धनुर्वात : क्लॉस्ट्रिडियम या वंशातील सूक्ष्मजंतूंपैकी क्लॉस्ट्रिडियम टेटॅनी नावाच्या सुक्ष्मजंतूंच्या बाह्यविषामुळे उद्‌भवणाऱ्या व ज्यामध्ये कंकालीय़ (सांगाड्यातील ) रेखित (ज्यांतील तंतू आडव्या स्वरूपात असतात असे ऐच्छिक) स्नायू अतिसंवेदनशील बनून ताठ राहतात आणि प्रतिक्षेपी क्रिया [→तंत्रिका तंत्र] अतिशय उत्तेजित बनल्यामुळे वारंवार झटके येणाऱ्या सांसर्गिक रोगाला धनुर्वात म्हणतात. या रोगामध्ये रोगी उताणा झोपलेला असताना प्रत्येक झटक्याच्या वेळी त्याच्या शरीराची धनुष्यासारखी कमान होते. काही काही वेळा त्याची डोक्याची मागची बाजू व टाचाच जमिनीस टेकलेल्या असून इतर सर्व शरीर भाग जमिनीपासून वर उचललेले असतात, यावरूनच या रोगास ‘धनुर्वात’ असे नाव पडले असावे. या लक्षणाला ‘धन्वाकार तनू’ म्हणतात. कधीकधी या रोगाची सुरुवातच जबडा घट्ट मिटून तोंड न उघडता येण्यापासूनच होते म्हणून या रोगास ‘हनुस्तंभ’ (इंग्रजीत लॉकजॉ) या नावानेही ओळखतात.

आ. धन्वाकार तनू

धनुर्वात हा रोग मानवाला फार प्राचीन काळापासून माहीत असावा. हिपॉक्राटीझ (ख्रि. पू. ४६०-३७७) या ग्रीक वैद्यांने या रोगाचे वर्णन लिहिले असून त्यांचा स्वतःचाच मुलगा या रोगामुळे मरण पावला होता.नुकत्याच प्रसुत झालेल्या स्त्रिया, नवजात अर्भके आणि जखमी सैनिक यांना ग्रासणाग हा रोग एक दैवी आपत्तीच मानीत असत. धनुर्वाताच्या सूक्ष्मजंतूंचा शोध लागण्यापूर्वी प्रयोगशाळांतून हा रोग उत्पन्न करण्यात यश मिळाले होते. आंतोन्यो कार्ल व रोटोन या शास्त्रज्ञांनी १८८४ मध्ये या रोगामुळे मेंलेल्या माणसाच्या चेहऱ्यावरील फोडातील द्रव पू सशांना टोचून त्यांच्यात हा रोग उत्पन्न करून दाखविला होता. आर्थर नीकोलीअर या शास्त्रज्ञांनी घाणयुक्त द्रव ससा व गिनीपिग या प्राण्यांना टोचून धनुर्वातासारखा रोग उत्पन्न केला होता. नीकोलीअर यांच्या मताप्रमाणे स्थानीय वाढ होत असलेल्या सूक्ष्मजीवापासून स्ट्रिक्निनसारख्या विषामुळे हा रोग होत असावा. शिबासाबुरो किटाझाटो नावाच्या जपानी शास्त्रज्ञांनी १८८९ च्या सुमारास ८०से. तापमानापर्यंत ४५ ते ६० मिनिटे पू तापवून या रोगाचे सूक्ष्मजंतू शुद्ध स्वरूपात अलग करण्यात यश मिळविले. टोकिओमधील संसर्गजन्य रोगाची संख्या या शास्त्रज्ञांनी १९१४ मध्ये स्थापन केली असून तिला त्यांचेच नाव देण्यात आले आहे. एमिल फोन बेरिंग (१८५४-१९१७) व किटाझाटो हे कॉख इन्स्टिट्यूटमध्ये काम करीत असताना, त्यांनी धनुर्वाताचे विष प्रतिजन (शरीरात विशिष्ट रोधक पदार्थ-प्रतिपिंड निर्माण करणारे) आणि प्रतिविष उत्पन्न करण्यास समर्थ असल्याचे दाखविले.

संप्राप्ती :समशीतोष्ण प्रदेशापेक्षा उष्ण प्रदेशीय भागात या रोगाचे प्रमाण अधिक आढळले आहे. अमेरिकेत प्रती वर्षी ३०० रोगी नोंदले जातात. काही प्रदेशांतीलजमिनीमध्येच धनुर्वाताच्या सूक्ष्मजंतूंचे प्रमाण अधिक असते. शेणखत, सोनखत यांसारखी खते वापरण्यात येत असलेल्या जमिनीत हे जंतू जास्त प्रमाणात असतात. दक्षिण इटलीमधील दाट वस्तीच्या प्रदेशातील जमीन व उत्तर अमेरिकेतील काही राज्यांच्या जमिनींत या सूक्ष्मजंतूंचे प्रमाण इतर भागांपेक्षा बरेच अधिक आढळले आहे.

धनुर्वाताचे सूक्ष्मजंतू अवायुजीवी (ऑक्सीजनाशिवाय जिवंत राहून जोरदार वाढणारे) व बीजाणुजनक (योग्य परिस्थितीत ज्यांपासून सूक्ष्मजंतू बनू शकतील असे बीजाणू तयार करू शकणारे) असून जमिनीत विखुरलेले असतात. शाकाहारी प्राणी विशेषेकरून घोडा, गाय, म्हैस, मानव वगैरे यांच्या आंत्रमार्गात (आतड्यांच्या मार्गात) ते कोणतीही विकृती उत्पन्न न करता राहतात. या प्राण्यांच्या आतड्यांतून उत्सर्जीत होणाऱ्या मलातून, तसेच कोंबड्यांची व शेळ्या-मेढ्यांची विष्ठा यांमधून हे सूक्ष्मजूंत भूप्रदेशावर पसरविले जातात. भारतासारख्या अविकसित देशातून कोठेही शौचविधी करण्याची अनिष्ट व अस्वास्थकारक पद्धत, प्रसूतीच्या वेळी मातेच्या प्रसूती मार्गाच्या निर्जंतुकतेकडे केलेले दुर्लक्ष, अर्भकाच्या नाळ कापलेल्या जखमेबद्दलचा निष्काळजीपणा (खेड्यातून या जखमेवर राख किंवा माती लावण्याचे अघोरी कृत्य सुईणी अजूनही करतात) इ. कारणांमुळे धनुर्वाताचे प्रमाण बरेच आढळते. गुजरात राज्यातील एका जिल्ह्यातील पाहणीत एकूण १,६२,१११ रोग्यांमध्ये धनुर्वाताचे प्रमाण ०·१४% आढळले होते व त्यांमध्ये धनुर्वात झालेल्या अर्भकांचे प्रमाण २/३ होते. लुधीयानीतील ११ खेड्यांची पहाणी केली तेव्हा नवजात अर्भकांच्या मृत्यूच्या प्रमुख कारणांमध्ये धनुर्वाताचा चौथा क्रमांक असल्याचे आढळून आले. थांयलंडमध्ये नवजात अर्भकांच्या मृत्युसंख्येत ३८% मृत्यू धनुर्वातामूळे झाल्याचे आढळते.


