लक्ष्मण मोरेश्वरशास्त्री हळबेहळबे, लक्ष्मण मोरेश्वरशास्त्री :(? १८३१–१२ मे १९०४). महाराष्ट्रातील पहिले स्वतंत्र कादंबरीकार व अद्भुतरम्य कादंबऱ्यांचे अध्वर्यू. त्यांची कौटुंबिक माहिती उपलब्ध नाही. त्यांचा जन्म वेदशास्त्रसंपन्न कुटुंबात वाई (जिल्हा सातारा) येथे झाला. त्यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजे महालातल्या मठ या गावचे. उत्तर पेशवाईत त्यांचे पूर्वज वाई येथे येऊन स्थायिक झाले. त्यांचे घराणे वैदिक व वडील शास्त्री असल्यामुळे घराण्याच्या पठडीप्रमाणे त्यांचे संस्कृतचे अध्ययन वाई येथे घरीच झाले. अध्ययन पूर्ण झाल्यावर ते मुंबईस गेले. शास्त्रीपंडिताला शोभेसी विद्वत्ता असल्यामुळे मुंबईतील अनेक संस्थांशी त्यांचा संबंध आला. मुंबईतील इंदुप्रकाश या वृत्तपत्राशी व ते प्रकाशित करणाऱ्या इंदुविजय या कंपनीशी त्यांचा निकट संबंध होता. या वृत्तपत्राच्या प्रारंभीच्या व्यवस्थापकवर्गात ते होते. दादोबा पांडुरंग प्रभृतींनी स्थापन केलेल्या (१८४९) परमहंस मंडळीचेही ते सदस्य होते. परमहंस सभाही सुधारणांचा पुरस्कार करण्यासाठी – विशेषतः जातिभेद नष्ट करणे व विधवांच्या पुनर्विवाहास संमती – होती. या मंडळाच्या कार्यात लक्ष्मणशास्त्री आघाडीवर होते. वामनराव कोल्हटकर या तत्कालीन वाईकर गृहस्थांशी प्रथमपासूनच त्यांची घनिष्ठ मैत्री होती. इंदुप्रकाश या वृत्तपत्राबरोबरच त्यांचा ज्ञान-प्रसारक (१८५०) या मासिकाशी लेखक या नात्याने संबंध होता. ज्ञानप्रसारका त त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या होत्या. चंद्रिका (१८५४) या मासिकाचे ते संस्थापक–संपादक होते आणि १८५६ मध्ये त्यांच्या रत्नप्रभा या कादंबरीची काही प्रकरणे त्यात प्रसिद्ध झाली होती.

 

लक्ष्मणशास्त्री यांची पहिली कादंबरी मुक्तामाला (१८६१) आणि दुसरी रत्नप्रभा (१८६६) होय. मुक्तामाला या कादंबरीचे मूळ नाव मुक्तमाला असून चौथ्या आवृत्तीनंतर ते मुक्तामाला झाले. रत्नप्रभा ही कादंबरी त्यांनी अक्कलकोट संस्थानचे तत्कालीन रीजंट माधवराव विठ्ठल ऊर्फ दादासाहेब विंचुरकर यांस आदरपूर्वक नजर (अर्पण) केली होती. या दोन्ही कादंबऱ्या वाचकवर्गात लोकप्रिय झाल्या. बडोद्याचे संस्थानिक खंडेराव गायकवाड यांनी लक्ष्मणशास्त्री यांच्या मुक्तामाला या अद्भुतरम्य कादंबरीवर लुब्ध होऊन त्यांना वर्षासन चालू केले (१८७०). त्यांनी संखेडा तालुक्यात हरेश्वर गावाचा इस्तावा (सारा) त्यांना दिला होता. मुक्तामालापूर्वीच रत्नप्रभा या कादंबरीचे लेखन झाले होते, तरी ती त्यांनी नंतर फेरफार करून प्रसिद्ध केली. मुक्तामालाच्या प्रस्तावनेत लक्ष्मणशास्त्री लिहितात, “आमच्या लोकांस स्वभाषेंतील पुस्तकें वगैरे वाचण्याची गोडी लागावी या हेतूने यथामती हा ग्रंथ तयार केला आहे. ईश्वरी नियमास अनुसरून जे लोक नीतीने वागतात, त्यांस कितीही संकटे प्राप्त झाली तरी, ती सर्व दूर होऊन त्यांस शेवटी सुखच होते. ही गोष्ट स्पष्टपणे ध्यानात येण्याकरिता हा एक इतिहास लिहितो.ङ्घ मुक्तामाला या कादंबरीच्या आतापर्यंत बारा आवृत्त्या निघाल्या आहेत. तसेच १९१६ मध्ये गुजराती भाषेत तिचा अनुवाद झाला आहे रत्नप्रभेच्या दोन आवृत्त्या निघाल्या.

