ब्रोकन हिल – १ : ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स राज्याच्या पश्चिममध्य भागातील महत्त्वाचे खाणकेंद्र. लोकसंख्या २९,७४३ (१९७२ अंदाज. जगातील अशुद्ध चांदीच्या खाणींच्या अतिसमृद्ध क्षेत्रांपैकी एका क्षेत्राचे हे केंद्र १८८४ पासून ‘सिल्व्हर सिटी’ म्हणून प्रसिद्ध आहे. मेन बॅरिअर रेंज या तुटकतुटक टेकड्यांच्या रांगेच्या पूर्व बाजूवर, साउथ ऑस्ट्रेलियाच्या सरहद्दीपासून ५० किमी. पूर्वेस, उष्ण व निमओसाड प्रदेशात हे वसलेले आहे. शहराच्या आसपासच्या खाणींत चांदी, शिसे, जस्त, कथिल व इतर काही धातू सापडतात. शिसे व जस्त यांच्याशी संयुक्त असलेला गंधक गंधकाम्लाच्या उत्पादनासाठी उपयोगी पडतो. वेस्ट डार्लिंग कुरण प्रदेशाचेही ते केंद्र आहे. १८८७ मध्ये ते ५४० किमी. वरील ॲडिलेडशी आणि १९२७ नंतर ९१२ किमी.वरील सिडनीशी रेल्वेने जोडण्यात आले. सिल्व्हर सिटी व बॅरिअर या महामार्गावरील हे प्रस्थानक असून ते देशातील मोठ्या शहरांशी हवाई मार्गानेही जोडले आहे. १८८८ मध्ये येथे नगरपालिका स्थापन झाली व यास १९०७ मध्ये शहराचा दर्जा मिळाला. मजूर संघटनांच्या एकत्रीकरणाने झालेल्या दि बॅरिअर इंडस्ट्रियल कौन्सिलचे येथील नागरी व्यवहारावर बरेच वर्चस्व आहे.येथे तंत्र महाविद्यालय, रुग्णालये व इतर आधुनिक नागरी सुविधा आहेत. ‘रॉयल फ्लाइंग डॉक्टर सर्व्हिस’ तसेच ‘रेडिओद्वारा शिक्षण’ यांचे ब्रोकन हिल हे महत्त्वाचे केंद्र आहे. ११२ किमी.वरील डार्लिंग नदीतून शहरास नळाद्वारे पाणीपुरवठा होतो.

कुमठेकर, ज. व.