आ.२. धनूर्वाताचे सूक्ष्मजंतू व जीवाणू

धनुर्वाताचे सूक्ष्मजंतू शलाकाकार असून त्यांच्या एका टोकावर गोल गुठळी असते. पङघम (ड्रम) वाजविण्याकरिता ज्या काठ्या वापरतात त्यांच्यासारख्या आकारावरून या सूक्ष्मजंतूना ‘ड्रमस्टीक बॅसिलस’ असेही म्हणतात, हे आगकाडीसारखेही दिसतात. गुल म्हणजे बीजाणू व बाकीची काडी म्हणजे शलाका. काही जंतू मिळून त्यांची साखळी बनवलेली असते तर काही एकएकटे किंवा दोन जवळजवळ आढळतात त्यांचे आकारमान ०·४ ते ०·६ मायक्रॉन (जाडी) व ४ ते ८ मायक्रॉन (लांबी) एवढे असते (१ मायक्रॉन = १०-3 मिमी.) ते चलनशील असून ग्रॅम-रंजक-व्यक्त (ग्रॅम यांच्या रंजकक्रियेत तयार होणारा मूळ जांभळसर रंग अल्काहॉलाने धुतल्यानंतरही कायम ठेवणारे) असतात. टोकावरची गोल गुठळी म्हणजेच बीजाणू असतात .

आ. ३ धनूर्वाताच्या सूक्ष्मजंतूच्या संक्रामणाचे परिणाम क्षेत्र-(१) त्वचा, (२) माती लागलेली जखम,(३) धनूर्वातांचे सूक्ष्मजंतू, (४) स्नायूतील बींबाणू, (५) प्रेरक तंत्रीका, (६) पाचव्या मास्तीक तंत्रीकेचे केंद्र, (७) पाचवी मस्तीक तंत्रीका, (८) जबङ्याचे स्नायू, (९) खालच्या जबङ्याचे हाङ, (१०) शरीर व हातापायातील स्नायूंना जाणाऱ्या प्रेरक तांत्रीका, (११) मेरूरज्जचा आङवा छेद.

धनुर्वाताचे बीजाणू उष्णता आणि रासायनिक पदार्थांविरूद्ध जोरदार प्रतिकार करू शकतात. नेहमी वापरण्यात असलेली जंतुनाशके या बीजाणूंविरूद्ध निष्प्रभ असतात. सर्वसाधारण समजूतीप्रमाणे ते उकळत्या पाण्यात नाश पावत असावेत, परंतु त्यातूनही ते जिंवत राहू शकतात. निर्जुंतूकीकरणाकरिता वापरण्यात येणाऱ्या  ⇨  ऑटोक्लेव्ह या उपकरणातील तापमान १२०° से.पर्यंत वाढवून शस्रक्रियेकरिता लागणारी हत्यारे व इतर उपकरणे १५ मिनिटांपर्यंत तापविल्यास त्यांवरील धनुर्वाताचे बीजाणू हमखास मरतात. मात्र ८०° से. तापमान एक तास ठेवूनही ते मरत नाहीत.

या सूक्ष्मजंतूंचे संक्रामण बहुधा (सूक्ष्मजंतू किंवा बीजाणू स्वरूपात) शरीरावरील जखमेतून होते परंतू शरीरावर कोणतीही जखम न आढळतासुद्धा धनुर्वात उद्‌भवू शकतो. या धनूर्वाताच्या प्रकाराला ‘अज्ञानहेतुक’ (इडिओपॅथिक) धनुर्वात म्हणतात. गंभीर स्वरूपाच्या विदारित (ऊतकांची म्हणजे पेशींच्या समूहांची वाकडी तिकडी चिरफाड झालेल्या), युद्धातील दारूगोळ्यांचे तुकडे वगैरेंनी झालेल्या जखमा, शेतकाम करताना होणाऱ्या जखमा यांतील माती खतमिश्रीत बाह्य पदार्थ अधिक प्रमाणात शिरण्याचा संभव असल्यामुळे धनुर्वात होण्याचा धोका असतो परंतू अतिसूक्ष्म किंवा कळत नळकत झालेल्या व बहुधा दुर्लक्षित झालेल्या जखमा (उदा., टाचणी किंवा छोटासा खिळा खुपसल्यामुळे झालेल्या जखमा) यांमधूनही जंतू किंवा बीजाणू शरीरात शिरून तेवढाच जोरदार रोग उत्पन्न करू शकतात म्हणून जखमेचे गांभीर्य, शरीरभाग किंवा जखमेचा प्रकार यांवर या जंतूंचे संक्रामण अवलंबून नसते.

सूक्ष्मजंतू शरीरात शिरल्यानंतर तेथे ते वाढून त्यांच्या विषोत्पादनतेवर रोग होणे अवलंबून असते. हे विष ‘बहिर्वीष’ वा ‘बाह्यकोशीक’ (कोशिकेच्या म्हणजे पेशीच्या बाहेर आढळणारे) विष म्हणून ओळखले जाते. कारण ते सूक्ष्मजंतूच्या कोशिकांत तयार होत असले तरी त्यांमधून बाहेर पडल्याशिवाय विषारी परिणाम करू शकत नाही. बीजाणूपासून सूक्ष्मजंतू तयार होणे, तसेच त्यांची वाढ होणे या क्रिया ऑक्सीजनन्यूनता असल्यासच प्रभावीपणाने होतात. यामुळे शरीरात खोल गेलेल्या भेदक जखमांमध्ये केवळ पृष्ठभागीच असणाऱ्या जखमांपेक्षा ते वाढण्याचा धोका जास्त असतो. जखमांशिवाय चिरकारी  (दिर्घकालीन) प्रकारच्या मध्यकर्णशोथामुळे (मध्यकर्णाच्या दाहयुक्त सुजेमुळे) धनुर्वात झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. या प्रकाराला ‘कर्ण धनूर्वात’ म्हणतात. चिरकारी व्रण [उदा., अपस्फीत-नीलाजन्य व्रण अपस्फीत-नीला], भाजणे, खरूज, बूट चावल्यामुळे होणारी जखम, ऊतकनाश करू शकणारी अंतःक्षेपणे (इंजेक्शने) देवीची लस टोचताना होणारी सूक्ष्म जखम आणि दात काढून टाकल्यावर होणारी जखम यांमधूनही धनूर्वाताचे सूक्ष्मजंतू शिरून धनुर्वात होण्याची शक्यता असते. रूग्णालयातून केलेल्या शस्त्रक्रियांनंतरही धनुर्वात झाल्याची उदाहरणे आहेत. शस्त्रक्रियेनंतर उद्‌भवणारा धनुर्वात बहुधा पट्टी बांधण्याच्या साधनातील बीजाणूंच्या संक्रामणापासून होत असावा. कधीकधी रोगवाहक (प्रत्यक्ष रोग झालेला नसताना फक्त सूक्ष्मजंतू शरीरात असणारे प्राणी) असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातील बीजाणू भक्षीकोशिकांद्वारे (सूक्ष्मजंतू व इतर बाह्य पदार्थ खाऊन टाकणाऱ्या कोशीकांद्वारे)शस्त्रक्रिया करावयाच्याच जागी विशेषेकरून गूदद्वार व गुदाशयाजवळील जागी अगोदरच पोहोचलेले असल्यास त्या ठिकाणी केलेली शस्त्रक्रिया सूक्ष्मजंतूंच्या वाढीस मदत करणारी ठरून धनुर्वात होण्याचा संभव असतो.


