प्रथमोपचार : अपघात, इजा अथवा गंभीर स्वरूपाच्या आजाराने जर्जर अशा आपद्ग्रस्त व्यक्तीस वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा तिला रुग्णालयात नेईपर्यंतच्या कालावधीत जे उपचार केले जातात त्यांना ‘प्रथमोपचार’ म्हणतात. असे उपचार बहुतांशी या विषयाचे प्रशिक्षण घेतलेल्या कित्येक आपद्ग्रस्तांचे प्राण वाचू शकतात, इजेची व्याप्ती न वाढता ती मर्यादित राहू शकते, तसेच रुग्णालयात पडून राहण्याचा कालही कमी होतो.

प्रथमोपचार म्हणजे जखमी व्यक्तीची ताबडतोब घ्यावयाची काळजी ही प्रथमोपचाराविषयीची कल्पना आधुनिक काळात जुनाट झाली आहे. आजच्या प्रथमोपचारकाला उपचारांचा अग्रक्रम ठरवता आला पाहिजे आणि मूळ जीवनाधारांचे त्यांला संपूर्ण ज्ञान असणे जरूर असून या ज्ञानाचा जीवनावश्यक शरीरक्रिया चालू ठेवण्याकरिता त्याला उपयोग करता आला पाहिजे.

रेडक्रॉस ही अशा तऱ्हेचे कार्य करणारी व सर्वसामान्यांना तद्‌विषयक प्रशिक्षण देणारी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्था आहे. [→ रेडक्रॉस]. अज्ञानापायी कित्येक वेळा मनात मदत करण्याचा हेतू असूनही रुग्णाचे नुकसान होण्याचा संभव असतो. कधीकधी अनभिज्ञ व्यक्तीने केलेले उपचार धोकादायकच ठरतात उदा., अपघातात पाठीच्या मणक्याचे हाड मोडलेला रुग्ण हलवताना विशेष काळजी न घेतल्यास मेरुरज्जूस (पाठीच्या कण्यातून जाणाऱ्या दोरीसारख्या मज्जातंतूच्या जुडग्यास) इजा पोहोचून मूळ इजा अधिक गंभीर बनून कायमचा अधरांगघात (पायांसह शरीराच्या भागाचा पक्षाघात) होण्याचा धोका असतो.

सर्वसामान्यांना या विषयाचे पद्धतशीर प्रशिक्षण द्यावे व अशा कार्यात एकसूत्रीपणा यावा साठी १८८७ साली इंग्लंडमध्ये सेंट जॉन रुग्णवाहक संस्था निर्माण झाली. या संस्थेकडून अपघातात सापडण्याचा अधिक संभव असलेल्यांना (उदा., खाणमजूर, रेल्वेकामगार, पोलीसदल इत्यादिकांना) प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. दहा वर्षांत या संस्थेचीच एक ‘रुग्णवाहक सेना’ तयार झाली. अशाच संस्था इतर देशांतही निर्माण झाल्या. भारतात शाळा व महाविद्यालये यांतील विद्यार्थी, बालवीर, वीरबाला, गृहरक्षक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींना या विषयाचे प्राथमिक ज्ञान देऊन तयार करण्यात आले आहे.

गंभीर अपघात झालेल्या जागी सामान्यतः गडबड व गोंधळ उडालेला असतो. अशा वेळी डोके शांत ठेवून चटकन कार्यरत होण्याची जरूरी असते. भोवतालची बघ्यांची गर्दी कमी करणे आवश्यक असते. अशा वेळी आपद्ग्रस्तास उघड जखम दिसत नसली, तरी प्रथम आडवे झोपवून ठेवावे. यामुळे रुधिराभिसरण-न्यूनत्व झाल्यामुळे उद्‌भवणाऱ्या संभाव्य अवसादास (रक्तदाब कमी होणे, नाडी मंदावणे, गार घाम फुटणे वगैरे लक्षणे असलेल्या अवस्थेस) प्रतिबंध होतो, तसेच अंतस्थ इंद्रियांचा अपाय वाढत नाही. प्रथमोपचारकाने रक्तस्राव, श्वासोच्छ्‌वास थांबणे, अस्थिभंगाची लक्षणे, विषबाधेची लक्षणे इत्यादींचा ताबडतोब आढावा घ्यावा. व्यक्ती जिवंत राहण्याकरिता दोन अत्यावश्यक शरीरक्रिया कार्यरत राहणे फार महत्त्वाची आहे : (१) श्वसनक्रिया आणि (२) रुधिराभिसरण. रुधिराभिसरण क्रियेत हृदयक्रिया एकदम बंद पडल्यास व त्याच वेळी श्वसनक्रियाही थांबल्यास मेंदूची भरून न येणारी हानी होण्याचा गंभीर धोका असतो. या क्रिया ताबडतोब सुरू करण्याच्या प्रयत्नांना ‘हृद्-फुप्फुस संजीवन’ म्हणतात. प्रत्येक प्रथमोपचारकास अशा प्रयत्नांची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते.

लक्षणे व तदनुसार करावयाचे उपचार : आपद्ग्रस्तामध्ये दिसणाऱ्या लक्षणांच्या गंभीरतेनुसार त्यांच्याकडे लक्ष पुरवणे जरूर असते. खूप रक्तस्राव चालू असेल, तर कृत्रिम श्वसन सुरू करण्यापूर्वी रक्तस्राव थांबवण्याकडे प्रथम लक्ष द्यावे. रक्तस्रावाची जागा शोधण्याकरिता कपडे काढत बसण्यापेक्षा पुष्कळ वेळा चटकन ते फाडणे किंवा कापणे अधिक हितावह असते. ओठ व तोंडाभोवतालच्या त्वचेचा रंग, तसेच श्वासाचा गंध यांवरून विषबाधेची कल्पना करता येते. रुग्णास शक्यतो फारसे हालवू नये. त्याची मान एका बाजूस वळवून जीभ पुढे ओढावी. हुडहुडी भरू नये म्हणून पांघरूण घालून नाडी बघावी. बेशुद्ध असल्यास काहीही पाजू नये. वैद्यकीय मदतीसाठी संदेश पाठवावा व लक्षणांनुसार पुढीलप्रमाणे तातडीचे उपचार सुरू करावेत.

