दासपंचायतन : समर्थ ⇨ रामदास व त्यांच्या चार समकालीन अनुयायांना ‘दासपंचायन’ असे नाव रामदासांच्या काळात दिले गेले होते. जयरामस्वामी वडगावकर, रंगनाथस्वामी निगडीकर, आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर आणि केशवस्वामी भागानगरकर हे दासपंचायतनात अंतर्भूत असलेले समर्थांचे अनुयायी होत.

जयरामस्वामी वडगावकर (१५९९–१६७३) हे सातारा जिल्ह्यातील वडगावच्या गादीचे अधिपती. ह्या गादीचे संस्थापक शांतलिंगाप्पा ऊर्फ शांतेश्वर महाराज ह्यांचे शिष्य कृष्णाप्पास्वामी हे जयरामस्वामींचे गुरू. जयरामस्वामी हे कात्राबाज मांडवगणचे देशपांडे असून त्यांचे उपनाव कसरे असे होते. सीतास्वयंवर (१६४८), रुक्मिणीहरण (१६५४) आणि अपरोक्षानुभव (१६६९) हे त्यांचे काही ग्रंथ. ह्यांच्या चरित्राची एक बखरही उपलब्ध आहे.

रंगनाथस्वामी निगडीकर (१६१२–८४) हे आनंदसंप्रदायी. त्यांचे उपनाव खडके. निगडी येथे ते राहत. निजानंद ऊर्फ बोपाजी ह्या आपल्या पित्याचेच शिष्यत्व त्यांनी स्वीकारले होते. आईचे नाव बयाबाई. गजेंद्रमोक्ष, गुरुगीता, शुकरंभासंवाद, पंचीकरण, भानुदासचरित्र इ. ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. ह्यांखेरीज योगवासिष्ठसार असाही एक ग्रंथ त्यांच्या नावावर मोडतो. तथापि हा ग्रंथ रंगनाथस्वामी निगडीकरांचा नसून एकनाथकालीन रंगनाथ मोगरेकरांचा असावा, असे दत्तो वामन पोतदारांसारख्या काही अभ्यासकांचे मत आहे. अनंत आणि गोपाळ हे निगडीकरांचे प्रमुख शिष्य.

आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर (? –१६९६) हे रंगनाथस्वामी मोगरेकरांच्या परंपरेतील. सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे त्यांचा मठ आहे. त्यांच्या वडिलांचे नाव बाळंभट बिन भानभट. रघुनाथस्वामी हे त्यांच्या गुरूचे नाव. आनंदमूर्तींनी गीताटीका लिहिली होती, असे भक्तमंजरीकार राजारामप्रासादी म्हणतो. तथापि ही गीताटीका उपलब्ध झालेली नाही. त्यांनी एक रामचरित्र लिहिले होते, असेही म्हटले जाते.

केशवस्वामी भागानगरकर (? – १६८२) हे भागानगर येथे तानाशा नावाच्या गृहस्थांकडे कारभारी होते. त्यांनी काशिराज स्वामींचा अनुग्रह घेतला, असे महाराष्ट्र सारस्वतकारांचे मत. तथापि केशवस्वामींच्या पदांतून पूर्णानंद, सहजानंद आणि नित्यानंद अशा तीन आनंद–सांप्रदायिकांची नावे गुरू म्हणून येतात. रा. चि. ढेरे ह्यांसारखे अभ्यासक केशवस्वामींना मुकुंदराजांच्या संप्रदायातील मानतात. आत्मारामकृत दासविश्रामधामातही तसे म्हटले आहे. ह्या दासविश्रामधामात आणि राजारामप्रासादीकृत भक्तमंजरीत केशवस्वामींचे चरित्र आलेले आहे. महीपती व भीमस्वामी ह्यांनीही ते थोडक्यात दिलेले आहे. तथापि ह्या चरित्रकारांच्या निवेदनांत एकवाक्यता आढळत नाही. त्यांचा समाधिसनही १६८२ आणि १६८६ असा दोन प्रकारे दिला जातो. तथापि १६८२ हा सामान्यतः मानला जातो. कै, खरशीकरशास्त्री ह्यांनी संपादिलेल्या केशवस्वामींच्या कवितेत ८४७ पदे, ४५ सवाया व २१८ श्लोक अंतर्भूत आहेत. काव्यसंग्रह ह्या मासिकाने त्यांची काही पदे प्रसिद्ध केली. धुळ्याच्या श्रीसमर्थवाग्देवता मंदिरातील काही बाडांतूनही केशवस्वामींची कविता आढळते. हैदराबाद येथे त्यांची समाधी आहे.

दासपंचायतनात रामदासांबरोबर ह्या चौघांचाच समावेश का केला गेला, हे कळत नाही. रामदासांच्या तुलनेत ह्या चौघांचे कर्तृत्व सामान्य वाटते.

सुर्वे, भा. ग.