पर्ल, रेमंड : (३ जून १८७९–१७ नोव्हेंबर १९४०). अमेरिकन जीववैज्ञानिक आणि जीवविज्ञान व मानवी वैद्यक या विषयांत सांख्यिकीतील तत्त्वांचा उपयोग [→ जीवसांख्यिकी] करणारे आद्य प्रवर्तक. त्यांचा जन्म फार्मिंग्टन (न्यू हँपशर) येथे झाला व त्यांचे शिक्षण मिशिगन (अन आर्बोर) विद्यापीठ व लाइपसिक, नेपल्स व लंडन येथे झाले. लंडन येथे कार्ल पीअर्सन यांच्याबरोबर अध्ययन करीत असताना आकारवैज्ञानिक फरक आणि मानव व इतर प्राणी यांच्यातील सहसंबंध यांवर संशोधन करून त्यांनी जीवसांख्यिकीतील कार्याचा प्रारंभ केला. या विषयावरील संशोधन त्यांनी मेन ॲग्रिकल्चरल एक्सपेरिमेंट स्टेशन येथे चालू ठेवले. तेथे ते १९०७–१८ या काळात जीववैज्ञानिक आणि जीवविज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून काम पहात होते. या अवधीत त्यांनी पाळीव कोंबडीच्या प्रजोत्पादनाच्या शरीरक्रियाविज्ञानाविषयी मूलभूत संशोधन केले. १९१७–१९ मध्ये ते अमेरिकेच्या अन्न-प्रशासनाच्या सांख्यिकी विभागाचे प्रमुख होते.

बॉल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने नव्यानेच स्थापन केलेल्या स्कूल ऑफ हायजीन अँड पब्लिक हेल्थमधील वैद्यकीय सांख्यिकी व जीवसांख्यिकी विभागांची उभारणी करण्यासाठी १९१८ मध्ये पर्ल यांना पाचारण करण्यात आले होते. १९२५ मध्ये त्या संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायॉलॉजिकल रिसर्चचे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनी आपले संशोधन प्रजोत्पादनक्षमता व लोकसंख्येची वाढ, मानवातील दीर्घायुष्य, तसेच आरोग्य व रोग यांचा शरीराशी असलेला संबंध यांवर केंद्रित केले.

क्वार्टर्ली  रिव्ह्यू ऑफ बायॉलॉजी (१९२६) व ह्यूमन बायॉलॉजी (१९२९) ह्या दोन नियतकालिकांचे ते संस्थापक होते. त्यांनी विपुल लेखन केलेले असून त्यात ७०० लेख व अनेक ग्रंथ आहेत. त्यांतील इन्ट्रोडक्शन टू मेडिकल बायोमेट्री अँड स्टॅटिस्टिक्स (१९२३), स्टडीज इन ह्यूमन बायॉलॉजी (१९२४), अल्कोहॉल अँड लाँजिव्हिटी (१९२६), द नॅचरल हिस्ट्री ऑफ पॉप्युलेशन (१९३९) हे फार महत्त्वाचे आहेत. ते हर्शी येथे मृत्यू पावले.

जमदाडे, ज. वि.