हृदय : शरीरातील अत्यंत महत्त्वाचे असे हे इंद्रिय पोकळ व स्नायुमय असून त्याचे कार्य म्हणजे रक्ताचे उत्क्षेपण करून ते सर्व इंद्रियास पोहोचविणे. हे वक्षगुहेत उरोस्थी आणि बरगड्यांच्या मागे, दोन्ही फुप्फु-सांच्या मधे अंशतः झाकलेले असते. त्याचा वरचा भाग (अथवा मूळ) उरोस्थीच्या तिसऱ्या बरगडीशी झालेल्या सांध्याच्या मागे सुरू होतो. तेथून ते डावीकडे पसरलेले असून त्याचे अग्र डाव्या बाजूच्या पाचव्या व सहाव्या बरगड्यांच्या मध्यभागी असते. डाव्या स्तनापासून खाली सरळ उभी रेघ काढली, तर हृदयाचे खालचे टोक त्या रेघेच्या आत २ सेंमी. असते. 

 

आ. १. हृदयाचे आंतरस्थान : (१) भित्तीय परिफुप्फस, (२) मध्यावकाशी परिफुप्फुस, (३) उजवे फुप्फुस, (४) यौवनलुप्त ग्रंथी, (५) ऊर्ध्वमहानीला, (६) उजवी पृथुकपाल नीला, (७) पृथुकपाल कबंध, (८) अधोजत्रू रोहिणी आणि नीला, (९) आंतरयुग्मिका नीला, (१०) डावी सामान्य ग्रीवा रोहिणी, (११) श्वास-प्रणाल, (१२) पहिली फासळी, (१३) डावी पृथुकपाल नीला, (१४) महारोहिणी चाप, (१५) डावे फुप्फुस, (१६) हृदय, (१७) परिहृदय, (१८) मध्यपटल. 
 
आ. २. हृदयाचा उभा छेद : (१) उजवे निलय, (२) त्रिदल झडप, (३) उजवे अलिंद, (४) उजव्या फुप्फुस नीला, (५) उजव्या फुप्फुस रोहिण्या, (६) पृथुकपाल कबंध, (७) डावी सामान्य ग्रीवा रोहिणी, (८) डावी अधोजत्रू रोहिणी, (९) महारोहिणी, (१०) डाव्या फुप्फुस रोहिण्या, (११) डाव्या फुप्फुस नीला, (१२) फुप्फुस झडप, (१३) डावे अलिंद, (१४) महारोहिणी झडप, (१५) द्विदली झडप, (१६) डावे निलय. 
 

काही व्यक्तींमध्ये भ्रूणावस्थेतील वाढीच्या प्रगतीत अडथळा झाल्याने हृदय किंचित उजव्या बाजूस सरकलेले आढळते. त्यामुळे स्तनरेघेपासून आतील अंतर २ सेंमी.पेक्षा अधिक असते. याखेरीज काही अत्यंतदुर्मिळ (१०,००० ते १२,००० एकके) घटनांमध्ये हृदय आणिपोटातील सर्व इंद्रिये डाव्या ऐवजी उजवीकडे (दक्षिण आवर्तन) आढळतात त्यामुळे हृदयाचा विस्तार उजव्या बरगडीकडून उजवीकडे सहाव्या बरगडीकडे झालेला आढळतो. ठोके छातीच्या उजव्या भागात पडत असतात. या दोन्ही प्रकारच्या दक्षिण हृदयत्वांमध्ये इतरही काहीदोष असण्याची शक्यता असते.

 

हृदय काहीसे लांबट तिकोनी असून त्याची वरची बाजू अथवामूळ रुंद असते. या भागातून शरीरास रक्त नेणारी महारोहिणी निघते वतेथेच शरीराच्या वरच्या भागातून रक्त आणणारी महानीला हृदयात शिरते. हृदयाचे खालचे डावे टोक (अग्र) स्नायूंचे बनलेले असून ते टणक असते. प्रौढ मनुष्याच्या हृदयाची लांबी (मुळापासून अग्रापर्यंत) सु. १२ सेंमी. असून रुंदी जास्तीत जास्त ८-९ सेंमी. आणि जाडी ६ सेंमी. असते. त्याचे सरासरी वजन २३०–३४० ग्रॅ. असते. 