धनुर्वाताचे सूक्ष्मजंतू जखमेत ज्या ठिकाणी शिरतात ती जागा सोडून इतरत्र सहसा फैलावत नाहीत. ती जागा त्यांच्या वाढीस योग्य, म्हणजे नाश पावलेले ऊतक असलेली आणि ऑक्सीजनाचा अभाव असलेली असल्यास ते वाढून विषोत्पादन करतात. या विषाला (वर उल्लेखिलेले बहिर्विष) ‘तंत्रिका विष’ असेही म्हणतात. कारण ते तंत्रिका (मज्जा) ऊतकाचा नाश करू शकते. या विषाचे ‘टेटॅनोलायसीन’ व ‘टेटॅनोस्पॅझ्मीन’ असे दोन घटक आहेत. पहिल्यामुळे रक्तातील कोशिकांचे विलयन होते आणि दुसऱ्यामुळे तंत्रिकाकोशिकांवर अपरावर्ती दुष्परिणाम घडतो व त्यामुळे झटके येतात. टेटॅनोस्पॅझ्मीन संवेदी तंत्रिकांवर परिणाम करीत नसावेत. ते लसीकावाहिन्यांतून (रक्तद्रवाशी साम्य असणारा व ऊतकांकडून रक्तात मिसळणारा द्रव वाहून नेणाऱ्या सूक्ष्म नलिकांतून) व प्रेरक तंत्रिकांच्या अंत्यपट्टातून अवशोषिले जाऊन केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या कोशिकांपर्यंत पोहचत असावे [→ तंत्रिका तंत्र]. तंत्रिका कोशिकांत एकदा बद्ध झालेल्या ह्या विषाचे कितीही प्रतिविष उतारा देऊनही उदासीनीकरण करता येत नाही. या विषाचे परिणाम नक्की कशा प्रकारे होतात हे अजून अज्ञात आहे. मात्र ते तंत्रिका तंत्राच्या प्रेरक विभागाची क्रियाशीलता अधिक वाढविण्यास कारणीभूत असून संपूर्ण तंत्रिका तंत्राची उत्तेजक ग्रहणशीलता अतिशय वाढविते, असे समजलेले आहे.

परिपाक काल व लक्षणे : परिपाक काल (सूक्ष्मजंतू शरीरात शिरल्यानंतर रोगलक्षणे सुरू होण्यापर्यंतचा काळ) ५ दिवस ते ४ आठवडे असू शकतो. सर्वसाधारणपणे तो २ ते २१ दिवसांचा असतो. परिपाक कालाचा आणि फलानुमानाचा (रोग संक्रामणाच्या संभाव्य फलाच्या पूर्वानुमानाचा) घनिष्ट संबंध असतो. परिपाक काल जेवढा कमी तेवढे फलानुमान अधिक गंभीर. कधीकधी परिपाक काल काही महिने किंवा वर्षांचाही असू शकतो. धनुर्वाताचे बीजाणू जिवंत ऊतकात चौदा वर्षे जिवंत राहिल्याचे उदाहरण आढळले आहे. जखमेत शिरलेल्या बीजाणूंचे सूक्ष्मजंतूत रूपांतर होण्यास योग्य परिस्थिती निर्माण न झाल्यास कधीकधी मूळ जखम संपूर्ण बरी झालेली असते.

आ. ४. लहान मुलातील धनर्वाताचे झटके व हास्यानुकारी मुखभंग.

रोगाच्या पूर्वरूपामध्ये पाठदुखी व अस्वस्थता पहिले चोवीस तास जाणवते. जानु-प्रतिक्षेपासारख्या (पाय काटकोनात वाकवून ढिला ठेवून गुडघ्याच्या खाली जोराने आघात केल्यास होणाऱ्या स्नायूच्या प्रतिक्षेपी आंकुंचनासारख्या) प्रतिक्षेपी क्रिया अतिशय संवेदनशील बनतात. कधीकधी सुरुवातच हनुस्तंभापासून होते. दोन्ही बाजूंचे चर्वणक स्नायू अतिशय ताठ आकुंचनावस्थेत राहिल्यामुळे जबडा उघडणे मुष्किल बनते. मात्र वेदना नसतात. त्यानंतर मान, पाठ व पोटाचे स्नायू ताठ बनू लागून वेदना जाणवू लागतात. चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होऊन चेहरा खिन्नपणाने दात विचकत राहिल्यासारखा (तोंडाच्या दोन्ही बाजूंचे स्नायू आकुंचन पावून ताठ बनल्यामुळे) दिसू लागतो, यालाच ‘हास्यानुकारी मुखभंग’ म्हणतात. सुरूवातीस वर्णन केलेल्या धन्वाकार तनूऐवजी सबंध शरीर पुढे वाकते. याला ‘अंतरायाम’(पाठीची अंतर्वक्रता पुढे असलेला बाक) म्हणतात आणि त्याचे कारण अभिवर्तनकारी (सांधे वाकविणाऱ्या) स्नायूंचे जोरदार आकुंचन हे असते. कधीकधी सबंध शरीर डाव्या वा उजव्या कुशीकडे वाकते. याला ‘पार्श्वायाम’ म्हणतात.

