लौए, माक्स टेओडोर फेलिक्स फोन : (९ ऑक्टोबर १८७९-२४ एप्रिल १९६०). जर्मन भौतिकीविज्ञ.क्ष-किरणांच्या विवर्तनाच्या [⟶ क्ष-किरण] लावलेल्या शोधाबद्दल त्यांना १९१४ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. या शोधामुळे शास्त्रज्ञांना स्फटिकांच्या संरचनेचा अभ्यास करणे शक्य झाले व आधुनिक इलेक्ट्रॉनिकीतील ⇨ घन अवस्था भौतिकी या महत्त्वाच्या क्षेत्राचा प्रारंभ झाला.

फोन लौए यांचा जन्म फाफनडॉर्फ येथे झाला. १८९८ मध्ये शालेय शिक्षण संपल्यावर त्यांनी एक वर्ष लष्करी नोकरी केली. त्यानंतर त्यांनी स्ट्रॅस्बर्ग विद्यापीठात गणित, भौतिकी व रसायनशास्त्र या विषयांचा अभ्यास केला परंतु ते लवकरच गटिंगेन विद्यापीठात डब्ल्यू. फोख्ट व डब्ल्यू. अब्राहम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी गेले. नंतर १९०२ मध्ये ते बर्लिन विद्यापीठात माक्स प्लांक यांच्या हाताखाली काम करू लागले. १९०३ मध्ये त्या विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळविल्यानंतर ते गटिंगेन विद्यापीठात दोन वर्षांकरिता गेले. १९०५ साली बर्लिन येथील इन्स्टिट्यूट फॉर थिऑरेटिकल फिजिक्स या संस्थेत माक्स प्लांक यांचे साहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथे त्यांनी प्लांक यांच्या ⇨एंट्रॉपी या संकल्पनेचा प्रकाशकीमध्ये उपयोग करण्यासंबंधी महत्त्वाचे कार्य केले. १९०६ मध्ये विद्यापीठीय अध्यापकपदाची अर्हता प्राप्त झाल्यावर ते १९०९ मध्ये म्यूनिक विद्यापीठात विनावेतन अध्यापक झाले आणि तेथे त्यांनी प्रकाशकी, ⇨ऊष्मागतिकी व ⇨सापेक्षता सिद्धांत या विषयांचे अध्यापन केले. पुढे ते १९१२ मध्ये झुरिक विद्यापीठात व १९१४ मध्ये फ्रँकफुर्ट येथे भौतिकीचे प्राध्यापक झाले. १९१६ पासून त्यांनी बुर्झवर्ग विद्यापीठात युद्धविषयक संशोधनकार्य केले. बर्लिन विद्यापीठात १९१९ साली भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली व १९४३ पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. 

बर्लिन-डालेम येथे आइन्स्टाइन यांच्या संचालकत्वाखाली स्थापन झालेल्या कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूट फॉर थिऑरेटिकल फिजिक्समध्ये फोन लौए द्वितीय संचालकपदावर होते. या संस्थेचे ते पुढे उपसंचालक झाले. या संस्थेचा जर्मन वैज्ञानिक संशोधनाशी निकटचा संबंध होता. या काळात व नंतरही फोन लौए यांचा जर्मनीतील वैज्ञानिक संशोधनाच्या विकासावर पुष्कळच प्रभाव पडला होता. नाझींनी सत्ताग्रहण केल्यावर झालेल्या आइन्स्टाइन यांच्या बडतर्फीचा व सापेक्षता सिद्धांताची ‘जगभर पसरलेली ज्यू चलाखी’ म्हणून निंदा करण्याबद्दल फोन लौए यांनी  तीव्र निषेध केला. दुसऱ्या महायुद्धात कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूट व्ह्यूर्टबेर्कमधील हेकिंगन येथे हालविण्यात आल्यावर फोन लौएही तेथे गेले. १९४४-४५ मध्ये त्यांनी भौतिकीचा इतिहास ग्रंथरूपाने लिहिला. या ग्रंथाच्या चार आवृत्त्या झाल्या व सात भाषांत त्याची भाषांतरे झाली. त्या वेळी संस्थेत व्हेर्नर हायझेनबेर्क यांच्या मार्गदर्शनाखाली लष्करी संशोधन चालू होते. फोन लौए यांनी अणुऊर्जा निर्मितीच्या युरेनियम प्रकल्पात भाग घेतलेला नव्हता परंतु महायुद्धानंतर दोस्त सैन्याने त्यांना बंदिवान करून इतर नऊ जर्मन शास्त्रज्ञांबरोबर इंग्लंडला पाठविले. १९४६ मध्ये परत आल्यावर ते गटिंगेन येथील माक्स प्लांक इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक व तेथील विद्यापीठात प्राध्यापक झाले. पुढे १९५१ मध्ये बर्लिन-डालेम येथील माक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन फिजिकल केमिस्ट्री या संस्थेचे ते संचालक झाले व १९५८ मध्ये या पदावरून निवृत्त झाले.