आ. १. शरीरावरील प्रमुख दाबस्थाने (हात व पायात जाणाऱ्या प्रमुख रोहिण्या दाबण्याची स्थाने).जखमा व रक्तस्राव : अपघात किंवा इतर कारणामुळे रक्तस्राव होत असल्यास प्रथम तो थांबवावयास हवा. रोहिणीस छिद्र पडून किंवा ती तुटल्यामुळे रक्तस्राव होत असेल, तर रक्ताच्या चिळकांड्या उडतात आणि असा रक्तस्राव न थांबल्यास मृत्यूू ओढवू शकतो. नीलेपासून होणारा रक्तस्राव संथ प्रवाहाच्या स्वरूपात असतो. केशवाहिन्यांतील (सूक्ष्म रक्तवाहिन्यांतील) रक्तस्राव झिरपण्याच्या स्वरूपात व थेंब थेंब गळणारा असतो. [→ जखमा आणि इजा रक्तस्राव]. पुष्कळ जखमांमधील रक्तस्राव जखमेवर बंधपट्ट (बँडेज) घट्ट बांधून थांबवता येतो. असा बंधपट्ट शक्यतो निर्जंतुक असावयास हवा. तो उपलब्ध नसल्यास स्वच्छ हातरुमाल, टॉवेल किंवा तत्सम कपडा वापरावयास हरकत नाही. अशा कपड्याच्या आतील घडीचा भाग किंवा अस्पर्शित भाग जखमेवर ठेवावा. कापूस प्रत्यक्ष जखमेवर ठेवू नये कारण त्याचे धागे जखमेच्या पृष्ठभागास चिकटून बसतात. बंधपट्टाच्या दाबाचे रक्तस्राव न थांबल्यास त्यावरच आणखी एक बंधपट्ट घट्ट बांधावा. इतके करूनही रक्तस्राव न थांबला, तर जखमेकडे रक्त वाहून आणणाऱ्या प्रमुख रोहिणीवर बोटांनी, ती हाडाजवळून जात असेल त्या स्थानी दाब द्यावा. शरीरावरील या विशिष्ट स्थानांना ‘दाबस्थाने’ म्हणतात व ती जखम आणि हृदय यांच्या दरम्यान असतात. नीला रक्तस्राव थांबवण्यास दाब जखमेच्या खाली दिला तरी पुरते.

वरील उपायांनी रक्तस्राव न थांबला किंवा तो जोरात चालूच राहिला किंवा संपूर्ण रोहिणीच तुटली असेल, तरच रोहिणीबंध वापरावा. रोहिणीतील रक्तप्रवाह बंद करणाऱ्या कपडा, हातरुमाल, रबर वगैरेंपासून बनविलेल्या साधनाला रोहिणीबंध म्हणतात. सर्वांत सोपा व चटकन वापरता येणारा रोहिणीबंध पुढीलप्रमाणे बनवता व वापरता येतो. साधारणपणे चार बोटे रुंदीची फडक्याची घडी प्रथम दोन वेढे देऊन गाठ मारून, जखम आणि हृदय यांच्या दरम्यान असलेल्या हाताच्या किंवा पायाच्या प्रमुख रोहिणीवर बांधावी. शिल्लक राहिलेल्या फडक्याच्या दोन टोकांत लहान लाकडी काठीचा तुकडा ठेवून तो घट्ट राहील अशी दुसरी गाठ मारावी. लाकडी काठीची दोन्ही टोके फिरवून रक्तस्राव पूर्ण थांबेपर्यंत पीळ द्यावा. (आ. २). 


आ. २. हाताच्या प्रमुख रोहिणीवर रोहिणीबंध बांधण्याची क्रिया.रोहिणीबंध बांधल्यानंतर रुग्णास त्वरेने तज्ञाकडे न्यावयास हवे. तसे करण्यास उशीर लागणार असेल, तर दर १५ ते २० मिनिटांनी तो सैल करून ३० सेकंद ते १ मिनिटापर्यंत रक्तप्रवाह जाऊ द्यावा. तसे न केल्यास बंधाच्या पुढील भागात ऊतकनाश (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या -पेशींच्या – समूहाचा नाश) होण्याची शक्यता असते.

रोहिणीबंधाविषयी काही बाबतींत विशेष काळजी घ्यावी लागते. रोहिणीबंध फक्त बाहू आणि मांडी या जागीच वापरणे उपयुक्त असते. तो सैल पडणे, अतिशय आवळून बांधणे आणि एक तासापेक्षा अधिक काळ तसाच ठेवणे धोक्याचे असते. जिच्यावर बंध बांधला असेल ती रोहिणी व जवळपासच्या तंत्रिकांना (मज्जांना) हानी पोहोचण्याचाही धोका असतो. वरील सर्व कारणांमुळे रोहिणीबंध वापरणाऱ्याने विशेष काळजी घेणे अगत्याचे असते. जीवनच धोक्यात असेल, तरच शेवटचा उपाय म्हणून रोहिणीबंध वापरणे चांगले.

लहान जखमा : किरकोळ वाटणाऱ्या लहानसहान जखमांचीही योग्य काळजी घ्यावी. अशा जखमांतून सूक्ष्मजंतूंचा प्रवेश झाल्यामुळे मोठा आजार उद्‌भवू शकतो. किरकोळ जखमा पाणी व साबणाने धुवून त्यांवर स्पिरिट किंवा टिंक्चर आयोडीन लावून निर्जंतुक बंधपट्ट बांधावा.

घोळणा फुटणे : (नासारक्तस्रवण). एकाएकीच एका किंवा दोन्ही नाकपुड्यांतून रक्तस्राव होण्याला घोळणा फुटणे म्हणतात. नाक कुरतडणे, नाकावर आघात होणे, अतिरक्तदाब इ. कारणांमुळे घोळणा फुटतो. काही व्यक्तींमध्ये अकारण घोळणा फुटण्याची प्रवृत्ती असते. क्वचितच काही तरुण मुलींमध्ये ऋतुस्राव कालात घोळणा फुटतो. याला ‘उन्मार्गी ऋतुस्राव’ म्हणतात.

घोळणा फुटलेल्या व्यक्तीस डोके थोडे मागे वळवून बसवावे. तिला झोपवल्यास डोके व खांदे इतर शरीरापेक्षा काहीसे उंचावर असावे (आ. ३). रक्तस्राव क्षेत्र नाकाच्या शेंड्याजवळ असते व दोन्ही नाकपुड्या दाबून बंद केल्यास दाब पडून रक्तस्राव थांबतो. कधीकधी दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ दाबून धरावे लागते. रक्तस्राव न थांबल्यास नाकपुडीत जाळीदार पट्टी (हलक्या व अतिशय विरविरीत मलमलीच्या वा तत्सम कापडाची पट्टी, गॉझ) किंवा कापडाची चिंधी घालून नंतर पंधरा मिनिटांपर्यंत दाबून ठेवावे लागते. थंड पाण्यात हातरुमाल बुडवून तो नाकावर धरून ठेवावा [→ नाक].

आ. ३. घोळणा फुटण्यावरील एक प्रथमोपचारअवसाद : अपघातजन्य ⇨अवसाद बहुधा रक्तस्रावामुळे उत्पन्न झालेल्या रुधिराभिसरण-न्यूनत्वापासून वा अतिशय वेदनाकारक जखमांमुळे उद्‌भवतो. अवसाद झालेल्या रुग्णाला ताबडतोब झोपवावे (आडवे करावे) व डोके इतर शरीरापेक्षा खालच्या पातळीवर ठेवावे. अंगावर गरम पांघरूण घालावे. रक्तस्राव थांबवण्याकडे लक्ष पुरवावे. पुष्कळसा रक्तस्राव होऊन गेला असल्यास पाय व कमरेचा भाग २०-३० सेंमी. उंच करून ठेवावा. रुग्ण शुद्धीवर असल्यास आणि त्यास तहान लागली असल्यास साधे पाणी (गरम किंवा थंड) पाजावे. कोणत्याही परिस्थितीत मद्य, कॉफी, चहा वगैरे पेये देऊ नयेत. वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब लागणार असेल, तर ग्लासभर पाण्यात १/८ चहाचा चमचा (१ चहाचा चमचा = सु. ४ मिलि.) खाण्याचा सोडा व १/४ चमचा मीठ मिसळवून घोट घोट पाजावे. रुग्ण बेशुद्ध असल्यास कोणतेही पेय पाजण्याचा प्रयत्न करू नये.

