आकलनाची तीन प्रातिनिधिक रुपे (रिप्रेझेंटेशन ऑफ रिॲलिटी) आकारास येत असतात. त्यांना जेरोमी ब्रूनर इनॅक्टिव्ह, आयकॉनिक व सिंबलिक पद्धती म्हणतात (क्रियारुपे, दृष्टरुपे व प्रतीकरुपे). बालवयातून तारुण्यावस्थेत जाताना व्यक्तीच्या ज्ञानविकासात प्रतीकात्मक रुपे फार महत्त्वाची ठरतात.

बोधनातील मानसिक प्रक्रियांचा किंवा या लेखाच्या प्रारंभी उल्लेख केलेल्या अनेकविध छटांच्या रुपांची ज्ञानसंपादनातील कामगिरी पूर्णपणे वा शास्त्रीय दृष्टिकोणातून समजून घेण्यास आपणास बोधनात्मक मानसशास्त्राच्या पलीकडे झेपावून सर्वसामान्यपणे ज्यास ‘बोधनशास्त्रे’ (कॉग्निटिव्ह सायन्सेस) म्हणतात अशा ज्ञानशाखांच्या गटांत शिरले पाहिजे. या शास्त्राच्या दृष्टिकोणाप्रमाणे मन व शरीर किंवा रचनावाद व कार्यवाद (फंक्शनॅलिझम) असे भेद नवीन माहितीच्या अपेक्षेने लटके ठरतात, या ज्ञानशास्त्रांच्या गटामध्ये अपुरे वाटतात. या भूमिकेतून पाहिले असता गेल्या १०-१५ वर्षांत मानसिक बोधनक्रियांची एक नवीन उपपत्ती मांडणारा कार्यवाद प्रभावी ठरत आहे. या कार्यवादाचे मूळ कृत्रिम बुद्धिच्या (आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स) स्वरुपाविषयी तत्त्वज्ञांनी केलेली चिंतने, गणकयंत्रविज्ञान, भाषाशास्त्र, मेंदूयंत्रविज्ञान आणि मानसशास्त्रातील संशोधने या सर्वांतच आढळते. या सर्व शाखांना सामावणाऱ्या शास्त्राची नवीन शाखा म्हणजे ‘बोधनशास्त्रे’. या शाखांना मान्य असलेली काही तत्त्वे अशी : (१) मानसिक वा बोधनिक अवस्था या मज्जाशारीरिक घटनाही असतात (न्यूरोफिजिऑलॉजिकल इव्हेंट्स). (२) मानसिक किंवा बोधनिक अवस्था या भौतिक कारणश्रेणींचा परिपाक असू शकतात. वृत्तविश्लेषण (इन्फर्मेशन प्रोसेसिंग) करणाऱ्या सर्व प्रकारच्या बोधनप्रणालींच्या कार्यावरून बोधनप्रक्रियेचे काही सिद्धांत मांडता येतात. उदा., बोधनप्रक्रिया ही रचनात्मक तसेच निव्वळ कार्यात्मकही असते. काही बोधनावस्था केवळ शारीरिक तर काही निव्वळ मानसिक असतात. दुसऱ्या प्रकारच्या मानसिक बोधनावस्थेचे स्पष्टीकरण करण्यासाठी ट्यूरिंग यंत्रेही तयार करण्यात आली आहेत.

संदर्भ : Harper, R. J. C. Anderson, C. C. Christensen, C.M. Hunka, S. M. The Cognitive Processes, Readings, Engleood Cliffs, N.J., 1964.  

काळे, श्री. वा.