 

प्रारंभीच्या काळात त्यांनी १९०७-११ मध्ये सापेक्षता सिद्धांताच्या उपयोजनावर सात निबंध प्रसिद्ध केले. त्यांनी १९११ मध्ये मर्यादित सापेक्षता सिद्धांतावर व १९२१ मध्ये व्यापक सापेक्षता सिद्धांतावर ग्रंथ लिहिले. या दोन्ही ग्रंथांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. कणांच्या आवर्ती स्फटिकीय रचनेतून प्रकाशतरंग जाण्यासंबंधीच्या समस्यांचा अभ्यास करीत असताना अशा माध्यमात पुष्कळच लघुतर तरंगलांबी असलेल्या क्ष-किरणांचे विवर्तन वा व्यतिकरण [⟶ प्रकाशकी] होऊ शकेल आणि स्फटिक असे माध्यम पुरवू शकतील, अशी कल्पना त्यांना सुचली, म्हणजेच स्फटिकातील आणवीय जालकाचा क्ष-करिणांसाठी ⇨विवर्तन जालकासारखा उपयोग करता येऊ शकेल, असे त्यांना वाटत होते. डब्ल्यू. फ्रीड्रिख व पी. निपिंग यांनी फोन लौए यांची कल्पना प्रयोगांद्वारे बरोबर असल्याचे सिद्ध केले. फोन लौए यांनी यासाठी गणितीय सूत्रांची मांडणी केली व हा शोध १९१२ मध्ये प्रसिद्ध झाला. या शोधामुळे  क्ष-किरण हे विद्युत् चुंबकीय स्वरूपाचे आहेत, असे सिद्ध झाले. त्यांची तरंगलांबी मोजणे शक्य झाले व यापूर्वी गृहीत म्हणूनच धरण्यात येणाऱ्या द्रव्याच्या आणवीय संरचनेचा निर्णायक पुरावा मिळाला. त्याचप्रमाणे स्फटिकांची आणवीय संरचना नियमित पुनरावर्ती मांडणीच्या स्वरूपाची आहे, असा पुरावा मिळून भौतिकी, भौतिकीय रसायनशास्त्र, धातुविज्ञान इ. विषयांत ⇨स्फटिकविज्ञानाचे नवीन युग सुरू झाले तसेच ⇨सर लॉरेन्स ब्रॅग व ⇨सर विल्यम ब्रॅग यांच्या त्यानंतरच्या कार्यास चालना मिळाली. या विषयावर फोन लौए यांनी त्यांनंतरच्या कार्यास चालना मिळाली. या विषयावर फोन लौए यांनी त्यानंतरही संशोधन चालू ठेवले होते. या कार्याखेरीज त्यांनी बर्लिन विद्यापीठात असताना ⇨अतिसंवाहकतेविषयी महत्त्वाचे कार्य केले आणि ते पुढे एफ्. लंडन व एच्. लंडन यांच्या अतिसंवाहकता सिद्धांताकरिता आधारभूत ठरले. १९३७-४७ या काळात त्यांनी या विषयावर एक ग्रंथ व १२ निबंध प्रसिद्ध केले. त्यांनी ⇨पुंज सिद्धांत, ⇨क्रॉम्पटन परिणाम व अणूचे विघटन यांसंबंधीही संशोधन  केले होते. 

नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना वॉन, स्टटगार्ट, म्यूनिक, बर्लिन, मँचेस्टर व शिकागो या विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या, तसेच लँडेनबर्ग पदक, माक्स प्लांक पदक, कलकत्त्याच्या इंडियन ॲसोसिएशनचे सुवर्ण पदक वगैरे सन्मान मिळाले. ते बर्लिनची ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, रशियन ॲकॅडेमी, अमेरिकन फिजिकल सोसायटी, लंडनची रॉयल सोसायटी वगैरे अनेक मान्यवर संस्थांचे सदस्य होते. १९४८ मध्ये ते इंटरनॅशनल युनियन ऑफ क्रिस्टॅलोग्राफी  या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष होते. त्यांचे सर्व कार्य Gesammette Schriften und Vorträge (३ खंड, १९६१) या शीर्षकाखाली संग्रहित करण्यात आलेले असून त्यात त्यांचे आत्मचरित्रही आहे. ते बर्लिन येथे मोटार अपघातात मृत्यू पावले.

भदे, व. ग.