कधीकधी कष्टगिलन (गिळताना त्रास होणे) हेच प्रथम लक्षण असते. पोटाचे स्नायू एवढे ताठ बनतात की, बोटांनी चाचपडून दाबून पाहिल्यास अजिबात दाबले जात नाहीत. उताण्या झोपलेल्या रोग्याच्या पाठीखालून तपासणाऱ्याचा हात सहज पलीकडे जाऊ शकतो म्हणजेच पाठ जमिनीला टेकलेली नसते. रोग्यात तपासताना केवळ स्पर्शसुद्धा जोरदार झटका उत्पन्न करतो. पुढे पुढे प्रतिक्षेपी क्रिया अतिसंवेदनशील बनतात व थोडाही आवाज (बोलणेसुद्धा), अंगावर गार वाऱ्याचा झोत येणे, रोगी झोपलेल्या पलंगास धक्का बसणे, त्याच्या खोलीतील बटन दाबून ती प्रकाशित करणे इत्यादींमुळे जोरदार झटके येतात. पुष्कळ वेळा वरील कोणतेही कारण नसताना आपोआपोच झटके येतात. कधीकधी झटक्यांचा जोर एवढा असतो की, अस्थिभंग होण्याचीही शक्यता असते. दोन झटक्यांमधील अंतर निरनिराळ्या रोग्यांत निरनिराळे असते. जोरदार रोगात दर तीन मिनिटांस झटके येतात. पुष्कळ वेळा मूत्राशयात लघवी तुंबून राहते. जोरदार रोगात कधीकधी शारीरिक तापमान अतिशय वाढलेले (४२·४° अंश) असते व ते मृत्यूस कारणीभूत होते. अधोथॅलॅमसातील (मोठ्या मेंदूतील थॅलॅमस नावाच्या भागाच्या खालील भागातील) उष्णता नियंत्रक केंद्रावर धनुर्वाताच्या विषाचा तो परिणाम असावा.


सौम्य प्रकारच्या धनुर्वातात तोंड उघडण्यामध्ये अल्पशी अडचण, थोडीफार पाठदुखी, सर्वसाधारण तापमान काही दिवस राहून झटके न येताच रोगी बरा होतो. या प्रकारतील रोग्याने बहुधा जखमेनंतर ताबडतोब प्रतिबंधक लसीचे अंतःक्षेपण करून घेतले असावे असा समज उत्पन्न होतो परंतु तसे नेहमीच धरून चालणे चूक असते.

जोरदार प्रकारात लक्षणे भराभर वाढत जाऊन वर सांगितल्याप्रमाणे अती तापमानामुळे किंवा फुप्फुसावरील उपद्रवामुळे (श्वसनाच्या स्नायूंवरील परिणामामुळे श्वासस्थगनामुळे) रोगी दगावतो.

प्रकार : धनुर्वाताचे पुढील प्रकार ओळखले जातात.

स्थानीय धनुर्वात : ज्या ठिकाणी जखम असेल तेथील स्नायूच फक्त आकूंचन पाऊन ताठ बनतात. कोणतेही सार्वदेहीक लक्षण न उद्‌भवता सौम्य स्वरूपाचा हा प्रकार नेहमी बरा होतो. 

मस्तक धनुर्वात : डोके व मानेचे स्नायू ताठ बनून झटके येतात. जखमही याच भागात असते. पुष्कळ वेळा सातव्या मस्तिष्क तंत्रिकेवर परिणाम होऊन जखमेच्या बाजूस आनन (चेहऱ्याचा) पक्षाघात होतो. इतर मस्तिष्क तंत्रिकांवर परिणाम झाल्यास गंभीर फलानुमान असून रोगी दगावण्याचा संभव असतो.

प्रसूतीपश्च धनुर्वात : प्रसूती किंवा गर्भपातानंतर होणारा हा प्रकार बहुधा ग्रामीण भागात आढळतो. तो गंभीर स्वरुपाचा असून गर्भपातानंतर होणारा अधिक धोकादायक असतो. दोन्ही प्रकारांत मृत्यूचे प्रमाण अधिक असते.

नवजात अर्भकातील धनुर्वात : भारतात या प्रकारच्या धनुर्वाताचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. अप्रशिक्षित सुईणीकडून होणारी प्रसूती व नाळेवरील जखमेवरील अस्वास्थ्यकारक उपचार याला कारणीभूत असतात. गंभीर स्वरूपाच्या या प्रकारात मृत्यूचे प्रमाण ८५ टक्के असते. अर्भकास स्तनचूषण करता येत नाही व हनुस्तंभामुळे करंगळी दोन्ही हिरड्यांमध्ये धरल्यास घट्ट पकडली जाते. नंतर झटकेही येऊ लागतात.

कर्णशोथजन्य धनुर्वात : मध्यकर्णशोथ बहुधा चिरकारी प्रकारचा असून त्यामधून येणाऱ्या स्त्रावात धनुर्वाताचे बहुधा चिरकारी प्रकारचा असून त्यामधून येणाऱ्या स्त्रावात धनुर्वाताचे सूक्ष्मजंतू सापडले आहेत. कधीकधी रोगाचे लक्षण नसलेल्या रोग्याच्या कानातील स्त्रावातही जंतू आढळलेले आहेत. बहुधा लहान वयात होणारा हा रोग सौम्य प्रकारात गणला जातो.

देवीची लस टोचल्यानंतर होणारा धनुर्वात : लहान मुलात लस टोचण्याच्या जागी असलेल्या त्वचेच्या निर्जंतुकतेकडे दुर्लक्ष झाल्यामुले हा प्रकार उद्‌भवतो. तो सौम्य असून मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असते.


अंत:स्नायुक अंत:क्षेपणजन्य धनुर्वात : स्नायूमध्ये दिलेल्या काही अंत:क्षेपणांपासून होणारा हा धनुर्वाताचा प्रकार भारतात पुष्कळ वेळा आढळतो. धनुर्वाताचे सूक्ष्मजंतू ज्या ठिकाणी अंत:क्षेपण दिले असेल त्याच ठिकाणच्या त्वचेवर अगोदरच असतील व त्वचेच्या निर्जंतुकीकरणाकडे दुर्लक्ष केल्यास किंवा अपुरी काळजी घेतल्यास अंत:क्षेपणाच्या सुईबरोबरच शरीरात प्रवेश करतात. क्वीनीन, ब्युटाझोलिडॉन, एमेटीन आणि यकृत अर्क ही औषधे अंत:क्षेपणाने दिलेल्या ठिकाणी ऊतकमृत्यूस कारणीभूत होण्याची शक्यता असते व त्यामुळे धनुर्वाताच्या सूक्ष्मजंतूंच्या वाढीस योग्य परिस्थिती निर्माण होते. अंत:क्षेपण मांसात खोल दिल्यामुळे ऑक्सिजनन्यूनताही असतेच. हेरॉईन किंवा कोकेन यासारख्या मादक द्रव्याची सवय असलेले लोक ही द्रव्य असलेली अंत:क्षेपणे स्वत:च टोचून घेतात. अशांपैकी पुष्कळांना धनुर्वात झाल्याचे आढळले आहे. अंत:क्षेपणामुळे झालेला धनुर्वात अधिक गंभीर स्वरूपाचा असून जखमुळे होणाऱ्या धनुर्वातापेक्षा त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दुप्पट असते.

इतर काही प्रकार : नारूमुळे झालेल्या विद्रधीपासून (गळवापासून) झालेला धनुर्वात अति गंभीर स्वरूपाचा असून मृत्यूचे प्रमाणही फार जास्त असते. शस्त्रक्रियेनंतर होणारा धनुर्वात केवळ आंत्रमार्गावरील शस्त्रक्रियांमध्येच आढळतो असे नसून कोणत्याही शस्त्रक्रियेचा तो उपद्रव असण्याची शक्यता असते.