 

हृदयाची भित्ती (अथवा तट) हृद्स्नायू नावाच्या अनैच्छिक (अनिच्छावर्ती) स्नायुतंतूंची बनलेली असून तिच्या आत अंतर्हृद्स्तराचे अस्तर व बाहेर हृदयावरणाचे वेष्टण असते. हृदयावरण पातळ कलेसारखे असून ते दुहेरी असते. त्याचा आतला थर हृदयाला घट्ट चिकटलेलाअसून बाहेरचा पदर तंत्वात्मक असतो. या दोन थरांमधील संभाव्य पोकळीत लसी द्रव असते. दोन्ही पदरांचा पृष्ठभाग गुळगुळीत असूनलसी द्रवामुळे ते पदर एकमेकांवर घासले जात नाहीत. छातीला बाहेरून काही इजा झाली, तर हृदयावरणाच्या या रचनेमुळे हृदयास त्या इजेचीबाधा सहसा होत नाही. हृदयावरणाचा बाहेरचा पदर वरच्या बाजूस महारोहिणी आणि महानीला यांच्या भित्तीशी एकजीव होतो व खाली मध्यपटलाच्या डाव्या बाजूस चिकटलेला असतो. अशा या दोन बंधनांमुळे हृदय वक्षगुहेत भक्कम बसविलेले असते. 

 

हृद्स्नायूचे वैशिष्ट्य असे की, त्यातील कोशिका एकमेकांना जोडलेल्या असतात. लगतच्या कोशिकांमध्ये मधूनमधून पटलाचा पूर्ण अभाव असतो. तसेच एका कोशिकेचे टोक व दुसरीचा प्रारंभ यात अंतर्विष्ट बिंबनावाचा पटलाचा अतिशय पातळ पापुद्रा असतो. या दोन्ही ठिकाणीविद्युत् आवेगाचे पारेषण विनासायास होत असते. त्यामुळे अलिंदांच्यासर्व कोशिकांचे किंवा निलयांच्या सर्व कोशिकांचे एकसंध असे संकोशिकत्व तयार झालेले असते. एका ठिकाणी निर्माण झालेले विद्युत् तरंग सर्व प्रकोष्ठात झपाट्याने पसरण्यासाठी ही रचना उपयुक्त ठरते. 

 

उभ्या आणि आडव्या विभाजकपटांनी हृदयांतील पोकळीचे चार भाग अथवा प्रकोष्ठ पडतात. हृदयाच्या बाह्य पृष्ठावर दिसणाऱ्या उभ्या व आडव्या खोबणीमुळे हे विभाग स्पष्ट दिसतात. वरच्या विभागांना अनुक्रमे उजवाव डावा ‘अलिंद’ व खालच्यांना अनुक्रमे उजवा व डावा ‘निलय ‘असे म्हणतात. 


 

निलयांच्या भित्ती अलिंदांच्या भित्तीपेक्षा जाड असतात त्यांतही डाव्या निलयाच्या जास्त जाड असतात. अलिंद व निलय यांना कराव्या लागत असलेल्या कार्यानुरूप त्यांच्या भित्तीची जाडी कमी-अधिक असते. 

 

उजव्या अलिंदात तीन द्वारे असतात, पैकी दोन महानीलांची असूनवरचे द्वार ऊर्ध्व महानीलेचे असते व त्यामार्गाने शरीराच्या वरच्या भागातील रक्त अलिंदांत येते आणि खालचे द्वार निम्नमहानीलेचे असते व त्यामार्गाने खालच्या भागांतील रक्त अलिंदात येते. तिसरे द्वार अलिंद व निलय यांच्यामधील पडद्यांत असून त्या मार्गाने अलिंदातील गोळा झालेलेसर्व रक्त त्याच्या आकुंचनामुळे निलयात जाते. या द्वाराचे तोंडाशी तीन कप्प्यांची झडप असून तिला ‘त्रिदल झडप’ असे म्हणतात. या झडपेमुळे निलयांत आलेले रक्त परत अलिंदांत जाऊ शकत नाही. 

 

उजवा निलय उजव्या अलिंदाच्या खाली असून त्यात दोन द्वारे असतात. एक वर वर्णन केलेले उजवे अलिंद-निलय-द्वार व दुसरे फुप्फुस-द्वार, या द्वारांतून रक्त उजव्या निलयांतून फुप्फुसांकडे जाते. या द्वारापाशीहीतीन अर्धचंद्राकृती पिशव्यांची बनलेली झडप असून तिच्यामुळे फुप्फुसरोहिणीत गेलेले रक्त उजव्या निलयात परत येऊ शकत नाही. 

