कैरॉज, यॅसा द : (२५ नोव्हेंबर १८४५–१६ ऑगस्ट १९००). वास्तववादी संप्रदायातील पोर्तुगीज कादंबरीकार. जन्म पॉव्हावा दे व्हर्जीं येथे. शिक्षण ओपोर्तो व कोईंब्रा येथे. कोईंब्रा विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली (१८६६). पोर्तुगालचा वाणिज्यदूत म्हणून हाव्हॅना, न्यू कॅसल, ब्रिस्टल आणि पॅरिस येथे काम केले. गाझेता द पोर्तुगाल  (इं. शी. गॅझेट ऑफ पोर्तुगाल) ह्या नियतकालिकातून निबंध लिहून त्याने वाङ्‍मयीन लेखनाचा ओनामा केला.

उ क्रिमी दु पाद्रि अमारू (१८७६, इं. भा. द. सिन ऑफ फादर अमारू १९६२) ही त्याची कादंबरी म्हणजे पोर्तुगीज वास्तववादी कादंबरीच्या विकासातील पहिला टप्पा होय. प्रीमु बाझीलिउ (१८७८, इं. भा. कझिन बाझीलिउ, १९५३) ही कादंबरी घाट आणि विश्लेषकता ह्या दोन्ही दृष्टींनी त्याच्या पहिल्या कादंबरीपेक्षा सरस आहे. अ रॅलीकिअ (१८८७, इं. भा. द. रेलिक, १९५४) ह्या कादंबरीत धार्मिक ढोंगीपणाचा उपरोध केलेला आढळतो. अ सिदाद ई अश सॅर्राशमध्ये (१९०१, इं. भा. द सिटी अँड द माउंटन्स, १९५५) त्याने भौतिक संस्कृतीचे विडंबन केले आहे.

कैरॉज हा निःसंशयपणे पोर्तुगीज वास्तववादी कादंबरीचा आघाडीचा प्रतिनिधी आहे आणि पोर्तुगीज भाषा-साहित्याला नवे शैलीदार वळण लावणाऱ्या दोन-तीन साहित्यिकांपैकी तो एक आहे. यूरोपीय संस्कृतीच्या सर्वोत्तम केंद्रांशी त्याचा परिचय असल्याने आपल्या देशाच्या मागासलेपणाचा तो तिटकारा करी. तथापि सरतेशेवटी त्याला आपल्या देशाचे निसर्गदत्त सौंदर्य कळून चुकले होते, हे त्याच्या शेवटच्या सर्वोत्तम कादंबरीवरून लक्षात येते. त्याच्या वाङ्‍मयीन कर्तृत्वासंबंधीच्या अपेक्षा वाढलेल्या असतानाच पॅरिस येथे तो निधन पावला.

रॉड्रिग्ज, एल्‌. ए. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)