फलानुमान : परिपाक कालाशिवाय आणखी चार लक्षणे लक्षात घेऊन जे. सी. पटेल व जोग या भारतीय डॉक्टरांनी फलानुमान करण्याची सोपी पद्धत सुचविली आहे. त्याकरिता एकूण पाच गोष्टी विचारात घ्यावा लागतात : (१) हनुस्तंभ, (२) ७ दिवसांपेक्षा कमी परिपाक काल, (३) झटके, (४) पहिले लक्षण व पहिला झटका यांमधील काळ ४८ तास किंवा त्याहून कमी असणे आणि (५) गुदाशयातील तापमान ३७·७८° से पेक्षा जास्त असणे. वरील लक्षणांनुरूप रोग्याची श्रेणी फलानुमान पुढीलप्रमाणे असते.

वरील पाचपैकी कोणतेही एकच लक्षण असणे प्रथम श्रेणी व मृत्युचे प्रमाण 0% म्हणजे सर्व रोगी बरे होतात. दोन लक्षणे असल्यास रोगी दुसऱ्या, तीन असल्यास तिसऱ्या, चार असल्यास चौथ्या व पाच असल्यास पाचव्या श्रेणीचा मानून फलानुमान अनुक्रमे ५ %,  २५ %, ५५ % व ८० % मृत्यtचे असते. लिंगभेदाचा फलानुमानाशी संबंध नसतो.

प्रतिबंधात्मक इलाज : धनुर्वात हा रोग प्रतिबंधात्मक इलाजाच्या दृष्टीने सोपा आहे परंतु प्रत्यक्ष रोगावरील इलाज करणे कष्टाचे व जिकिरीचे काम असते. धनुर्वाताविरुद्ध नैसर्गिक प्रतिरक्षा नसते.

ज्या प्रदेशातून सर्व रहिवाशांना स्वार्जित प्रतिरक्षा मिळवून देण्यात आली असेल तेथे धनुर्वातास प्रतिबंध घालणे सोपे जाते. सैन्यातील सैनिकांना प्रतिरक्षात्मक अंतःक्षेपणे ठराविक कालावधीनंतर देण्याची जवळजवळ सक्तीच असते. त्यामुळे जखमेची विशेष काळजी घेणे व प्रबलक अंतःक्षेपणे देणे एवढ्यावर भागते. ब्रिटनमध्ये त्रिपतिरक्षात्मक अंतःक्षेपणे (घटसर्प-डांग्या खोकला-धनुर्वात या तीनही रोगांविरुद्ध प्रतिपिंडे असलेली अंतःक्षेपणे) बालवयातच देण्याची पद्धत एवढी रुढ झाली आहे की, तेथे रोगास प्रतिबंध करणे सोपे झाले आहे. धनुर्वात विषाभ (जंतूंच्या बहिर्विषाच्या अपघटनामुळे तयार झालेला बिनविषारी परंतु प्रतिविषाशी संयोग पावण्याची क्षमता असलेला पदार्थ) अधिहर्षताजनक (बाह्य पदार्थांच्या दुसऱ्या संपर्काच्या वेळी होणारी विपरीत प्रतिक्रिया-ॲलर्जी-उत्पन्न करणारे) असल्यामुळे त्रिप्रतिरक्षात्मक अंतःक्षेपणाची तिसरी मात्रा देऊन झाल्यानंतर तीन वर्षांपर्यंत प्रबलक अंतःक्षेपण दिले नाही तरी चालते.


भारतात शहरातील सुशिक्षित कुटुंबातून त्रिप्रतिपक्षात्मक अंतःक्षेपणाची जाणीव झाली असून ग्रामीण भागात या पद्धतीचा प्रसार फार हळू होत आहे. संयुक्त राष्ट्र बालक निधीमार्फत (युनिसेफमार्फत) विकसनशील व इतर देशांतून या अंतःक्षेपणांचा प्रसार करण्याचे कार्य हाती घेतले आहे (१९७१). झेकोस्लोव्हाकिया, नेदर्लंड्‌स व रशिया या देशांतील प्रयोगशाळांतून त्रिप्रतिरक्षात्मक अंतःक्षेपणांच्या उत्पादनाकडे विशेष लक्ष पुरविले जात असून हे औषध अधिक सुधारण्यावर (अधिहर्षता वगैरे नाहीशी कशी होईल यावर) भर दिला जात आहे. टोंगा व यूगोस्लाव्हिया या भौगोलिक दृष्ट्या भिन्न असलेल्या देशांतून जागतिक संघटनेने ठरवून दिलेल्या प्रमाणात मिश्रण केलेली अंतःक्षेपणेच देण्यात येत असून अधिहर्षतेसारखा कोणताही गंभीर परिणाम आढळून आला नसून ती प्रभावी ठरली आहेत.

धनुर्वात प्रतिबंधक इलाजांत पुढील गोष्टींचा समावेश होतो.

जखमेवरील इलाज : पुष्कळ वेळा जखम स्वच्छ करून जंतुनाशके वापरण्याने भागते. जखमेतील बाह्य पदार्थ (माती, काचेचे तुकडे, पायातील काटे, शरीरात घुसलेले तोफगोळ्यांचे तुकडे वगैरे) संपूर्ण काढून टाकणे, ऊतकमृत्यू झालेला भाग छाटून कापून काढून टाकणे, जरूर पडल्यास जखम मोठी करणे अत्यंत जरूरीचे असते. नको असलेले निर्जीव ऊतक काढून टाकण्याच्या क्रियेला ‘नष्ट ऊतक कर्तन’ म्हणतात.

स्वार्जित प्रतिरक्षा : वयाच्या तिसऱ्या महिन्यापासून दर महिन्यास एक याप्रमाणे त्रिप्रतिरक्षात्मक तीन अंतःक्षेपणे द्यावीत. त्यानंतर मूल शाळेत जाऊ लागताच एक प्रबलक अंतक्षेपण द्यावे. पहिल्या तीन अंतःक्षेपणापैकी तिसरे देवीची लस टोचून घेण्यापूर्वीच द्यावे म्हणजे लस अंतःक्रामणजन्य धनुर्वाताची शक्यता कमी होते. गर्भारपणाच्या शेवटच्या महिन्यात मातेलाच धनुर्वात विषाभ अंतःक्षेपण दिल्यास नवजात अर्भकास धनुर्वात होण्यास प्रतिबंधक होतो. कारण मातेच्या रक्तातील प्रतिपिंडे वारेतून अर्भकास पुरेशा प्रमाणात मिळतात.