 

आधुनिक मराठीतील पहिल्या स्वतंत्र कादंबरीत मुक्तामाला या कादंबरीची गणना केली जाते. तिच्या मुळाशी नीतिबोध हा उद्देश असून त्यांच्या सुधारणावादी वृत्तीचे प्रतिबिंब या कादंबरीवर पडले आहे. कादं-बरीची नायिका मुक्तामाला हिच्या पतिनिधनाची वार्ता खरी मानून तिचे वडील शांतवर्मा हे समाजपरंपरेनुसार तिच्या केशवपनाची तयारी सुरू करतात. त्यावेळी तिच्या मनात निर्माण झालेले वादळ लक्ष्मणशास्त्री यांनी प्रत्यय-कारीपणे चित्रित केले आहे. त्याबरोबरच शांतवर्मा यांना ही प्रथा अश्लाघ्य वाटत होती, असेही दर्शविले आहे. मुक्तामालेची व्यक्तिरेखा अत्यंत वेधक व हृदयस्पर्शी आहे. सौंदर्य हे तिचे केवल एक बाह्यभूषण असून तिचे अंतरंगही सुंदर आहे. या कादंबरीचे कथानक नऊ भागांत मांडले असून, प्रत्येक भागाच्या शिरोभागी त्या त्या भागाचा सारांश व्यक्तविणारा सुभाषितवजा श्लोकही दिला आहे. संस्कृत महाकाव्यसदृश रचनाशैली, ऐतिहासिकता भासविणारी वातावरणनिर्मिती, तत्कालीन सामाजिक संदर्भ आणि अद्भुतरम्यता यांमुळे ही बोधपर व मनोरंजक असलेली कादंबरी विशेष लोकप्रिय झाली. लक्ष्मणशास्त्री यांची भाषा शुद्ध, सरळ, साधी पण भारदस्त असून त्यांची सृष्टिवर्णने रसाळ व यथार्थ आहेत. ही कादंबरी घटनाप्रधान असली, तरी तो तिचा खास विशेष नव्हे. मुक्तामालेचा आणि तिने निर्माण केलेल्या युगधर्माचा वैशिष्ट्यनिदर्शक शब्द अद्भुतरम्यता हा आहे. यानंतरच्या बहुतेक इंग्रजी अंमलातील कादंबऱ्या हिच्याच धाटणीवर लिहिल्या आहेत. त्यांच्या रत्नप्रभा या कादंबरीमध्ये विधवेच्या पुनर्विवाहाचा विषय त्यांनी प्रामुख्याने हाताळला आहे. एकंदरीत स्वकालीन वैचारिक आंदोलन आणि संस्कृत वळणाचे पूर्वकालीन कथानक यांचा संकर रत्नप्रभा या कादंबरीत झाला आहे. त्यामुळेच मुक्तामाले चा गौरव तिला लाभू शकला नाही.

 

लक्ष्मणशास्त्री हे सुधारकी मतांचे होते, तरी त्यांची वृत्ती धार्मिक होती. आळंदी येथील स्वामी श्री नृसिंहसरस्वती यांना ते आपले गुरू मानीत. नित्यनेमाने मंत्रजप, गुरुचरित्रा चे पारायण ते करीत असत. त्यांनी वाई येथील गंगापुरी घाटावर कृष्णामाईसाठी चौथरा बांधून तो कृष्णाबाई संस्थानला अर्पण केला. कृष्णोत्सवात कृष्णामाई याच चौथऱ्यावर विराजमान असते. या चौथऱ्यावर पूर्वाभिमुख कोरीव लेख असून त्यावर ‘श्री कृष्णाबाई चरणी तत्पर लक्ष्मण मोरेश्वरशास्त्री हळबे आणि मंडळी गंगापुरी शके १८२५ङ्ख (१९०३) असा मजकूर आहे.

 

वाई येथे त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

 

संदर्भ : हळबे, लक्ष्मण मोरेश्वरशास्त्री, मुक्तामाला, आवृ. दहावी, पुणे, १९६०.

 

पोळ, मनीषा