फ्रेदेरिक मीस्त्रालमीस्त्राल, फ्रेदेरिक : (८ सप्टेंबर १८३०–२५ मार्च १९१४). प्रॉव्हांसाल भाषा व साहित्य ह्यांचे आपल्या काव्याद्वारे पुनरुज्जीवन घडवून आणून त्यांना जागतिक साहित्यात मान्यता मिळवून देणारा फ्रेंच कवी व भाषाभ्यासक. दक्षिण फ्रान्समधील माय्यान- हल्लीचे बुश-द्यु-रोन- येथे एका सधन शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. आव्हीन्याँ येथील ‘कॉलेज रॉयल’ येथे शिकत असताना त्याचे शिक्षक जोसेफ रूमानीय्य ह्यांच्याशी त्याची मैत्री जमली. मीस्त्रालने ॲक्स–आ–प्रोव्हांस विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती (१८५१) परंतु वकिलीचा व्यवसाय न करता, जोसेफ रूमानीय्य ह्यांच्या सहकार्याने प्रॉव्हांसाल भाषा–साहित्य–संस्कृतीचे कार्य हाती घेतले. त्यासाठी आपल्या काही कविमित्रांच्या साह्याने ‘फेलिब्रीज’ नावाचे एक मंडळ सुरू केले. त्रूबदूरांनी संपन्न केलेल्या प्रॉव्हांसाल भाषेला पुन्हा तिचे प्राचीन वैभव प्राप्त करून देण्याचा त्याचा प्रयत्न जरी यशस्वी झाला नाही, तरी ह्या ध्येयपूर्तीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्याने रचिलेल्या कवितांनी मात्र प्रॉव्हांसाल साहित्यसंचितात मोलाची भर घातली.

मीस्त्रालचे मीरेइस हे दीर्घकाव्य १८५९ मध्ये प्रसिद्ध होताच एकदम तो प्रसिद्धीच्या झोतात आला. या पुस्तकात त्याने प्रॉव्हांसालबरोबर फ्रेंच भाषेतील रूपांतरही दिले आहे. त्याची इतर पुस्तकेही द्वैभाषिक प्रकाशने आहेत. फ्रेंच रूपांतरे मीस्त्रालने स्वतः किंवा त्याच्या सहकाऱ्यांनी केलेली आहेत. एका श्रीमंत शेतकऱ्याची मुलगी मीरेइस आणि टोपल्या विणणाऱ्या गरीब माणसाचा मुलगा यांच्या शोकान्त प्रेमकथेवर मीरेइस आधारलेले असून त्यात प्रोव्हाँसमधील लहान गावातले जीवन, तिथला निसर्ग, लोकांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचे पारंपरिक रीतिरिवाज, उत्सव, नृत्ये, गीते, त्यांच्यामध्ये प्रचलित असलेल्या रम्य लोककथा या सर्वांचे आल्हाददायक चित्रण आहे. मीरेइसची १९६५ पर्यंत विविध भाषांतून पन्नासपेक्षा अधिक भाषांतरे झालेली आहेत. कालाँदो (फ्रेंच शी. कालाँदाल, १८६७) हे दीर्घकाव्य प्रतिकात्मक आहे. त्यातील राजकन्या प्रोव्हाँस, तिला बंदीवासात ठेवणारा लुटारू म्हणजे फ्रान्स आणि तिची सुटका करणारा राजपुत्र म्हणजे फेलिब्रीज. मीस्त्रालच्या १८४८ पासूनच्या उत्कृष्ट कवितांचा संग्रह १८७५ मध्ये लिस ईस्क्लो दॉर (फ्रेंच शी. ले ईल दॉर इं. शी. द गोल्डन आयल्स) या नावाने प्रकाशित झाला. यानंतरची दोन विशेष उल्लेखनीय प्रकाशने म्हणजे ‘नेर्तो’ (१८८४) हे कथाकाव्य आणि ला रेनो जानो (१८९०, इं. शी. क्वीन जेन) हे ऐतिहासिक नाटक. सदर नाटक फारसे यशस्वी ठरले नाही. आपल्या ‘लु पुएम दु रोझ’ (१८९७, इं. भा. द साँग ऑफ द रोज, १९३७) या उत्कृष्ट दीर्घकाव्यात वाफेवर चालणाऱ्या बोटी उपयोगात येण्याच्या काळातील-साधारण १८३० च्या सुमाराचे-रोन नदी व तिच्या किनाऱ्यावरील लोकांचे दैनंदिन जीवन, रीतीभाती, प्रचलित समजुती व लोककथा या सर्वांचे सुंदर दर्शन मीस्त्रालने घडवले आहे. या काव्यात मीस्त्रालने मुक्तच्छंदाचा समर्थपणे उपयोग केला आहे. काव्यकृती लिस उलीव्हादो (१९१२, इं. शी. ऑलिव्ह गॅदरिंग) आणि आत्मचरित्रपर मेझोरिजिन (१९०६, इं. भा. द मेम्वार्स, १९०७) ही दोन प्रकाशने त्याच्या स्वाभाविक निर्भर शैलीची साक्ष देतात. यांच्याशिवाय त्याच्या कथा प्रोझ दार्माना (तीन भाग) ह्या कथासंग्रहात अंतर्भूत आहेत. ली मेइसून हे त्याचे १८४८ साली रचलेले काव्य त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. भाषाभ्यासक म्हणून मीस्त्रालला प्रतिष्ठा मिळवून देणारा लु त्रेझार दु फेलिब्रीज (फ्रेंच शी. ‘त्रेझार द्यु फेलिब्रीज’, इं. शी. ‘द ट्रेझरी ऑफ द फेलिब्रीज’) हा द्विखंडात्मक मौलिक ग्रंथ १८७८ ते १८८६ मध्ये प्रकाशित झाला. दक्षिण फ्रान्सच्या प्रॉव्हांसाल भाषेतील शब्द, वाक्प्रचार, म्हणी, लोककथा, या सर्वांचा दीर्घ परिश्रमाने व साक्षेपी, संशोधक वृत्तीने या कोशामध्ये मीस्त्रालने संग्रह केलेला आहे. भाषाभ्यासाच्या क्षेत्रातील मीस्त्रालचे हे कार्य आणि त्याची इतर साहित्यसेवा यांचा स्पॅनिश नाटककार होसे एचेगाराई याच्या जोडीने १९०४ साली नोबेल पारितोषिक देऊन यथोचित गौरव करण्यात आला (या बक्षिसाच्या रकमेतील काही भाग मीस्त्रालने आर्ल येथे स्थापन केलेल्या ‘म्युझेआन आर्लातान’ या वस्तुसंग्रहालयासाठी खर्च केला).

माय्यान येथे त्याचे निधन झाले. ज्या चळवळीसाठी आयुष्यभर पाच तपे त्याने अविश्रांत धडपड केली, ती फेलिब्रीज चळवळ त्याच्यानंतर थंडावली.

संदर्भ : 1. Aldington, R. Introduction to Mistral, London, 1956.

2. Edwards, T. The Lion of Arles A Portrait of Mistral and His Circle, New York, 1963.

3. Girdlestone, C. M. Dreamer and Striver: The Poetry of Frederic Mistral, 1937.

टोणगावकर, विजया