अस्थिभंग : अपघातजन्य ⇨अस्थिभंगात बहुधा सामान्य (जखमविरहीत) किंवा सव्रण (जखमेसहित) अस्थिभंग आढळतात. सव्रण अस्थिभंगाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. यात रक्तस्राव थांबविणे महत्त्वाचे असून निर्जंतुक बंधपट्ट घट्ट बांधावा. जखमेबाहेर ओलेले हाडाचे टोक जखमेत ढकलण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही प्रकारच्या अस्थिभंगावरील प्रथमोपचारात मोडलेल्या हाडाचे अचलीकरण (जागेवरून हलू न देणे) महत्त्वाचे असते. त्यामुळे अस्थिभंगाजवळील स्नायू, रक्तवाहिन्या, व तंत्रिका यांना इजा होण्याचा धोका टळतो. अचलीकरणाकरिता उपयुक्त असलेल्या साधनाला बंधफलक म्हणतात.  पातळ लाकडी पट्टी, मासिकाची किंवा वर्तमानपत्राची जाड घडी, कार्डबोर्डचा तुकडा इत्यादींचा बंधफलक म्हणून उपयोग करता येतो. गुडघ्याखालील पाय वा कोपराखालील हात या भागांतील अस्थिभंगावर बंधफलक बांधताना मोडलेल्या हाडाच्या वरचा व खालचा असे दोन्ही सांधे हलणार नाहीत, अशी काळजी घेऊनच बंधफलक बांधावा. फासळ्या, चेहरा व कवटीची हाडे यांच्या अस्थिभंगावर बंधफलकाची गरज नसते. मानेतील व पाठीतील मणक्यांचा अस्थिभंग अतिशय गंभीर असू शकतो. अशा अस्थिभंगाची थोडीशी शंका आल्यास रुग्णास अजिबात न हलविणे उत्तम. हलविणे आवश्यक असेल, तर पुष्कळ लोकांनी मिळून डोके, खांदे व मान या भागांची थोडीशी हालचाल न होऊ देता उचलावे. मऊ कापडाने गुंडाळलेल्या लांब फळीवर किंवा दरवाजावर (जवळपासच्या इमारतीच्या बिजागऱ्यातून काढून घेतलेल्या) उताणे झोपवावे. नंतर फळी किंवा दरवाजा चौघांनी चार टोके धरून उचलावा. अशा पद्धतीने डोके, मान व पाठीचा कणा यांची हालचाल टाळता येते व संभाव्य गंभीर हानी, पक्षाघात वगैरे टाळता येते.

अस्थिभंगाबद्दल पुढील दक्षता घ्यावी : (१) अस्थिभंगाची शंका असल्यास तो झालाच आहे, असे गृहीत धरून उपाय योजावा. (२) अवसादावर उपचार करावे. (३) सर्व अनावश्यक हालचाली टाळाव्यात. (४) शक्य तेथे बंधफलक वापरावा. (५) रुग्णास हलविण्यापूर्वी सर्व प्रकारची काळजी घ्यावी.

घसा गुदमरणे : घसा व इतर श्वसनमार्गात एखादी बाह्य वस्तू अडकल्यास श्वास घेण्यात अडथळा उत्पन्न होतो व व्यक्ती गुदमरते. तिला खोकल्याची जोरदार उबळ येत असल्यास तशी येऊ द्यावी. कारण अडकलेली वस्तू बाहेर फेकण्याचा तो प्रयत्न असतो. खोकला थांबेपर्यंत घशात बोटे घालून वस्तू काढण्याचा प्रयत्न करू नये कारण बाहेर निघण्याएेवजी ती वस्तू अधिक खोलवर जाण्याचा धोका असतो. अशी व्यक्ती बहुतकरून स्वतःची अंगस्थिती सुखावह होईल अशी करते. श्वसनात गंभीर अडथळा आल्यास किंवा श्वसनक्रियाच बंद पडल्यास त्वरेने कृत्रिम श्वसनाचा उपाय योजावा.

पुष्कळ वेळा खाद्यपदार्थ (बहुधा मांसाचा मोठा तुकडा) श्वासनालात (घशापासून श्वासनलिकेपर्यंतच्या श्वसन मार्गाच्या भागात) शिरून गुदमरल्यासारखे होते. अशा वेळी तीव्र हृद्‌रोग उद्‌भवल्याची शंका येण्याची शक्यता असते. पाश्चात्य देशांतून उपहारगृहांमध्ये खाण्याची प्रथा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या विकृतीला ‘उपहारगृह-हृद्‌विकृती’ (कॅफे करोनरी) असे नाव दिले आहे. श्वसनातील अडथळ्यामुळे रोगी निळा दिसू लागतो परंतु त्याच्या हृदयात कोणताही बिघाड झालेला नसतो म्हणून श्वसनमार्ग मोकळा करण्याचे सर्व उपया योजावेत.


रुग्ण लहान मूल असल्यास संपूर्ण उलटे उचलून धरून, जीभ बाहेर ओढून बाह्य पदार्थ बाहेर पडतो का हे बघावे. प्रौढास तो उभा असल्यास व घशात काही अडकले असल्यास मानेनेच होकार देण्यास सांगावा कारण त्याला बोलणे अशक्य असते. त्याच्या पाठीशी उभे राहून दोन्ही हातांनी बरगड्यांच्या खाली कवटाळून जोराने वरच्या व मागच्या बाजूकडे दाबावे. अशा दाबामुळे मध्यपटल (उदर व वक्ष यांना विलग करणारे स्नायुयुक्त पटल) वर सरकून फुप्फुसातील उरलेली हवा बाहेर फेकली जाऊन बाह्य पदार्थ बाहेर पडण्याची शक्यता असते.

पुष्कळ वेळा बेशुद्धी लवकर येण्याची शक्यता असते. अशा वेळी रुग्णास पाठीवर उताणे झोपवावे. तोंड उघडून बोटाने अडकलेला पदार्थ निघतो का ते बघावे. उपहारगृहामध्ये अशा प्रसंगी उपयोगी पडावे म्हणून खास बनविलेले प्लॅस्टिकचे चिमटे ठेवलेले असतात. बाह्य पदार्थ निघाल्यानंतरही श्वसनक्रिया बंदच राहिली व नाडीही लागेनाशी झाली, तर ताबडतोब ‘हृद्-फुप्फुस संजीवन’ सुरू करावे.

सर्व प्रयत्नांनंतरही बाह्य पदार्थ निघत नसेल व तो श्वासनालात वरच्या भागात स्वरयंत्राजवळ अडकला असेल, तर प्रशिक्षित प्रथमोपचारकाने गळ्यातील ‘श्वासनालाचे छिद्रीकरण’ करावे. हा उपचार एक शस्त्रक्रियाच असून तिला ‘श्वासनाल-छिद्रीकरण’ असेच म्हणतात व तिचा उपयोग अखेरचा उपाय म्हणूनच करावा. लहान मुलांच्या बाबतीत मोठे छिद्र असलेली १८ क्रमांकाची अंतःक्षेपणाची (इंजेक्शनाची) सुई श्वासनालात खुपसून हवा खेळण्याचा मार्ग काहीसा मोकळा करता येतो. वरील उपचार गंभीर असले, तरी अनेक वेळा जीव बचावण्यास समर्थ ठरले आहेत.

