मुद्रा-३ : (सील्स.) प्राचीन संस्कृतींमधून एका विशिष्ट अर्थाने वापरात असलेले मणी किंवा मूल्यवान दगड. त्यांचा उपयोग मऊ ओलसर मातीवर प्रतिकृती उमटविण्यासाठी ठसा म्हणून केला जात असे. सुरुवातीच्या मुद्रा या मंत्रसिद्ध ताईतासारख्या होत्या कारण त्यांचा उद्देश भुतपिशाश्चादी दुष्ट शक्तींपासून किंवा जादूटोण्यापासून संरक्षण मिळावे, हा होता. पुढे मुद्रांचे प्रकार वाढले आणि त्यांना विशिष्ट संदर्भात भिन्न अर्थ प्राप्त झाले. जगातील प्राचीन अवशेषांकरिता प्रख्यात असलेल्या मध्यपूर्वेत, विशेषतः ईजिप्त व मेसोपोटेमियात पुरातत्त्वीय उत्खननात असंख्य मुद्रा सापडल्या आहेत. याशिवाय आग्नेय यूरोप व भारतातही मुद्रा मिळालेल्या आहेत. या सर्वांचे उपयोग विविध असून कारागिरीदेखील निरनिराळी आढळते. मध्यपूर्वेतील नवाश्मयुगीन व ब्राँझयुगीन मुद्रा सर्वांत प्राचीन आहेत.

मुद्रांचा वापर कसा सुरू झाला, याची निश्चित माहिती ज्ञात नाही परंतु जादुटोणा अथवा संरक्षक वस्तू या कल्पनेशी अभिप्रेत असलेल्या मंत्रसिद्ध ताईतातून त्यांचा उगम झाला असावा, असे तज्ञांचे मत आहे. नंतरच्या काळात मुद्रेचा उपयोग मालकी अथवा अधिकृतपणा दर्शविण्यासाठी झाला असावा.

मुद्रांचे आकार व प्रकार विविध आढळतात परंतु सपाट मुद्रा आधी प्रचलित झाल्या असाव्यात. त्यांवर भौमितिक रचनाबंध व प्राण्यांच्या आकृत्या आहेत. ती गणचिन्हे किंवा जादूटोण्याची प्रातिनिधिक चिन्हे असावीत. मध्यपूर्वेत दंडगोल (सिलिंड्रिकल) आकाराच्या मुद्रा प्रचलित होत्या. त्या ओल्या मातीवर फिरवल्या तर त्यावरील उत्कीर्ण ठसे सलग एकापुढे एक उमटले जात. ईजिप्तमध्ये मूल्यवान रत्नांवर निरनिराळे आशय किंवा चिन्हे उत्कीर्ण केली जात. ही रत्ने तेथील पवित्र शेणकिड्याच्या आकाराची असत. लेखनकलेचा शोध लागल्यानंतर मुद्रांवर अक्षरे उमटविण्यात येऊ लागली. पॅलेस्टाइनमधील मगिडो येथे १९०४ मध्ये आढळलेली मुद्रा या दृष्टीने उल्लेखनीय आहे.

भारतात शेकडो मुद्रा सापडल्या असून हस्तिदंत, मूल्यवान दगड. रत्ने व माती यांच्या त्या बनविलेल्या आहेत. सर्वांत प्राचीन मुद्रा सिंधू संस्कृतीच्या उत्खननात मिळाल्या असून त्या स्टीअटाईटच्या आहेत. त्यांवर विविध प्राणी, देवदेवता आणि सांकेतिक लिपीतील चिन्हे/अक्षरे (?) आढळतात. या मुद्रांचा काय उपयोग असावा, हे अद्यापि ज्ञात झाले नाही. यांवरील लिपीचे वाचनही अद्यापि निश्चित ठामपणे झालेले नाही.

ऐतिहासिक कालातील स्थलांचा अवशेषांच्या उत्खननात, विशेषतः बसार व भीटा या दोन स्थली अनेक मुद्रा सापडलेल्या आहेत. अमरावती, बेसनगर, ब्राम्हणबाद, कासिया, पाटलिपुत्र, राजगीर, सारनाथ, तक्षशिला व नालंदा येथे ज्या मुद्रा सापडल्या आहेत, त्यांवर चैत्य, स्वस्तिक, लक्ष्मी, चक्र, स्तूप, शिवलिंग इ. विविध प्रतीकात्मक चिन्हे आहेत. काहींवर व्यक्तिनामे वा राजनामे असून काही मुद्रा अधिकाऱ्यांच्या, धार्मिक संस्थांच्या, रक्षकांच्या श्रेणींच्या अथवा बौद्ध विहारांच्या आहेत. 

देव, शां. भा.

पॅरिस नगरीची मेणाची/लाखेची मुद्रा इ.स. १४१२.गोमेद मण्याच्या अंगठीवरील प्राचीन ग्रीक मुद्रेचा नमुना, इ.स.पू. ४२०-४७०.गोमेदच्या अंगठीवरील प्राचीन ईजिप्शियन शाही मुद्रा, इ.स.पू. २०८० ते १६४०.प्राचीन मोहें-जो-दडो येथील मातीच्या मुद्रा, भारत.उगवता सूर्यदेव, बॅबिलोनियन मुद्रा.चीन या राजवंशाची अधिकृत मुद्रा, इ.स.पू. २४९ ते २२१.

ईलम संस्कृतीच्या काचखळीच्या दंडगोलाकार मुद्रा, इ.स.पू. ४ थे सहस्त्रक.बॅबिलोनियन मुद्रा, इ.स.पू. पहिले सहस्त्रक.