पाणसाप : बिनविषारी साप असून बहुधा गोड्या पाण्यात किंवा गोड्या पाण्याच्या आसपास आढळतात. सामान्यतः या सगळ्यांना विरोळे म्हणतात. पाणसापांचा समावेश कोल्युब्रिडी सर्पकुलात केला आहे.

नेहमीच पाण्यात राहणाऱ्या सापांचे शरीर किंचित चापट असते. नाकपुड्या मुस्कटाच्या बाजूंवर असण्याऐवजी वरच्या पृष्ठावर असतात त्यामुळे पाण्यात असताना मुस्कट पाण्याबाहेर काढून त्यांना सहज श्वासोच्छ‌्वास करता येतो. डोळेदेखील काहीसे डोक्याच्या वरच्या बाजूवर असतात. मासे आणि बेडूक खाऊन ते आपली उपजीविका करतात. यांच्या शरीरावरील खवले बारीक असतात काही जातींत तर ते इतके बारीक असतात की, ते कणांसारखे दिसतात.

भारतात आढळणाऱ्या विरोळ्यांपैकी काही फक्त गोड्या पाण्यात राहणारे आहेत पण काही नदीमुखाजवळ समुद्रात राहणारे असून समुद्रकिनाऱ्यावर आढळतात. नदीमुखातून ते नदीत कित्येक किलोमीटर आत जातात.

या सापांपैकी दोन-तीन जातींचे साप भारतात नेहमी सापडणारे आहेत. 

आ. १ पट्टेरी विरोळा (चरसिड्रस ग्रॅन्युलेटस)पट्टेरी विरोळा : याचे शास्त्रीय नाव चरसिड्रस ग्रॅन्युलेटस आहे. हा भारतात सगळीकडे समुद्रकिनाऱ्यावर आढळतो. मुंबईच्या आसपास हा बराच सापडतो. लांबी सु. १ मी. पर्यंत असते. पाठ करड्या रंगाची असून तिच्यावर एकाआड एक असे तपकिरी आणि पिवळसर आडवे पट्टे असतात. पिल्लांच्या अंगावरील पट्टे पिवळे व काळे असतात. नाकपुड्या मुस्कटाच्या वरच्या पृष्ठावर एकमेकींजवळ असतात. डोळ्यातील बाहुली उभी असते. हा साप स्वभावाने गरीब असतो. ह्याला पकडल्यावर सुटण्याकरिता तो धडपड करतो पण चावत नाही. पाण्यात जरी हा सफाईने पोहत असला, तरी जमिनीवर तो मोठ्या कष्टाने हळूहळू सरपटू शकतो. मादी अंडी घालीत नाही. तिला एका खेपेला ६ ते ८ पिल्ले होतात.

आ.२. हिरवा विरोळा (हेलिकॉप्स शिस्टोसस)हिरवा विरोळा : हा नेहमी आढळणारा पाणसाप आहे. ह्याचे शास्त्रीय नाव हेलिकॉप्स शिस्टोसस आहे. हा नद्या, तलाव आणि पाण्याच्या डबक्यात किंवा यांच्या आसपास राहतो. ह्याची लांबी सु. ६० – ७५ सेंमी. पर्यंत असते. डोळ्यातील बाहुली वाटोळी असते. नाकपुड्या चिरेसारख्या असतात. पाठीवरील प्रत्येक खवल्यावर कणा असल्यामुळे ती खरखरीत लागते, शेपूट लांब असते. पाठीचा रंग गर्द हिरवा असतो आणि पोट पिवळ्या रंगाचे असते. हा चपळ पण गरीब साप आहे. हातात पकडला तरी चावत नाही. मासे आणि बेडूक हे त्याचे भक्ष्य होय, मादी एका खेपेला १० ते २५ अंडी पाण्याच्या जवळपास घालते. हा सपाट प्रदेशातला साप असला, तरी ९१५ मी. उंचीवरील प्रदेशातसुद्धा सापडतो.

श्वानमुखी विरोळा: याचे शास्त्रीय नाव सेरेबेरस ऱ्हिंकॉप्स आहे. महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्याकडील नद्यांत हा साप सापडतो. लांबी ११० सेंमी. पर्यंत असते. पाण्याखाली असताना याचा रंग निळसर करडा दिसतो. पाठीवर काळसर पट्टे असतात. डोक्याकडे पट्ट्यांच्या ऐवजी ठिपके असतात. पोट पिवळसर असते. डोळ्यांच्या मागे काळी रेघ असते. मादीला पिल्ले होतात.

कर्वे. ज. नी.