हृद्-फुप्फुस संजीवन : येथे हृद-फुप्फुस संजीवनाबद्दल प्रत्येक प्रथमोपचारकास आवश्यक असणारी माहिती देणे योग्य ठरते. ही माहिती प्रत्येक कुटुंबातील एकाने तरी आत्मसात करून प्रत्यक्ष शिकून घेणेही उपयुक्त आहे.

जिवंत राहण्याकरिता अत्यंत आवश्यक अशा दोन महत्त्वाच्या शरीरक्रियांमध्ये श्वसनक्रिया आणि रुधिराभिसरण क्रिया यांचा समावेश होतो. हवेतील ऑक्सिजन रक्तात घेऊन त्याचा सर्व शरीरभागांना पुरवठा करण्याचे कार्य या दोन्ही क्रिया मिळूनच पूर्ण होते. कोणत्याही कारणामुळे या दोन्हींपैकी  एक क्रिया बंद पडली, तरी मृत्यू जलद ओढवतो. कधीकधी हृद्स्तंभन (हृदयक्रिया बंद पडून रोहिण्यांतील रक्तदाब नाहीसा होणे) आणि श्वसन निष्फलता तात्पुरत्या, अल्पकाळ टिकणाऱ्या असतात. अशा वेळी तातडीने हृद्-फुप्फुस संजीवनाचा उपचार सुरू केल्यास प्राण वाचू शकतो.

या क्रियांवर गंभीर परिणाम झालेली व्यक्ती बहुतकरून बेशुद्ध होऊन पडते. ताबडतोब उपचार न केल्यास मृत्यू किंवा मेंदूस कायमची इजा होण्याचा धोका असतो.

हृद्-फुप्फुस संजीवन करण्याकरिता प्रथम तीन आवश्यक गोष्टींकडे लक्ष पुरविणे जरूरीचे असते : (१) हवामार्ग पूर्णपणे मोकळा ठेवणे, (२) कृत्रिम श्वसन सुरू करणे आणि (३) छातीवर विशिष्ट जागी व ठराविक पद्धतीने दाबणे. या तीन कृतींना ‘संजीवनत्रयी’ म्हणता येईल.

(१) हवामार्ग मोकळा ठेवणे : याकरिता पुढील योजना करावी : (अ) रुग्णास पाठीवर उताणे झोपवावे, (आ) एक हात मानेखाली घालून ती थोडी उंच उचलावी व त्याच वेळी त्याचे डोके दुसऱ्या हाताने जमिनीकडे झुकवावे. यामुळे मान अतिप्रसारित होते व घशात मागे पडलेली जीभ उचलली जावून हवामार्ग मोकळा होतो. (इ) कान रुग्णाच्या तोंडाजवळ नेऊन श्वसनाचा आवाज सुरू होतो की नाही हे एेकावे. छातीकडे नजर ठेवून ती श्वसनाबरोबर हलते किंवा नाही हे बघावे. (ई) श्वसनक्रिया वरील उपायानंतरही बंदच राहिल्यास रुग्णाचे तोंड उघडून कोणताही बाह्य पदार्थ (कृत्रिम दात, अन्न वगैरे) बोटाने काढून टाकावा.

(२) कृत्रिम श्वसनक्रिया सुरू करणे : वरील उपचारानंतर कधीकधी श्वसनक्रिया आपोआप सुरू होते. तसे न झाल्यास मुखाने कृत्रिम श्वसन सुरू करावे आणि त्याकरिता (अ) एका हाताने उचललेली अतिप्रसारित मान तशीच ठेवून दुसऱ्या हाताच्या बोटांनी रुग्णाच्या नाकपुड्या दाबून बंद कराव्यात, (आ) खोल श्वास घ्यावा व आपले तोंड रुग्णाच्या तोंडावर अशा प्रकारे ठेवावे की, तुम्ही त्याच्या तोंडात जोराने फुंकून घालणार असलेली हवा बाहेर निघून न जाता त्याच्या श्वसनमार्गातून फुप्फुसात शिरावी. रुग्णाची छाती फुगून उचलली गेली की, आपले तोंड एका बाजूस घ्यावे व पुन्हा एकदा खोल श्वास घ्यावा. (इ) वरीलप्रमाणे कृती मिनिटास कमीतकमी १२ वेळा करावी (ई) तुम्ही हवा जोरात फुंकीत असताना अडथळा जाणवला व रुग्णाची छाती फुगली नाही, तर पुन्हा एकदा हवामार्ग मोकळा आहे किंवा नाही याची खात्री करावी. (उ) तोंड व ओठाभोवतालीच इजा झाल्यामुळे हा भाग वापरता न आल्यास दोन्ही नाकपुड्या तोंडात घालून तोंडाचा भाग हवा बाहेर न जाण्यासारखा बंद ठेवून नाकाद्वाने कृत्रिम श्वसन करता येते. (ऊ) अर्भके व लहान मुलांमध्ये  या प्रकारच्या कृत्रिम श्वसनाकरिता नाक आणि तोंड दोन्ही तोंडात धरून हवा फुंकता येते. प्रथमोपचारकाने फार खोल श्वास न घेता मिनिटास २० वेळा हवा फुंकावी.

आ. ४. बाह्य हृद्-मर्दन(३) छाती दाबणे : हवामार्ग मोकळा असल्याची खात्री झाल्यानंतर आणि व सांगितल्याप्रमाणे हवा फुंकण्याचा चार वेळा प्रयोग केल्यानंतर मानेस दोन्ही बाजूंच्या ग्रीवा रोहिण्यांतील नाडी तपासून पहावी. नाडी न लागल्यास पुढीलप्रमाणे छाती दाबण्याचा उपचार सुरू करावा (याला ‘बाह्य हृद्-मर्दन’ असेही म्हणतात, आ. ४): (अ) रुग्णाच्या एका बाजूस गुडघे टेकून उभे रहावे. एका हाताच्या मनगटाची तळहाताकडची बाजू छातीवर मध्यभागी असलेल्या उरोस्थीच्या मध्यावर टेकवावी. या हातावर दुसरा हात टेकवावा. बोटे फासळ्यांवर टेकवू नयेत (आ) सर्व शरीराचा भार या टेकवलेल्या हातावर देऊन सरळ खाली दाब द्यावा. तुमचे खांदे या कृतीत वापरावे. (इ) प्रौढात उरोस्थी जवळजवळ पाच सेंटिमीटरपर्यंत मागे ढकलावी व दाब काढून घ्यावा. दर मिनिटास ही कृती ६० ते ८० वेळा करावी. कधीकधी ती करताना फासळ्या तुटण्याचा धोका असतो. तो पत्करून व तशा तुटल्या तरी कृती चालूच ठेवावी कारण ती जीवनमरणाशीच संबंधित असते. (ई) छाती दाबणे अथवा बाह्य हृद्-मर्दन नेहमी कृत्रिम श्वसनाबरोबरच म्हणजे दोन्ही एकाच वेळी सुरू ठेवणे जरूरीचे असते. (उ) दोन प्रथमोपचार हजर असल्यास एकाने हृद्-मर्दन मिनिटास ६० या गतीने व दुसऱ्याने कृत्रिम श्वसन दर पाच आ. ५. कृत्रिम श्वसन व हृद्-मर्दन : (अ) दोन प्रथमोपचारक (आ) एक प्रथमोपचारक.मर्दनांनंतर एक या प्रमाणात १२ वेळा करावे. एकच प्रथमोपचारक कृती करणार असेल, तर हृद्-मर्दन गती मिनिटास ८० व दर १५ दाबांनंतर एक कृत्रिम श्वसन इतकी गती असावी. (आ. ५). 

