काचबिंदु : डोळ्यातील पुढच्या पोकळीतील द्रव पदार्थाचा (नेत्रजलाचा) दाब वाढल्यामुळे होणाऱ्या विकाराला काचबिंदु किंवा श्यामहरित रोग असे म्हणतात. या विकारात बाहुलीचा रंग पांढरट हिवरट दिसतो म्हणून हे नाव पडले आहे.

नेत्रजलाच्या परिवहनाचा मार्ग : (१) श्लेम नलिका, (२) फाँताना पोकळ्या, (३) स्वच्छमंडल, (४) पश्चागार, (५) पूर्वागार, (६) कनीनिका, (७) काच (भिंग), (८) लोमश प्रवर्ध, (९) लोमश स्नायू.

नेत्रजलाची उत्पत्ती कनीनिकेच्या (डोळ्यांतील गोलाकार काळ्या दिसणाऱ्या चकतीच्या) मागे पश्चागारात म्हणजे मागील पोकळीत लोमशकायेमध्ये (केसल पिंडामध्ये) होते. तेथून ते कनीनिका व काच यांच्यातील फटीतून पूर्वागारात (पुढील पोकळीत) येते. कनीनिकेची पुढची बाजू व स्वच्छमंडल (डोळ्यांच्या तंतुमय आवरणाचा पुढचा पारदर्शक भाग) यांच्यामधील कोणत (पुरस्संपुट कोणत) असलेल्या लहान लहान पोकळ जागांतून (फाँताना पोकळ्यांतून, फाँताना या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या पोकळ्यांतून) ते बाहेरच्या बाजूच्या श्लेम नलिकेवाटे (श्लेम या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या नलिकेवाटे) नेत्रातील नीलांमध्ये वाहून नेले जाते.

प्राकृतावस्थेत (सर्वसामान्य अवस्थेत) या द्रवाचा दाब सु.१५ ते २५ मिमी. पाऱ्याइतका असतो. पुरस्संपुट कोणात होणाऱ्या द्रवशोषणाला रोध उत्पन्न झाला, तर नेत्रजलाचा दाब वाढतो व त्यामुळे हा विकार होतो.

काचबिंदू हा फार महत्वाचा नेत्रविकार आहे. अंधत्व येण्याच्या एकूण कारणांपैकी या विकारामुळे येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण १२-१५ टक्के असते. अज्ञान,उपेक्षा आणि वैद्यकीय सल्ल्याचा अभाव यांमुळे भारतात या विकारामुळे येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण जास्तच असावे. चाळीस वर्षावरील व्यक्तीपैकी दोन टक्के व्यक्तींमध्ये या विकाराची प्रवृत्ती दिसून येते. विकार त्वरित ओळखला गेला नाही, तरी सु.दहा टक्के रोगी पूर्ण अंध होतात म्हणून या विकाराचे निदान लवकर करणे ही गोष्ट फार महत्वाची आहे.

विशिष्ट मानववंशात या विकाराचे प्रमाणे अधिक असल्याचे दिसून आलेले नाही, पण ३० टक्के रोग्यांमध्ये काही आनुवंशिक प्रवृत्ती दिसून येते.पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या विकाराचे प्रमाण अधिक दिसून येते. थकवा, मनस्ताप, अंधारात सारखे काम करावे लागणे अशा गोष्टींचे पूर्ववृत्त आढळून येते.

प्रकार:काचबिंदूचे तीन प्रकार कल्पिले आहेत: (१) मूलभूत, (२) गौणआणि (३) जन्मजात.

(१) मूलभूत काचबिंदू:या प्रकारात विशेष असे काही कारण लक्षात येत नाही. याचे दोन पोटप्रकार आहेत. एका प्रकारात डोळ्यांला शोध (दाहयुक्त सूज) येतो. बाहुली प्रथम भुरकट दिसू लागते. कपाळ दुखणे व दिव्याभोवती रंगीबेरंगी वलये दिसणे ही प्राथमिक लक्षणेही दिसतात. अशी लक्षणे मधूनमधून उत्पन्न होतात व नाहीशी होतात. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही, पण पुढे एकाएकी डोळ्यांत भयंकर वेदना होऊ लागून डोळा लाल होतो. डोकेदुखी उलट्या वगैरे लक्षणे होऊन दृष्टी झपाट्याने कमी कमी होत जाते. वेळच्यावेळी उपचार न झाल्यास पूर्ण अंधत्व येते. क्वचित आपोआप बरे वाटते पण दृष्टी मात्र पुष्कळच कमी होते. याचेच रुपांतर चिरकारी (कायम स्वरुपाच्या जुनाट) काचबिंदूत होते. बाहुली प्रसृत (मोठी) व स्तब्ध झालेली असून तिचा रंग हिरवट भुरकट दिसू लागतो.