परार्जित प्रतिरक्षा : अलीकडील काही वर्षांपासून धनुर्वाताच्या प्रतिबंधाकरिता घोड्याच्या रक्तरसापासून बनविलेली लस वापरण्याबद्दल वादविवाद चालू आहेत. भारतात याच लसीला ‘धनुर्वात प्रतिरक्षात्मक रक्तरस’ (अँटिटेटॅनस सीरम-एटीएस) म्हणतात. या लसीची गरज नसून ती हानिकारक असल्याचे काही शास्त्रज्ञ म्हणतात. अधिहर्षताजन्य अवसाद (सार्वदेहिक प्रतिक्षोभ) उत्पन्न होण्याचा धोका व ती न दिल्यास धनुर्वाताचे प्रमाण वाढते असा कोणताही पुरावा मिळत नसल्यामुळे ती अनावश्यक आहे, असे काहींचे मत आहे. भारतासारख्या देशातून एटीएस १,५०० ते ३,००० एकक त्वचेखाली अंतःक्षेपणाने देण्यास हरकत नसावी. मात्र प्रत्येक वेळी अत्यल्प मात्रा प्रथम देऊन अधिहर्षता नसल्याची खात्री करुन घेणे आवश्यक असते. पाश्चात्य देशांतून या ऐवजी मानवी धनुर्वात प्रतिरक्षात्मक इम्यूनोग्लोब्युलीन (विशिष्ट प्रतिकारक्षमता निर्माण झालेली किंवा मुद्दाम निर्माण करविलेली रक्तरसातील प्रथिने) देण्याची पद्धत जवळजवळ रुढ झाली आहे. याची २५० ते ५०० एकक मात्रा अंतःक्षेपणाने देतात.

एटीएस वापरण्यामध्ये अधिहर्षता आणि अनिश्चितता यांशिवाय आणखी काही तोटे आहेत. एटीएस घेतलेच आहे अशा समजुतीमुळे निष्काळजीपणा उत्पन्न होतो कारण हे औषध शरीरातून लवकर उत्सर्जित होते. मध्यकर्णशोथजन्य, नवजात अर्भकातील प्रसूतीनंतरच्या काळातील देवीची लस टोचल्यानंतर उद्भभवणारा आणि अंतःक्षेपणजन्य धनुर्वात यांविरुद्ध प्रतिरक्षा देण्यास एटीएस असमर्थ असते.

सर्व प्रतिरक्षात्मक इलाजांमध्ये धनुर्वात प्रतिरोधक स्वार्जित प्रतिरक्षा उत्पन्न करण्याच्या इलाजास तोड नाही. ज्या प्रदेशात धनुर्वाताचे सूक्ष्म जंतू अधिक आहेत तेथील प्रत्येक व्यक्तीला स्वार्जित प्रतिरक्षा मिळवून देणे अगत्याचे असते. एकदा मिळविलेली प्रतिरक्षा ९०% व्यक्तींमध्ये १० वर्षे टिकून राहते. सैनिक जखम होण्याची शक्यता असणारे सर्व कामगार शेतकरी व शेतमजूर घोडे, गायी-म्हशी आदी प्राण्यांच्या नेहमी सानिध्यात असणारे मधुमेह असणारे धडपळणारी मुले मादक द्रव्यासक्ती असणारे या सर्वांनी स्वार्जित प्रतिरक्षात्मक इलाज करुन घेणे जरूरीचे असते. एकदा धनुर्वात झालेल्या व्यक्तींचाही समावेश यांत करणे आवश्यक आहे. कारण हा रोग प्रतिरक्षा उत्पन्न करीत नाही.


प्रतिजैव औषधे : पेनिसिलीन, टेट्रासायक्लीन, एरिथ्रोमायसीन ही प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे धनुर्वाताच्या सूक्ष्मजंतूंवर परिणाम करतात व म्हणून प्रतिबंधात्मक इलाजात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. पुष्कळ वेळा बेंझिल पेनिसिलिनाचे एकत्र अंतःक्षेपण (२ मोठी एकके) पुरेसे असते. मात्र पेनिसिलिनाची अधिहर्षता नसल्याची खात्री करून घेणे अगत्याचे असून ती असल्यास इतर दोन औषधे तोंडाने देता येतात.

चिकित्सा : चिकित्सेमध्ये दोन प्रमुख गोष्टींकडे विशेष लक्ष पुरवावे लागते : (१) धनुर्वाताचे विष केंद्रीय तंत्रिका तंत्राकडे जाण्याचे थोपविणे व (२) विषामुळे उद्भवलेल्या लक्षणांवर इलाज करणे. पहिला उद्देश साधण्याकरिता नष्ट ऊतक कर्तन हा इलाज विषोत्पादनास योग्य अशी परिस्थिती काढून टाकण्यास मदत करतो. संशयास्पद रोग्यासही ताबडतोब २०,००० आंतरराष्ट्रीय एकके प्रतिविष असलेलले अंतःक्षेपण नीलेतून द्यावे. अधिहर्षता नसल्याची खात्री करून घ्यावी व ती होऊ नये किंवा झाल्यास तिचा जोर कमी रहावा म्हणून अगोदर ॲड्रेनॅलिन व ॲट्रोपीन अंतःक्षेपणाने देतात. घोड्याच्या रक्तरसाची  अधिहर्षता असल्यास गोकुलीय प्राण्याच्या (मेंढीच्या) रक्तरसापासून बनविलेली किंवा शक्य असल्यास मानवी प्रतिरक्षात्मक ग्लोब्युलिनाची अंतःक्षेपणे द्यावीत. रोग्याला रुग्णालयात धनुर्वाताच्या खास विभागात ठेवावे. उत्तम शुश्रूषा, कमीत कमी प्रकाश व कमीत कमी उत्तेजके (आवाज वगैरे) यांमुळे झटक्यांचे प्रमाण कमी राहते. श्वसनक्रियेचे स्नायू ताठ बनून एकसारखे आकुंचनावस्थेत राहिल्यास श्वासोच्छवासात बिघाड होऊन मृत्यू येण्याचा संभव असतो. म्हणून वैद्यकीय मदत व विशिष्ट उपकरणे (कृत्रिम श्वसनयंत्र, श्वासनाल छिद्रिकरणाची उपकरणे) सतत जवळ व चटकन मिळण्याची व्यवस्था हवी. झटके कमी करण्याकरिता पॅरा-आल्डीहाइड, फिनोबार्बिटोन यांसारखी औषधे वापरतात. मात्र फार मोठ्या मात्रा (फिनोबार्बिटोन १८० मिग्रॅ. दर चार तासांत) द्याव्या लागतात. डायझेपामक्लोरप्रोमॅझीन यासारखी शांतकेही उपयुक्त असतात. अलीकडे डायझेपाम इतर औषधांपेक्षा अधिक गुणकारी असल्याचे आढळून आले आहे. सौम्य रोगात १० मिग्रॅ. अंतःस्नायुक अंतःक्षेपण दर चार तासांनी देतात. जोरदार रोगात नीलेतून २० मिग्रॅ. दर चार तासांनी देतात. कोणतेही विषारी परिणाम आढळून आलेले नाहीत.