 

उजव्या निलयापासून निघणाऱ्या फुप्फुस रोहिणीच्या पुढे दोन शाखा होऊन एक उजव्या व दुसरी डाव्या फुप्फुसाकडे जाते. उजव्या निलयाचे आकुंचन झाल्याबरोबर तेथील रक्त फुप्फुस रोहिणीच्या दोन्ही शाखांच्या मार्गाने दोन्ही फुप्फुसांत जाते. तेथे श्वासोच्छ्वासाबरोबर आलेल्या हवेतील ऑक्सिजन शोषला जाऊन रक्तातील कार्बन डाय-ऑक्साइड बाहेरपडतो व रक्त शुद्ध केले जाते. 

 

अशा तऱ्हेने शुद्ध झालेले रक्त फुप्फुसनीलांच्याद्वारे डाव्या अलिंदात येते. प्रत्येक फुप्फुसांतून दोन फुप्फुसनीला निघून, एकंदर चार नीला डाव्या अलिंदाच्या मागच्या बाजूस चार द्वारांनी रक्त आणतात. या चार द्वाराशिवाय डाव्या अलिंदांत आणखी एक द्वार असून त्या मार्गाने हे रक्त डाव्या निलयात जाते. या डाव्या अलिंद-निलय-द्वारावर एक द्विदल झडप असून तिच्यामुळे निलयात आलेले रक्त परत अलिंदात जाऊ शकत नाही. 

 

डाव्या निलयापासून महारोहिणी निघते. निलयाचे आकुंचन झाल्या-बरोबर तेथील रक्त महारोहिणीत जाते. त्या रोहिणीच्या द्वाराशीही अर्ध-चंद्राकृती त्रिदल-झडप असते व तिच्यामुळे रक्त परत निलयांत येऊ शकत नाही. 

 

महारोहिणीपासून प्रथम निघणाऱ्या दोन शाखा झडपेच्या वरच्या भागातून निघतात. त्यातील एक हृदयाच्या उजव्या बाजूस व दुसरीडाव्या बाजूस रक्त पुरविते. हृदयाच्या बाह्य पृष्ठावरील खोबणीतून या दोन हृद्रोहिण्या हृद्स्नायूंना रक्त पुरवितात. या खोबणीतच हृदयाच्या स्नायूतील विऑक्सिजनित अशुद्ध रक्त नेणाऱ्या हृद्नीला असतात आणि या ते रक्त महानीलेत पोहोचवितात. 

 

डाव्या निलयातील ऑक्सिजनित रक्त महारोहिणीत जोराने ढकलण्याचे कार्य उत्क्षेपण स्नायूंच्या आकुंचनामुळे होते. महारोहिणीपासून अनेकशाखा व उपशाखा निघून त्यांच्याद्वारे सर्व शरीराला ऑक्सिजनित रक्ताचा पुरवठा होतो. सर्व शरीरभर रक्ताचा पुरवठा करावयाचा असल्यामुळेडाव्या निलयाच्या भित्तींतील स्नायू जास्त शक्तिशाली व जाड असतात. उजव्या निलयाला फक्त फुप्फुसापर्यंतच रक्त पंप करावयाचे असल्यामुळे त्याच्या भित्ती त्या मानाने कमी जाड असतात. दोन्ही अलिंदांना जवळच्या निलयातच रक्त पोहोचविण्याचे काम असल्यामुळे त्यांच्या भित्तींचीजाडी पुष्कळच कमी असते. 

 

शरीरातील कंकालीय रेखित स्नायूंच्या तुलनेने हृद्स्नायूचे आकुंचन सावकाश होत असते. अलिंदासाठी हा कालावधी सु. ०.२ सेकंद व निलयासाठी ०.३ सेकंद असतो. या दीर्घ आकुंचनामुळे रक्त बाहेर टाकण्याची (पंपासारखी) क्रिया समाधानकारकपणे घडून येते. 

 

हृदयाचे स्पंदन आकुंचन व प्रसरण स्नायूंमुळे होते. हृदयात रक्त पोहोचून अलिंद व निलय पूर्ण भरले म्हणजे हृदयाच्या स्नायूंमध्ये असलेल्या तंत्रिका तंतूंमध्ये प्रेरणा उत्पन्न होऊन हृद्स्नायूंच्या आकुंचनाला सुरुवात होते. हृदयाचे प्रत्येक स्पंदन म्हणजे हृदयाच्या स्नायूंना चेतना देणाऱ्या तंत्रिका तंतूंचा उद्रेकच असतो. हृदयाच्या मागच्या भागात ज्या ठिकाणी ऊर्ध्व-महानीला उजव्या अलिंदांत शिरते त्या ठिकाणी विशिष्ट तंत्रिकाकोशिकांचा व स्नायूंचा एक पुंज असतो, त्याला ‘कोटर-अलिंद पुंज’ अथवा ‘लिम्युलस गुच्छिका’ म्हणतात. या पुंजांतच आकुंचनाच्या प्रेरणेची उत्पत्ती होते आणि त्यामुळे हृद्स्नायूंचे बराच वेळ टिकणारे आकुंचन होते. हा पुंज अनेक लहानमोठ्या कोशिकांचा असून त्यातील सर्वांत मोठ्या कोशिकांकडून आकुंचन-प्रसरणाच्या गतीचे नियमन होते. सर्वांत मोठ्या कोशिका म्हणजेच ‘गतिनिर्मात्या’ होत. 