दुसऱ्या प्रकारात डोळ्यांला सूज वा शोथ येत नाही. हा प्रकार अधिक प्रमाणात दिसतो. यात लक्षणे अगदी हळूहळू वाढत जातात. रक्तवाहिन्या अधिक टणक होत गेल्यामुळे हा प्रकार होत असावा. यात लक्षणे इतकी हळूहळू वाढत जातात की, रोग्याला ते वयोमानामुळे होत आहे असे वाटते. डोळे व डोके दुखणे, चष्म्याचा नंबर वारंवार बदलावा लागणे, वाचन, लेखन वगैरे जवळची कामे करण्यास कष्ट पडणे आणि दृष्टिक्षेत्र हळूहळू कमी कमी होत जाणे ही लक्षणे असतात. समोर पाहिले असता स्पष्ट दिसते पण बाजूची दृष्टी कमीकमी होत जाते.

(२) गौण प्रकार:बहुधा डोळ्यांला झालेल्या इजेमुळे, रक्तस्त्राव झाल्यामुळे अथवा डोळ्यांच्या स्वच्छमंडळ, काच वगैरे भागांच्या विकृतीमुळे हा प्रकार उत्पन्न होतो.

(३) जन्मजात प्रकार:भ्रूणावस्थेत (विकासाच्या पूर्व अवस्थेतील बालजीवाच्या अवस्थेत) श्लेम नलिकेची उत्पत्ती नीट झाली नसल्यामुळे हा प्रकार दिसतो. हा प्रकार अगदी क्वचित आढळतो.

निदान:डोळे तपासले असता दृग्बिंब (डोळ्याच्या आतील पडद्यावरील मज्जातंतूंचा बनलेला भाग) खोल आणि चषकाकार दिसते. त्यातील तंत्रिका तंतूवर (मज्जातंतूवर) दाब पडल्यामुळे त्याचे कार्य नीट चालत नाही आणि त्यामुळे अंधत्व येते. दृग्बिंब पांढरट व फिकट दिसते.

डोळ्यातील पुरस्संपुट कोण तपासण्याची एक विशेष पध्दत आहे. तिला कोणपरीक्षा (गोनिओस्कोपी) असे म्हणतात.या पध्दतीमध्ये कनीनिका व स्वच्छमंडल यांमध्ये होणारा पुरस्संपुट कोण विशेष प्रकारे तपासता येतो. स्वच्छमंडलाची संवेदनक्षमता विशेष औषधांनी नाहीशी करुन ही परीक्षा करता येते.

दूसरी एक तपासण्याची पध्दत म्हणजे डोळ्यांतील दाब तपासणे. हातांच्या तर्जन्या डोळ्यांवर शेजारी शेजारी ठेवून एक दाबली असता तरंग उत्पन्न होतो.त्यावरुन आतील दाबाची कल्पना करता येते. दाब तपासण्यासाठी दाबमापक यंत्रही उपलब्ध आहे. या यंत्राने प्रत्यक्ष दाब किती आहे ते मोजता येते. मात्र प्राकृतावस्थेतही डोळ्यांतील दाब दिवसातून अनेक वेळा बदलत असल्यामुळे या यंत्राने अनेक वेळा परीक्षा करावी लागते. २५ मिमी. पाऱ्याच्या दाबापेक्षा दाब सारखाच वाढलेला दिसला तर काचबिंदूचे निदान करता येते. तीव्र डोके दुखी, ओकाऱ्या वगैरे लक्षणांमुळे मेंदूमध्ये दाब वाढविणाऱ्या रोगापासून व्यवच्छेदक (फरक दाखविणारे) निदान करावे लागते.

चिकित्सा:बाहुली आकुंचित करणारी पायलोकार्पिनासारखी औषधे वापरल्यास तात्पुरते बरे वाटते. मूत्रल (लघवी साफ करणारी) औषधे दिल्याने शरीरातील द्रव कमी पडूनही थोडा गुण येतो. निदान करुन शस्त्रक्रिया त्वरित केली तर चांगला गुण येऊन दृष्टिनाश टाळता येतो. बाहुलीचा विस्तार करणारी ॲट्रोपिनासारखी औषधे कटाक्षाने टाळणे जरुर आहे कारण त्यामुळे लक्षणे अधिक तीव्र होतात.

 

पहा : डोळा नेत्रवैद्यक.

चिटणीस, व. के.