यूग्लीना : प्रोटोझोआ संघाच्या मॅस्टिगोफोरा वर्गातील यूग्लीनिडा या गणाचा हा एककोशिक (एक पेशी असलेला) प्राणी आहे पण काही वनस्पतिसदृश लक्षणांमुळे ⇨ शैवलांच्या यूग्लीनोफायटा या विभागातही यांचा समावेश केला जातो. यांचा रंग हिरवा आहे. हे गोड्या पाण्याच्या डबक्यात आढळतात. कधीकधी यांची संख्या इतकी होते की, डबक्यातले पाणी हिरवे दिसते.

यूग्लिनाच्या शरीराचा आकार लांबट असून त्यावर एक कशाभिका (चाबकाच्या वादीसारखी संरचना) असते. शरीराच्या मध्यभागी एक गोलीय केंद्रक (कोशिकेतील कार्यांवर नियंत्रण ठेवणारा जटिल गोलसर पुंज) असून त्यात एक अंतःकाय (केंद्रकाच्या मध्यालगतचा रंगसूत्र द्रव्याचा पुंज) असतो. कधीकधी अंत:कायांची संख्या एकापेक्षा जास्त असते. अंतःकायात न्यूक्लिइक अम्लाचा अभाव असतो. केंद्रकातील रंगसूत्रद्रव्य मण्यांच्या माळेसारखे असते. शरीरात हरितद्रव्ययुक्त एक किंवा अनेक वर्णलवक (कणिका) असतात. यामुळेच यूग्लिनाचा रंग हिरवा दिसतो. वर्णलवकांमुळे यात प्रकाशसंश्लेषणाची [सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने कार्बन डाय – ऑक्साइड व पाणी यांपासून कार्बोहायड्रेटे निर्माण करण्याच्या प्रक्रियेची ⟶ प्रकाशसंश्लेषण] क्षमता आली आहे. या गुणामुळे काही शास्त्रज्ञ याची गणना वनस्पतींत करतात. याच्या शरीराची लांबी निरनिराळ्या जातींत ०·०१५ ते ०·५ मिमी. इतकी असते. अमीबाप्रमाणे याचे जीवद्रव्य (जिवंत कोशिका द्रव्य) बहिर्द्रव्य व अंतर्द्रव्य यांत विभागलेले असते. शरीरावर पातळ उपचर्म (अगदी बाहेरचा थर) असते. उपचर्म जाड झाल्याने पृष्ठावर समांतर पण तिरप्या ओळी दिसतात. शरीराच्या अग्र टोकावर असलेले मुख चंबूसारख्या आशयातून ग्रसिकेत (नालासारख्या संरचनेत) उघडते. ग्रसिका शेवटी एका मोठ्या वाटोळ्या आशयात उघडते. संकोचनशील रिक्तिका (स्रावयुक्त पोकळी) आपल्या अंतर्वस्तूंचे विसर्जन या आशयात करतात. मुख व ग्रसिका यांचा उपयोग अन्नग्रहणासाठी होत नसून आशयातील पदार्थ बाहेर टाकण्यास होतो. चाबकासारखी कशाभिका आशयाच्या जवळ असलेल्या कशामूलकातून उद्‌भवते. या कशाभिकेचा उपयोग पोहण्यासाठी होतो.

 यूग्लीना ग्रासिलीस : (१) मुख, (२) कशामिका, (३) दृक्बिंदू, (४) आशय, (५) संकोचनशील रिक्तिका, (६) केंद्रक, (७) वर्णलवक, (८) अंत:कायशरीराच्या पृष्ठभागातून अन्नाचे शोषण केले जाते. यूग्लिनाच्या निरनिराळ्या जातींच्या अन्नाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. प्रयोगशाळेत संवर्धित केलेल्या (वाढविलेल्या) यूग्लिनांच्या जातींत त्यांच्या अन्नाच्या माध्यमात कोणती रासायनिक द्रव्ये व जीवनसत्त्वे घालावी लागतात, याबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. यूग्लीना ग्रासिलीस या जातीचा उपयोग माध्यमातील जीवनसत्त्व ब१२ याचे मापन करण्यास केला जातो. यूग्लीना गोड्या पाण्यात, मचूळ पाण्यात किंवा चिखलात आढळतात. यांची संख्या थोड्या काळात खूप वाढते. पाणी आटल्यामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर ते स्वतःचे पुटीभवन (पुटीमध्ये म्हणजे कोशिकेला वेढणाऱ्या निर्जिव कलेमध्ये स्वतःला बंदिस्त करून घेण्याची प्रक्रिया) करून घेऊन मात करतात.

कशाभिकेच्या छेदात इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने नेहमीचे तंतू दिसतात. याच्या आवरणातही पार्श्विक तंतू असतात. काही जातींत दुसरी लहान कशाभिका आढळते. ही लहान कशाभिका मोठ्या कशाभिकेस जोडलेली असते. कशाभिकेवर प्रकाशसंवेदी कणिका असतात. आशयाजवळ लाल कणांचा बनलेला एक दृक्‌बिंदू (डोळ्याचे कार्य करणारा वर्णकाचा ठिपका) असतो. ही यूग्लिनातील एक ठळक संरचना होय. यात जीवद्रव्य असून या जीवद्रव्यात हीमॅटोक्रोमाच्या (तांबड्या रंगद्रव्याच्या) कणिका असतात. शरीराच्या इतर भागापेक्षा अग्र टोक जास्त प्रकाशसंवेदी असते.

ग्लुकोजाचे बहुवारिक असलेल्या पॅरामायलम कणिका आकाराने मोठ्या व थोड्या किंवा आकाराने लहान व पुष्कळ असून सर्वत्र पसरलेल्या असतात. याचा आकार दांड्यसारखा, चापट पत्र्यासारखा अथवा खोलगट कपासारखा असतो. वर्णलवकात प्रकणू (स्टार्चनिर्मितीचे व साठविण्याचे ठिकाण असलेला रंगहीन पुंज) असतो. या प्रकणूवर पॅरामायलम कणिकांचे आवरण असते किंवा नसते. वर्णलवकात मेदसदृश पदार्थ असतो. यू. ग्रासिलिसावर जर स्ट्रेप्टोमायसीनची प्रक्रिया केली, तर वर्णलवकाचा नाश होतो. याचे संवर्धन जर काही काल अंधारात ठेवले, तरीही वर्णलवक नाश पावतात पण हेच संवर्धन उजेडात ठेवले, तर काही कालातच ते पुन्हा निर्माण होतात. तापमान आणि प्रकाश यांचाही वर्णलवकांवर परिणाम होतो.

यांचे प्रजनन अनुदैर्ध्य द्विभाजनाने (लांबीच्या दिशेत दोन भाग होण्याची क्रिया होऊन) होते. यांच्यात लैंगिक प्रजनन आढळत नाही.

इनामदार, ना. भा. जोशी, मीनाक्षी