एल्हण : (चौदावे शतक). महानुभाव कवी. आपल्या काव्यात त्याने आपले नाव ‘एल्हणा’ असे दिले आहे. त्याचा कृष्णचरित्रावरील आठै सैंवरे हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ह्याच काव्याचा निर्देश कित्येकांनी श्रीकृष्णषोडशसहस्त्रविवाह अष्टस्वयंवर वर्णन (अष्टनायिकाविवाह) असा केला आहे. ह्या आठै सैंवराचे एकूण बारा भाग किंवा प्रसंग आहेत. रसाळ शैलीने लिहिलेल्या ह्या काव्यग्रंथात कृष्णाच्या अष्टनायिका (रुक्मिणी, जांबुवंती, सत्यभामा, सुमित्राविंदा, नाग्‍नजिती, लक्ष्मणा, भद्रा व कालिंदी) आणि त्याच्या सोळा सहस्त्र स्त्रिया ह्यांच्या विवाहांची वर्णने केली आहेत. ह्याच कवीचे वसंतवर्णन म्हणून एक काव्य स्वतंत्रपणे आढळते पण वस्तुत: तेआठै सैंवरे ह्या काव्याचे शेवटचे प्रकरण होय.

सुर्वे, भा. ग.