कापूरपक्षी : (नाईटजार). कॅप्रिमुल्जिडी या पक्षिकुलातला हा पक्षी आहे. भारतात याच्या कित्येक जाती आढळतात. त्यांचे बाह्यत: एकमेकींशी बरेच साम्य असल्यामुळे पक्षी पाहिल्यावर त्याची जात ओळखणे कठीण जाते, पण त्यांचे आवाज वेगवेगळे असल्यामुळे आवाजावरून त्यांची जात ओळखता येते. भारतात सगळीकडे आढळणाऱ्या सामान्य जातीचे शास्त्रीय नाव कॅप्रिमुल्जस एशियाटिकस असे आहे. झुडपे असलेले त्याचप्रमाणे खडकाळ उघडे मैदानी प्रदेश, गवत व झुडपे वाढलेले कोरडे ओढे व नाले, शेतीच्या व मनुष्य वस्तीच्या आसपासचा भाग आणि झाडी या ठिकाणी हा पक्षी राहतो.

कापूर पक्षी

हा साधारणपणे साळुंकीएवढा असतो. वरचा भाग करडा तपकिरी, पिवळसर व तांबूस असून त्याच्यावर काळ्या रेषा असतात मानेच्या मागच्या भागावर एक रूंद पिवळसर वलयाकृती पट्टा असून त्यावर काळसर चिन्हे असतात. पंखावर पट्टे असून उडताना ते जास्त स्पष्ट दिसतात. खालचा भाग पिवळसर असून त्याच्यावर तपकिरी रंगाचे पुसट पट्टे व ठिपके असतात. सबंध शरीराची रंगव्यवस्था मायावरणी नमुन्याची [→ मायावरण] असल्यामुळे बाह्य परिस्थितीशी हा पक्षी एकरूप झालेला असतो व आपल्याला मुळीच दिसत नाही. चोच आखूड, टोकाशी वाकडी आणि तपकिरी असते. जिवणी बरीच मोठी असल्यामुळे याला फार मोठा आ वासता येतो.

हा पक्षी दिवसभर झुडपांखाली सुरक्षित ठिकाणी झोपलेला असतो. रात्रिंचर असल्यामुळे तिन्हीसांजेच्या सुमारास भक्ष्य मिळविण्याकरिता तो बाहेर पडतो व रात्रभर त्याचा हा उद्योग सुरू असतो. पतंग, मुद्‌गल (भुंगे) आणि इतर कीटक याचे भक्ष्य होय. याचा आवाज चक्-चक्-चक्-र-र असा काहीसा असतो. याच्या शरीरावरची सगळी पिसे मऊ असल्यामुळे उडताना मुळीच आवाज होत नाही.

प्रजोत्पादनाचा काळ मुख्यत्वेकरून मार्चपासून सप्टेंबरपर्यंत असतो, पण स्थानिक परिस्थितीला अनुसरून तो पुढेमागे होतो. घरटे नसते. एखाद्या झुडपाखाली सुरक्षित ठिकाणी मादी दोन अंडी घालते. त्यांचा रंग गुलाबी किंवा तांबडा पिवळा असून त्यावर तांबूस तपकिरी किंवा जांभळे ठिपके असतात.

कापूर पक्षी गाईचे अथवा बकरीचे आचळ तोंडात धरून त्यांचे दूध पितो, अशी दंतकथा पुष्कळ देशांत प्रचलित आहे.

कर्वे, ज. नी.