बून्यिन, इव्हान : (२२ ऑक्टोबर १८७०-८ नोव्हेंबर १९५३). रशियन कथा-कादंबरीकार. जन्म अर्योल प्रांतातील व्हरॉन्यिश येथे एका गरीब आणि कनिष्ठ उमराव कुटुंबात. शिक्षण एलेट्स येथील शाळेत. मॉस्को विद्यापीठातही तो एक वर्ष शिकत होता. घरच्या गरिबीमुळे वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून कारकून, पत्रकार अशा चाकऱ्या तो करू लागला. आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीचा आरंभ ‘रोदिना’ (इं.शी. मदरलॅंड) आणि ‘नाद मगीलई स.या. नादसना’ (इ.शी.ऑन एस्.वाय. नॅडसन्स ग्रेव्ह) ह्यांसारख्या कविता लिहून केला. विख्यात अमेरिकन कवी लाँगफेलो ह्याच्या ‘सॉंग ऑफ हायावाथा’ ह्या काव्याच्या त्याने केलेल्या रशियन अनुवादास रशियन अकादमीने पुश्किन पारितोषिक बहाल केले होते. (१९०२). तथापि आज तो मुख्यतः कथा-काबंदरीकार म्हणूनच ख्यातकीर्त आहे. ‘अंतोन्विस्कये याब्लकी’ (१९१०, इं.शी.अंतोनॉव्ह ॲपल्स) आणि ‘गस्पदीन इज सान फ्रान्सिस्को’ (१९१५, इं.शी. द जंटलमन फ्रॉम सॅन फ्रॅन्सिस्को) ह्या त्याच्या विशेष गाजलेल्या कथा होत. ‘अंतोनॉव्ह ॲपल्स’ ह्या कथेत एका विशिष्ट प्रकारच्या सफरचंदांच्या वासावरून मनात निर्माण होणाऱ्या विचार-कल्पनांच्या साखळीच्या आधारे, मध्य रशियातील ऱ्हासाला लागलेल्या उमराववर्गाचे प्रभावी चित्रण त्याने केले आहे, तर ‘द जंटलमन फ्रॉम सॅन फ्रॅन्सिरको’ वर विख्यात रशियन साहित्यिक टॉलस्टॉय ह्याच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. दियेंव्हन्या (१९१०, इं.शी.व्हिलेज) आणि सुखदोला (१९११, इं.शी. वॉटरलेस व्हॅली) ह्या त्याच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. ‘व्हिलेज’ ह्या कादंबरीला मध्य रशियातील एका खेड्याची पार्श्वभूमी लाभलेली आहे. तत्कालीन रशियन जीवनातील दैन्य आणि अंधार ह्यांचे प्रत्ययकारी दर्शन बून्यिनने ह्या कादंबरीतून घडविलेले आहे. ‘वॉटरलेस व्हॅली’ ही त्याची कादंबरी आधुनिक रशियन साहित्यातील एक अत्यंत श्रेष्ठ अशी गद्यकृती समजली जाते. ह्या कादंबरीत त्याने दाखविला आहे, क्रुश्चेव्हनामक एका घराण्याचा ऱ्हास, एका नोकराणीच्या दृष्टिकोणातून त्याची हकीकत बून्यिनने मांडलेली आहे. रशियन क्रांतीला बून्यिनचा विरोध होता. १९२० मध्ये तो फ्रान्समध्ये जाऊन राहिला. तथापि विदेशात आमरण वास्तव्य असूनही आपल्या साहित्यकृतींतून रशियन जीवनाची वास्तववादी चित्रे त्याने रेखाटली. मीतिना ल्युबोव्ह (१९२५, इं.भा.मित्याज लव्ह, १९२६) व झिज्न आर्सेंन्येवा (१९३०, इं.भा.द वेल ऑफ डेज, १९३३) ह्या त्याच्या कादंबऱ्या त्या दृष्टीने लक्षणीय ठरतात. त्यांपैकी झिज्न आर्सेन्येवा ही कादंबरी आत्मचरित्रात्मक आहे. टॉलस्टॉय आणि चेकॉव्ह ह्या दोन रशियन साहित्यश्रेष्ठींवरही त्याने पुस्तके लिहिली आहेत. व्हस्पोमिनानिये (१९५०, इं.भा.मेमरीज अँड पोर्ट्रेट्स. १९५१) हे त्याचे अखेरचे पुस्तक. ‘पीटर्झबर्ग विज्ञान अकादमी’ चा (म.अर्थ) सन्मान्य सदस्य म्हणून बून्यिनची नेमणूक १९०९ मध्ये झालेली होती. १९३३ मध्ये त्याला साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळवणारा तो पहिला रशियन साहित्यिक होय. पॅरिस येथे तो निधन पावला.
पांडे,म.प. (इं.) कुलकर्णी, अ.र.(म.)
“