 विषबाधा : बाह्य विषारी पदार्थ शरीरात शिरल्यानंतर त्याच्या हानीकारक परिणामांमुळे उद्‍भवणाऱ्या लक्षणसमूहाला विषबाधा म्हणतात. असे पदार्थ बहुधा रासायनिक असून त्यांचे सर्वसाधारण वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते : (१) किटकनाशके, (२) औषधे [⟶ औषध], (३) तीव्र क्षार (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणारे पदार्थ, अल्कली) व तीव्र अम्ले, (४) खनिज तेलजन्य पदार्थ आणि (५) वनस्पतीजन्य विषे.


विषबाधेवरील प्रथमोपचारांत प्रतिबंधात्मक उपायांना विशेष महत्त्व असते. लहान मुलांच्या हाती असे पदार्थ न पडण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. असे पदार्थ साठवताना योग्य तेच पात्र किंवा धारक वापरावयास हवा. शीतपेयाच्या रिकाम्या बाटलीत फ्रेंच पॉलिशसारखा पदार्थ भरुन ठेवणे अगदी अयोग्य व घातक असते. 

विषबाधेवरील उपचारात क्षणाचाही विलंब प्राणघातक ठरण्याचा संभव असतो. विषबाधेवरील उपचारांची पुढील तीन प्रमुख तत्त्वे (१) विष काढून टाकण्याचा प्रयत्‍न करणे, (२) आत शिरलेले विष निष्क्रिय बनविणे आणि (३) आधार देणारे उपाय लक्षात ठेवून प्रथमोपचारांची योजना ताबडतोब करावी. काही विषे वगळल्यास रुग्णास ताबडतोब उलटी होणे उपयुक्त असते. सायरप ऑफ इपेकॅक हे औषध अतिशय जोरदार वमनकारक  (ओकारी करविणारे) असते. प्रौढास तीन चहाचे चमचे किंवा लहान मुलास १ ते ३ चहाचे चमचे मात्रा पुरते. वमनकारके केरोसीन अथवा इतर खनिज तेलजन्य पदार्थांच्या विषबाधेत वापरू नयेत. [⟶ विषविज्ञान].

 भाजणे व पोळणे : अंगावरचे कपडे पेटलेल्या व्यक्तीच्या अंगावर थंड पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्‍न करावा. तथापि पाण्यापेक्षा कपडे पेटलेल्या व्यक्तीस ब्लॅंकेट, रग यासारख्या जाड कापडाने गुंडाळावे. हवा न मिळाल्यामुळे कपडे विझतात. हाताने ज्वाला विझवण्याचा प्रयत्‍न केव्हाही करू नये. तसे केल्यास हातांनाच इजा होण्याचा संभव असतो. ज्वाला विझवल्यानंतर भाजलेली जागा निर्जंतुक ठेवण्याकडे व वेदना प्रतिबंधक उपायांकडे लक्ष पुरवावे. व्हॅसलीन, आयोडीन किंवा कापूस भाजल्याजागी लावू नयेत, तसेच जळालेले व त्याजागी चिकटून बसलेले कपड्यांचे अवशेष ओढून काढण्याचा प्रयत्‍न करू नये. बर्‌नॉल किंवा प्रोपामिडीन यासारखी तयार मिळणारी मलमे लावण्यास हरकत नाही. जादा भाजलेल्या व्यक्तीला निर्जलीकरणाची सतत भिती असते. म्हणून पाणी, सरबत व इतर पेये भरपूर प्रमाणात अधूनमधून देत राहावी. [⟶ भाजणे व पोळणे].

उष्णताजन्य विकार : उष्णताजन्य विकारांची कारणे व लक्षणे प्रथमोपचारकास माहीत असावी. ऊष्मा-अवक्लांतीमध्ये गलितगात्रावस्था येऊन अवसादाची लक्षणे उद्‍भवतात. रोग्यास थंड जागी झोपवून पाय काहीसे वर व डोके खाली करून ठेवावे. शरीरातील लवणाचा अभाव कमी करण्याकरिता एक पेला पाण्यात /चमचा मीठ घालून दर पंधरा मिनिटांस पिण्यास द्यावे. या विकारात शारिरीक तापमान वाढलेले नसते. ऊष्माघातात तापमान (४२° से.) हमखास वाढलेले असते व हा विकार गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे ताबडतोब उपचारांची आवश्यकता असते. रुग्णास थंड जागी गार पाण्यात गळ्यापर्यंत बुडवून ठेवणे किंवा ओल्या कपड्यात गुंडाळून झोपवणे. पंखा उपलब्ध असल्यास वारा सतत खेळता ठेवणे यांचा प्रथमोपचारात समावेश करतात. साध्या उपायांनी तापमान ३७° से.पर्यंत न उतरल्यास किंवा रुग्ण बेशुद्ध असल्यास त्याला रुग्णालयात हलवावे. [⟶ उष्णताजन्य विकार]. 

आ. ६. चक्कर व मूर्च्छा येणेहिमदाह : अती थंडी असलेल्या प्रदेशात पर्वतारोहण करणाऱ्यात किंवा हिमालयासारख्या उंच भागात केवळ भ्रमंतीकरिता किंवा तीर्थयात्रा करण्याकरिता गेलेल्या व्यक्तीमध्ये हातपायांच्या बोटांमध्ये रक्तपुरवठ्यात व्यत्यय येऊन होणाऱ्या ऊतकनाशाला ⇨ हिमदाह म्हणतात. गार पडलेल्या शरीरभागात हळूहळू पुन्हा उष्णता आणण्याचा प्रयत्‍न करावा. ही कृती हळुवारपणाने तसेच मंद गतीनेच करावी. ती जलद केल्यास रुग्णास तीव्र वेदना होतात व ऊतक कायमचे नाश पावण्याचा संभव असतो. जोराने चोळणे, गरम पाण्यातबुडवणे किंवा बर्फाचा तुकडा चोळणे हे उपचार केव्हाही करू नयेत. शारीरिक तापमान जेवढे असते (३७° से.) तेवढ्या गरम पाण्यात विकृत भाग बुडवून त्याची मंद हालचाल करावी. पुष्कळसे गरम कपडे, बोटे, नाक व कान यांवर गरम कपड्याची आच्छादने, वाऱ्यापासून संरक्षण आणि ओले कपडे अंगावर न ठेवणे हिमदाह प्रतिबंधक असतात. रुग्णाने धूम्रपान करू नये. [⟶ हिमदाह].