 

रक्त उजव्या अलिंदात आल्यावर ‘कोटर-अलिंद ग्रंथी ‘तील तंत्रिका कोशिकांमध्ये प्रेरणा उत्पन्न होते व तेथून संवेदना उत्पन्न होऊन ती दोन्ही अलिंदांच्या स्नायूंमध्ये पसरते व तीमुळे दोन्ही अलिंदाचे आकुंचन होते. ही संवेदना अलिंदस्नायूमधून ‘अलिंद-निलय-ग्रंथी ‘मध्ये पुन्हा एकत्रित होते. ही त्रिदल झडपेच्या तोंडाजवळ असते. तेथील फिकट रंगाच्या विशिष्ट स्नायुतंतूच्या समूहमार्गाने ती संवदेना सर्व निलयांत पसरते. या ‘विशिष्ट स्नायुतंतुसमूहा ‘ला ‘अलिंद-निलय-स्नायु-समूह’ असे म्हणतात. या समूहातील स्नायुतंतू आंतरनिलय भित्तिपटांत शिरून त्याच्या दोन शाखा होतात आणि त्या दोन शाखा उजव्या व डाव्या निलयांच्या स्नायूंचे आकुंचन घडवून आणतात. अलिंद व निलय यांच्या स्नायूंमध्ये संबंध घडवून आणणारा एवढा एकच मार्ग आहे. 

 

अलिंदातून निलयात रक्त जाण्याची क्रिया सर्वस्वीच त्याच्या आंकुचनावर अवलंबून नसते. आकुंचन सुरू होण्याआधी त्यातील जवळ-जवळ ७५% क्रिया घडून येते व आकुंचनामुळे ती पूर्ण होते. अलिंदाच्या आकुंचनाची उपयुक्तता विशेषतः अतिरिक्त क्षमतेचा वापर (उदा., व्यायाम घडत असताना) हृदय करत असते, त्यावेळी दिसून येते. ही क्षमता विश्रांत स्थितीच्या ३००–४०० प्रतिशत असू शकते. विश्रांत अवस्थेत हृदयातून महारोहिणीमध्ये दर मिनिटास ५-६ लिटर (स्त्रियांमध्ये १०–२०% कमी) रक्त प्रवेश करते. 

 

हृदयचक्र : हृदय साधारणपणे दर मिनिटास ७०–८० वेळा आकुंचन-प्रसरण पावते आणि त्या प्रत्येक आकुंचनाबरोबर डाव्या निलयातून महारोहिणींत रक्त पंप केले जाते व रक्ताचे उत्क्षेपण होते. महा-रोहिणीतून रक्त पुढेपुढे त्या रोहिणीच्या शाखोपशाखामध्ये जाते. त्यावेळीत्या रोहिण्या प्रसरण पावतात. या रोहिणी प्रसरणालाच ‘नाडी’ असे म्हणतात. रोहिणीच्या खाली जेथे जेथे हाड असते तेथे तेथे तिचे प्रसरण सुलभपणे समजू शकते (उदा., मनगटाजवळील रोहिणी येथे त्वचेच्या खालीच रोहिणी असून तिचे खाली हाडच असल्यामुळे त्या रोहिणीचेस्पंदन सहज स्पर्शाने कळू शकते)

 

हृदयाचे स्पंदन सारखेच चालू असते. आकुंचन होऊन गेल्यावर स्नायूंचे प्रसरण होते, तेवढा वेळच त्या स्नायूंना विश्रांती मिळू शकते. एका आकुंचनापासून पुढल्या आकुंचनापर्यंतच्या काळाला ‘हृदयचक्र’ असे म्हणतात. हृदयस्पंदन जेव्हा दर मिनिटास ७०–८० असते, तेव्हा एक चक्र पुरे होण्यास ०.८ से. इतका वेळ लागतो. त्यापैकी आकुंचन क्रिया ०.३ से. आणि प्रसरण क्रिया ०.५ से. असते. हृदयाचा वेग वाढलाम्हणजे आकुंचन काल तेवढाच राहून प्रसरण काल मात्र कमी होतो( उदा., व्यायाम तसेच ज्वर व भीती, राग वगैरे मनोविकार) . हृदयाचावेग दर मिनिटास १०० झाला तर हृदयचक्र ०.६ सेकंदांत पुरे होतेत्यापैकी ०.३ से. आकुंचन काल जाऊन प्रसरणास मात्र ०.३ सेकंदचवेळ मिळतो, म्हणजेच हृदयाच्या स्नायूंचा विश्रांतिकाल कमी होतो. 