घशात स्त्राव साचू न देण्याकडे लक्ष पुरवावे. रोगी बरा होऊन घरी जाण्यापूर्वी धनुर्वात विषभाचे अंतःक्षेपण द्यावे व पुढे ती अंतःक्षेपणे ठराविक कालावधीने चालू ठेवण्यास सांगावे. अलीकडील इलाजांत रोग्याला अतिघनता असलेल्या ऑक्सिजन कोठीत ठेवण्याचा इलाज यशस्वी ठरू लागला आहे.

रानडे, म. आ. भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय चिकित्सा : धनुर्वाताच्या रोग्याला प्रथम नारायण तेलासारख्या वातनाशक तेलाने अभ्यंग करून शेकून घाम काढावा. नंतर शिरःस्थानामध्ये वात प्रकुपित झाल्यामुळे संज्ञा नाहीशी झालेली असते म्हणून शिरःशुद्धी व्हावी याकरिता शिरोविरेचक द्रव्य नाकात घालावे. शिंका येऊन डोके शुद्ध झाल्यानंतर विदारीगंधादी काढा, मांसरस, दूध, दही यांनी सिद्ध तूप पाजावे म्हणजे वात न वाढता धनुर्वात कमी होतो. नंतर महास्नेह शास्त्रोक्त पद्धतीने औषधांनी सिद्ध करून पान, भोजन, नस्य, बस्ती, अभ्यंग इ. कार्यांकरिता त्याचा उपयोग करावा आणि योग्य त्या पद्धतीने शेकावे. धनुर्वात जोराचा असेल, तर त्या रोग्याला पुरुषभर खड्यात धान्याचे भूत किंवा रानशेणीचे चूर्ण गरम करून घालावे. त्यात त्याला तोंडापर्यंत पुरावे किंवा पुरुषभर लांबीच्या तापलेल्या दगडावर दारू शिंपडून पळसाची पाने अंथरून त्याला निजवावे. अंगावरही पळसाची पाने पांधरावी किंवा खिचडी, मांसाच्या वेशवार किंवा दूध यांनी शेकावे किंवा मुळा, एरंडमूळ इ. द्रव्यांनी सिद्ध केलेल्या तेलाने परिषेश करावा. भूक लागल्यानंतर आंबट दह्यामध्ये मिरी व वेखंड घालून प्यायला द्यावे. तसेच तेल, तूप, वसा किंवा मध द्यावे. कफपित्तांचा संबंध असेल, तर त्या दोषांची चिकित्साही करावी. वेग कमी झाल्यावर दुसरा वेग येण्याच्या अगोदर पुन्हा शिरोविरेचन द्रव्यांचे नस्य द्यावे. कोंबडा, खेकडा, काळा मासा, शुषुमार नावाचा मासा, डुक्कर ह्यांची वसा पिण्यास द्यावी. वातहर द्रव्यांनी सिद्ध केलेली दुधे किंवा जव, बोर, कळीथ, मुळा, दही, तूप, तेल ह्यांनी सिद्ध केलेली पेज द्यावी. जरूरीप्रमाणे एरंड तेलासारखे स्निग्घ विरेचन व बस्ती द्यावे. सूतिका भरणरस अर्धी गुंज, मोरावळा व आल्याचा रस ह्यांतून २४ तासांतून ७ ते ८ वेळा द्यावा.

पटवर्धन, शुभदा अ.


पशुंतील धनुर्वात : सर्व पाळीव पशूंना धनुर्वात प्राणघातक संक्रामक रोग होतो. पक्षी व कोंबड्या सामान्यतः या रोगास प्रतिरोघी आहेत. क्लॉस्टिडीयम टेटॅनी हे मनुष्यामधील रोगकारक सूक्ष्मजंतूच पशूंमध्येही आढळतात. हे सूक्ष्मजंतू गायीगुरे, शेळ्यांमेंढ्या व विशेषतः घोड्यांच्या आतड्यात वास्तव्य करून राहतात. त्यामुळे त्यामुळे त्यांच्या विष्ठेतून ते जास्त प्रमाणात जमिनीवर पडतात. अर्थातच ही खते वापरात असलेल्या जमिनीत ते मोठ्या प्रमाणावर आढळतात. बीजाणुरूपात ते वर्षानुवर्षे जिवंत राहू शकतात आणि माती लागलेल्या जखमांवाटे जनावरांच्या शरीरांत प्रवेश करतात.

घोड्यांमध्ये सर्वांत अधिक प्रमाणात तर गायीगुरांत व डुकरांत हा रोग कमी प्रमाणात आढळतो. मुंबईत ज्या वेळी घोडागाड्यांची संख्या बरीच होती त्या वेळी रस्त्यावर पडलेल्या लिदीने घोड्यांच्या जखमा दूषित होऊन घोड्यांमध्ये या रोगाचे प्रमाण बरेच आढळून येत असे. नाल सैल झाल्यामुळे त्यांचे खिळे वेडेवाकडे पायाच्या तळव्यात घुसल्यामुळे होणाऱ्या खोल, अरूंद जखमा, डांबरी रस्त्यांवर पाय घसरल्यामुळे गुडघ्यांना होणाऱ्या जखमा व गुदद्वाराजवळील जखमा यांमुळे घोड्यामध्ये रोगोद्भव होत असे. इतर पशूंमध्ये नाळ कीपम्याच्या वेळी, खच्चीकरणाच्या वेळी, कष्टमय प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या जखमा व मेंढ्यांमध्ये लोकर कापण्याच्या वेळी होणाऱ्या जखमा दूषित झाल्यास रोगोद्‌भव झाल्याचे दिसून येते. खोल व अरूंद जखमांत ऑक्सिजनचा अभाव असलेली परिस्थिती निर्माण होते व या सूक्ष्मजंतूंच्या वाढीस ती उपकारक ठरते.

रोगोद्‌भव व लक्षणे : एक ते तीन आठवड्यांच्या रोगपरिपाक कालानंतर लक्षणे दिसू लागतात. या रोगाचे सूक्ष्मजंतू रक्ताभिसरणाद्वारा शरीरात सर्वत्र न पसरता जखम झालेल्या ठिकाणीच त्यांची वाढ होते. ही वाढ होत असताना टेटॅनोस्पॅझ्मीन हे तंत्रिकेवर परिणाम करणारे बहिर्विष तयार होते व ते तंत्रिकांवाटे केंद्रीय तंत्रिका तंत्रापर्यंत पोहोचते. मेंदू व मेरुरज्जूतील तंत्रिका कोशिकांवरील जंतुविषाच्या परिणामामुळे स्नायूंना संवेदना पोहोचविणाऱ्या तंत्रिकेमध्ये विकृती होऊन स्नायूंचे शीघ्र कंपन व दृढपणा हे दोष उत्पन्न होतात. या कंपनात  स्पानायूंना प्रसरण पावण्यास फारसा वाव न मिळाल्यामुळे ते एकसारखे आकुंचन पावतात. रोगजंतूच्या विषाच्या तंत्रिका तंत्रावरील परिणामामुळे रोगोद्‌भव होतो. ज्या जनावरांना नैसर्गिक रीत्या या विषाची बाधा कमी प्रमाणात होते, त्यांना अर्थातच रोगही कमी प्रमाणात होत असल्याचे दिसते. घोड्याच्या व कोंबडीच्या वजनाच्या प्रमाणात तुलनेने ३,५०,००० पट विष कोंबडीला मारण्यासाठी लागते, तर कुत्र्याला ६०० पट लागते.