 मूर्च्छा येणे, चक्कर येणे व बेशुद्धी :एकाएकी उद्‍भवणाऱ्या परंतु अल्पकाळ टिकणाऱ्या बेशुद्धीला  मूर्च्छा म्हणतात. थकवा, भूक, एकाएकीच उद्‍भवलेला भावना प्रक्षोभ, रक्तस्त्राव दृष्टीस पडणे इ. अनेक कारणांमुळे मूर्च्छा येते. मेंदूकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यात निर्माण होणारी तात्पुरती कमतरता यास कारणीभूत असते. बेशुद्धीपूर्वी जे गरगरल्यासारखे वाटते त्याला चक्कर येणे म्हणतात. चक्कर आली असे वाटल्यास त्या व्यक्तीला गुडघ्यात मान घालून खुर्चीवर किंवा खाली बसवावे किंवा उताणे झोपवून डोके काहीसे खाली व दोन्हीपाय उंच करावे (आ. ६). कपाळावरगार पाण्यात भिजविलेली पट्टी ठेवावी व अमोनिया, स्पिरिट अमोनिया ॲरोमॅटिकस किंवा कांदा हुंगावयास द्यावा. मूर्च्छा साधीच असेल, तर रुग्ण मिनिटा दोन मिनिटांतच पूर्णपणे शुद्धीवर येतो. तरी देखील त्याला दहा मिनिटापर्यंत उठू न देणे हितावह असते. बेशुद्धीची काही कारणे गंभीर विकृतीही असू शकतात. छातीत कळ येणे, झटकेयेणे, अती डोकेदुखी ही लक्षणे व मिनिटा दोन मिनिटांपेक्षा जास्तकाळ टिकणारी मूर्च्छा गंभीर समजून रुग्णास रुग्णालयात हलवावे. मूर्च्छा साधी असल्यास नाडी व श्वसनक्रिया प्राकृतिक (सर्वसाधारण) अवस्थेतच असतात. [⟶ बेशुद्धी].


  आ. ७. दाताखाली जीभ चावली जाऊ नये म्हणून दातांमध्ये रूमालाची घडी ठेवणे.

झटके येणे : हातापायांच्या स्नातूंची अनैच्छिक अनियमित आकुंचने व शैथिल्य यांच्या आलटून पालटूनयेण्यामुळे उद्‍भवणाऱ्या हालचालींना झटका म्हणतात. झटके येण्याची अनेक कारणे आहेत व त्यांमध्ये ⇨ अपस्मार हे एक प्रमुख कारण आहे. डोक्यावरील आघात, ⇨ मस्तिष्कावरण शोथ आणि कवटीच्या आतील अर्बुदे (नवीन कोशिकांच्या अत्याधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठी) यांसारख्या गंभीरविकृतींतही झटके येतात. लहान मुलांत शारीरिक तापमान एकदम वाढल्यास झटके येतात. झटके दाबून धरुन बंड करण्याचा प्रयत्‍न करू नये.रुग्णास या अपसामान्य हालचालीमुळेइजा होणार नाही अशी काळजी घ्यावी. शक्य असल्यास वरच्या व खालच्या दातांमध्ये हातरुमालाची घडी वळकटी करुन किंवा वर्तमानपत्राची जाड घडी ठेवावी (आ.७) यामुळे दातांखाली जीभ चावली जाणार नाही. चमचा किंवा इतर पदार्थ दातामध्ये जोराने कोंबण्याचा प्रयत्‍न करु नये. रुग्णास एका अंगावर झोपवण्याने स्त्रवणारी लाळ श्वासनलिकेत न शिरता सरळ बाहेर पडू शकते. झटके थांबताच गळ्याभोवतालचे कपडे ढिले करावे व शुद्धीवर आल्यानंतरही थोडा वेळ तसेच पडू द्यावे. पूर्ण विश्रांती घेऊ द्यावी. लहान मुलांत तापमान वाढलेले असल्यास कोमट पाण्यात टॉवेल किंवा स्पंज बुडवून अंग पुसावे. वारंवार झटके येणाऱ्या व्यक्तीने कोणतेही वाहन चालवू नये, खोल पाणी व आग यांपासून लांब असावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा.

बुडणे व जवळजवळ बुडणे : बुडालेल्या व्यक्तीची नाडी लागत नाही, पूर्ण बेशुद्धी असते व श्वसनक्रिया बंद असते. जवळजवळ बुडालेल्या व्यक्तीत कधीकधी कोणतेही अपसामान्य लक्षण आढळत नाही तथापि श्वसन-क्लेश आणि मानसिक अस्पष्टता उद्‍भवण्याचा संभव असतो. बुडण्याच्या बेतात आलेल्या व्यक्तीमध्ये हृद्-स्तंभन होण्याचाही धोका असतो. अशा व्यक्तीला तातडीने उपचार करण्याची व पुष्कळ वेळा हृद्-फुप्फुस संजीवन उपचाराची गरज असते. उंचावरून पाण्यात सुरकांडी मारणाऱ्या व्यक्तीत इतर शारीरिक इजेची, (उदा., मानेच्या मणक्यांचा अस्थिभंग) शक्यता लक्षात ठेवावी लागते. म्हणून बेशुद्ध रोग्यास पाण्याबाहेर काढतानाही विशेष काळजी घ्यावी लागते.

 बुडालेल्या व्यक्तीवर बाहेर काढल्यानंतर वेळ न घालवता ताबडतोब तोंडाने कृत्रिम श्वसन सुरू करावे. पूर्वी फुप्फुसात गेलेले किंवा गिळलेले पाणी काढून टाकण्याकरिता पूर्ण उलटे करणे, पाठ थोपटणे, कंबर धरुन गरगर फिरविणे किंवा उपलब्ध असल्यास कुंभाराच्या चाकावर ठेवून फिरविणे यांसारखे उपचार करण्यात बराचसा वेळ खर्ची पडून श्वसनक्रियेच्या संजीवनाकडे दुर्लक्ष होत असे. आत शिरलेले गोडे पाणी जवळजवळ बुडालेल्या व्यक्तीस फुप्फुसातून रुधिराभिसरण सुरू असल्यास चटकन अभिशोषिले जाते. याउलट खारे पाणी रक्तातील रक्तद्रव फुप्फुसात ओढून घेते. म्हणून खाऱ्या पाण्यात बुडालेल्या व्यक्तीस ट्रेंडेलेनबुर्ख स्थितीत (डोके खाली परंतु कमरेचा भाग वर असलेली उताणी शरीरस्थिती एफ्. ट्रेंडेलेनबुर्ख या जर्मन शस्त्रक्रियाविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारी) ठेवल्यास पाणी बाहेर पडण्यास मदत होते.

मागे सांगितल्याप्रमाणे तोंडाने कृत्रिम श्वसन आणि जरूर तेथे बाह्य हृद्-मर्दन सुरू करावे. कष्टश्वसन व त्वचा निळसर दिसत असलेल्या व्यक्तीला फक्त कृत्रिम श्वसनाचीच आवश्यकता असते. कृत्रिम श्वसनाचा इतर कोणताही प्रकार उपयुक्त नसून फक्त तोंडाने केलेले श्वसनच परिणामकारक असते. कोणत्याही बुडालेल्या व्यक्तीस शक्य तेवढ्या तातडीने रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करावी. हृद्-फुप्फुस संजीवनाचे प्रयत्‍न तज्ञ वैद्यकीय मदत मिळेपर्यंत चालूच ठेवावे.