 

निलयांचे स्नायू गुळगुळीत असतात. त्यांचेपासून निलयांच्या पोकळीत आतपर्यंत आलेले जे स्नायुतंतू असतात त्यांना ‘अंकुरक’ स्नायू असे म्हणतात. यांच्या टोकांपासून ‘कंडरीय रज्जू’ निघतात हे रज्जू द्विदलव त्रिदल झडपांच्या कडांना घट्ट चिकटलेले असतात. निलयाचे आकुंचन होते, तेव्हा दले मिटून झडप बंद होते. त्यावेळी निलयांतील दाबाच्या जोराने ती दले अलिंदांत ढकलली जाऊ नयेत, म्हणून अंकुरक स्नायूंचे आकुंचन होऊन कंडरीय रज्जू ताणले जातात व दले अलिंदांत ढकलली जात नाहीत. 

 

शरीरांतील सर्व इंद्रियांचे क्रियानियंत्रण मेंदू आणि मेरुरज्जूपासून निघणाऱ्या तंत्रिकाव्यूहाकडून होते परंतु हृदय हे एकच इंद्रिय असे आहे की, ज्याची आकुंचन-प्रसरण क्रिया हृदयातील स्नायूमध्ये असलेल्या तंत्रिकातंतूकडूनच होते. हृदयस्पंदनाचे वेगनियंत्रण मात्र मेंदूपासून निघणाऱ्या दोन बाजूंच्या दोन दहाव्या तंत्रिकांकडून आणि अनुकंपी तंत्रिकाजालाकडून होते. अनुकंपी तंत्रिकाजालामुळे हृद्स्पंदन जास्त वेगाने होते तर दहाव्या तंत्रिकेमुळे हा वेग कमी होतो. 

 

हृदयाची आकुंचनक्षमता रक्तातील कॅल्शियम आयनांच्या प्रमाणावर अवलंबून असते तसेच पोटॅशियमाचे प्रमाणही त्याच्या विरुद्ध परिणाम घडवते. अतिरिक्त पोटॅशियम शिथिलता वाढवून विस्फारण घडवून आणते. तापमानातील वाढीमुळे (उदा., ज्वरामध्ये) स्पंदनाचा वेग वाढतो आणि काही प्रमाणात अधिक रक्त बाहेर फेकले जाते. याउलट परिणाम अवतप्तता झाली असता दिसतो. हे सर्व बदल विद्युत् हृद् आलेखात प्रतिबिंबित होतात. [→ विद्युत हृल्लेखन]. 

 

हृदयाचे ध्वनी :स्टेथॉस्कोपने छातीची तपासणी केल्यास हृदयाच्या आकुंचन-प्रसरणामुळे उत्पन्न होणारे आवाज ऐकू येतात. हे आवाज डाव्या स्तनाजवळ, चौथ्या व पाचव्या बरगड्यांच्या मध्यभागी आणि उजव्या बाजूच्या तिसऱ्या बरगडीजवळ उरोस्थीपाशी ऐकू येतात. डाव्या स्तनाजवळ ऐकू येणाऱ्या ध्वनीला ‘अग्रध्वनि’ असे म्हणतात. सर्व ध्वनी ल्ल्ब्ब्ब्-डब्ब असा उच्चार करता येईल अशा प्रकारचे असतात. पहिला ल्ल्ब्ब्ब् हा आवाज लांबवर व बद्द असा येतो तर दुसरा आखूड व खटकेदार असतो. पहिला निलयस्नायूंच्या जोरदार आकुंचनामुळे आणि झडपांच्या दलांच्या कंपनामुळे उत्पन्न होतो, तर दुसरा महारोहिणी आणि फुप्फुस रोहिणी यांच्या उगमांपाशी असलेल्या अर्धचंद्राकृती झडपा एकदम बंद होण्याचे वेळेच्या कंपनामुळे होतो. 

 

पहा : हृदयविकार हृद्‌रोहिणी विकार. 

 

संदर्भ : Guyton, A. C. Hall, John E. Textbook of Medical Physiology, 9th Edition, Philadelphia (USA), 1996. 

कापडी, रा. सी.