जनावर अतिसंवेदनशील होते. साध्या आवाजानेही दचकते, कान टवकारते व त्याची मुद्रा भयभीत दिसते. चेहरा व जबडा व यांच्या स्नायूंचे शीघ्र कंपन होऊन स्नायूंच्या आकुंचनामुळे व ते ताठर बनल्यामुळे तोंड घट्ट मिटले जाते. जोर लावून उघडण्याचा प्रयत्न केला, तरीही तोंड उघडता येत नाही. शेपटी कडक झाल्यामुळे ती हालविणे थांबते डोळ्यातील (विशेषतः घोड्याच्या) निमेषक पडदा (डोळ्याच्या आतील बाजूच्या कोनात असलेला त्वचेचा पडदा) बुबुळावर सरकलेला दिसतो, हे महत्वाचे लक्षण समजले जाते. पाठीच्या कण्याच्या स्नायुंचा संकोच झाल्यामुळे त्याला धनुष्याकृती बाक आलेला दिसतो. गायीगुरांमध्ये आतड्याच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे मलमूत्र तुंबून राहते व पोटात वायू कोंडला गेल्यामुळे पोट फुगते. तोंडातून लाळ पडते. अन्नपाणी गिळण्याचा प्रयत्न करताना ते नाकावाटे बाहेर येते. कुत्र्यामध्ये पुढील व मागील पाय एकमेकांपासून लांब फाकलेले दिसतात. पायाचे स्नायू ताठरल्यामुळे चालणे व वळणे कठीण होते व जनावर खाली पडते. सर्व जातींच्या पशूंमध्ये आढळणारी रोगलक्षणे जवळजवळ सारखीच दिसतात. घोडे व गायीगुरांमध्ये ८ ते १० दिवसांत मृत्यू ओढावतो, तर शेळ्या व मेंढ्या तिसऱ्या किंवा चवथ्या दिवशी मरण पावतात. श्वसन तंत्रातील स्नायू ताठर झाल्यामुळे श्वासरोध होऊन मृत्यू ओढवतो.

पशूंमध्ये होणाऱ्या इतर काही रोगांत उदा., कुचला खाण्यात आल्यास होणारी विषबाधा, मस्तिष्क वा परिमस्तिष्क ज्वर (मेंदूच्या आवरणाला आलेल्या दाहयुक्त सुजेमुळे येणारा ज्वर) या विकारांमध्ये धनुर्वाताप्रमाणेच रोगलक्षणे दिसतात. या रोगांपासून अलगता सिद्ध करणारे निदान करणे रोगाच्या सुरुवातीस शक्य आले नाही, तरी एक दोन दिवसांनंतर धनुर्वाताची रोगलक्षणे अधिक स्पष्ट झाल्यावर होऊ शकते.


चिकित्सा : रोगकारक सूक्ष्मजंतू जखम झालेल्या ठिकाणी वाढत असल्यामुळे जखमांची शुश्रूषा महत्त्वाची ठरते. क्वचित जखम शस्त्रक्रियेने उघडी करून तिच्या सर्व भागात ऑक्सिजन पोहोचेल अशी व्यवस्था करून दाहक औषधे लावून तेथील जंतूंचा नाश करतात. जखमेत ऑक्सिजन खेळता रहावा यासाठी पोटॅशियम परमँगॅनेट व हायड्रोजन पेरॉक्साइड यांसारख्या ऑक्सिजन पुरवणाऱ्या औषधांनी ती स्वच्छ करतात. प्रखर प्रकाश किंवा गोंगाट यांनी जनावर उद्दीपित होऊ नये यासाठी त्याला शांत व अंधाऱ्या जागी मोकळे सोडतात. क्लोरल हायड्रस व मॅग्नेशियम सल्फेट यांसारखी शामक औषधे देतात. अलीकडे क्लोरप्रोमॅझीन यासारखी औषधे बरीच वापरात आहेत. आजारी जनावरास ताबडतोब धनुर्वातविरोधी रक्तरस योग्य मात्रेमध्ये देतात. घोड्याला ३ लाख आंतरराष्ट्रीय एककांची ३ अंतःक्षेपणे १२ तासांच्या अंतराने द्यावी लागतात.

प्रतिबंधक उपाय : ज्या भागामध्ये हा रोग पशूस्थानिक (एखाद्या भागात रोगकारक जंतूंच्या अस्तित्वामुळे तेथील पशूंमध्ये रोग वारंवार उद्‌भवण्याची शक्यता असणे) स्वरूपात असतो तेथील जनावरांना धनुर्वात विषाभ टोचतात. शर्यतीच्या घोड्यांना विषाभ टोचण्याची प्रथा आहे. तसेच निर्बिजीकरण, शेपटी कापणे यांसारख्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी किंवा मेंढ्यांची लोकर कापण्याआधी धनुर्वातविरोधी रक्तरसाची अंतःक्षेपणे देतात. घोड्याला १,५०० ते ३,००० व कोकरांना १०० ते १५० आंतरराष्ट्रीय एककांची अधस्त्वचीय (त्वचेखाली) अंतःक्षेपणे देतात. यामुळे तात्पुरती प्रतिरक्षा उत्पन्न होऊन ती १० ते १४ दिवस टिकते. विषाभ टोचल्यावर १० ते १४ दिवसांमध्ये प्रतिरक्षा निर्माण होते व ती एक वर्षभर टिकते. धनुर्वातविरोधी रक्तरस देतेवेळी काही जनावरांत येणारी अधिहर्षता लक्षात घेणे जरूर असते.

गद्रे, य. त्र्यं.

संदर्भ : 1. Alstead,S. Girdwood, R.H. Textbook of Medical Treatment, Edinburgh, 1974.

            2. Blood, D.C. Henderson, J.A. Veterinary Medicine, London, 1973.

            3. Harvey, A.M., Ed. Principles and Practice of Medicine, New Delhi, 1974.

            4. Miller, W.C West, G.P. Black’s Veterinary Dictionary, London, 1973.

            5. Scott, R. B., Price’s Textbook of Practice of Medicine, London, 1973.

            6. Vakil, R.J., Ed. Textbook of Medicine, Bombay, 1969.