विजेचा धक्का : विद्युत् प्रवाह शरीरात शिरून उत्पन्न होणाऱ्या अवसादाला ‘विजेचा धक्का’ बसला असे म्हणतात. असा धक्का बसू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी. सर्व विद्युत् उपकरणे व वीजवाहक तारा सुस्थितीत असून धक्का-प्रतिबंधक असाव्यात. विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीच्या मदतीस जाताना प्रथम ताबडतोब विजेचे मुख्य स्विच बंद करून विद्युत् प्रवाह बंद करावा. उच्च विद्युत् दाब असलेल्या तारांशी संबंध असल्यास वीज कंपनीशी संपर्क साधून विद्युत् प्रवाह बंद असल्याची खात्री करून घेतल्याशिवाय मदतीकरिता पुढे सरसावू नये. विद्युत् प्रवाह ओल, ओले पदार्थ व पाणी यांतून वाहतो. अशा ठिकाणी कोरड्या जागेवर, कोरड्या पाटावर, कोरड्या लाकडी खुर्चीवर, स्टूलावर वगैरे विद्युत् प्रवाह प्रतिरोधक जागा बघूनच उभे राहावे. लांब कोरडी काठी घेऊन तिच्या एका टोकास वर्तमानपत्र गुंडाळून ती धक्का बसलेल्या व्यक्तीला सोडविण्याकरितावापरावी. शक्य असल्यास रबरी हातमोजे वापरावे. कमी विद्युत् दाब असलेल्या विद्युत् प्रवाहामुळेही मृत्यू ओढवण्याचा गंभीर धोका असतो. मेंदूतील श्वसन केंद्र व हृदय यांवरील गंभीर परिणामामुळे मृत्यू ओढवतो. विद्युत् प्रवाहापासून अलग केलेली व्यक्ती श्वास घेत नसल्यास किंवा तिची नाडी लागतनसल्यास ताबडतोब हृद्-फुप्फुस संजीवन सुरू करावे. वैद्यकीय मदत मिळेपर्यत हा उपचार न थांबता चालू ठेवावा.

 प्राणिदंश : नियततापी (परिसराच्या तापमानात बदल झाला तरी शरीराचे तापमान एका ठराविक पातळीवर स्थिर राहणाऱ्या), प्राण्यांच्या चावण्यामुळे जेव्हात्वचेला जखम होते तेव्हा तीत सूक्ष्मजंतू शिरून गंभीर रोग उद्‍भवण्याचा संभव असतो. कुत्रा, मांजर, उंदीर, घोडा, गाय, डुक्कर, खार, कोल्हा, वटवाघूळ, लांडगा इ. प्राण्यांचे दंश ⇨ अलर्क रोगासारखा असाध्य रोग उत्पन्न करण्यास कारणीभूत होऊ शकतात. जखम झाल्याबरोबर ताबडतोब ती पाण्याने काळजीपूर्वक व पूर्णपणे धुवून काढावी. पातळ कापडाचा तुकडा साबणाच्या पाण्यात बुडवून त्याने सर्व जखमा स्वच्छ कराव्यात व पुन्हा वाहत्या पाण्यात जखम काही वेळ धरून ठेवावी. चावलेल्याप्राण्याची लाळ शक्य तेवढी धुवूनकाढणे हा मुख्य उद्देश असतो. शक्य असल्यास तीव्र नायट्रिक अम्लात भिजवलेला कापसाचा बोळा लहान लाकडी काडीवर घेऊन जखमेवर फिरवावा. प्राणिदंशानंतर, विशेषेकरून डोके, चेहरा व मान या शरीरभागांवर जखमा झाल्यास शक्य तेवढ्या लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा. पाळीव प्राणी असल्यास त्याचीही पशुवैद्याकडून तपासणी करून घ्यावी.


सर्पदंश : विषारी सर्पाच्या दंशामुळे दंशजागी त्वचा सुजून काळीनिळी पडते, वेदना होतात. विषारी सर्पदंश झालेल्या व्यक्तीस सर्व शारीरिक हालचाल बंद करावयास लावावी. हातापायांच्या दंशाकरिता योग्य जागी रोहिणीबंध बांधावा. हा बंध अशा प्रकारे आवळावा की, खोल असलेल्या रक्तवाहिन्यांतील प्रवाहात अडथळा येणार नाही परंतु पृष्ठस्थ रक्तवाहिन्यांतील प्रवाह वर हृदयाकडे जाणार नाही. बंध अशा प्रकारे बांधला असता जखमेतून थोडे थोडे रक्त झिरपत राहते. जखमेवर बर्फ किंवा थंडगार पाण्याची पट्टी ठेवण्याने विषाचे शोषण मंदावते. रुग्णास शक्य तेवढ्या जलदीने रुग्णालयात हालवावे. पूर्वी वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब लागणार असल्यास सर्पदंशाच्या जागी चाकूने चिरा पाडून त्यांतून रक्त काढून घेण्याचा व त्यासाठी तोंडात रोग नसणाऱ्या व्यक्तीने जखमेतून विष शोषून थुंकून टाकण्याचा उपचारकरीत. अलीकडे हा उपचार न करण्याचे तसेच रोहिणीबंध न वापरण्याचे सुचविण्यात आले आहे. सर्पदंशाच्या रुग्णास कोणत्याही स्वरूपातील मद्य देऊ नये.

सर्पदंशातील बहुसंख्य सर्प बिनविषारी असण्याची शक्यताअसते. सर्प विषारी असूनही दंश ओझरता आणि वरवरच्याअसण्याचीही शक्यता असते. दंश झालेली व्यक्ती भीतीनेच गलितगात्र बनून अवसादानानेच मृत्यू पावण्याची शक्यता असते. अशा वेळी रुग्णास धीर दिल्यानेही खूप मदत होते. रुग्णास रुग्णालायात नेते वेळी मारलेला साप बरोबर न्यावा. कारण तो विषारी की बिनविषारी हे तेथील तज्ञ ठरवू शकतात व योग्य उपचारास मदत होते.

विंचूदंश : विंचवाच्या विषाचा सौम्य वेदनांपासून थेट गंभीर अशा अवसादापर्यंत परिणाम होण्याची शक्यता असते. रुग्णास हालचालीपासून परावृत्त करून झोपवून ठेवावे. शक्य असल्यास चावल्या जागेवर व सभोवती बर्फ ठेवावा. यामुळे विशाचे अभिशोषण मंदावते. वेदना असह्य असल्यास किंवा अवसादाची लक्षणे आढळल्यास रुग्णास रुग्णालयात हलवावे.

किटकदंश : काही थोड्याच कीटकांच्या दंशामुळे गंभीर स्वरूपाचे रोग होतात. तथापि अधिहृषता (ॲलर्जी) असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत कीटकदंश मारक ठरण्याची शक्यता असते. उपचाराकरिता ‘कीटकदंश’ ही नोंद पहावी.

तातडीची प्रसूती : प्रथमोपचारकास प्रवासात, अनपेक्षित स्थळी, अपघातस्थळी किंवा क्वचित प्रसंगी घरातील स्त्री प्रसूत होताना मदत करण्याचा प्रसंग येतो. म्हणून प्रथमोपचारकास ⇨ प्रसूतिविज्ञानातील काही गोष्टींचे ढोबळ ज्ञान असणे जरुर असते. प्रसूती ही नैसर्गिक कृती असून धोकारहित प्रसूतीकरिता या विषयाच्या तज्ञाचीच गरज असते असे नसून व्यवहारज्ञान असलेली कोणतीही व्यक्ती अशा वेळी मदत करू शकते.

 प्रसूतिवेदना या गर्भाशयाच्या आवर्ती (पुनःपुन्हा होणाऱ्या) आकुंचनामुळे गर्भाशयाचे योनिमार्गाकडे असलेले तोंड उघडून वत्याचेआकारमान हळूहळू वाढत जाऊन प्रसूतीस मदत होते. प्रसूतीवेदनांचा काळ निरनिराळा असू शकतो. पहिलटकरणीत १२-१६ तास व बहुप्रसवा स्त्रीत ६-८ तास हा काळ टिकतो.प्रत्यक्ष प्रसूतीत गर्भ गर्भाशयातून व योनिमार्गातून बाहेर पडतो. प्रसूतिवेदना सुरु झाल्यापासून ते गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडे होण्यापर्यतच्या अवस्थेला ‘प्रसूति-प्रथमावस्था’ असे म्हणतात. गर्भ बाहेरपडतो त्या अवस्थेला ‘प्रसूति-द्वितीयावस्था’ म्हणतात व पहिलटकरणीत ती १-२तास आणि बहुप्रसवेत १०-३० मिनिटे टिकते. प्रसूतितृतीयावस्थेत गर्भाशयातील वार [⟶ वार-२] सुटून बाहेर पडते. या अवस्थेला ३-२० मिनिटे लागतात.

 तातडीच्या प्रसूतीच्या वेळी प्रथमोपचारकाने चटकन आडोसा करुन द्यावा व स्रीला पाठीवर सोयीस्कर रीत्या झोपवावे आणि दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून वर घेण्यास सांगावे. निसर्गास आपले कार्य करू द्यावे व प्रसूती झटपट होण्याकरिता कोणतीही लुडबुड करू नये. स्वतःचे हात स्वच्छ धुवावे. शक्य असल्यास उकळलेले पाणी किंवा ५% डेटॉल मिश्रित पाण्याने योनिद्वार पुसून घ्यावे. बाहेर येणाऱ्या बालकास अजिबात ओढू नये. बाहेर आलेल्या भागाला आधार द्यावाआणि आपोआपनिसटून बाहेरयेऊ द्यावे. पूर्णपणे बाहेर आलेल्या बालकास दोन्ही हातानी, डोके काहीसे खाली व पायाची बाजू वर असे धरावे. तोंड, नाक व घसा पुसून घ्यावा. नवजात अर्भक रडू लागून, श्वासोच्छवास करू लागताच एखाद्या टॉवेलात गुंडाळून आईजवळ ठेवावे. वैद्यकीय मदत मिळण्यास फार विलंब लागणार असल्यास प्रथमोपचारकाने काही मिनिटे थांबून पुढीलप्रमाणे ⇨ नाळ कापावी. अर्भकाच्या बेंबीपासून १० सेंमी (पाच बोटे) अंतरावर पक्क्या दोऱ्याने किंवा रिबीनीने घट्ट गाठ बांधावी. या गाठीपासून १० सेंमी. आणखी वर दुसरी तशीच घट्ट गाठ बांधावी. दोन्ही गाठींच्या मधोमध उकळवून घेतलेल्या कात्रीने किंवा चाकूने कापावे. वार बाहेर पडल्यावर वैद्यकीय तपासणीकरिता भांड्यात घालून झाकून ठेवावी. आजूबाजूचे रक्त साफ करुन स्त्रीस उबदार पांघरूण घालावे व गरम पेय द्यावे. प्रसूतीनंतर दोन तास स्त्रीने उताणेच झोपावे. तोपर्यंत थोडा थोडा होणारा रक्तस्त्राव पूर्णपणे थांबतो. नवजात अर्भकाच्या सर्वांगावर पांढरा, चीजसारखा जो थर असतो त्याला ‘भ्रूण-स्नेह’ म्हणतात. प्रथमोपचारकाने हा थर धुवून काढण्याचा प्रयत्‍न करू नये कारण तो संरक्षणात्मक असतो. रुग्णालयात न्यावे लागल्यास वार बरोबर न्यावी. नाळ कापण्यात अडचणी आल्यास वार, नाळ व नवजात अर्भक तसेच रुग्णालयात न्यावेत.

 प्रथमोपचार पेटी : प्रत्येक घरात, विशेषेकरून वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब लागण्याची शक्यताअसलेल्या ठिकाणी तसेच वारंवार व सतत प्रवास करावा लागणाऱ्यांनी, ऐनवेळी उपयोगी पडणारी साधने व काही साधी औषधे असलेली पेटी नेहमी विशिष्ट ठिकाणी ठेवणे किंवा जवळ बाळगणे हितावह असते. घरात अशी पेटी लहानमुलांच्या हाती लागणार नाही अशा बेताने ठेवावी. रेल्वे रक्षक (गार्ड) व सार्वजनिक वाहनातील वाहक व चालक यांना या पेटीतील सर्व वस्तू वापरण्याचे म्हणजेच प्रथमोपचारांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणेपुढील वस्तू अशा पेटीत असाव्यात : (१) तापमापक, (२) विजेरी, (३) आगपेटी, (४) कात्री, (५) छोटा चिमटा, (६) गरम पाण्याची रबरी पिशवी, (७) बर्फ घालता येणारी रबरी पिशवी, (८) २·५ सेंमी., ७·५ सेंमी. अशा रुंदीच्या बंधपट्ट्याच्या गुंडाळ्या (६ ते ८ नग), (९) २·५ सेंमी. रुंदीची चिकटपट्टीची एक गुंडाळी, (१०) औषधी उपयोगाचा निर्जंतुक कापूस, (११) निर्जंतुक जाळीदार कापडाच्या ५ सेंमी x ५ सेंमी. आकारमानाच्या घड्या (१२ नग), (१२) साध्याटाचण्या व सुरक्षित टाचण्या (सेफ्टी पिन्स), (१३) निरनिराळ्या आकारमानांच्या लांब वा आखूड चिकटपट्टीसहित जखमांवर लावण्याच्या निर्जंतुक पट्ट्या) (‘बॅन्ड एड’ या नावाने बाजारात मिळणाऱ्या), (१४) निरनिराळ्या आकारमानांचे लांब व आखूड बंधफलक, (१५) त्रिकोणी बंधपट्ट, (१६) प्रत्यास्थी (ताण काढून घेताच मूळ स्थितीत परत येणारे) बंधपट्ट (इलेस्टोप्लास्ट, १ किंवा २ नग), (१७) टिंक्चर आयोडीन, डेटॉल किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड, (१८) सोडा बायकार्ब (४ चहाचे चमचे), (१९) मीठ (८-१२ चहाचे चमचे), (२०) सायरप ऑफ इपेकॅक (वमनकारक), (२१) स्पिरीट अमोनिया ॲरोमॅटिकस, (२२) बर्‌नॉल किंवा प्रोपामिडीन क्रीम (१ नळी).

 संदर्भ : 1. American National Red Cross, American Red Cross First Aid Textbook, Washington, 1957.

              2. American National Red Cross, Standard First Aid and Personal Safety, New York, 1973.

              3. Bernstein, E., Ed, 1979 Medical and Health Annual, (Encyclopaedia Britannica), Chicago, 1978.

              4. Cutter, W. A., Ed., Accident Prevention and First Aid, New York, 1965.

  

कुलकर्णी, श्यामकांत परांडेकर. आ. शं. भालेराव, य. त्र्यं.